(१८६८-१९२७)
भारताच्या स्वराज्याचे समान ध्येय साध्य करण्यासाठी कितीही बलिदान देण्यास सदैव तयार असलेले हकीम अजमल खान यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८६८ रोजी दिल्लीत झाला. त्यांचे वडील हकीम अब्दुल गुलाम मोहम्मद खान हे एक प्रसिद्ध स्वदेशी वैद्यकीय व्यवसायी होते.
अजमल खान अनेक विषय शिकले आणि वडिलांप्रमाणे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झाले. १९०६ पर्यंत ते स्वतःला वैद्यकीय व्यवसाय आणि सार्वजनिक सेवेत मर्यादित होते. ते मुस्लिम प्रतिनिधींपैकी एक होते, ज्यांनी एक ऑक्टोबर १९०६ रोजी शिमला येथे व्हाईसरॉय यांची भेट घेतली. नंतर ते ऑल इंडिया मुस्लिम लीगचे उपाध्यक्ष झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात मतभेद निर्माण झाले तेव्हा १९१६ मध्ये लखनौ करारावर स्वाक्षरी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
महात्मा गांधी यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते ज्यामुळे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. १९१७ मध्ये, मुस्लिम लीग सोडल्यानंतर डिसेंबर १९१८ मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दिल्ली अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.
त्यांनी खिलाफत, असहकार चळवळीच्या उद्घाटन समारंभात भाग घेतला, जिथे त्यांनी मानद पदव्यांचा त्याग केला. जसे “कैसर-ए-हिंद”, “हजीकुल-मुल्क”, ज्यांना ब्रिटीश सरकारने बहाल केले आणि त्यामुळे ते एक आदर्श बनले. ते खिलाफतच्या मुद्द्यावर जानेवारी 1920 मध्ये व्हाईसरॉयला भेटलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य होते. त्यांनी 1921 मध्ये अहमदाबाद येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. जामिया मिलिया इस्लामिया (नॅशनल मुस्लिम युनिव्हर्सिटी) चे ते पहिले कुलपती बनले, जे राष्ट्रवादी विचारधारा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले होते. कुलपती म्हणून संस्थेला बळकटी देताना त्यांनी राष्ट्रवादी विचारसरणीला बळ दिले. १० मार्च १९२२ रोजी महात्मा गांधींना अटक झाली तेव्हा अजमल खान यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांसाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि सप्टेंबर १९२४ मध्ये त्यांच्या घरी हिंदू आणि मुस्लिम नेत्यांची बैठक घेतली. त्यांनी वैद्यकीय डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी म्हणून भारतीय जनतेची सेवा केली. डॉ अजमल खान हे कवीही होते. त्यांनी उर्दू आणि पर्शियन भाषांमध्ये कविता लिहिल्या, डॉ. झाकीर हुसेन यांनी हा काव्यसंग्रह १९२६ मध्ये “दिवान-शादिया” या शीर्षकाने आणला.
हकीम अजमल खान यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे १९२५ मध्ये सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी त्यांनी प्रचारासाठी अथक परिश्रम घेतले. २९ डिसेंबर १९२७ रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील जातीय सलोखा कायम होता.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment