Halloween Costume ideas 2015

सऊदी अरब मधील यादवी शिगेला

- एम.आय.शेख

मागच्या मे महिन्यामध्ये ट्रम्प यांच्या भेटीनंतर सऊदी अरबमध्ये जी खळबळ अपेक्षित होती ती त्यांच्या भेटीनंतर लगेच सुरू झाली. ट्रम्प यांचा दौरा संपल्या-संपल्याच जूनमध्ये क्राऊन प्रिन्स मुहम्मद बिन नाफे यांना पायउतार व्हावे लागले. त्यांच्या जागी राजे सलमान यांचे पुत्र मुहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद यांची निवड करण्यात आली. स्थानिक सऊदी विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेले व धाराप्रवाह इंग्रजी बोलणारे क्राऊन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान हे पाश्‍चिमात्य जीवनशैलीकडे आकर्षित होणारे व्यक्तिमत्व आहे. क्राऊन प्रिन्स बनल्याबरोबर त्यांनी कुवैतवर बहिष्कार टाकला. ट्रम्पनी ईराणला वेगळे पाडण्याचा जो कानमंत्र सऊदी अरबला दिला होता त्यावर लगेचच अंमलबजावणी सुरू केली.
   
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तर या सगळ्या घडामोडींनी कळसाध्याय गाठला. 48 तासाच्या आत तीन मोठ्या घटना घडल्या. पहिल्या घटनेत लेबनॉनचे प्रधानमंत्री शाद अल हरीरी यांनी रियादमध्ये येऊन आपल्या पदाच्या राजीनाम्याची घोषणी केली. त्यासाठी त्यांनी लेबनान मधील इराण समर्थक शियांचा सशस्त्र गट हिजबुल्लाहकडून आपल्या जीवनाला धोका असल्याचा व इराण लेबनानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला. दुसर्‍या घटनेत एक (संशयीत) हेलिकॉप्टर दुर्घटनेत राजपुत्र मंजूर बिन मक्रान यांच्या सहित 8 उच्च पदस्थ लष्करी अधिकार्‍यांचा मृत्यु झाला. तिसर्‍या घटनेमध्ये खरबपती राजपुत्र वलिद बिन तलाल यांच्यासह 11 उच्च पदस्थांना अटक करण्यात आली. यात सऊदी सरकारचे अनेक माजीमंत्री, सरकारी अधिकारी व राजपुत्रांचा समावेश होता. विशेषबाब म्हणजे हे सर्व लोक सध्या असलेल्या शासनाच्या विरोधात नव्हते, उलट त्या व्यवस्थेचाच एक भाग होते. विनोद म्हणजे या
सर्वांना भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली. विशेष बाब म्हणजे सऊदी अरब सरकारमध्ये भ्रष्टाचार या शब्दाची व्याख्याच करण्यात आलेली नाही. त्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी कुठलीच संस्था अस्तित्वात नाही. राजे सलमान यांनी तात्काळ प्रभावाने एक आदेश काढून भ्रष्टाचार विरोधी समितीची रचना केली व मुहम्मद बिन अजीज यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आणि लगेच या 11 लोकांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले सर्व लोक अब्जावधीश व सऊदी परिवाराशीच संबंधित आहेत. मात्र सलमान यांचे पुत्र मुहम्मद बिन सलमान यांना भविष्यात विरोध करू शकतील या संभावनेला लक्षात घेऊन या सर्वांना अटक करण्यात आलेली आहे. या तीन घटनांमुळे फक्त सऊदी अरब मध्येच नव्हे तर मध्यपुर्वेच्या खाडी देशात खळबळ उडालेली आहे. सऊदी अरब हे मक्का मदिन्यामुळे मुस्लिम जगताच्या श्रद्धेचे केंद्र असल्यामुळे व जगातील प्रमुख खनीज तेल उत्पादक देश असल्यामुळे सगळ्या जगात सऊदी अरबमधील घटनांमुळे चिंता आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. सऊदी अरब आणि इराणमध्ये युद्ध होण्याच्या शक्यतेमुळे अवघे जग चिंतीत आहे. या पार्श्‍वभूमीवर सऊदी अरबमधील या घटनाचक्राचा मागोवा घेणे अप्रस्तुत होणार नाही.
सऊदी अरबचा आधुनिक इतिहास
    सऊदी अरबचे मूळ नाव हिजाज. सहाव्या शतकामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जन्माने हा देश नावारूपाला आला. परंतु या देशाच्या आधुनिक इतिहासाची सुरूवात सध्या अस्तित्वात असलेल्या सऊद घराण्याच्या सत्ता ग्रहणापासून होते. त्यापुर्वी हा देश तुर्क ऑटोमन साम्राज्य (खिलाफत-ए-उस्मानिया)च्या नियंत्रणात होता. पहिल्या महायुद्धात तुर्की खलीफाने जर्मनीची साथ दिल्याने 1919 मध्ये युद्ध समाप्तीनंतर या खिलाफतीला दोस्त राष्ट्रांनी खालसा केले. ब्रिटीश गुप्तहेर हैम्फरे आणि सैन्य कमांडर टी.ए. लॉरेन्स यांच्या मध्यस्तीने हिजाजची सत्ता सऊदी घराण्याच्या हाती देण्यात आली. ही सत्ता मिळावी म्हणून सऊदी घराण्याने आपल्याच नागरिकांचा मोठ्या प्रमाणात नरसंहार केला होता.
    टोळीवाले ते राजे महाराजे
    सऊदी घराणे हे विसाव्या शतकातील अरबस्थानातील एक दबंग घराणे म्हणून ओळखले जात होते. खनीज तेलाचा शोध लागण्यापुर्वी बकर्‍या आणि ऊंट चारून स्वतःची उपजीविका चालवत होते. मक्का मदिन्याला भेट देणार्‍या हाजींची व्यवस्था करण्याइतपत ही त्यांची आर्थिक क्षमता नव्हती. म्हणून हैद्राबादचा निजाम तो खर्च व हाजींच्या सेवेसाठी तरूण खादेमीन (सेवक) दरवर्षी हैद्राबादहून पाठवित होता. मात्र 1938 साली तेलाचा शोध लागला आणि टोळीवाल्यांचे रूपांतर राजा महाराजामध्ये झाले. त्यांनी सत्ता हाती येताच सर्व प्रथम आपल्या देशाचे नाव बदलून आपल्या घराण्याच्या नावावर ठेवले. मक्का आणि मदिना सारखी महत्वाची धर्मस्थळे सऊदी अरबमध्ये असल्यामुळे त्या देशातील बहुतेक नागरिक धर्म पारायण असे होते व आहेत. सऊद खानदानाचा रानटी लौकिक पाहता त्यांना धर्मसत्तेच्या मान्यतेची गरज होती व त्याच काळात वहाबी विचारधारेला राजाश्रयाची गरज होती. म्हणून वहाबी विचारधारेच्या पाठिंब्यावर रानटी सऊद टोळीचे सभ्य सऊद घराण्यामध्ये रूपांतरण झाले.
    सुबत्ता आली की त्यासोबत अनेक चांगल्या गोष्टी आपोआप येतात. सऊदी अरबमध्ये तर प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांच्या सदक्यात प्रचंड अशी सुबत्ता आली व त्या सुबत्तेचा उपयोग त्यांनी लोक कल्याणासाठी केला. ही सऊदी घराण्याची जमेची बाजू.
    असे म्हंटले जाते की सऊदी अरबमध्ये असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी त्यांच्या बंदरातून एकही तेलाचे जहाज जात नाही व खानदानात एक तरी राजपुत्र / राजकन्या जन्म घेत नाही. आजमितीला सऊद खानदानामध्ये 20 हजार पेक्षा जास्त सदस्य आहेत. खनिज तेलापासून मिळालेल्या प्रचंड संपत्तीतून सऊदी घराण्याने देशामध्ये मोठ्या प्रमाणात मुलभूत सोयीसुविधा उभ्या केल्या. वाळवंटाचे नंदनवन केले. त्यासाठी बिन-लादेन बांधकाम क्षेत्रातील कंपनीने मोठी भुमिका बजावली. त्याच बिन लादेन ग्रुपचा चेअरमन या अटक झालेल्या (11) लोकांपैकी एक आहे. पेट्रो डॉलरचा ओघ इतका प्रचंड होता की, बघता-बघता सऊदी अरब संपन्न राष्ट्र म्हणून उदयास आले. टॅक्स फ्री कंट्री म्हणून त्याचा लौकिक झाला. अविरत येत असलेल्या संपत्तीचा काही वाटा सऊद घराण्याने जनतेला अनेक मोफत सोयीसुविधा देण्यासाठी खर्च केला. जनता सुखी असेल तर राज्य कोण करत आहे याच्याकडे लक्ष देत नाही. 2011 साली ट्युनिशीया मधून सुरू झालेल्या राजेशाही विरोधी जनआंदोलनाची ज्याला ’अरब स्प्रिंग’ म्हणून ओळखले जाते, ची झळ म्हणूनच सऊदी अरेबियाला बसली नाही.
अन् परिस्थिती बदलली
    मात्र 2013 नंतर परिस्थिती बदलली. अमेरिकेचे खनिज तेल अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले व तेलाच्या किमती कोसळल्या. 150 प्रतीबॅरल तेल अवघे 35 डॉलर प्रति बॅरल पर्यंत उतरले व त्याची झळ सऊदी अरबला बसू लागली. कामगारांचे वेतन सुद्धा देणे अवघड झाले. म्हणून सऊदी अरबने मोठ्या प्रमाणात कामगार कपात केली. आपल्या देशाने सुद्धा तेलाच्या बाबतीत एकाच देशावर अवलंबून राहण्याचे धोरण बदलून अमेरिकेकडून तेल घेतले. ज्याच्या चाचण्या ओरिसामध्ये सुरू आहेत.
    सऊदी अरबच्या राजघराण्यातील व्यक्ती प्रचंड उधळपट्टी साठी ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील मिरज आणि तेलंगणातील हैद्राबादमधील बारकस विभाग या अरबी शेखांचे आवडते पर्यटन क्षेत्र. या ठिकाणी लाखो डॉलर उधळून हे लोक कोवळ्या मुस्लिम मुलींशी इस्लामच्या दृष्टीकोणाने निषिद्ध (हराम) असलेला मुता मॅरेज (निश्‍चित कालावधीसाठीचा विवाह) करतात व करारप्रमाणे वेळ झाली की तलाक व रूपये मुलींच्या गरीब माता पित्यांना देऊन निघून जातात. कित्येक अरब अशा मुलींना सोबत घेऊन जातात व घरकामासाठी जुंपतात. गेल्या आक्टोबरमध्ये एकट्या हैद्राबादमधून 48 मुलींची सुटका केलेली घटना ताजीच आहे.
    असो! तेलाचे भाव पडल्यामुळे सऊदी सरकारला नागरिकांवर टॅक्स लावावा लागला. कालपर्यंत स्वतः हाजींची सेवा करणारे सऊदी खानदान, हाजींवर कर लावू लागले. या वर्षी प्रत्येक हाजीला 2 हजार रूपये हज टॅक्स द्यावा लागला. त्यामुळे शानशौकीत जगण्याची सवय झालेल्या सऊदी नागरिकांना टॅक्स भरणे जीवावर आल्यासारखे वाटू लागले. स्मृतीभ्रंशाने पीडित राजे सलमान यांच्यामध्ये या बदलत्या परिस्थितीशी तोंड देण्याचे सामर्थ्य नाही. म्हणून त्यांनी दुसर्‍या राजपुत्राचा हक्क डावलून स्वतःच्या मुलाला क्राऊन प्रिन्स म्हणून गादीवर बसविले. क्राऊन प्रिंस व ट्रम्प यांचे यहुदी जावाई जेराड कुश्‍नर हे दोघे मित्र आहेत.  क्राऊन प्रिंन्सचा हुद्दा मिळाल्याबरोबर त्यांनी पहिला दौरा अमेरिकेचा केला व मुस्लिमांचे प्रखर आलोचक ट्रम्प यांना आपल्या देशात पायधूळ झाडण्यासाठी, आपले मित्र जेराड कुश्‍नर यांच्या मार्फतीने राजी केले. त्यांच्या भेटीच्या मोबदल्यात 2008 पासून मंदीमुळे आर्थीक अडचणीत सापडलेल्या अमेरिकेच्या हत्यार कंपन्यांचे 300 कोटींचे हत्यार खरेदी करण्याची तयारी दर्शविली. ठरल्याप्रमाणे मे महिन्यात ट्रम्प आले व हत्यारांचा सौदा झाला. येणेप्रमाणे सऊदी अरब व अमेरिका यांच्यामधील ऐतिहासिक मधूर संबंध शिखरावर जाऊन पोहोचले.
    आर्थिक व सामाजिक बदल
    सऊदी अरबची एकूण लोकसंख्या 3 कोटी आहे.  त्यांच्यापैकी 60 टक्क्याहून जास्त संख्या 35 वर्षाच्या आतील आहेत. त्यांच्या सेवेला 80 लाख विदेशी नागरिक आहेत. हल्ली आपण वाचतो की सऊदी अरबमध्ये महिलांना ड्रायव्हींगची, स्टेडियमध्ये जाऊन सामने पाहण्याची व एकट्याने मॉलमध्ये शॉपिंग करण्याची परवानगी मिळणार आहे. या मागे पाश्‍चिमात्य जीवन व्यवस्थेने प्रभावित असलेले क्राऊन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान हे आहेत. अमेरिकेला आवडत नसलेल्या महिलांवरील इस्लामी प्रतिबंधांना दूर सारण्याचा त्यांचा हेतू आहे. प्रश्‍न महिलांच्या ड्रायव्हींगच्या परवानगीचा नाही. ढीगभर ड्रायव्हर पदरी असल्यामुळे त्यांना त्याची गरजही नाही. महिलांना ड्रायव्हींगचा अधिकार देण्यामागे इस्लामची महेरमची व्यवस्था उध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे.
    सऊदी अरब समाजाचा मोठा भाग या सुधारणांच्या विरोधात आहे. त्यात या अकरा प्रभावशाली लोकांच्या आकस्मीक अटकेमुळे सऊदी अरबमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरलेला आहे. त्यात कडी म्हणजे अनअनुभवी क्राऊन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान यांनी यमनच्या हैती विद्रोहीवर बॉम्बफेक करून, सीरियामध्ये हस्तक्षेप करून, जॉर्डनच्या हिज्बुल्लाहला डिवचून, कुवैतवर बहिष्कार करून आणि इराणचा सरळ विरोध पत्करून शेजारच्या देशांमध्ये आपले अनेक शत्रू तयार करून घेतलेले आहेत.
    सऊदी अरबच्या या अस्थिर परिस्थितीमुळेच तेलावे भाव भडकण्यास सुरूवात झालेली आहे. आपला मागचा अर्थसंकल्प 50 डॉलर प्रतिबॅरल किंमत ठरवून तयार करण्यात आलेला आहे. सध्या भाव 63 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आपल्या राष्ट्रीय आर्थिक गणितावर ही या घडामोडींचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
    जगात अस्तित्वात असलेल्या 56 मुस्लिम देशांपैकी फक्त सऊदी अरबमध्ये काही प्रमाणात सामाजिक व आर्थिक क्षेत्रामध्ये इस्लामी कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जात होते. सुधारणेच्या नावाखाली त्या कायद्याला संपवून सऊदी अरब सुद्धा अमेरिका प्रणित वन वर्ल्ड ऑर्डरखाली आणण्याचा क्राऊन प्रिन्सचा डाव आहे, अशी मुस्लिम जगात व्यापक भावना आहे.
न्यूयॉर्कपेक्षा 33 पट मोठे शहर
    तेलाच्या आमदनीवर अवलंबून न राहता इतर आधुनिक आर्थिक स्त्रोतातून धन कमावण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून जगातील सर्वात मोठे शहर सऊदी अरबमध्ये नव्याने वसविण्याचा निर्णय क्राऊन प्रिन्स यांनी घेतलेला आहे. याची घोषणा त्यांनी 9 नोव्हेंबरला रियादमध्ये फ्युचर इनिशिएटिव्ह कॉन्फ्रन्समध्ये केली. यात जगातील सर्वच ख्यातनाम कंपन्यांचे जवळ-जवळ 2 हजार सीईओ हजर होते. न्यूयॉर्कपेक्षाही 33 पट मोठे हे शहर असेल. या शहराचा आकार 10 हजार 300 वर्ग मिल एवढा असेल.
    या शहरात जगातील सर्वच मोठ्या व्यापारी कंपन्यांचे कार्यालय आणि औद्योगिक केंद्रे असतील. स्पष्ट आहे अक्षय उर्जेवर आणि व्याजावर चालणारे हे शहर असेल. ज्यात अनेक मल्टीप्लेक्स असतील व जगातील सर्व चित्रपटे या ठिकाणी दाखविली जातील. या शहराच्या निर्माणासाठी 500 अब्ज डॉलर गुंतविण्याची घोषणा क्राऊन प्रिन्स यांनी भरगच्च पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. या शहरासह सऊदी अरबच्या इतर महत्वाच्या शहरामध्ये इजराईलचे स्टोअर उघडण्याची व इजराईलला राजकीय मान्यता देण्याचीही क्राऊन प्रिन्सची तयारी आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. एकंदरित क्राऊन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान यांनी सुधारणेच्या नावाखाली सऊदी अरबचा दुबई करण्याचा घाट घातलेला आहे. त्यांनी आपल्या वेगवेगळ्या धाडशी निर्णयाने समग्र मध्यपुर्वेला अस्थिर करून टाकलेले आहे व इस्लामचे मानचिन्ह असलेल्या सऊदी अरबचा प्रवास पश्‍चिमेच्या म्हणजे उलट्या दिशेने सुरू केलेला आहे.     
    क्राऊन प्रिन्सच्या या धाडसाला सऊदी अरबच्या तरूणांचा जरी पाठिंबा असला तरी जेष्ठांचा विरोध आहे. या सर्व घडामोडींमुळे सऊदी अरबमध्ये एक अभूतपूर्व अशी अस्थिर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमेरिकेच्या पाठिंब्यावर क्राऊन प्रिन्स यांनी मोठे धाडस केलेले आहे. काही महिन्याच्या आतच कळेल की त्यांचे धाडस यशस्वी होते का बुमरँग होऊन अंगाशी येते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget