Halloween Costume ideas 2015
August 2020

मुंबई
मास्क आणि सॅनिटायजरच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने नेमलेल्या चार सदस्यीय समितीला तीन दिवसात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री श्री. टोपे  व अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार काल दि. ३१ जुलै रोजी आरोग्य विभागाने शासन निर्णयाद्वारे समिती गठित केली. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे समितीचे अध्यक्ष असून हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य औषध नियंत्रण प्राधिकारी सहआयुक्त हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. कोरोनावर सध्या तरी प्रतिबंधात्मक उपाय हेच औषध असल्याने आणि नागरिकांनाही वेळोवेळी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करण्याबाबत विविध माध्यमातून आवाहन केले जात असल्याने या दोन्ही वस्तूंची मागणी वाढली आहे. या दोन्ही बाबी नियंत्रित दराने मिळण्यासाठी त्यांच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी समितीने उपाययोजना करताना मास्क आणि सॅनिटायजरच्या कमाल दर मर्यादा ठरवायच्या आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सदर समितीला तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या दोन्ही वस्तूंच्या किंमती नियंत्रणात आल्यास सामान्यांना दिलासा मिळेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
मुंबई
महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागामार्फत आजपासून ‘डिजिटल ८ अ‘ ऑनलाईन सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ‘डिजिटल ८ अ‘सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आज करण्यात आला.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाईन शुभारंभ केल्यानंतर सर्वांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

श्री. थोरात यावेळी म्हणाले, शासकीय कामात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणूनच या विभागाला प्रशासनाचा कणा असे म्हणतात. महाराष्ट्राच्या विकासात आजपर्यंत या विभागाने महत्त्वाचे योगदान दिले असून यापुढील काळातही हा विभाग सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहील असा विश्वास आहे. गेला ४ महिन्यापेक्षा अधिकचा काळ आपण सर्व कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम करीत आहोत, या काळात राज्यातील महसूल यंत्रणा सक्षमपणे काम करीत होती याचा मला अभिमान वाटतो.

सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणणारा हा विभाग आहे. त्यामुळेच अनेक जबाबदाऱ्या महसूल विभागावर सोपविण्यात येतात. आजपर्यंत साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी ‘डिजिटल  ७/१२‘ घेतला आहे त्याचप्रमाणे आता ‘डिजिटल ८ अ‘ ला सुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे.  महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असेही आवाहन श्री. थोरात यांनी केले.

मुंबई
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दिलेल्या संदेशात ते म्हणतात, हे वर्ष अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीचे आहे. यानिमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊंना मानाचा मुजरा. अण्णा भाऊ हे केवळ कलावंत नव्हते, तर त्यांनी लेखक, कवी, लोकशाहीर म्हणून समाजातल्या विषमतेवर बोट ठेवले, कष्टकऱ्यांच्या व्यथांना आवाज दिला.

आपल्या पोवाड्यातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम मना-मनात पोहचवला. आपल्या श्रेष्ठ साहित्यकृतीतून मराठी आणि महाराष्ट्राची वैशिष्ट्ये जगभरात पोहचवली. अण्णाभाऊंचे हे योगदान कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेच आहे. अशा महान साहित्यरत्न अण्णाभाऊंना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

मुंबई
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादायी आणि नवी ऊर्जा देणारे आहे,  असे प्रतिपादन राज्याचे   सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता समारोप आणि अभिवादन कार्यक्रमाचे ऑनलाईन वेबिनार द्वारे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मातंग समाज मंडळ, शिव सहकार सेना पुणे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.                                  

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले,  अण्णाभाऊ साठे यांनी दलित, शोषित आणि कष्टकरी त्यांच्या हितासाठी  फार मोठे कार्य केले आहे. अण्णांचे  शिक्षण कमी असूनसुद्धा त्यांची साहित्य संपदा फार मोठी आहे, त्यांनी विविध कथा, कादंबऱ्या, पटकथा लिहल्या असून, अनेक पोवाडे, लोकनाट्याची निर्मिती केली आहे,  ही त्यांना ईश्वराने दिलेली एक देणच म्हणावी लागेल,  असे त्यांनी सांगितले.

अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडा आणि लोककलेच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करून इंग्रजांच्या विरोधात, भारतीयांचा आवाज बुलंद करण्याचे काम केले, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो किंवा गोवा मुक्ती संग्राम  असो यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते   अण्णाभाऊ साठे यांनी फकीर नावाची कादंबरी लिहली आहे, या कादंबरीचा मूळ हेतू  अन्यायाविरुद्ध लढा  व सर्वसामान्यiच्या हिताचे कार्य हा होता. अण्णा भाऊ साठे यांचे,  जीवन कार्य फार अदभूत आणि  महान होते.त्यांनी समाजाच्या हितासाठी खूप मोठं कार्य केले आहे.  त्याकाळी, मुंबईतील गिरणी  कामगारांच्या व्यथा,  पोटासाठी भटकंती,  करणाऱ्या मजुरांचे दुःख त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या साहित्यातून समाजापुढे मांडलं अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने समाजसेवक होते. त्यांचे कार्य फक्त्त साहित्य पुरतं मर्यादित नसून देशातील परकीय राजवट संपली पाहिजे यासाठीही त्यांनी कार्य केले, असे ते म्हणाले. कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री रमेश बागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शिव सहकार सेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब भांडे,  रवींद्र बागवे, अविनाश बागडे,  हनुमंत साठे, रवींद्र दळवी, विजय अंभोरे आदींनी आपला ऑनलाइन सहभाग नोंदविला. लहुजी समता परिषदेचे, अध्यक्ष अनिल हातागले  यांनी आभार व्यक्त केले. 

मुंबई
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नैराश्याचे वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थी व युवक यांच्यापुढे आव्हानात्मक परिस्थिती उभी आहे. या परिस्थितीतून युवकांना बाहेर काढण्यासाठी व समाजाला जागरूक करण्यासाठी शिक्षकांना समुपदेशक म्हणून भूमिका पार पाडावी लागेल.
देशाला प्रगतीच्या वाटेने पुढे न्यायचे असेल तर ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ या मानसिकतेतून बाहेर पडून ‘खबरदारी घ्या आणि आनंदी राहून कार्य करा’ (Be Careful and Be Cheerful) हा मूलमंत्र अंगिकारावा लागेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभागाने महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या ‘मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण’ या ७ दिवसांच्या ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपालांनी दृकश्राव्य माध्यमातून आज राजभवन, मुंबई येथून केले, त्यावेळी ते बोलत होते.
नैराश्य किंवा विषाद ही मनुष्यात निर्माण होणारी एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, शेतकरी आणि राजकारणी यांसह सर्वांना कधी ना कधी निराशा येत असते. मात्र ही प्रवृत्ती अभ्यास, निष्ठा व समर्पण भावनेने घालविता येते असे सांगून भगवदगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या मार्गदर्शनाने घोर नैराश्यातून बाहेर काढून कर्तव्य करण्याला प्रवृत्त केले, असे त्यांनी सांगितले.
लोकमान्य टिळकांनी देखील तुरुंगामध्ये राहून निराश न होता गीता रहस्याची निर्मिती केली, याचे स्मरण राज्यपालांनी दिले. सोक्रेटस, प्लेटो, कॉनफुशियस, ताओ तसेच संतसाहित्याच्या  वाचनाने नैराश्य दूर होण्याला मदत होऊ शकते असे राज्यपालांनी सांगितले.
भारतातील युवकांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांचा थोर वारसा लाभला आहे, त्यामुळे युवकांनी निर्भय होऊन देशाला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
शिक्षकांना समुपदेशक म्हणून मूलभूत प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन समारोहाला विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मानसोपचार तज्ञ डॉ सुधीर भावे आदि उपस्थित होते.  

मंदिराच्या पुजाऱ्याला आणि 16 पोलिसांना कोरोनाची लागण

Ram Mandir
अयोध्या
राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर सध्या कोरोनाचे संकट घोंघावत आहे. अयोध्येतील राम मंदिराचे पुजारी प्रदीप दास  यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदीप दास हे मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. या बरोबरच राम जन्मभूमीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 16 पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राम जन्मभूमीमध्ये मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या सोबत आणखी चार पुजारी रामलल्लाची सेवा करतात. याच चार  पुजाऱ्यापैकी प्रदीप दास हे एक पुजारी आहेत. प्रदीप दास यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना होम क्वारंटीन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बरोबरच राम जन्मूभूमीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आणि कोरोना विषाणूची लागण झालेल्या 16 पोलिस कर्मचाऱ्याना देखील क्वारंटीन करण्यात आले आहे. दरम्यान, राम जन्मभूमी मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम 5 ऑगस्टला आयोजित  करण्यात आला आहे. या कार्यक्रमास ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 200 लोक सहभाग घेणार आहेत. कोरोनाच्या उद्रेकामुळे अधिक लोकांना आमंत्रण दिले गेलेले नाही. फक्त निवडक  लोकांनाच भूमिपूजन कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी राम जन्मभूमी परिसरात 50-50 लोकांचे वेगवेगळे ब्लॉ्क्स तयार करण्यात येत आहेत. यामध्ये केवळ 200 व्यक्ती बसू शकणार  आहेत. देशातील 50 मोठे साधू या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्याच प्रमाणे देशातील 50 मोठे नेते आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यवेळी सहभागी झालेले नेते येथे उपस्थित  राहणार आहेत. यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांचा समावेश आहे.

मुंबई
सर्वसामान्य गरीब माणसाचे घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई महानगर वगळता उर्वरित एमएमआर क्षेत्रासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण मुंबई महानगर वगळता मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी व त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी स्ट्रेस फंड उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या स्ट्रेस फंडच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील पुनर्वसन सदनिकांच्या बांधकामासाठी बँकांकडून विकासकाला कर्ज उपलब्ध होईल व योजना गतीने पूर्ण होईल. तब्बल पाच वर्षानंतर आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची ही बैठक झाली.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कायद्यामध्ये जे काही बदल करणे गरजेचे आहे ते लवकरात लवकर केले जातील. तसेच स्ट्रेस फंड उभारण्याबाबत आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणला जाईल.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महानगर वगळता उर्वरित मुंबई महानगर क्षेत्रातील नगरपालिका आणि महानगरपालिकासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण उभारण्यात यावे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवताना विकासकाला सवलती जरूर दिल्या पाहिजेत परंतु त्यांनी कालमर्यादेत काम करण्याचे बंधनही त्यांच्यावर घातले पाहिजे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी सांगितले. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. श्रीनिवास, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Nwab Malik
आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून दिनांक ०१ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाइन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
तथापी, आयटीआय महाविद्यालये कधी सुरू होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती जाहीर करण्यात येईल, सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया  ऑनलाइन पद्धतीने सुरू करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.
प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४वर्षावरील उमेदवार  आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरून वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छुक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाइन  करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात  आलेल्या आहेत, असे मलिक यांनी सांगितले.

Ram Pradhan
मुंबई
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय काम करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि प्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्‍टी देणाऱ्या एका कर्तृत्ववान अधिकाऱ्याला आपण मुकलो आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव तसेच ज्येष्ठ सनदी अधिकारी  राम प्रधान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, श्री. प्रधान यांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकीर्दीत अनेक विभागात काम केले. रचनात्मक आणि विधायक कामाला आपल्या अनुभवांची  जोड देतांना राम प्रधान यांनी राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरचे अनेक प्रश्न संयमाने, मुत्सदेगिरीने आणि अभ्यासपूर्वक हाताळले. अनेक विषयांचा सखोल अभ्यास हे त्यांचे वैशिष्ट्य होते. प्रशासकीय अधिकारी ते अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल असा त्यांचा कार्य प्रवास नेहमीच  सर्वांसाठी प्रोत्साहन देणारा राहिला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Uddhav Yhackeray
मुंबई
‘त्याग आणि समर्पणाची शिकवण देणाऱ्या बकरी ईदच्या संदेशाचा वसा घेऊन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (१ ऑगस्ट रोजी) साजरा होणाऱ्या बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, मुस्लिम बांधवांचा हा पवित्र बकरी ईद  सण त्यागाचा संदेश देतो. त्याग आणि समर्पणातून मानव कल्याणाचा विचार सांगतो. याशिवाय सण साजरा करताना गोरगरीबांचाही विचार करण्यास सांगतो. मानवतेच्या विकासाच्या दृष्टीने दिलेल्या या संदेशाचा वसा घेऊन आपण समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या.
कोरोना विषाणूच्या संकटामुळे हा सण आरोग्याची काळजी घेऊन आणि नियमांचे पालन करून शांततेत साजरा करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे ई- भूमिपूजन करण्यात यावे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सल्ल्यावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना उद्धव ठाकरे स्वत: पंढरपूरला पूजेसाठी गेले होते. त्यांना राम मंदिराच्या भूमिपूजनावर बोलण्याचा अधिकारच काय?, असा खोचक सवाल  रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
राम मंदिराचे ऑनलाइन भूमिपूजन करण्याचा उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याचा काहीच अधिकार नाही. कारण ते स्वत: आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते. राज्यात कोरोनाचे संकट असतानाही ते पूजेला गेले होते. अशी टीका ना. दानवे यांनी केली आहे.
ठाकरे यांनी विठ्ठलाची पूजा ऑनलाइन पद्धतीने केली असती तर त्यांना बोलण्याचा आणि सल्ला देण्याचा अधिकार होता. मात्र, स्वत: कोरोना काळात महापूजा करायची आणि दुसऱ्यांना  कोरोना आहे म्हणून ई-भूमिपूजन करण्याचा सल्ला द्यायचा हा दुटप्पीपणा आहे, असेही ते म्हणाले.
राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्याचे शॅडो मुख्यमंत्री आहेत का? असा सवाल  दानवे यांना करण्यात आला. त्यावर, शरद पवार हे मुख्यमंत्री नाहीत, पण महाविकास आघाडीचे कर्णधार आहेत, असे ते म्हणाले.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget