वरील शीर्षक हे आजघडीला किती सूचक, समर्पक व पूरक आहे - हे सहजी सप्रमाण व उघडपणे दिसून येते. राजकारणात उच्च व नीच या स्तरावर कार्य आधीही व्हायचे, पण मागील काही काळापासून राजकारणाच्या पटलावर जनसेवा हा प्रकार अगदी बोलण्यापुरता मर्यादित ठेवून नसती खटपट व कटकट यात जनतेसह राज्य व देशाचे प्रचंड नुकसान होत आहे. याला मूळ कारण हे जनतेची पसंती/निवड आहे, जी निवडणुकीतून व्यक्त केली जाते आणि अकार्यक्षम व्यक्ती निवडून स्वतःच्या आयुष्याला स्वतःच शाप देण्याचे अर्थात उतरती कळा लावून घेण्याचे कार्य कथित सुजाण नागरिक करतात.
राजकारणीच नव्हे तर जनतेचाही स्वार्थ इतका पराकोटीला पोहोचला आहे की त्यांना राज्य किंवा राष्ट्राचा विचारही करावासा वाटत नाही. ही विभागाची राज्याची आणि राष्ट्राची शोकांतिकाच म्हणावी की, आजघडीला आपल्या राष्ट्राच्या सुजाण नागरिकांना राष्ट्राचे अस्तित्व व प्रगतीचा अधिकार भार पेलवत नाही आणि “बोलाची कढी व बोलाचाच भात” अहोरात्र पंगतरूपाने कल्पनेत मांडून निव्वळ भूलथापा वाढणाऱ्यांच्या मैफिलीत कथित सामान्य पण संधीसाधू लोक अकार्यक्षम, भ्रष्टाचारी, दुराचारी व धर्मांध व्यक्तीच्या मागे आपल्या आयुष्यासह राष्ट्राच्या भविष्याची राखरांगोळी करत आहेत.
अतिशयोक्ती करणं हा राजकारण्यांचा जुना खेळ व छंद, तर या बावळटपणाच्या घातकी खेळत डुंबून जाणे आणि त्यातच स्वतःचे मनोरंजन करून घेत राजकारण्यांचे कोडकौतुक करणाऱ्या जनतेने अनादी काळापासून अनादी कालपर्यंत स्वतःसाठी कल्या पाण्याच्या शिक्षेची अर्थात यातनामयी जीवनाची तडजोड करूनच ठेवली आहे. जनतेने काळात नकळतपणे स्वतःसाठी स्वतःच निर्माण केलेल्या व वाढवून घेतलेल्या समस्यांच्या निराकारणाकरिता ते स्वतः जबाबदार घेऊन बिकट समस्यांचे परिमार्जन करणे हे स्वातंत्र्यासाठी तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पेराल ते उगवेल (म्हणजेच राजकारणी, गुंड, अधिकारी, इत्यादींना अती महत्त्व देऊन लोकशाहीचा पाया किलकिल्या करणाऱ्या जनतेच्या वागणुकीने) या म्हणीचा प्रत्यय जनतेने वेळोवेळी घेऊनही या बाबीची गांभीर्याने दखल घेतली नाही. पण आता आधुनिक प्रणालीच्या संगतीने या वास्तव लोकशाहीच्या तथ्यपूर्ण सत्य अर्थात वास्तवाला संघटित करून स्वतःची, स्वतःच्या विभागाची व राष्ट्राची प्रगती साधणे अत्यावश्यकच आहे.
राजकारणात पक्षांतर एवढे सहज व सोपे आहे की, त्यापेक्षा जास्त कठीण मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी वाटते. या व अश्या अनेक कारणांमुळे राजकारणाचा स्तर फार जास्त खालावला आहे - ज्यामुळे नीतिमत्ता, नैतिकता, तत्व, जाहीरनामा, वचन, इत्यादी मूलभूत घटकांना औपचारिकतेपेक्षा जास्त महत्व उरलेच नाही आणि मागील कित्येक वर्षापासून तर सत्तेचा माज व उन्माद असा काही वाढला आहे की, ज्या लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांना तर दमडीची किंमत राहिली नाही. जनतेला पूर्वापार गुलामीगिरीची सवय जडल्याने त्यांनी राजकारण्यांना अति महत्व देत राजशाही जीवनाचा साज असलेले मुक्त जीवन देऊ केले, त्यामुळे जनसेवा व राष्ट्रसेवा ही राजकारण्यांची प्राथमिक कर्तव्ये खितपत पडली आणि राजकारणी वर्ग स्वार्थ, पक्षहित, पक्षपात, षडयंत्र, भ्रष्टाचार, दुराचारी, धर्मांधता, घराणेशाही या व्यापात अडकून गुन्हेगारीकडे वळत यातच आयुष्य व्यतीत करण्यास धन्यता मानून प्राधान्य देत वाटचाल करताहेत.
जनतेला त्यांच्या अस्तित्वाची व अधिकारांची आणि राजकारण्यांना (शैक्षणिक गुणवत्ता व पदाची पात्रता नसतानाही मिळत असलेल्या राजेशाही थाटाच्या कर्यकलापेक्षा मोलाचे असलेल्या) त्यांच्या कर्तव्याची अर्थात जनसेवा व राष्ट्रसेवेची जाणीव होणे फार जास्त आवश्यक आहे. त्याशिवाय ही बेबंदशाही अशीच चालू राहील आणि फार कमी काळात याचा उद्रेक होऊन सबंध राष्ट्राला भयानक व भयावह असे परिणाम भोगावे लागतील.
नेतृत्वाची अर्थात सत्तेची संधी मिळवऱ्याला त्याच्या जाहीरनाम्यापासून ते सत्तेच्या काळात न जमलेल्या यशाची कारणमीमांसा देणे तितकेच सोपे ठरते, जितके सोपे विरोधी पक्षाला जनतेने साथ दिली नाही म्हणून आलेले अप्याश! अर्थात सत्ताधारी असो की विरोधक, दोष तो जनतेचाच आणि कारण ही जनताच! दुधारी तलवार आणि अवसानघातकी पर्यायांपेक्षा बिकट संकटात जनतेला देशद्रोही तर त्याच जनतेला वेळप्रसंगी (निवडणूक, इत्यादी काळात) सर्वश्रेष्ठ देशप्रेमी ठरविणारे असेही बरेच कथित मुत्सद्दी आहेत, ज्यांना देशाची नाममात्र माहितीही उसने घेऊन स्वतःचे देशप्रेम व्यक्त करताना बाकी नऊ येतात.
यांनाही आम्ही अर्थात कथित जनता नानाविध बिरुदावली व मानसन्मान देऊन त्याचे जीवन सार्थकी तर स्वतःचे जीवन नाटकी ठरवितो.
या लेखातून कोण्या एका व्यक्तीला, समूहाला, पक्षाला, धर्माला, गटाला, समाजाला, वा तत्सम बाबीला उद्देशून काहीबाही लिहिणे किंवा टीका/उपहास/व्यंग करणे असा मुळीच उद्देश नाही. वर्तमान स्थितीचे वास्तव विश्लेषण करून जनजागृती करून लोकहित साध्य करण्याप्रती आपले योगदान देण्याचा उदात्त हेतू मांडण्याचा छोटासा प्रयत्न आहे, जे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. फक्त आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या भावी पिढीसाठी आणि संपूर्ण जगासाठी एक सबळ राष्ट्राचे परिपूर्ण उदाहरण आपले महान राष्ट्र आहे, ही जाणीव स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्त्वांना अभिमानाने अधोरेखित करणारी आहे.
- इकबाल सईद काझी
(विश्लेषण/लेखक)
Post a Comment