Halloween Costume ideas 2015

मुस्लिम समाजाने बौद्धिक मैफली तयार कराव्यात

‘सामाजिक समतेचा प्रवाह’ या प्रा. बेन्नूर स्मृतीग्रंथाचे प्रकाशन : अरफा खानम यांचे प्रतिपादन


पुणे (शोधन सेवा) - दलित समुदायासारखा मुस्लिम समाज घटनात्मक अधिकाराला घेऊन सजग नाहीत. सच्चर समितीने हे स्पष्ट करून दाखवलं आहे की, मुस्लिम दलितांपेक्षा अधिक  मागास आहेत, पण आज आपल्या घटनात्मक अधिकारासाठी जो प्रयत्न दलित समाज करतोय तो प्रयत्न मुसलमानांकडून होताना दिसत नाही. घटनात्मक अधिकारांचे महत्व समजून  घेण्यासाठी दलितासारख्या बौद्धिक मैफली मुसलमानांकडून तयार करण्याची गरज आहे. असे जर झाले तर येत्या वीस वर्षांत मुसलमानांची सामजिक व आर्थिक प्रगती झाल्याशिवाय  राहणार नाही, असे मत दि वायरच्या वरीष्ठ संपादिका आरफा खानम शेरवानी यांनी पुण्यात व्यक्त केले.
कलीम अजीम व सरफराज अहमद संपादित ‘सामाजिक समतेचा प्रवाह’ या प्रा. फकरुद्दीन बेन्नूर स्मृतिग्रंथाचे प्रकाशन 20 जानेवारीला पुण्यात पार पडले. गाजियोद्दीन रिसर्च सेंटर व दि युनिक फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते  स्मृतिग्रंथाचे प्रकाशन झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावतीचे माजी पोलीस उपायुक्त सुलतान शेख होते. यावेळी मंचावर डॉ. युसूफ बेन्नूर, दि युनिक फाँऊंडेशनच्या संचालिका मुक्ता कुलकर्णी, युनिक अकॅडमीचे मल्हार पाटील व युनिक फाऊंडेशनचे विवेक घोटाळे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आरफा खानम ‘सामाजिक सौहार्द आणि त्याचे मापदंड’ या विषयावर बोलत  होत्या.
भाजपच्या मुस्लिमद्वेषावर हल्ला चढविताना त्या म्हणाल्या, भाजप आणि आरएसएसची लोकं मुसलमानांना वेगळे पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तेच प्रयत्न मुसलमानांतील  कट्टरपंथीयांकडून होत आहेत. त्यांना वाटते की भारतातील मुसलमानांची संस्कृती सौदी अरेबियासारखी असावी. या दोन्ही वृत्ती सांस्कृतिक वर्चस्ववादाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना  वेगेवगळ्या संस्कृतीला एकसारखे बनवायचे आहे. आमचा प्रयत्न त्या दोन शक्तीशी मुकाबला करून त्यांचा पराभव करायचा आहे.
माझ्या भारतात नमाज अदा करणाऱ्याला बघून कोणी भीत नाही, तर नमाजसाठी त्याला आपली जागा सोडतो, वुजू करण्यासाठी पाणी दिलं जातं. जिथे नमाजसाठी एक पंडित  मुसलमानांपुढे आपला गमछा अंथरतो, मी अशा देशातून आहे. मला माहीत नाही की या लोकांना कोणता देश बनवायचा आहे. जिते दाढी- टोपीला बघून लोकं भयभीत होतात. जिथे  कपाळावरच्या टिळा पाहून लोकं दहशतीत जातात, असा माझा देश असू शकत नाही, अशी खंत आरफा खानम यांनी व्यक्त केली.
प्रा. बेन्नूर यांच्याबद्दल ते म्हणाले की, ‘प्रा. बेन्नूर यांच्याबद्दल नेहमी सांगितलं जातं की, त्यांना राष्ट्रीय ओळख मिळू शकली नाही, त्यांना देशपातळीवर नाव मिळू शकले नाही, माझं  म्हणणे आहे की, ‘एक सूरज से अच्छा हैं की, छोटे छोटे चराग हर जगह जला दिए जाए.’
प्रा. बेन्नूर अशा पद्धतीचे एक छोटा दिवा होते, जे हयातभर स्थानिक पातळीवर असलेल्या अंधाराला संपवण्याचा प्रयत्न करीत राहीले. त्या व्यक्तीचा प्रभाव इतका आहे की, ते निघून  गेल्यावर आज आपण त्यांच्या वैचारिक वारसा समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.’
प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचे बालपणीचे मित्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रा. बेन्नूर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांनी बेन्नूर यांच्यासह कोर्टात काम केल्याच्या  आठवणींना उजाळा दिला. मौलाना मदनी, के. एम. अशरफ, एम. ए. अन्सारी, खुंदमिरी आणि रफिक जकेरियासारखे बेन्नूर एक प्रखर राष्ट्रवादी होते. प्रा. बेन्नूर यांच्या वैचारिक लेखनाबद्दल बोलताना शिंदे म्हणतात, देशातील मूलतत्त्ववादी विचारांचा त्यांनी नेहमी समाचार घेतला. त्यांनी उभे केलेले काम हे सध्याच्या संकुचित कट्टरवादी परिस्थितीला उत्तर देणारे  आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात जी सामाजिक व राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीला स्मृतिग्रंथ उत्तर आहे, असे मते देखील शिंदे यांनी व्यक्त केलं.
अध्यक्षीय भाषणात सुलतान शेख यांनी देशातील विविधता जपण्याचे आवाहन केले. देशात संघ- भाजपकडून जी वातावरण निर्मिती केली जात आहे, त्याला उत्तर भारतातील हिंदु- मुस्लिमांचे सहजीवन व संस्कृती आहे. त्यांनी कितीही प्रयत्न करावेत पण भारताच्या या गंगा- जमुनी संस्कृतीला ते धक्कादेखील पोहोचवू शकत नाही. सामाजिक समतेचा प्रवाह हा ग्रंथ  सामाजिक सद्भाव बिघडवण्याचा प्रयत्न करण्याला शक्तींना चोख उत्तर आहे, असेही सुलतान शेख म्हणाले.
प्रास्ताविक करताना कलीम अजीम यांनी ग्रंथाच्या गंगा-जमुनी संकल्पनेची मांडणी केली. भाषा, साहित्य, संस्कृती, सभ्यता, स्थापत्य, इतिहास, व एकात्मतेची प्रतिके ग्रंथातून केल्याचे  ते म्हणाले. भारताची बहुसांस्कृतिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा सामाजिक समतेचा प्रवाह या ग्रंथातून होते, असे ते म्हणाले. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा हा  ग्रंथ एक भाग आहे, असे ते म्हणाले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सरफराज अहमद यांनी सामाजिक सद्भभावनेच्या प्रतिकांच्या राजकारणाची चर्चा केली. बेन्नूर यांनी तहयात  सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेची बांधणी केल्याचे ते म्हणाले. युनिक फाऊंडेशनचे चंपत बोड्डेवार यांनी प्रकाशकांची भूमिका मांडताना युनिक फाऊंडेशनच्या वैचारिक कार्याचा आढावा घेत वैचारिक प्रवाह व संसोधनाची बंधिलकी मांडली. ग्रंथाची कल्पना व त्यामागील उद्देशांची मांडणी करताना मुस्लिम समुदायातील बहुविध संस्कृती व समाजाची मांडणी अधिक स्पष्टपणे या ग्रंथातून स्पष्ट होते असे मत मांडले. कार्यक्रमाचे आभार युनिकचे केदार देशमुख यांनी मानले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget