Halloween Costume ideas 2015

मोहम्मद उमर सुभानी

(१८९०-१९२६)



मोहम्मद उमर सुभानी, ज्यांना महात्मा गांधींनी “महान देशभक्त” म्हणून गौरवले होते, त्यांचा जन्म १८९० मध्ये मुंबईत झाला. त्यांचे वडील यूसुफ सुभानी हे प्रसिद्ध व्यापारी होते. त्यांनी लहान वयातच त्यांच्या वडिलांकडून व्यवसायाचे सिद्धान्त शिकून घेतले आणि व्यवसायात चांगली कौशल्ये मिळवली. त्या काळात त्यांना “कापूस राजा” म्हणून ओळखले जायचे. 

आपला व्यवसाय चालवत असताना, त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आस्था दाखवली. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आणि शांततेच्या मागे सक्रियपणे उपक्रम आयोजित केले ज्यासाठी गांधीजींनी त्यांचे “स्टेज मॅनेजर’ म्हणून कौतुक केले. 

अ‍ॅनी बेझंट यांच्या नेतृत्वाखाली “होम रुल मूव्हमेंट”मध्ये मोहम्मद सुभानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय राष्ट्रीय चळवळीचा भाग म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जेव्हा जेव्हा कोणत्याही आंदोलनाची हाक दिली तेव्हा त्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि सर्व खर्च स्वतःच्या स्रोतातून उचलला. ही बाब ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी डोळ्यात अंजन घालणारी ठरली.

१९२१ मध्ये त्यांनी खिलाफत आणि असहकार चळवळीत सक्रिय भूमिका बजावली. या प्रसंगी, त्यांनी परदेशी वस्तू जाळताना आपले सर्व महागड्या कपड्यांना आग लावली आणि त्यामुळे ते आपल्या देशवाशियांकरिता अनुकरणीय ठरले. त्यांनी गांधीजींना टिळक स्वराज्य निधीसाठी कोरे धनादेश देऊ केले. निधी उभारणी कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपल्या सहकारी व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा केल्या. 

त्यांनी एक लाख रुपयांच्या उदार देणगीसह त्यांचा “सुभानी व्हिला” हा बंगला खिलाफत कमिटीला भेट म्हणून दिला. 

ते इंडियन नॅशनल काँग्रेसच्या उपक्रमांना वित्तपुरवठा करत असल्याने ब्रिटिश सरकारने त्यांच्या व्यवसायावर निर्बंध लादले. या दबावाला न घाबरता, ते सर्व उपक्रम आणि बैठकांमध्ये भाग घेत पुढे गेले. ब्रिटीशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे त्यांचा व्यवसाय नष्ट झाला तेव्हाही ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि खिलाफत समितीच्या कार्यात कार्यरत राहिले. 

अखेरीस, “अंगोरा फंड”साठी देणग्या गोळा करताना त्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. फेब्रुवारी १९२२ मध्ये त्यांचे तीन कोटी चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीमुळे ते आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आणि ते मानसिकदृष्ट्या खचले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आर्थिक बळ देणे हा मोठा सन्मान वाटणाऱ्या माणसाला “नाही” म्हणणे सहन होत नव्हते. 

आर्थिक आणि मानसिक नैराश्येतून बाहेर पडू न शकल्याने त्यांनी ६ जुलै १९२६ रोजी आत्महत्या केली.


लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget