मृत्यूपासून शिक्षेची सुरूवात
मृत्यूनंतर कयामतचा दिवस येईपर्यंतच्या काळाला बरज़ख़ी जीवन म्हणतात. मुस्लिम समाजात मृतदेह कबरमध्ये दफन करतात म्हणून या जीवनाला ’कबर की जिन्दगी’ असेही म्हणतात. या जीवनात नास्तिक, अनेकेश्वरवादी व इतर पापी लोक दु:ख भोगतात, तर एकमेव ईश्वर, अल्लाहवर श्रध्दा ठेवणाऱ्या सदाचारी लोकांना दिलासा मिळतो. हे मात्र नक्की की मृत्यू ते कयामत या काळात सुख किंवा दुःख यांपैकी कोणत्याही एका परिस्थितीतून प्रत्येक माणसाला जावेच लागते. मग मृत व्यक्ती दफन केला गेला असो, जाळला गेला असो किंवा ते प्राण्यांचे अन्न बनलेले असो. मृत व्यक्तीची अवस्था सांसारिक जीवनातील लोकांना दिसत नाही. आदरणीय अंतिम पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी म्हटले आहे की,
मला ही भीती वाटते की तुम्ही तुमच्या मृतांना दफन करणे थांबवाल, अन्यथा मी अल्लाहकडे प्रार्थना केली असती की मी ऐकत असलेल्या कबरीतील यातनांचा आवाज तुम्हालाही ऐकू यावा. (हदीस संग्रह मुस्लिम - 7213 खपीं.. 2867 - इस्लाम 360 )बरज़ख़ी जीवनात मिळणारी शिक्षा जिन्न आणि मानवांपासून लपवून ठेवली गेली आहे. त्यांना ती अजिबात दिसत नाही, पण त्यांच्याशिवाय इतर प्राण्यांना त्याची थोडीफार जाणीव होत असते. जर ती परिस्थिती उघड केली गेली आणि लोकांनी मृतांचे रडणे, ओरडणे ऐकले तर त्यांना मृत्यूची इतकी भीती वाटेल की ते कुणाच्याही अंत्यसंस्काराला जाऊ शकणार नाहीत, कोणतेही काम करू शकणार नाहीत आणि जगाची व्यवस्था विस्कळीत होईल. कबरमध्ये मिळणाऱ्या यातना अल्लाहच्या अदृश्य व्यवस्थेचा एक भाग आहे. त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी ही प्रार्थना नेहमी केली पाहिजे, अल्लाहुम्-म इन्नी अऊज़ुबि-क मिन् अज़ाबिल्-कब्-रि हे अल्लाह! कबरीच्या यातनापासून मी तुझा आश्रय घेतो.( हदीस संग्रह - बुख़ारी 1377 - इस्लाम 360 )
याशिवाय शिक्षेकडे नेणाऱ्या सर्व कृती टाळण्याची काळजी घेतली पाहिजे. कबरीच्या शिक्षेस कारणीभूत ठरणारे काही गुन्हे पुढीलप्रमाणे आहेत. अल्लाहच्या अस्तित्वात, गुण सामर्थ्यात, हक्क व अधिकारात कुणाला सामील करणे, दांभिकपणा, ढोंगीपणा करणे, अल्लाहचे कायदे बदलणे, लघवीच्या थेंबापासून स्वतःचे रक्षण न करणे, एखाद्याच्या पाठीमागे त्याच्या बद्दलच्या वाईट गोष्टी दुसर्यास सांगणे, लावालावी करणे, खोटे बोलणे, कुरआन शिकल्यानंतर त्याकडे लक्ष न देणे, अनिवार्य नमाज़ झोपेत घालविणे, व्याज खाणे, व्यभिचार करणे, लोकांना चांगले शिकवणे पण स्वतःला विसरणे, रमजानमधील उपवास विनाकारण तोडणे, पुरुषांनी घोट्याच्या खालपर्यंत असलेले कपडे घालणे, एखाद्या प्राण्याला कैद करून त्याचा छळ करणे व कर्ज न फेडणे इत्यादी. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी पाहा,
इस्लाम सवाल व जवाब
अज़ाबे कब्र के तफ्सिली असबाब.
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment