Halloween Costume ideas 2015

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहावे...!


भारत हा कृषीप्रधान देश आहे, आजही या देशातील ७० ते ८० टक्के लोकांचा व्यवसाय शेती  आणि पशुपालन हा आहे, मात्र यंदा राज्यात पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदा प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी नदीनाल्यांना महापुर आले आहेत. त्यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना उभ्या पिकांची नासाडी, फळफळावळ बागांचे नुकसान डोळ्यांदेखत पाहून हताश व निराश व्हावे लागले आहे. संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी या फळपीकांचे तर मोठे नुकसान झाले आहे. शिवाय भात, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, गहू,या सारख्या पिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरवर्षी विक्रमी उत्पादन देणाऱ्या कांदा व लसूण या पिकांची ही मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. जगाच्या पाठीवर भारतीय शेती अत्यंत सुपीक आहे. अगदी प्राचीन काळापासून कृषी संस्कृतीच्या पाऊलखुणा या देशात टिकून आहेत.आज एकविसाव्या शतकात सुध्दा कृषी उद्योग जगभरात सर्वश्रेष्ठ मानला जातो, भारतात आज पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय केला जातो, शेतीतून उत्पादन ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते, भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून भारतीय अन्नधान्याच्या निर्यातीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.मात्र यंदा प्रचंड पावसामुळे रब्बी पिकांची, फळबागांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पशुधन,पक्षी व मानवी जीवनावरही त्याचा दुष्परिणाम झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने एक दोन वर्षे झाली की महाभयंकर नैसर्गिक आपत्तीला बळीराजाला तोंड द्यावे लागते आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग हताश, हतबल व निराश होऊ लागला आहे. शेतकरी आत्मविश्वास व हिंमत गमावून बसला आहे. डोळ्यांदेखत होत्याचे नव्हते पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे. त्यातूनच शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी होऊन आत्महत्येला प्रवृत्त होत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे,ही परिस्थिती बदलण्यासाठी मायबाप सरकारने आता शेतकऱ्यांच्या बाजूने कंबर कसली पाहिजे.

कोसळणाऱ्या प्रचंड पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीला कोणीही थोपवू शकत नाही, हे वास्तव आहे. अतीप्रमाणात पडलेल्या पावसामुळे अल्प कालावधीत शेतकऱ्यांच्या पीकांचे होत्याचे नव्हते करून जाते. यंदा पावसामुळे शेतातील उभी पिके आडवी झाली. फळबागां उध्वस्त झाल्या. पशूधन गतप्राण झाले. काही शेतकऱ्यांच्या घरादारांचे नुकसान झाले. काही दुर्दैवी शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. डोळ्यांदेखत होणारे नुकसान असह्य झाले झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. संपूर्ण महाराष्ट्राला यांचा जोराचा फटका बसला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई याला तोंड द्यावे लागते,मात्र यावर्षी तापमानात झालेली वाढ, अती प्रमाणात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे.

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे रहायला हवे...

नैसर्गिक आपत्तीशी सामुदायिकपणे, परस्पर सहकार्य व समन्वयाने सामना करावा लागतो. अतीप्रमाणात पडलेल्या पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी, फळबागांचे नुकसान, पशूधनाची दूरावस्था पाहता ही नैसर्गिक आपत्ती सहनशीलतेच्या पलिकडची आहे. अशावेळी आपत्तीग्रस्त शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दीन दुबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची जबाबदारी मायबाप सरकारची असते. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यायला हवा. 

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित व योग्य पंचनामे व्हावेत...

राज्यातील महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित, योग्य व वास्तव पंचनामे करायला हवेत. अर्थात आजवरच्या अनुभवावरून तलाठी, ग्रामसेवक व मंडल अधिकारी , तसेच कृषी खात्याचे अधिकारी पंचनामे करतांना कामचुकारपणा व भेदभाव तसेच आर्थिक बेव्यवहार करतात. त्यांची मिलीभगत असल्याने वास्तवतेप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळत नाही. व त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते, गरीब व असाह्य शेतकरी याविरोधात दाद मागू शकत नाही. तरी सर्व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे व्यवस्थित व योग्य ते सर्वेक्षण व्हावे आणि कोणत्याही आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. यात अडथळा किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

शासनाने प्रांतभेद करू नये...

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब व योग्य ते आर्थिक सहाय्य करावे, हे करताना शासनाने प्रांतभेद करू नये. राज्यात ज्या ज्या प्रांतात शेतकऱ्यांच्या पिकांची, फळबागांची, व पशूधनाची नासाडी, दूरावस्था व नुकसान झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना समान न्यायाने आर्थिक साहाय्य व्हावे, अन्यथा राजकीय हस्तक्षेपामुळे एखाद्या भागात तसेच ठराविक शेतकऱ्यांना झुकते माप दिले जाते, असे होऊ नये.

आपत्तीग्रस्त शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे....

शासनाने शेतकऱ्यांना तटपूंजी मदत करून त्याची मानसिकता खचू देऊ नये. त्यांच्या नुकसानीचा पुरेपूर मोबदला त्याला मिळू द्यावा. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी प्रवृत्ती प्रत्येक आपत्तीच्या वेळी दिसून येते, शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेल्या दुःखात शेतकरी खचला जात असताना सुध्दा त्याच्या कडे चिरीमिरी अर्थात आर्थिक स्वरूपात मागणी केली जाते, अशांवर लक्ष ठेवून त्यावर कडक कारवाई करावी, आपत्तीग्रस्त शेतकरी पुन्हा या अस्मानी संकटातून बाहेर पडून ताठ मनाने उभा राहिला पाहिजे, यासाठी मायबाप सरकारने मोठ्या दिलदार मनाने मदत केली पाहिजे.

शासकीय मदत शेतकऱ्यांच्या मनाला दिलासा देणारी ठरेल...

यंदाच्या वर्षी अतीवृष्टीमुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक,व मानसिक नुकसान झाले आहे. शेतकरी पुर्णपणे खचला आहे, अशा वेळी शासनाची मदत ही शेतकऱ्यांच्या मनाला दिलासा व उभारी देणारी ठरणार आहे.तरी विनाविलंब मदत मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.

केंद्र सरकारच्या आपत्तीग्रस्त निधीची मागणी करून तात्काळ पाठपुरावा करावा....

केंद्र सरकारकडे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने तात्काळ निधीची मागणी करून त्याचा पाठपुरावा करावा,  केंद्र सरकारकडे आपत्तीग्रस्त निधीची मागणी केल्यास राज्य सरकार शेतकऱ्यांच्या नुकसानीची पुरेपूर भरपाई करून देऊ शकते.

शेतकऱ्यांच्या वीजेच्या बिलात व इतर करात सूट देण्यात यावी....

यंदाच्या अतीवृष्टीमुळे शेतकरी आत्मविश्वास गमावून बसला आहे. अशावेळी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या वीजेची बीले माफ करावीत. तसेच इतर महसुली कर ही माफ करण्यात यावेत.

अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर मोठे संकट आले आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मायबाप सरकारने धावून जावून त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, आवश्यक आहे.सरकारमध्ये व विरोधी पक्षात शेतकऱ्यांच्या मुलांचा समावेश आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आलेल्या संकटाची जाणीव सध्याच्या राजकारण्यांना असणे स्वाभाविक आहे, तेव्हा मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या हलाखीची परिस्थिती पाहून मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.


- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget