- बशीर शेख
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवरील सामूहिक अत्याचार व हत्या प्रकरणी तीन नराधमांना विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे आणि शिक्षाही झालेली आहे. कोपर्डी येथील घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. सर्वच स्तरावर या घटनेतील आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली जात होती. अखेर या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला असून तिन्ही आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (25), संतोष भवाळ (30) आणि नितीन भैलुमे (23) अशी या दोषींची नावे आहेत. 13 जुलै 2016 कोपर्डीत राहणारी 15 वर्षांची मुलगी नववीत शिकत होती. पीडित मुलीवर नराधमांनी 13 जुलै 2016 रोजी संध्याकाळी अत्याचार केला. पीडित मुलगी आजोबांच्या घरी जात असताना नराधमांनी दुचाकीवरुन तिचा पाठलाग केला आणि गावातील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली. वरील तिघांना झालेल्या शिक्षेबद्दल समाजातून समाधानाची भावना व्यक्त होत आहे. हे चांगले आहे. अशा नराधमांना अशाच कठोर शिक्षा तीव्र गतीने होणे समाजाला निरोधी ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. या निकालाचे स्वागत करतांना अशाच इतर घटनांमध्ये मात्र निकाल वेळेवर लागत नाही. याची खंत व्यक्त केल्याशिवाय रहावत नाही. मग ती पुण्यात जून 2014 मध्ये झालेली मोहसीन शेख या निरपराध तरूणाची हत्या असो का बाबरीतील अख्लाकची हत्या असो की हरियाणाच्या पैलूखानची हत्या असो. या हत्यांचा निकालही याच तीव्र गतीने लागणे न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेच्या सिद्धांतास अनुरूप असे आहे. मात्र असे होतांना दिसत नाही. मोहसीन शेखची हत्या होवून साडेतीन वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. याचा निकाल दृष्टीक्षेपात सुद्धा नाही. कोपर्डी खटल्यात तावातावाने युक्तीवाद करणारे प्रसिद्ध फौजदारी वकील उज्ज्वल निकम यांनी मात्र मोहसीन शेख याच्या खटल्यातून अंग काढून घेतलेले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत की, कुठल्याही लोकशाहीची यशस्वीता त्या देशातील अल्पसंख्यांक व इतर कमकुवत समाज घटक किती सुरक्षित आहे, यावर अवलंबून आहे. कोपर्डी खटल्याच्या निकालाचे स्वागत करतांना मोहसीन शेख व तत्सम निरपराध लोकांच्या हत्येच्या खटल्याचा निकालही लवकर लागावा एवढीच आशा करणे आपल्या हातात आहे.
Post a Comment