Halloween Costume ideas 2015

वांझोटी

 नगीना नाज मन्सूर सखरकर
नवी मुंबई 9769600126

वांझोटी हा एक असा शब्द आहे जो निपुत्रिक स्त्रियांना उद्देशून बोलला जातो. हा शब्द पुत्रप्राप्ती न झालेल्या महिलांच्या कानावर पडताच हातोड्यासारखा त्यांच्या हृदयावर आघात करतो. अल्लाह रब्बुल इज्जतने सृष्टी तयार केली व त्यात सर्वप्रथम ज्या जोडप्याला पाठविले त्यांचे नाव आदम आणि हव्वा अलै. असे होते. आदमची निर्मिती अल्लाहने मातीपासून केली तर हव्वाची निर्मिती आदमच्या फासळ्यांपैकी उजवीकडच्या तेराव्या फासळीपासून केली अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे. मात्र कुरआनमध्ये याचा तपशील नमूद नाही. त्यात फक्त एवढे म्हटलेले आहे की, ”लोकहो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचरिणी बनविली आणि या एकाच जोडप्यापासून समस्त  पुरूष व स्त्रिया जगात पसरविल्या” (संदर्भ : सुरे निसा आयत नं.1).
   
पुरूषाच्या विर्याचा एक थेंब अन्य ठिकाणी पडल्यास तो नजासत (नापाक) मानला जातो. परंतु मनुष्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये याच विर्याच्या एका थेंबाचे अनन्यासाधारण महत्व आहे. ते जेव्हा स्त्रीच्या गर्भाशयात पडते तेव्हा त्यापासून मानवाची निर्मिती होती. सृष्टीमध्ये निर्मितीची ही प्रक्रिया हजारो वर्षांपासून सुरू आहे. मात्र रहेमत-ए-खुदावंदी (अल्लाहची कृपा) ने कुठल्या स्त्रीच्या नशीबात काय लिहिले आहे? हे कोणालाच माहित नसते. वेळ आणि काळानुसार प्रत्येक स्त्रीच्या नशिबात मुलं असतातच असं नाही. कुरआनने म्हटलेले आहे, ’‘आम्ही कोणाला मुलं देतो, कोणाला मुली, कोणाला दोन्ही तर कोणाला काहीच देत नाही.” प्रत्येक मादीला आई बनण्याचे स्वप्न असते. आईपण तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान असतो. तिचे हेच रूप तिच्या अस्तित्वाला खर्‍या अर्थाने न्याय देते. मात्र काही स्त्रियांच्या नशिबात आई बनणे राहत नाही. अत्यंत प्रगत अशा वैद्यकीय उपचारानंतर सुद्धा अनेक स्त्रीया अशा असतात की, ज्यांना शेवटपर्यंत मूल होऊ शकत नाही.
    पुरातन काळ असो की आधुनिक काळ. जर एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर पुरूषाला कोणी दोष देत नाही. सगळ्यांच्या नजरा स्त्रीकडे वळलेल्या असतात. तिलाच दोष दिला जातो. समाजात अनेक अज्ञानी आणि उतावीळ महिला तर अशा असतात की, लग्न झाल्या -झाल्या नवरीच्या गरोदरपणाची बातमी कधी येते, याकडे लक्ष ठेवून असतात. जणू काही येणारे मूल त्यांच्याच घरी येणार आहे. लग्न होवून काही काळ लोटल्यावरसुद्धा नवरीच्या गरोदरपणाची बातमी न आल्यास त्या महिलेबद्दल उलट-सुलट बातम्या पसरविल्या जातात.
    ज्या मुली एकत्रित कुटुंबात वाढतात. लहान भाऊ-बहिणींसोबत जगण्याचा त्यांना अनुभव असतो. शेजार-पाजारच्या मुलां-मुलींबरोबर मोठ्या होतात, अशा मुलींना जर लग्नानंतर लवकर मुलाची चाहूल नाही लागली तर अगोदरच त्यांचे मन त्यांना आतल्या आत खात असते. त्या मुली रडून-रडून अल्लाहकडे मुलबाळ व्हावे, यासाठी दुआ मागत असतात. त्यांना इतर लोकांच्या प्रश्‍नार्थक नजरांना सामोरे जाण्याचे धैर्य होत नाही. अनेक महिला तर तिला वांझोटी म्हणायला सुरूवात देखील करतात आणि ’हिला मूल होणारच नाही’ असा निर्णय देवून मोकळ्या होतात. काही कुटुंब तर एवढी मागास विचारसरणीची असतात की, अशा मूलबाळ न झालेल्या महिलांना आपल्या घरातील सुनांच्या जवळसुद्धा जाऊ देत नाहीत. एखादी नवीन लग्न झालेली मुलगी घरात आली तर तिच्यावर या महिलेची छायासुद्धा पडू देत नाही. तिला स्पर्श करू देत नाही. त्यांचा असा समज असतो की, निपुत्रिक महिलेने स्पर्श केल्याने नवीन नवरीलासुद्धा कदाचित मूल होणार नाही. गरोदर महिलांच्या संपर्कातसुद्धा त्यांना येवू दिले जात नाही. जणुकाही निपुत्रिक महिला गरोदर स्त्रियांच्या संपर्कात आल्या तर त्यांच्या उदरामधील गर्भावर विपरित परिणाम होईल. समाजातील अशा वागणुकीचा त्यांना किती त्रास होत असेल? याचा कोणीही विचार करीत नाही. अशा महिला एकलकोंड्या होवून जातात. कुठल्याही समारंभात जाण्याचे टाळत असतात. वरून जरी त्या शांत वाटत असल्या तरी आतल्या आत अस्वस्थ असतात. त्या स्वत:ला व स्वत:च्या नशिबाला दोष देत असतात. त्यांच्या उदास नजरेमधून त्यांच्या वेदनांचा सहज अंदाज लावता येतो.
    कित्येकवेळा असेही लक्षात आलेले आहे की, लग्नानंतर नैसर्गिकरित्या 10-10, 20-20 वर्षानंतर मुल-बाळ झालेले आहे. परंतु भारतीय परिपेक्षामध्ये इतकी वाट पाहण्याची कोणाची तयारी नसते. या दहा-वीस वर्षाच्या काळामध्ये मुलं-बाळ न झालेल्या महिलांचा किती मानसिक छळ होतो हे त्याच जाणो. अनेकवेळा पुरेशी वाट न पाहता पुरूष दुसरे लग्न करतात. असे करतांना त्यांच्या लक्षात येत नाही की अल्लाहच्या मनात आले तर दुसरी काय, तीसरी किंवा चौथी जरी केली तरी मुलबाळ होणार नाही. अनेकवेळा पुरूषांमध्ये वंध्यत्व असते. परंतु या सत्याचा कोणीच स्वीकार करीत नाही. साधारणपणे आपण कोणाच्या दु:खाला हलके जरी करीत नसलो तरी किमान त्यांना जास्तीचे दु:ख देवू नये, एवढी सामान्य समज अनेक लोकांना नसते. मुलांच्या बाबतीत कुरआनने म्हटलेले आहे की, ’औलाद नेमत भी है और फितना भी.’ अर्थात मुलबाळ असणे एका प्रकारे दैवी आशिर्वादही आहे आणि परीक्षा ही. कारण अनेक लोकांना आपण पाहतो त्यांच्या मुलांच्या हातूनच त्यांचे कुटुंब उध्वस्त होतात. अनेक नालायक मुलं मोठी झाल्यावर आपल्या आई-वडिलांना त्रास देतात, प्रसंगी खून करतात. या सगळ्या घटनांमधून कोणीच बोध घेत नाही. फक्त निपुत्रिक स्त्रियांना वांझोटी म्हणून हिनविणे ही आता समाजाची रीत झालेली आहे.
    आता वेळ आलेली आहे की, निपुत्रिक महिला सुद्धा महिलाच असतात. त्यांनाही भावना असतात आणि त्यांच्या भावनांचीही कदर करणे आपले कर्तव्य असते. या गोष्टीचे भान ठेवावे. शेवटी अल्लाहकडे एवढीच प्रार्थना आहे की, अल्लाहने आपल्या सर्वांना चारित्र्यवान आणि समजदार व आरोग्यसंपन्न संतती द्यावी. आमीन. 

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget