एखाद्याच्या मृत्यूची बातमी देताना अमुक व्यक्तीचा ’इन्तिकाल हो गया है’ असे म्हटले जाते. इन्तिकाल म्हणजे एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाकडे जाणे. मृत्यूनंतर माणूस एका जगातून दुसऱ्या जगात स्थानांतरित होतो, म्हणून ’इन्तिकाल हुवा’ असे म्हणतात. ’फना हुवा’ म्हणजे नष्ट झाला असे म्हणत नाही. मृत्यू म्हणजे सांसारिक जीवनाचा शेवट आणि मरणोत्तर जीवनाची सुरुवात आहे. मृत्यूनंतरही जीवनाचे सातत्य कायम राहते आणि त्याचे फक्त स्वरूप बदलते. मृत्यू म्हणजे भक्ताचे आपल्या निर्मात्या अल्लाहकडे परत जाणे होय, म्हणूनच कुणी मरण पावल्यावर ‘इन्ना लिल्लाही व इन्ना इलयही राज़िऊन’ म्हणण्याची प्रथा आहे. अर्थात ’’निसंशय आपण अल्लाहचेच आहोत आणि अल्लाहकडेच परत जाणारे आहोत’’. मृत्यूनंतर माणूस ज्या जगात प्रवेश करतो त्याला ’आलमे बरजख’ म्हणजे मृत्यू ते कयामत या दरम्यानचे जग म्हणतात. मृत्यू होताना आत्मा हा फक्त शरीरापासून वेगळा होतो. नष्ट होत नाही. शरीरापासून विभक्त झाल्यानंतरही आत्मा संपूर्ण व्यक्तिमत्त्वासह जगतो. ते व्यक्तिमत्त्व जे सांसारिक जीवनातील योग्य किंवा अयोग्य दृष्टिकोनातून आणि चांगल्या-वाईट आचरणातून बनलेले असते. मृत्यूनंतरही आत्मा हा चेतना, भावना, निरीक्षणे आणि अनुभवांच्या अवस्थेतून जात असतो. चांगला माणूस मृत्यूनंतर कयामतच्या दिवसापर्यंत ईश्वराचा पाहुणा म्हणून राहतो आणि दुष्ट माणूस अटकेत असलेल्या आरोपीप्रमाणे कैदेत राहतो. आदरणीय अब्दुल्लाह इब्ने उमर (र) यांनी वर्णन केले आहे की अल्लाहचे पैगंबर (स) म्हणाले, जेव्हा तुमच्यापैकी एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्याला सकाळी आणि संध्याकाळी त्याचे स्थान दाखवले जाते. जर तो स्वर्गातील लोकांपैकी एक असेल तर त्याला त्याचे तेथील स्थान दाखवले जाते आणि जर तो नरकवासीयांपैकी असेल तर तेथील त्याचे स्थान दाखवले जाते. मग त्याला म्हटले जाते, कयामतच्या दिवशी हे तुझे स्थान राहणार आहे. (हदीस संग्रह बुखारी:1379- इस्लाम 360 )
या हदीसमध्ये सांगितल्याप्रमाणे मृत्यूनंतर माणूस अजिबात संपत नाही तर त्याचा आत्मा त्याच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांसह बाकी राहतो. सकाळ-संध्याकाळ त्याला त्याचे खरे निवासस्थान दाखवले जाते. स्वर्गाचे दृश्य पाहिल्यानंतर स्वर्गवासीयांना किती आनंद होईल याची कल्पना करणे आपल्यासाठी अवघड आहे. त्याचप्रमाणे नरक पाहिल्यानंतर नरकवासीयांची जी अवस्था होईल, जो पश्चात्ताप होईल, जे दु:ख त्यांना भोगावे लागतील, त्याचीही आपण कल्पना करू शकत नाही.
यावरून हे ज्ञात होते की मृत्यूनंतर माणूस अजिबात नष्ट होत नाही. तर फक्त त्याच्या वर्तमान शरीरापासून त्याचा आत्मा काढून घेतला जातो. माणसाचे व्यक्तिमत्व मृत्यूनंतरही कायम राहते आणि त्याला सुख-दुःखही जाणवते. कयामतच्या दिवशी याच आत्म्याला शरीर देऊन अल्लाहच्या न्यायालयात उभे केले जाईल आणि सांसारिक जीवनातील कर्मांची पडताळणी करून बक्षीस किंवा शिक्षा दिली जाईल.
..................... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment