Halloween Costume ideas 2015

इस्लाम ही पुरोगामी आणि संतुलित जीवन पद्धत

देशापुढील अनेक गंभीर समस्या आणि आव्हाणे बाजुला सारून राज्यकर्ते तत्सम विषयाला ज्वलंत मुद्दे बनवून लोकांना मुळ मुद्यांपासून परावृत्त करीत असतात. त्याचे ज्वलंत  उदाहरण तलाक! सतत दोन वेळा प्रयत्न करून देखील संसदेत पारित ना झाल्यामुळे सरकार याला अध्यादेशाचे स्वरूप देण्याच्या प्रयत्नात आहे. अपप्रचार आणि अज्ञानामुळे विपर्यासाच्या टोकाला गेलेला हा शब्द तलाक! इस्लाम धर्मात स्त्रीया किती असुरक्षित आहेत की पतीने कोणत्याही क्षणी उच्चारलेल्या फक्त तीन शब्द तलाक- तलाक-तलाक ने स्त्रीचे  अवघे जीवनच उध्वस्थ! तलाक हा अन्यायाचा कळसच! अशा अनेक गैरसमजुती पसरून स्वत:ला मुस्लीम महिलांचे कैवारी सिद्ध करण्याचा प्रयत्न चालविला जात आहे.
इस्लाम ही पुरोगामी आणि संतुलित जीवन पद्धत आहे. प्रेम, न्याय स्वातंत्र्यता, समता आणि बंधुतेच्या माध्यमातून आदर्श समाज निर्मिती हे तीचे ध्येय आहे. या व्यवस्थेत कोणत्याही  प्रकारच्या भेदभावाला थारा नाही. संपूर्ण मानवजात ही फक्त एकाच निर्मात्याची निर्मिती असल्यामुळे सर्वजण समान आहेत. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुष समानतेचा इस्लाम प्रतिक आहे.  किंबहुना परमदायाळु परमेश्वराने स्त्रीयांनाच झुकते माप दिल्याचे दिसून येते. पैगंबरांनी वचन दिले की ज्या व्यक्तीने मुलींचे योग्य संगोपन व संस्कार केले त्याच्या स्वर्गप्राप्तीची  जवाबदारी मी घेतो. त्यामुळे मुलींचे जन्म हे शुभ असून त्याचे स्वागत केले गेले. मुलामुलीमध्ये कोणतेच भेदभाव न पाळण्याचे पैगंबरांनी पालकांना आदेश दिले. कुरआनमध्ये स्त्रीयांसाठी वारसाहक्क निर्धारित केला गेला. इस्लामने स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व अधोरेखित केले. पत्नी ही पतीची दासी नसून ती पतीची सहचारिणी आहे. पैगंबर (सल्ल.) यांनी फर्माविले  की, ’सर्वोत्तम पुरुष तो आहे जो आपल्या पत्नीशी उत्तम वर्तन करतो.’ परंतु अपरिहार्य स्थितीत जर पती पत्नीला विभक्त होण्याची वेळ आल्यास ती सन्मानाने व्हावी यासाठी  तलाकचे प्रयोजन केले आहे.
तलाक अर्थात घटस्फोट. ही संज्ञा लग्न व्यवस्थेशी संलग्न असल्यामुळे सर्वात प्रथम इस्लामी लग्न पद्धती समजणे गरजेचे आहे. इस्लाम धर्मात लग्न हे बंधन नसून करार आहे. एक  सुखी व सदृढ कुटुंब व्यवस्था निर्माण करण्यासाठी एका स्त्री आणि पुरुषांचा सामाजिक अधिमान्यता प्राप्त करार. ह्या विवाहपद्धतीच्या खालील तीन अनिवार्य बाबी आहेत.
प्रथम-  मुलामुलींची रजामंदी. सर्वात प्रथम मुलीने मुलाला पसंत करणे. इस्लामने मुलींना आपला पती निवडण्याचे अधिकार दिले. मुलींच्या संमतीशिवाय झालेले लग्न शरीयतबाह्य ठरते. तसेच  मुलाने देखील मुलीला पसंत करून सन्मती देणे आवश्यक आहे. मुला-मुलीची सहमती झाल्यावर वधुपक्षाकडून मुलीला एक विशिष्ट रक्कम देणे याला मेहेर असे म्हणतात. मेहेरची  रक्कम ठरविण्याचे अधिकार हे सर्वस्वी वधुचे आहेत.
द्वितीय - त्यानंतर उभय पक्षात झालेला या विवाहाला लेखी स्वरूपात करारबद्ध करावे व त्यावर दोन सक्षम साक्षीदार असावेत. अशा प्रकारे विवाह अत्यंत साधा आणि सोपा करण्यात  आला. या प्रक्रियेनंतरच अधिकृत विवाह होतो. पैगंबर (सल्ल.) यांनी सांगितले की, जो विवाह कमी खर्चात व साध्या पद्धतीने होतो तो उत्तम विवाह असून त्यामुळे परस्परातील प्रेम  वाढीस लागते. तसेच शरियतने लग्नाच्या खर्चाची वधुपक्षावर कोणतीच जवाबदारी टाकली नाही.
काही अपरिहार्य कारणांमुळे जर नवरा बायकोचे सहजीवन अशक्य असेल अशा अपवादात्मक परिस्थितीत इस्लामने या नरकमय सहजीवनापेक्षा तलाक अर्थात विभक्तीचा मार्ग खुला  केला. विहित कृत्यात अल्लाहला तलाक हा अत्यंत नापसंत आहे. कुरआनने तलाकचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. नवरा बायकोचे वाद पराकोटीस गेले असतील तर प्रथम दोघात समन्वयासाठी सर्व प्रयत्न आवश्यक आहेत. दोन्ही कुटुंबातील वरिष्ठाने तडजोडीचे सर्व प्रयत्न करणे, पतीने बिछाना विभक्त करणे इत्यादी तडजोडीचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यास  आणि कोणतेही पर्याय शिल्लक न राहिल्यास पती पत्नीला एक तलाक देईल. तलाक हा रागाच्या भरात, नशेत अथवा कोणत्याही भावनाच्या आवेशात न देता अत्यंत विचारपुर्वक  द्यावा. पहिल्या तलाक नंतर पत्नी ही पतीच्या घरातच राहिल. या अवधीत जर दोघांचे मनोमिलन झाल्यास त्यांचा निकाह पुर्ववत कायम राहील. परंतु असे ना झाल्यास पती पत्नीला  दुसरा तलाक देईल.
दोन्ही तलाकमध्ये कमीत कमी एका मासीक पाळीचे अंतर आवश्यक आहे. दुसऱ्या तलाक नंतर देखील पत्नी पतीच्या घरातच राहील व सन्मानाने वागविली जाईल. या अवधीत दोघांचे  मनोमिलन झाल्यास विवाह पुर्वत कायम राहील. परंतु असे ना घडल्यास परत एका मासिक पाळीच्या अंतराने पती पत्नीला अपरिहार्य स्थितीस तीसरा आणि अंतिम तलाक देईल व  चांगल्याप्रकारे तिच्याशी विभक्त होईल. अशा प्रकारे मनोमिलनाच्या संपूर्ण पर्याय संपुष्टात आल्यावर तलाक अर्थात घटस्फोट होईल. इस्लामने तलाकची ही प्रक्रिया जाणून बुजून  लांबविलेली आहे. जेणे करून पती-पत्नीचे मनोमिलन व्हावे व तलाक टळावे. या उपरही जर तलाक झालाच तर मतभेदाची तिव्रता लक्षात येते. तलाक संदर्भात असे सखोल मार्गदर्शन 
कुरआनमध्ये केले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत नरकमय जीवनापेक्षा चांगल्याप्रकारे विभक्तीचा मार्ग तलाक आहे. ज्याप्रकारे पतीला तलाक देण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे पत्नीला देखील पतीपासून  विभक्त होण्याचा अधिकार इस्लामने दिला. त्याला खुला असे म्हणतात. त्यामुळे नरकमय सहजीवनांपासून विभक्तीचे अधिकार फक्त पतीलाच नसून पत्नीला देखील देण्यात आले आहे  हे लक्षात घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे तलाक दिल्यानंतर पुरुष दुसरे लग्न करू शकतो, त्याचप्रमाणे स्त्री देखील दुसरे लग्न करू शकते. विधवा अथवा घटस्फोटित स्त्री बरोबर लग्न हे  इस्लाममध्ये सत्कृत्य मानले गेले. स्वत: आदरणीय पैगंबर (सल्ल.) यांनी आपले पहिले लग्न एका विधवा स्त्री बरोबर केले.
बळजबरीच्या सहजीवनामुळे स्त्रीवर होणारे अत्याचार आणि परिस्थिती विकोपाला गेल्यास त्याचा बळी! याची जीवंत उदाहरणे आपल्यासमोर रोजच येतात. कधी स्टोच्या भडक्याने, तर  कधी विहीरीत ढकलून तर कधी डोक्यावर दगड घालून ज्या प्रकारे अमानुषरित्या निष्पाप महिलांची हत्या होते किंवा तिला आत्महत्येस विवश केले जाते हे चित्र मानवतेला काळीमा  फासविणारे आहे. अशा नरकमय स्थितीत सुखी जीवनासाठी तलाक ही एका अर्थाने संजीवनी ठरते. त्यामुळे संसारिक जीवनातील अपयश हे अत्याचाराच्या विकोपाला न जाता संसारिक जीवनाचा चांगल्या प्रकारे समारोप होतो. यामुळेच मुस्लिमांमध्ये स्त्री वरील अत्याचार, हुंडा बळी, स्त्री आत्महत्या, स्त्रीभ्रुणहत्या इत्यादीचे प्रमाण जवळपास नगण्य आहेत. भारतीय  मुस्लीम समाज हा येथील बहुजन समाजाचाच एक भाग आहे. या समाजामध्ये स्त्री अत्याचार प्रमाणात खुप कमी प्रमाणात आढळतात. यामागील कारणांचा सखोल अभ्यास झाल्यास ते  संपूर्ण भारतीय समाजाला मार्गदर्शन ठरू शकेल.

- अर्शद शेख
9422222332

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget