Halloween Costume ideas 2015

कोणत्या वयात मुलांना उपवास करणे बंधनकारक आहे?


आजकाल चार-पाच वर्षाच्या मुलांनाही उपवास करण्यास लावून त्यांचे छायाचित्र समाज माध्यमांवर टाकण्याची जणू स्पर्धाच सुरू झालेली आहे. मात्र ज्या वयात पालकांनी आपल्या मुलांना उपवास करायला सुरूवात केली पाहिजे, ते वय म्हणजे मुलं उपवास करण्यास सक्षम आहेत याची त्यांना खात्री पटायला हवी. साधारणपणे इस्लामी विद्वानांनी दहा वर्षे वयाची व्याख्या केलेली आहे. मात्र प्रत्येक मुलाच्या शरीर रचनेप्रमाणे हे वय कमी जास्त होवू शकते. 

’’लहान मुलांसाठी ते पौगंडावस्थेपर्यंत पोहोचेपर्यंत उपवास करणे बंधनकारक नाही.’’

हजरत अल अवजाई यांनी या संदर्भात म्हटले आहे की, ’’जर मुलगा/मुलगी तीन दिवस सतत व्यत्यय न घेता आणि कमजोर न होता उपवास करू  शकतील असा आई-वडिलांना जोपर्यंत विश्वास येणार नाही तोपर्यंत मुलांना उपवास करायला लावू नये. हजरत इसाक यांचे या संदर्भात म्हणणे असे की, ’’जेव्हा मुलं 12 वर्षाची होतात तेव्हा मला वाटतं की त्यांना उपवास करायला लावायला हवे.’’ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एके ठिकाणी फरमाविले आहे की, ’’मुलं जेव्हा उपवास करण्यासाठी शारीरिकरित्या सक्षम होतील तेव्हाच त्यांना उपवास करायला सांगा. तेव्हा सुद्धा समजा एखादे मूल रोजाच्या अवस्थेमध्ये भूकेने व्याकूळ झाले तर त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याला एखादी खेळणी द्यावी परंतु, शारीरिक दुर्बलता किंवा आजारपणाच्या परिस्थितीत त्यांना उपवास करण्यास भाग पाडू नये.’’

सहाबा रजि., जे मुस्लिम उम्माहमधील सर्वोत्कृष्ट लोक आहेत ते त्यांच्या मुलांना लहान असताना उपवास करू द्यायचे. (मजमुआए फतवा अल शेख इब्ने उथायमिन 19/28-29). तरूण पिढीसाठी रमजान हा खूपच आकर्षक विषय आहे. तरूणांसाठी रमजान हा विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारा महिना आहे. विचार शक्ती वाढविण्याचा महिना आहे. 

इस्लामिक सेंटर ऑफ ग्रेटर सिनसिनाटी (अमेरिका) येथील तरूणांचे म्हणणे आहे की, शुक्रवारपासून सुरू झालेला रमजानचा महिना हा उत्सव आणि आनंदाच्या वाढीसाठी पोषक आहे. अल्लाहशी एकरूपता आणि मुस्लिम उम्माहसोबत एकता वाढविण्याचा महिना आहे. कारण या महिन्यात सर्व लोक अध्यात्मिक शिस्तीत असतात. कितीही उष्णता असो हे लपलेले सामर्थ्य शोधण्यासाठी उपयुक्त महिना आहे. आपल्या व्यक्तीमत्वातील उणीवा दूर करण्याचा महिना आहे. हे अध्यात्मिक प्रबोधनाबद्दल आहे. जे लोक प्रार्थना करण्यात आणि कुरआन पठण करण्यात जास्त वेळ घालवितात त्यांना या महिन्यात खूप पुण्य मिळेल. इफ्तारसाठी लहान भावंडांसाठी वेगवेगळ्या गोडवस्तूंची गुडीबॅग बनविण्यात अधिक आनंद आहे. 

17 वर्षीय दानियाल खान या मुलाचे म्हणणे आहे की, बऱ्याच लोकांना रमजानचा महिना उपवासामुळे शुद्ध संघर्षाचा वाटतो. पण मी म्हणू शकतो की हा वर्षातील मजेदार आणि शांततामय काळ आहे. उपवास आम्हाला अधिक मजबूत बनवितो. मी स्वतःला या महिन्यात धन्य समजतो. 

हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी जे वर्षातील बहुतेक वेळ अभ्यासात आणि शालेय क्रियाकल्पात रममान असतात. रमजान त्यांना स्वतःला नैतिकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठीची  दुर्मिळ संधी देतो. 16 वर्षीय फरिआल जिंदानी म्हणते की, जितका वेळ ती कारमध्ये असते तितका वेळ तिने ऑडिओ कुरआन ऐकण्याची व्यवस्था केलेली आहे. पश्चिम मुंबईचा 18 वर्षीय आबेद कादरी म्हणतो की, ’’रमजानमध्ये त्याच्या पालकांना अतिरिक्त आदर दाखविण्याचा तो प्रयत्न करतो आणि स्वतःच्या शिष्टाचार आणि वर्तनाबद्दल अधिक जागरूक असतो.’’

जोयबा बकाली (17, रा. नागपूर) ही विद्यार्थीनी  म्हणते की, रमजानमध्ये ती संपूर्ण कुरआन वाचून पूर्ण करते. यामुळे तिचे मन प्रार्थनेत केंद्रित होते. नंतर लोकांशी दयाळूपणे वागण्यास मदत होते. रमजान वर्षातून एकदाच येतो म्हणून तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा आहे. अकोला येथील आसिफ सय्यद (17, अध्यक्ष युवक मंडळ अकोला) म्हणतो की, ’’उपवास, प्रार्थना आणि आत्मपरीक्षण यांचे संयोजन एक उच्च आणि अकल्पनीय अध्यात्मिक अनुभुती देते. मी रोज रात्री तरावीह नमाजसाठी मस्जिदमध्ये जातो. एकत्र प्रार्थना करतो आणि घरी येऊन व्यक्तिगत प्रार्थना करतो. तेव्हा मला मानसिक आणि शारीरिक प्रसन्नता जाणवते, हा महिना आनंदाचा आहे. 

नागपूरचाच नासीर शेख (19) म्हणतो की, ’’ मी इस्लामिक सेंटर चालवितो. माझ्या मनामध्ये रमजानमध्ये शुद्धतेची नवीन भावना निर्माण होते. एरव्ही आपले ईमान थोडेसे कमीजास्त होते. परंतु, रमजानमध्ये ईमानवर लक्ष केंद्रित करत असतो आणि प्रत्येक दिवस अध्यात्मिक शुद्धी करण्यासारखा असतो.’’ 

ब्रिटनमधील अलसादिक अल जहरा स्कूल ही एक अशी शाळा आहे, जी चांगल्या व्यवस्थापनामुळे ओळखली जाते. ही शाळा एक स्वतंत्र इस्लामिक शाळा आहे. रमजानच्या काळात शाळेमध्ये मुलींना व्यस्त ठेवण्यासाठी खेळाच्या माध्यमातून त्यांंचे नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी युथ स्पोर्टस् ट्रस्ट गर्ल अ‍ॅ्निटव्ह फेस्टिव्हलचे आयोजन करते. रमजानमध्ये ही एक अतिशय चांगली कृती त्या शाळेने केलेली आहे. 

शाळेमध्ये खूप स्पर्धा आणि अ‍ॅ्निटव्हिटी घेतल्या जातात. पण काही अ‍ॅ्निटव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांच्या मुखामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते. शाळेने अशा अ‍ॅ्निटव्हिटीज घेवू नये. 

रमजानमध्ये तरूण व्यावसायिकांचे अनुभव 

’’मला वाटते की माझ्यासाठी एक अधिक कठीण झाले आहे. कारण मला कोणत्याही ब्रेकशिवाय सात तास काम करावे लागते. एक विद्यार्थी म्हणून मी शाळेत किंवा विद्यापीठ असतांना मला एक तास ब्रेक मिळत होता. पण व्यावसायामध्ये तो मिळत नाही.’’- फय्याजअली नागपूर

आफिया जबीन (32, सॉफ्टवेअर इंजिनिअर बेंगलोर) म्हणाली, ’’रमजानपूर्वी माझे झोपेचे सत्र सामान्य होते. मी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास झोपायची आणि सकाळी 7 वाजता उठायची. पण आता रमजानमध्ये मला पहाटे सहरी करून पुन्हा सात वाजता कामावर जायचे आहे. मी माझे झोपेचे सत्र 9 वाजता करायचे निश्चित केले परंतु ते मला आजपर्यंत साध्य झाले नाही. मी अजूनही 12 वाजता झोपते, सहेरीसाठी वेळेवर उठते पुन्हा 7 वाजता नियमितपणे कामावर जाते. आणि सायंकाळी 5 वाजता ऑफिसहून येवून इफ्तारची तयारी करते. तरीपण मला रमजानमध्ये खूप आनंदी वाटते थकवा येत नाही. 

बिलाल मुहम्मद म्हणतो की, ’’महिनाभरच्या उपवासानंतर ईदच्या दिवशी मी फ्रिजसमोर उभा राहतो. तेव्हा माझ्या मनात येते की मी काही काहीही खावू शकत नाही. मात्र ताबडतोब माझ्या लक्षात आले येते की आज माझा उपवास नाही आज तर ईद आहे. आज मी मला वाटेल तेव्हा खावू पिवू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. माझ्यासाठी आणि माझ्यासारख्याच अनेक लोकांसाठी आम्ही आमचा धर्म गांभीर्याने घेतो. आम्ही स्वतःला वचन देतो की आम्ही हे कायम ठेवू. रमजान संपल्यानंतर माझे मन एकीकडे आनंदी होते तर दूसरीकडे दुःखी होते. की आता रमजान संपले. रमजान महिना मला खूप आवडतो. या महिन्यात आपण खूप काही शिकतो. 

1400 वर्षापूर्वी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एकदा म्हटले आहे की, आधी पाच गोष्टींचा फायदा घ्या. 

1. तारूण्याचा वृद्ध होण्यापूर्वी 2. आरोग्याचा आजारी पडण्यापूर्वी 3. श्रीमंतीचा गरीब होण्यापूर्वी 4. तुमच्या मोकळ्या वेळेचा  व्यस्त होण्यापूर्वी 5. तुमच्या जीवनाचा मृत्यू होण्यापूर्वी. ही किती मोठी गोष्ट आहे समजणाऱ्यांसाठी असे माझे मत आहे.

- डॉ. समीना अन्सारी, खामगाव


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget