भाषेचा गोडवा, तिचे महत्त्व, वापर, प्रसार, प्रचार या बाबी फक्त ती भाषा बोलण्याने साध्य होत नसतात तर त्या भाषेचे साहित्य यामध्ये खुप मोठी भूमिका बजावते. भाषेला जिवंत ठेवण्यामागे तिच्या साहित्याचा मोलाचा वाटा असतो. ती भाषा बोलणाऱ्यांची संस्कृती त्यांच्या लिखाणातून झळकते. एक प्रादेशिक भाषा असुनही इंग्रजी, ऊर्दू, हिंदी या भाषांप्रमाणेच मराठी भाषा वाड़मयाच्या दृष्टीने खुप प्रगत आणि प्राचीन आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय स्तरावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर आयोजित केले जाते. जवळपास सर्वच मराठी प्रकाशने आपल्या पुस्तकांचे प्रदर्शन या संमेलनात सादर करतात. लेखक आणि कवींसोबतच विविध अभिनेते, अभिनेत्री, राजकारणातील दिग्गज यासाठी आमंत्रित केले जातात. जगभरातील मराठी साहित्यिक, वाचक, रसिक प्रेक्षक या संमेलनाला आवर्जून भेट देतात.
साहित्य संमेलनात राजकारण्यांचे काय काम? असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा 1965 च्या मराठी साहित्य संमेलनात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे शब्द आठवतात ते म्हणाले होते,
राजकारणामध्ये पुष्कळ वेळा जे घडते त्याच्या मूळ प्रेरणा साहित्यातून निर्माण होत असतात. महाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाले तर संयुक्त महाराष्ट्राची प्रेरणा महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून निघाली.
या अगोदरच्या म्हणजे 1964 च्या साहित्य संमेलनात याच विषयावर अध्यक्षपदी बोलताना वि. ना. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज म्हणतात, ’’राजकारण आणि साहित्य या परस्परांना कधीही न भेटणाऱ्या समांतर रेषा आहेत असे मानणे हे साहित्याच्या बाजूने अडाणीपणाचे आणि राजकारणाच्या बाजूने धूर्तपणाचे लक्षण आहे.’’
आजकालच्या राजकारण्यांमध्ये साहित्याची गोडी प्रत्यक्ष दिसत नसली तरी ही गोष्ट विसरता कामा नये की पुर्वीचे राजकारणी हे साहित्यिक पण होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर, शिवराम महादेव परांजपे यांचे साहित्य राजकारणाभोवती फिरताना दिसते. शंकरराव देव, विनोबा भावे यांचे साहित्य महात्मा गांधींच्या प्रभावाखाली असलेले दिसते. राजकारणाचा साहित्यावर असा प्रभाव पडलेला दिसत असताना साहित्यिकांचा राजकारणाशी अथवा राजकारण्यांचा साहित्यिकांशी संबंध असणे काही वावगे ठरणार नाही. मात्र साहित्य आणि साहित्य संमेलन यांचा वापर करून चुकीचे राजकारण करणे हे धोकादायक आहे.
या वर्षीचे म्हणजे 2024 चे संमेलन हे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. हे संमेलन इचलकरंजी किंवा दिल्ली या दोन ठिकाणी ठेवण्यासाठी बराच वाद झाला. शेवटी हे दिल्ली येथे आयोजित करण्याचे नुकतेच ठरले. यापुर्वी 1954 साली एकदा दिल्ली येथे हे संमेलन आयोजित केले होते. आतापर्यंत एकुण 23 वेळा संमेलन महाराष्ट्राबाहेर आयोजित केले गेले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानात सर्व धर्मीय, सर्व पंथीय मराठी साहित्याचे दर्शन होते. इस्लामला सोप्या पद्धतीने मराठी भाषेत सादर करण्यासाठी इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट गेले 35 वर्षांपासुन अशा संमेलनामध्ये पवित्र कुरआनचे मराठी भाषांतर, पैगंबरांच्या शिकवणी, पैगंबर चरित्र व इस्लामच्या विविध पैलूंवर साहित्य प्रदर्शन करत आहे, साहित्य प्रेमींबरोबर संवाद करत आहे, मराठी साहित्यामध्ये मोलाचे योगदान यामधून होत आहे. नेहमीप्रमाणे याही वर्षी वाचकांसाठी एक उत्सव म्हणून हे संमेलन लाभणार आहे, त्याचा पुरेपूर फायदा प्रकाशने, साहित्यिक आणि वाचक घेतील हीच अपेक्षा.
- डॉ. हर्षदीप बी. सरतापे
मो. : 7507153106
Post a Comment