Halloween Costume ideas 2015

भारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय?

भारतीय मुस्लिम नेहमीच प्रादेशिक होता. इस्लामच्या आगमनापासूनच त्यानं स्थानिक सहजीवन व संस्कृती स्वीकारलं. कोकण व केरळमध्ये आलेल्या अरब व्यापाऱ्यांनी स्थानिक स्त्रियांशी लग्ने केली. स्त्रिया आपल्या सांस्कृतिक व सामाजिक परंपरा घेऊन तिकडे गेल्या. इथल्या विवाहित स्त्रिया पतीसाठी मंगळसूत्र, सिंदूर आणि जोडवी परिधान करतात. हे तत्कालीन व्यापारी अरबांसाठी चकीत करणारे होते. त्यांनी त्याची कधीही मनाई केली नाही किंवा त्याला गैरइस्लामिकही म्हटले नाही.
आजही कोकणात स्थानिक तेहजीब आणि इस्लामचा सुरेख संगम आढळतो. अब्दुल कादर मुकादम यांनी यावर सविस्तर लिहिलेलं आहे. बंगालमध्ये मुस्लिम ख़वातीन सिंदूर भरतात तर काही टिकली लावतात. तिथल्या शहरी भागात अबाया घालणाऱ्या मुली आढळतात. मात्र त्यांची जुबान, तहेजीब, परंपरा, सण-उत्सव स्थानिक आहेत. इतकंच नाही तर हिंदू आणि मुस्लिम असा संस्कृती-संगम यांच्यात आढळतो. बांगलादेशात आजही मुस्लिम स्त्रिया सिंदूर भरतात. तसेच पाकिस्तानच्या फॅशन वर्ल्डमध्ये टिकली लावणे सुंदरतेचं प्रतीक मानलं जातं. जीओ टीवीच्या अनेक सोप ओपेरात याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.
ओरिसामधील मुस्लिम उडिया बोलतात. तसेच मलयाळी स्थानिक बोली बोलतात. तामिळनाडु, आंध्र, कर्नाटकात प्रादेशिक भाषा, परिधान, संस्कृती, खान-पान स्वीकारतात. महाराष्ट्रातही मुस्लिम स्थानिक संस्कृतीला चिकटून आहेत. भाषा, परंपरा, सण उत्सवात प्रादेशिकता आढळते. औरंगाबादसह मराठवाडा निजामी संस्थानाचा भाग असल्यानं तिथं उर्दू भाषा आणि संस्कृती नांदते. अगदी त्याच पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रात मराठी संस्थानं असल्यानं तिथं मराठीपणा आढळतो. जसे इथले मुस्लिम मराठीपणा सोडू इच्छित नाहीत तसंच मराठवाड्याचे उर्दू मिजाज सोडू इच्छित नाहीत.
अलीकडे मराठवाड्यात मराठी बोलणाऱ्या मुस्लिमांचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तो मराठीचा वाचक पूर्वीपासूनच होता पण बोलीत मात्र अळखडत. दिव्य मराठी आल्यापासून मराठवाड्यात मुसलमानांत मराठीचा व्यवहार वाढल्याचं माझ्या एका पत्रकार मित्राने सांगितलं. विशेष म्हणजे इथले बहुसंख्य मुस्लिम मध्यमवर्गीय व कामगार गटात मोडणारे आहेत.
जुन्या भागात ‘औरंगाबाद टाइम्स’, ‘रहेबर’ ही उर्दू दैनिकं हॉटेल, टपरी, दुकानात वाचली जातात. त्यामानानं त्याला खरेदी करणारे मात्र कमी आहेत. याउलट लोक मराठी दैनिक खरेदी करून वाचायला पसंती देतात. मराठवाड्यात हिंदूंच्या सण-उत्सवात मुस्लिमांचा सहभाग हमखास आढळतो. आजही ग्रामीण गणपती मंडळाचा अध्यक्ष मुस्लिम आळढतो. आमचे सोलापूरचे एक मित्र आहेत त्यांच्या गावात गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा मान त्यांच्या तांबोळी कुटुंबाकडे होता.
उत्तर भारतात अस्मितेचा शिरकाव झाल्याने परिस्थिती मात्र जराशी वेगळी आढळते. त्याला बाहेरून आलेले आक्रमक जबाबदार आहेत. सततच्या हल्ल्यांमुळे इथल्या प्रादेशिकतेला तडे गेले. परंतु तो ब्रिटिशांशी लढताना प्रथम देशीय व नंतर धार्मिक होता. बहुतेक उत्तरी भागात आजही प्रादेशिकता टिकून आहे. योगेंद्र सिंकद आणि सबा नकवी यांनी या विषयावर स्वतंत्र पुस्तके लिहिली आहेत. रोमिला थापर आणि हरबंस मुखिया यांनीही या प्रादेशिकतेची दखल घेतली आहे.
इशान्य भारत हा जसा हिंदू संस्कृतीच्या बाबतीत उर्वरीत भारताला अनभिज्ञ आहे. तसांच तो मुस्लिम संस्कृतीच्या बाबतीतही आहे. बहुतेकांना तो बांगलादेशी घुसखोर या संज्ञेपलीकडे माहीत नसतो. इशान्य भारतावर आधारित साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या काही विशेषांकात इथल्या बहुसांस्कृतिकची वैशिष्ट्य दिसून येतात. अलीकडे केरव्हान, फ्रंटलाईन सारख्या मीडियाने इशान्य भारताचे सुंदर दर्शन घडविणारे काही रिपोर्ट प्रकाशित केलेली आहेत.
इस्लामच्या बाबतीत बोलायचं झाल्यास भारतीय मुस्लिमानं कधीही अरबी इस्लामचं अनुकरण केलेलं नाही. हां, काही बाबतीत तसे प्रयत्न झालेले आहेत. पण प्रादेशिकता त्यापुढे टिकू शकली नाही. मुळात भारतातला इस्लाम हा सुफी परंपरेतून आलेला आहे. त्यामुळं त्यानं स्थानिक सहजीवनाला अधिक प्राध्यान्य दिलेलं आहे. त्यामुळेच इथले सण-उत्सव, आनंद सोहळे, रितीरिवाज, लग्ने, जन्म सोहळे, मयतानंतरच्या प्रथा, छिल्ला-छठी, नियाज (कंदुरी) इत्यादीत स्थानकपणा आळढतो. त्याला अजूनही कुठल्याही पुनरुज्जीवनावादी संघटक थोपवू शकले नाहीत.
जाफर शरीफ यांनी 1890मध्ये लिहिलेल्या व ब्रिटिश अधिकाऱ्याने संपादित केलेल्या ‘कानून ए इस्लाम’ पुस्तकात असा संमिश्र व सांस्कृतिक समागमाचे अनेक संदर्भ आढळतात. अलीकडे मुशिरूल हसन, इम्तियाज अहमद, रोमिला थापरपासून फकरुद्दीन बेन्नूर असगर अली इत्यादींनी त्यावर विपुल लेखन केले आहे. प्रा. बेन्नूर यांनी ही ‘समाजरचना’ मांडणारे स्वतंत्र असे पुस्तकच लिहिले आहे. उर्दूतही अशा प्रकारची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.
नव्वदीत इराक-अमेरिका युद्धानंतर भारतात सद्दाम नाव ठेवण्याची प्रथा पडली व ती अनेक दिवस टिकून राहिली. त्याला जितका तत्कालीन धर्मवादी वर्चस्ववाद जबाबदार होता, इतकाच भांडवली सत्तेला आपल्या पद्धतीने आव्हान देण्याचा मानस कारणीभूत होता. (आजही असा भाबडापणा आढळतो) जागतिकीकरणाने ‘भांडवल’ या संकल्पनेला जसं महत्व आलं तसं भारतीय मुस्लिमांच्या धर्मवादी कल्पना हळहळू गळून पडताना दिसून आल्या. प्रा. बेन्नूर व असगर अलींनी यावर बरचसं लिहून ठेवलं आहे.
रामजन्मभूमी आंदोलन, बाबरीचं उद्ध्वस्तीकरण, गुजरात, कंधमाल, कोक्राझार दंगल, 2000च्या सुरुवातीला लागलेला कथित दहशतवादाचा डाग मुस्लिमांची आत्ममंथनाची प्रक्रिया घडवून गेला. परिणामी एकीकडे आत्मकेंद्री तर दूसरीकडे व्यावहारिक, व्यावसायिक आणि लोकशाही घटकांशी जोडू पाहणारा समाज उदयास आला.
गेल्या सहा वर्षापासून या प्रक्रियेला अजून गती मिळाली आहे. त्यामुळे त्याला राजकीय व्यवहार आता कळू लागला आहे. अमेरिकेने अफगाणमध्ये तालिबानी सत्तेला मान्यता देणे व भारताने त्याला कबुली देणे आणि पर्यायाने युरोपीय व भारतीय गोदी मीडिया तालिबानी, तालिबानी करून ओऱड करणे, यातले भांडवली राजकीय मेख तो समजून आहे. सोशल मीडियाच्या टोळधारी मंडळीने त्याला समज आणि माहितीच्या बाबतीत ‘आत्मनिर्भर’ बनवले आहे. असो.
भारतीय मुसलमान हा पूर्वीपासून प्रादेशिक होता व आहे. यावर ‘अल जझिरा’ या अरबी मीडिया हाऊसने छान माहितीपट तयार केलेली आहेत. शिवाय TRT या तुर्की सरकारी चॅनेलनेही यावर बरचसे काम केले आहे. बीबीसी, टाइमलाईन, वाईस ऑफ अमेरिका यावर सातत्याने रिपोर्ट प्रकाशित करत असतात.
अलीकडे सततच्या होणाऱ्या धर्मवादी हल्ल्यात त्याचे अधिकाधिक प्रादेशिक होत जाणे खूप काही सांगून जाते. एकीकडे त्याला वेगळे पाडून झोडपण्याची प्रक्रिया सुरू आहे तर दुसरीकडे तो स्वत:ला अधिकाधिक स्थानिक, भाषिक, सांस्कृतिक व सामाजिक करत आहे. अर्थात हेच भारताच्या कदीम तहेजीबचं प्राबल्य म्हणूया...

- कलीम अज़ीम
अंबेजोगाई

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget