Halloween Costume ideas 2015

भ्रामक युक्तिवाद

राजेशाही शासन पद्धतीतच वंशज नसल्यास पर्यायाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. लोकशाही प्रक्रियेत मात्र असा प्रश्न निर्माण होत नाही. कारण लोकशाही प्रक्रिया स्वत: पर्याय निर्माण  करीत असते. स्वातंत्र्योत्तर भारताने असे अनेक प्रसंग पाहिले जेव्हा खंबीर नेतृत्वानंतर कोण असा प्रश्न निर्माण झाला. पंडित जवाहरलाल नेहरू नंतर कोण? इंदिरागांधीनंतर कोण?  असे अनेक वेळेस निर्माण झालेल्या, प्रश्नाला या लोकशाही प्रक्रियेने पर्याय दिल्याचा इतिहास आपल्या समोर आहे. याचे मुळ कारण म्हणजे लोकाशही प्रक्रियेत पंतप्रधानपद हे सार्वभौम  नसुन ते सामुहीक नेतृत्वातुन निर्माण होते म्हणून येथे नेतृत्वापेक्षा संघठन नेहमीच वरचढ ठरते.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर सतरा वर्षे पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते. पंडित नेहरू यांच्या समोर एक नविन राष्ट्र उभारण्याचे आव्हाण होते. स्वतंत्र देशासाठी व्यवस्था निर्माण करायची होती. नेहरूंनी स्वतंत्र भारताची सुत्रे हाती घेतली त्यावेळेस भारत सुई देखील बनवित नव्हता. देशासमोर गरीबी, भुकमरी, शिक्षण, रोजगार तसेच संरक्षण इ. सारख्या अत्यंत  गंभीर समस्या होत्या. परंतु या सर्व आव्हाणांना तोंड देत पंडित नेहरू एक नविन राष्ट्र उभारण्यात यशस्वी झाले. हे करत असतांना त्यांनी तत्कालीन महाशक्तीच्या दबावाला बळी न  पडता भारताची स्वातंत्र्य ओळख जगात निर्माण केली. पंडित जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व सर्वसमावेशक आणि उदारमतवादी होते. जनतेने नेहरूच्या भारत निर्माण अभियानास भरपूर पाठींबा दिला. सलग तीन वेळेस तयांना पंतप्रधानपद दिले. पंतप्रधानपदावर असतानाच नेहरूंचा मृत्यू झाला. परंतु नेहरूच्या लोकप्रियतेला त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात कधीच ओहोटी  लागली नाही. नेहरूंच्या नेतृत्वात काँग्रेसला पहिल्या 1951 च्या लोकसभेत 364 तर शेवटच्या 1962 च्या निवडणुकीत 361 जागा मिळाल्या हे त्यांच्या पंतप्रधान पदाच्या यशस्वी कारकीर्दीचे द्योतक आहे. परंतु नेहरूंच्या मृत्युनंतर भारतासमोर प्रश्न निर्माण झाला. नेहरू नंतर कोण? नेहरू एवढ्या उंचीचा नेता कोण? कोण पुढे नेईल नेहरूच्या विकासाचे कार्यक्रम?  भारताच्या जनतेसमोर मोठे संकट उभे राहिले. परंतु ही लोकशाही प्रक्रिया असल्यामुळे त्यांच्या नंतर लाल बहादूर शास्त्री सारखे नेतृत्व भारताला मिळाले. लालबहादूर शास्त्रींनी अत्यंत  बिकट अशा काळात भारताचे नेतृत्व समर्थपणे सांभाळले. त्यांच्या काळात पाकीस्तानने भारतावर आक्रमण केले. परंतु याच अत्यंत सौम्य वाटणाऱ्या लालबहादूरशास्त्रींनी खंबीरपणे  पाकिस्तानच्या आक्रमणाला परतावून आपल्या खंबीर नेतृत्वाची चुणुक दाखवून दिली.
त्यानंतर नेतृत्वाची धुरी सांभाळली ती श्रीमती इंदिरा गांधी यांनी. वयाच्या 49 व्या वर्षी त्या पंतप्रधान झाल्या. त्यांच्या समोर दोन मोठी आव्हाणे होती. एक दुष्काळ आणि दुसरे  पाकीस्तान. याच इंदिरा गांधींनी एकदाचा पाकीस्तानचा सोक्षमोक्ष लावला. 1971 च्या युद्धात फक्त पाकीस्तानला हरवलेच नाही तर पाकिस्तानची दोन शकले करून टाकली. इंदिरा  गांधींना प्रचंड लोकप्रियता मिळाली. लोकशाहीची गळचेपी करत त्यांनी देशांवर आणिबाणी लादली. परंतु इंदिरा गांधीची ही घोडचुक ठरली व पुढील लोकसभा निवडणूकीत जनतेने इंदिरा काँग्रेसचा धुव्वा उडविला. अत्यंत कणखर आणि चिवट अशा इंदिरा गांधीने फक्त तीन वर्षाच्या काळात पुन्हा जनतेचे समर्थन प्राप्त केले व लोकसभेत 367 जागा जिंकून पुन्हा  पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधीनी बँकेचे राष्ट्रीयकरण इ. सारखे अनेक देशहिताचे निर्णय घेतले. तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा दरारा निर्माण केला. 1984 ला इंदिरा गांधीची  निर्घूण हत्या झाली. देश नेतृत्वहीन झाल्यासारखे वाटले. कारण त्यावेळेस त्यांचा एवढा सक्षम नेता कोणीच नव्हता. पुन्हा प्रश्न तोच निर्माण झाला इंदिरा गांधी नंतर कोण? आणि पुन्हा  एकदा लोकशाही प्रक्रियेनेच त्याचे उत्तर दिले. की ही अखंड प्रक्रिया आहे. नेतृत्व येते आणि जाते परंतु प्रक्रिया निरंतर असते व ती सातत्याने पर्याय देखील निर्माण करत असते. अवघ्या चाळीस वर्षाच्या आणि राजकारणातील अगदी शुन्य अशा वैमानिकाला देशाचा कप्तान करण्यात आले. राजीव गांधीने समर्थपणे जबाबदारी सांभाळली व भारताला माहिती आणि  तंत्रज्ञान युगात नेले. कम्प्युटर आणि टेलिफोनच्या ऐतिहासिक सुधारणा केल्या. भारताला आधुनिक युगात नेण्यात राजीव गांधी यांचा सिंहाचा वाटा आहे. राजीव गांधींना लोकसभेत  एकूण 426 असे ऐतिहासिक बहुमत होते. परंतु मंडल कमंडलमुळे पुढच्या निवडणुकीत राजीवजींचा पराभव झाला.
व्ही.पी.सिंग, चंद्रशेखर, देवगौडा, इंद्रकुमार गुजराल इ. च्या अल्पकाळाच्या शासनानंतर जेव्हा पुन्हा निवडणुका लागल्या तेंव्हा राजीव गांधीची हत्या झाली. परंतू त्यांचा पक्ष लोकसभेत  बहुमत प्राप्त करून गेला. अर्थात जनतेने काँग्रेसवर पुन्हा विेशास दाखविला होता. राजीव गांधीबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करीत जनतेने पुन्हा काँग्रेसचे सरकार आणले. गड आला  पण सिंह गेला होता. पुन्हा नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. पुन्हा लोकशाही प्रक्रियेने पर्याय निर्माण केला आणि नरसिम्हाराव पंतप्रधान झाले.त्यानंतर वाजपेयी सरकार सत्तेत आले.  त्यावेळेस काँग्रेस पक्ष पुर्णपणे मरगळीत गेला होता. हा पक्ष संपला की काय असे वाटत होते. पक्षाकडे सक्षम नेतृत्व नसल्यामुळे सोनिया गांधी सारख्या नवख्या स्त्रीकडे नेतृत्व देण्यात आले होते. अटलबिहारी वाजपायी सरकारने आपली टर्म पुर्ण केली. कोणताही सक्षम पर्याय नसल्यामुळे अतिआत्मविेशासात प्रमोद महाजनने मोठ्या प्रमाणावर ‘शायनिंग इंडिया’चा प्रचार  केला. वाजपेयी सरकारच्या काळात भारताने किती क्रांती केली याचा जोराने प्रोप्रोगंडा सुरू झाला. परंतु भारताच्या जनतेने शायनिंग इंडियाची वास्तविकता भाजपाला दाखवून दिली.  फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेत पुन्हा काँग्रेसपक्ष सत्ताधिन झाला. परंतु पुन्हा सक्षम नेतृत्वाचा तिढा निर्माण झाला. कोण होणार भारताचा पंतप्रधान? कोणालाच्या गावीसुद्धा  नव्हते की ब्युरोक्रेसी मधून आलेला, अत्यंत मृदृभाषी व कोणत्याही सदनाचा खासदार नसलेला व्यक्ती मनमोहनसिंग भारताचे पंतप्रधान होतील. म्हणून परंतु मनमोहन सिंगने आपली  निवड सार्थ ठरावीत भारताला जागतिक मंदिच्या काळात आर्थिक संकटातून वाचविले. जेंव्हा संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था ही बर्बादीच्या उंबरठ्यावर उभी होती त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था त्यांनी मजबुत स्थितीत ठेवली. प्रथम सत्रात त्यांनी खंबीर भुमिका घेतल्या. परंतु दुसऱ्या टर्ममध्ये शासन आणि प्रशासनात मरगळ आली. युपीएच्या ढसाळ,  असामाधानकारक कारभाराने महागाई, भ्रष्टाचार, महिलेवरील अत्याचार असे अनेक समस्या ऐरणीवर आल्या. त्यामुळे कंटाळलेल्या जनतेने विकासाच्या एशमेधावर स्वार नरेंद्र मोदी  यांना नेतृत्वाची संधी दिली.
परंतु चार वर्षातच जनतेचा पुन्हा भ्रमनिरास झाला आहे. नोटबंदीच्या अपयशाने आणि स्वच्छता अभियान, जन-धन योजना, स्मार्ट सिटी, स्टार्टअप, स्टॅण्ड अप इंडिया अशा अनेक  योजनांच्या अपयशाने हे सरकार केवळ जुमला सरकार असल्याचे मत जनतेचे होत गेले. देशासमोर पुन्हा गरीबी, बेरोजगारी, आरोग्य, अन्याय, महिलांवरील अत्याचार कुपोषण इ. समस्येत या सरकारच्या कालावधीत कोणतेही ठोस उपाय न केले गेल्यामुळे या समस्या तीव्र होत गेल्या. सरकारचे हे अपयश लपवण्यासाठी शेवटचा युक्तीवाद केला जात आहे तो हा  की विरोधकांकडे कोणता सक्षम पर्याय आहे काय? याचा अर्थ विरोधकांकडे पर्याय नसल्यामुळे पुन्हा मजबुरीने का होईना परंतु हेच सरकार निवडणून द्यावे लागेल. हा मुळातच भ्रामक युक्तीवाद आहे. भारताच्या राजकारणाच्या इतिहास ज्याला माहित नसेल आणि जो नागरीकशास्त्रात अज्ञानी आहे तोच अशा युक्तीवादावर विेशास ठेऊ शकतो. कारण इतिहासात  अनेकदा पर्यायाचा प्रश्न निर्माण झाला आणि लोकशाही प्रक्रियेने त्याचे योग्य उत्तर दिलेले आपण पाहिले.
परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे भारतीय लोकशाहीत पंतप्रधानपद हे अमेरीकेतील राष्ट्रपती सारखे सार्वभौम नसतात. पंतप्रधान हे जरी पक्षाचा चेहरा असला तरी पक्षाचे संगठण,  त्याची विचारधारा, प्राथमिकता व एजेंड्याचा त्याच्या निर्णयावर प्रभाव आणि नियंत्रण असते. त्याचप्रमाणे संसदीय लोकशाहीत संसदेचे, विरोधी पक्षाचे आणि न्यायालयाचे देखील नियंत्रण  असते म्हणून तो एकटा सर्व निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून भारतीय लोकशाहीत व्यक्तीपेक्षा पक्ष व त्याची विचारधाराच श्रेष्ठ असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवाचून मग तो पंडित  जवाहरलाल नेहरू असो, इंदिरा गांधी अथवा राजीव गांधी असो ही प्रक्रिया कधीच थांबत नसते. तसेच सातत्याने पर्याय देखील निर्माण करीत असते.
अपेक्षा भंग झालेल्या जनतेने मोठमोठ्या धुरीणांना पराजीत केले. भारताचा इतिहास पाहिल्यास अपेक्षाभंग झालेल्या जनतेने कधीच मजबुरीने पर्याय न निवडता नवीन पर्याय शोधला  आहे. त्यामुळे विरोधकांकडे कोणताच पर्याय नाही म्हणून मजबुरीने आम्हालाच निवडा हा भ्रामक युक्तीवाद आहे.

- अर्शद शेख
9422222332

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget