Halloween Costume ideas 2015

जेरूसलेम : अमेरिकेचे पुन्हा आगीत तेल !



-एम.आय.शेख
6 डिसेंबर 2017 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलम शहराला इजराईलची राजधानी म्हणून मान्यता दिली व तेल अवीव येथील अमेरिकी दुतावास जेरूसलम येथे हलविण्यास मंजुरी दिली. गेली 70 वर्षे जो निर्णय अमेरिकेच्या आतापावेतो झालेल्या वेगवेगळ्या अध्यक्षांनी तहकूब ठेवला होता त्याची अंमलबजावणी ट्रम्प यांनी सगळ्यांचा विरोध डावलून केली. ट्रम्प यांच्या या अविवेकी निर्णयाचा जगाच्या सर्वच भागातून विरोध सुरू झालेला आहे. ट्रम्प यांना मात्र या विरोधाची काडीमात्र परवा नाही. या निर्णयाचा सर्वात कडवा विरोध सऊदी अरब आणि ईरानकडून होण्याची शक्यता होती. म्हणूनच इरानला वेगळे पाडून व सऊदी अरबमध्ये आपल्या जावयाचा मित्र मोहम्मद बिन सलमान याला सत्तेत आणून ट्रम्प यांनी या विरोधाची धार अगोदरच बोथट करून ठेवलेली  आहे. इजराईलची राजधानी तेल अवीव येथून जेरूसलेम येथे हलविण्यामागे ट्रम्प यांचे यहूदी (ज्यू) जावाई जेराड कुश्‍नर यांचे राजकारण असल्याचे स्पष्ट आहे. इजराईल वगळता कोणीही या निर्णयाचे समर्थन केलेले नाही. या निर्णयामुळे मध्यपुर्वेतील राजकीय संतुलन बिघडून रक्तरंजित संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. म्हणून हा विषय काय आहे? हे समजून घेणे अप्रस्त होणार नाही.
ज्यू लोकांचा इतिहास
      ज्यू लोक म्हणजे बनी इसराईलचे लोक हे अल्लाहच्या विशेष मर्जीतील लोक होते. ईसापूर्व 300 वर्षापुर्वी प्रेषित मुसा यांच्यासोबत ज्यू लोकांना इजिप्तमधून निघून सीरियाच्या मार्गाने पॅलिस्टीनमध्ये जावून तेथील जुल्मी राजाबरोबर युद्ध करण्याचा अल्लाहने आदेश दिला होता. तो प्रेषित मुसा यांनी खालील शब्दात ज्यू लोकांना सांगितला.  ”हे माझ्या बांधवानो! या पवित्रभूमीत दाखल व्हा जी अल्लाहने तुमच्याकरिता विधिपूर्वक बहाल केली आहे. मागे फिरू नका नाहीतर अयशस्वी व निराश परताल.” (संदर्भ ः सुरे मायदा आयत नं. 21). त्या काळात पॅलिस्टीनमध्ये अमालका नावाची शक्तीशाली राजवट सुरू होती. ज्यू त्यांच्याशी लढू इच्छित नव्हते. त्यांनी प्रेषित मुसा यांना सांगितले की, ”हे मुसा! आम्ही तर तेथे कदापि जाणार नाही जोपर्यंत ते तेथे आहेत. तुम्ही आणि तुमचा पालनकर्ता दोघे जा आणि लढा. आम्ही येथेच बसलो आहोत.” (संदर्भ ः कुरआन अल मायदा आयत नं. 24) त्यावर अल्लाहने ज्यू लोकांना खालील शब्दात तंबी दिली. ”बरे तर, तो प्रदेश चाळीस वर्षापर्यंत यांच्याकरिता निषिद्ध आहे. हे भूतलावर वणवण भटकत राहतील. या अवज्ञाकारींच्या स्थितीवर मुळीच दया दाखवू नका.” (संदर्भ ः कुरआन ः सुरे अलमायदा आयत नं. 26). या व अशा अनेक आदेशांच्या अवज्ञा केल्यामुळे ज्यू समाज अल्लाहच्या नजरेतून कायमचा उतरला व अल्लाहचा त्यांच्यावर कोप झाला.   
पॅलेस्टिनचा इतिहास
      ज्या काळात मानव आपली उपजिविका भागविण्यासाठी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी भटकत होता त्या काळात अरबस्थानमधील अनेक टोळ्यांपैकी ’साम’ टोळीच्या एका शाखेच्या काही लोकांनी ज्यांचे नाव ’कन्आनी’ होते. ईसापूर्व 2500 मध्ये अरबस्थान येथून येवून जॉर्डन नदीच्या किनारी पॅलेस्टीनमध्ये आपली वस्ती केली. जॉर्डन आणि इजिप्तच्या मध्ये असलेल्या जॉर्डन नदीच्या किनार्‍याच्या लगतच्या प्रदेशाला हजारो वर्षापासून इजराईल असे म्हणतात. इजराईलच्या शेजारी सीरिया, इराक आणि सऊदी अरब असून लिबीया, सुडान, युथोपिया, इरान ही त्याच्या जवळ आहेत.
      ह. इब्राहीम अलै. (अब्राहम) सुद्धा इराकच्या ’अर’ येथून येवून पॅलेस्टीन येथे स्थायीक झाले होते. त्यांना दोन मुले होती. एकाचे नाव इसकाह अलै. तर दूसर्‍याचे नाव इस्माईल अलै. असे होते. त्यांनी इसहाक अलै. यांना पॅलेस्टीनमध्ये (बैतुल मुकद्दस) येथे तर ह.इस्माईल यांना मक्का (बैतुल हराम) येथे जावून स्थाईक होवून धर्मप्रचार करण्याचा आदेश दिला. हजरत इसहाक अलै. यांचे पुत्र हजरत याकूब अलै. होते ज्यांना इस्राईल (अल्लाहचा बंदा) म्हणून ओळखले जात होते. आज अस्तित्वात असलेल्या इस्राईल या देशाचे नाव त्यांच्याच नावावरून घेतलेले आहे. इस्राईलच्या भूमीला प्रेषितांची भूमीही म्हटले जाते. कारण याच भूमीमध्ये ह. दाऊद अलै, ह.सुलेमान अलै., ह. याह्या अलै., ह.मुसा अलै., ह. हारूण अलै., ह.ईसा अलै. ही वास्तव्यास होते. ह. इब्राहीम अलै. यांच्यापासून प्रेषितांच्या दोन शाखा निघाल्या. एक- हजरत याकूब उर्फ इस्राईल यांच्यापासून सुरू झालेल्या शाखेला बनी इस्राईल असे म्हणतात तर ह. इस्माईल अलै. यांच्या पासून सुरू झालेल्या शाखेला बनी इस्माईल असे म्हणतात. बनी इस्माईलमध्ये प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांचा जन्म झाला. ही गोष्ट बनी इस्राईल म्हणजे आजच्या यहुदी आणि ख्रिश्‍चनांना सहन झाली नाही. म्हणून ते प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना प्रेषित मानत नाहीत, हेच यहुदी-ख्रिश्‍चन विरूद्ध मुस्लिम यांच्यातील वैराचे प्रमुख कारण आहे.
      दुसर्‍या महायुद्धापूर्वी आटोमन साम्राज्य म्हणजेच उस्मानिया खिलाफतीचा पॅलिस्टीन हा एक भूभाग होता. या साम्राज्याचे शेवटचे खलीफा सुलतान अब्दुल हमीद सानी यांना यहुदी लोकांच्या एका शिष्टमंडळाने भेटून त्यांना पॅलेस्टीनमध्ये यहुदी वस्ती वसविण्याची परवानगी मागितली. त्या बदल्यात आटोमन साम्राज्यावर असलेले कर्ज स्वतः फेडण्याची तयारी दर्शविली. मात्र सुलतान अब्दुल हमीद यांनी त्यांची विनंती धुडकावून लावली. 1909 मध्ये सुलतान अब्दुल हमीद यांचा मृत्यू झाला. पहिल्या महायुद्धामध्ये आटोमन साम्राज्याने जर्मनीचे समर्थन केले होते. जर्मनीच्या पाडावाने पहिले महायुद्ध संपले व ऑटोमन साम्राज्यावर ब्रिटीशांनी ताबा मिळविला. त्याचे वेगवेगळे तुकडे केले. तुर्कीचा भाग आपल्या मर्जीतील कमाल पाशा अतातुर्क याला दिला तर हिजाजचा भाग सऊद परिवाराला दिला. पॅलेस्टीनच्या भागावर मात्र दुसर्‍या महायुद्धापर्यंत ब्रिटीशांचाच अंमल होता. म्हणून यहुदी लोकांनी  यहुदी लोकांसाठी ब्रिटीशांकडे पॅलेस्टीनच्या भूभागामध्ये वेगळे राष्ट्र तयार करून देण्याची विनंती केली. त्यासाठी त्यांनी दुसर्‍या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना भरपूर अर्थसहाय्य केले. हिटलर यांनी यहुदी लोकांवर केेलेल्या आनन्वित अत्याचाराचा दाखला दिला. ब्रिटीशांना दुसर्‍या महायुद्धामध्ये जरी विजय प्राप्त झाला तरी त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली की त्यांना आपल्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक राष्ट्रांना स्वातंत्र्य द्यावे लागले. परिणामी भारत आणि पॅलेस्टीनवरचा ताबा त्यांनी 1947 व 1948 साली सोडला.
     
यहुदींनी केलेल्या अर्थसहाय्याच्या बदल्यात यहुदींसाठी नवीन राष्ट्र तयार करण्यासाठी ब्रिटीशांनी अमेरिकेच्या मदतीने 1947 साली संयुक्त राष्ट्रामध्ये एक ठराव संमत करून पॅलिस्टीनच्या भूमीवर इस्राईल नावाच्या नवीन देशाची निर्मिती करण्यास मंजुरी मिळविली. संयुक्त राष्ट्राच्या या ठरावाप्रमाणे 14 मे 1948 रोजी त्यांनी पॅलिस्टनवरील आपला ताबा सोडला. मात्र जाता-जाता त्यांनी पॅलिस्टीनची फाळणी करून इस्राईलची निर्मिती केली. सरकारी इमारती, हत्यारे, पोलीस यहुद्यांच्या ताब्यात दिले.
      अरब राष्ट्रांचा याला प्रखर विरोध होता या विरोधाला न जुमानता शेवटी 15 मे 1948 साली इजराईल या देशाची अधिकृत घोषणा झाली आणि लगेचच अरब-इजराईल युद्धाला तोंड फुटले. सऊदी अरब, लेबनान, सीरिया, जॉर्डन आणि इजिप्त यांनी संयुक्तरित्या इजराईलवर हल्ला केला. मात्र ब्रिटन आणि अमेरिकेच्या लष्करी मदतीमुळे इजराईलने हे युद्ध जिंकले. या युद्धामध्ये अरब राष्ट्रांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा 29 ऑक्टोबर 1958 रोजी इजराईलने इजिप्तवर हल्ला करून सीना नावाचा भाग आपल्या राज्यात जोडला. इजराईलच्या या दंडेलशाहीला फ्रान्स आणि ब्रिटनने सक्रीय सहकार्य केले. 6 नोव्हेंबर 1958 रोजी युद्धबंदी करार झाला जो 19 मे 1967 पर्यंत कायम राहिला. 1967 मध्ये मात्र सहा दिवसांचे अरब इजराईल युद्ध झाले. यात इजराईलने अमेरिका आणि ब्रिटीश सैनिकांच्या मदतीने सीनाबरोबर पूर्वी जेरूसलमच्या काही भागावर आणि इजिप्तच्या गोलान टेकड्यांवर तसेच जॉर्डनच्या काही भागावर आपला कब्जा प्रस्थापित केला.
      10 जूनला संयुक्त राष्ट्राने मध्यस्ती करून युद्धबंदी केली पण इजराईलने बळकावलेला प्रदेश त्याच्याकडेच राहिला. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1973 रोजी यहुद्यांच्या पवित्र दिवशी म्हणजे ’यौमे कपूर’ ला इजिप्त आणि सीरियाने संयुक्तरित्या पुन्हा इजराईलवर हल्ला केला. इजराईलने प्रतिकार करीत हा हल्ला परतवून लावला. एवढेच नव्हे तर सुवेज कालव्याच्या पूर्व किनार्‍यावर कब्जा मिळविला. 24 आक्टोबर 1973 रोजी युद्धबंदी झाली आणि संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेने या भागात प्रवेश केला. युद्धबंदी करारात ठरल्याप्रमाणे 18 जानेवारी 1974 रोजी इजराईलने सुवेज कालव्यावरचा आपला ताबा सोडला. यानंतरचे दोन वर्ष शांतीत गेले. मात्र 13 आक्टोबर 1976 रोजी ऐन्टेबे विमानतळावर इजराईली सैनिकांनी एक धाडसी हल्ला करून आपल्या 103 नागरिकांना सोडवून आणले. यानंतर मात्र अरबांची हिम्मत खचली आणि इजराईलशी युद्ध करण्याचा त्यांनी नाद सोडला. 26 मार्च 1979 रोजी इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात यांनी इजराईलला मान्यता देवून त्याच्याबरोबर तह केला. यानंतर या दोन्ही देशात राजकीय आणि व्यापारिक संबंध सुरू झाले. मैत्रीचा उपहार म्हणून 1982 साली इजराईलने इजिप्तचा जिंकलेला सीनाचा प्रदेश त्याला परत दिला.
      हळू-हळू पॅलेस्टीन व आजूबाजूच्या अरब देशांचा भूभाग बळकावत असतांनाच जुलै 1980 मध्ये पूर्व आणि पश्‍चिम जेरूसलेमला इजराईलने आपली राजधानी म्हणून घोषित केले. 7 जून 1981 रोजी इजराईलने परत एका धाडसी हवाई कारवाईमध्ये इराकचे अणुकेंद्र उध्वस्त केले. 6 जून 1982 रोजी परत एका धाडसी कारवाईमध्ये इजराईली सैनिकांनी लेबनानमधील पीएलओ (पॅलिस्टीन लिबरेशन ऑर्गनायझेशन) चे मुख्यालय उडवून दिले. यात बैरूत शहराचा पश्‍चिमी भाग बेचिराख झाला. अधिक रक्तपात टाळण्यासाठी पीएलओने बैरूत शहर रिकामे करण्याला मान्यता दिली. याचवर्षी 14 सप्टेबरला लेबनानचे निर्वाचित अध्यक्ष बशीर जमाल यांची हत्या इजराईलची गुप्तचर संघटना मोसाद ने केली. यानंतर सुद्धा इजराईलने शेजारी अरब राष्ट्रांना सळो की पळो करून सोडले. इस्राईलने जरी जेरूसलेमला आपली राजधानी घोषित केली मात्र प्रत्यक्षात इस्राईलची राजधानी तेल अवीव शहरात आहे. जेरूसलेमच्या अर्ध्या भागावर म्हणजे पश्‍चिमी जेरूसलेम ज्यात बैतुल मुकद्दस आहे तो भाग अजूनही पॅलेस्टीनचाच भाग म्हणून ओळखला जातो. त्या भागासहीत पूर्व आणि पश्‍चिम जेरूसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यामुळे बैतुल मुकद्दस सहीत संपूर्ण जेरूसलम शहर आता इस्राईलचे शहर म्हणून भविष्यात ओळखले जाईल. हे अरबांनाच नव्हे तर जगातील इतर मुस्लिम देशांना सहन होण्यासारखे नाही. इस्राईल शहराचे महत्व एका ईश्‍वराला मानणार्‍या यहुदी, ख्रिश्‍चन आणि मुस्लिम या तिन्ही धर्मांमध्ये एकसारखे आहे. ख्रिश्‍चन ज्यांना आपले प्रेषित मानतात ते ईसा अलै. यांचा जन्म जेरूसलेमच्या बेथलहेम भागातला. त्यांना याच शहरात यहुद्यांनी क्रुसेडवर चढविले. या नात्याने हे शहर ख्रिश्‍चनांसाठी अत्यंत पवित्र आहे. यहुद्यांच्या मान्यतेप्रमाणे पवित्र विपींग वॉल ही याच शहराच्या एका टेकडीच्यापायथ्याशी आहे. शिवाय त्यांचे पवित्र धार्मिक स्थळ हैकल-ए-सुलेमानी या शहराच्या भूभागात असल्याची त्यांची मान्यता आहे. याच शहरात असलेली मस्जिद-ए-अक्सा ही मुस्लिमांसाठी ’किब्ला-ए-अव्वल’ असून याच मस्जिदीमधून सर्व पैगम्बरांना नमाज पढवून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मेराजच्या रात्री अल्लाहकडे सदेह प्रस्थान केले. म्हणून मुस्लिमांसाठी हे शहर जीवापेक्षा जास्त प्रिय आहे. मक्का आणि मदिनानंतर जेरूसलेम हेच मुस्लिमांसाठी तिसरे पवित्र शहर आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयाची कारणे
      ट्रम्प यांच्या ताज्या निर्णयामुळे मुस्लिमांचा या शहरावरील अधिकार तसेच मस्जिद-ए-अक्सा दोन्ही धोक्यात आलेले आहेत. परंतु ट्रम्प यांनी हा निर्णय का घेतला यासाठी चार महत्वपूर्ण कारणे आहेत. एक - यहुदी समाज अमेरिकेमध्ये फक्त 60 लाख एवढा आहे. मात्र या लोकांचा प्रमुख व्यवसाय व्याजावर आधारित व्यवहार आहेत. म्हणून हा समाज अत्यंत श्रीमंत असा समाज आहे. अमेरिकेच्या आर्थिक नाड्या याच समाजाच्या हातात आहेत. अमेरिकेच्या प्रत्येक महत्वाच्या पदावर यहुदी लोक अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले आहेत. माध्यमे मग ती प्रिंट असो का इलेक्ट्रॉनिक्स जवळ-जवळ सर्वांवरच यहुद्यांची मालकी आहे. म्हणून यांच्या मर्जीला डावलण्यासाठी जो धोरणीपणा या पुर्वीच्या अध्यक्षांच्या अंगी होता त्याचा अभाव ट्रम्प यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी यहुदी लॉबीच्या दबावाला बळी पडून हा निर्णय घेतला आहे. 
      दोन - त्यांचे जावाई जेराड कुश्‍नर हे स्वतः यहूदी असून त्यांनीच या निर्णयासाठी ट्रम्प यांच्यावर आतून दबाव आणला असावा.
      तीन - अमेरिका आता खनिज तेलासाठी स्वयंपूर्ण झालेली आहे. 2015 पासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या समुद्रधुनीतून फ्रँकिंग पद्धतीने समुद्रतळाला असलेले तेलाचे साठे शोधून काढण्यास अमेरिकेला यश आलेले आहे. तेव्हापासून सऊदी अरबसह मध्यपुर्वेच्या इतर मुस्लिम देशांवर तेलासाठी अमेरिकेचे असलेले अवलंबित्व संपलले आहे. त्यामुळे या देशांच्या नाराजीची फारशी पर्वा करण्याची गरज अमेरिकेला राहिलेली नाही.
      चार - जगामध्ये अस्तित्वात असलेल्या 56 पेक्षा अधिक मुस्लिम देशांमध्ये एकी नाही. ते कितीही नाराज झाले तरी एकत्र येवून कोणाविरूद्ध लढू शकत नाहीत. याची पक्की खात्री अमेरिका आणि इजराईलला आहे. म्हणून सुद्धा ट्रम्प यांनी एवढा मोठा धाडसी निर्णय घेतलेला आहे. शिवाय, सऊदी अरबचे वली अहेद राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांना आपल्या गोटात वळवून सऊदी अरबचा विरोध होणार नाही, याची पक्की व्यवस्था त्यांनी केलेली आहे. मात्र सऊदी अरबची जनता आणि मध्यपुर्वेतील इतर राष्ट्रातील जनता तसेच इजीप्तमधील जनता या निर्णयाने गप्प राहील असे वाटत नाही. या निर्णयानंतर मध्यपुर्वेतील मुस्लिम देशांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. जेरूसलममध्ये ज्यू आणि पॅलिस्टीनी जनतेमध्ये चकमकी सुरू झालेल्या आहेत. हमासचे प्रमुख इस्माईल हनिया यांनी तिसर्‍या इंतफादा (सशस्त्र चळवळ) ची घोषणा केलेली आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती माईक पेन्स यांना भेटण्यास पॅलिस्टीनचे प्रशासकीय प्रमुख महेमूद अब्बास यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे, त्यामुळे अमेरिकेचे तिळपापड झालेले आहे. एकंदरित परिस्थिती चिघळण्यास सुरूवात झालेली आहे. भविष्यात हे प्रकरण किती चिघळेल याचा अंदाज बांधणे कठिण आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget