Halloween Costume ideas 2015

देते व्हा, देण्यातला आनंद लुटा


दरवर्षी रमजानचा महिना हाच संदेश घेऊन येतो की, ’देते व्हा’ देण्यातला आनंद लुटा! होय रमजान महिना हा एकमेकांना देण्याचा, एकमेकांच्या गरजा भागवण्याचा आणि एकमेकांसाठी त्याग  व बलिदान करण्याची शिकवण देणारा महिना आहे. सहरी असो की इफ्तारी मोठ्या प्रमाणावर लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येते. सायंकाळी इफ्तारची वेळ होताच, शेजारी-पाजारी, गल्लीत राहणारे लोक एकमेकांकडे इफ्तारी पाठवितात.

एकमेकांना इफ्तारी देण्या घेण्यावरून त्या घरची परिस्थिती कळते. शेजाऱ्यांकडे इफ्तारीची व्यवस्था नसेल तर त्याची आपोआप मदत होते. प्रवाशांसाठी स्थानकांवर, रेल्वेमध्ये, दवाखान्यात असलेल्या आजारांच्या नातेवाईकांसाठी फलाहार व जेवणाची व्यवस्था केली जाते. अशा परिस्थितीत रोजा नसलेले परंतु गरजूवंत असलेले लोक देखील लाभान्वीत होतात. त्यांचीही मदत होते.

रमजान महिन्यात लहान-लहान मुले देखील रोजा धरतात. पाच सहा वर्षांची ही चिमुकली मुलं, एरवी खाण्यापिण्यासाठी हट्ट धरणारी, रोजा ठेवला असता अगदी एकांतवासातही काही खात-पीत नाहीत! त्यांना हा संयम मिळतो कुठून! निश्चितच तो अल्लाह त्यांना हा संयम देतो. रोजामुळे, त्यांना भूक-तहान याची जाणीव होते. त्यांच्यातील हट्टीपणा कमी होतो. त्यांच्या हस्ते शेजाऱ्यापाजाऱ्यांमध्ये इफ्तरी वाटली जाते. यातून तेही ’देते होतात, देण्यातला आनंद लुटतात.’

या महिन्याला ’मवासात’चा महिना म्हटले जाते. प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी फर्माविले रमजान हा मवासातचा महिना आहे. ’मवासात’ या शब्दाचा अर्थ होतो गरीब आणि गरजू लोकांविषयी दया, कृपा दाखविणे. त्यांची आर्थिक मदत करणे. मृदू शब्दात बोलणे, नम्रपणाने वागणे, आपल्या अखत्यारीत असलेल्या लोकांना व सेवकांना थोडी मुभा (सवलत) देणे, त्यांना आर्थिक सहाय्य करणे, या सर्व बाबींचा  ’मवासात’ मध्ये समावेश होतो.

वर्षभरात जेवढे दान केले जात असेल, त्यापेक्षाही अनेक पटीने जास्त दान या महिन्यात केले जाते. विशेष म्हणजे हे दान, दान पेटीत  -(उर्वरित आतील पान 7 वर)

टाकले जात नाही तर प्रत्यक्ष गरजू व्यक्तीपर्यंत पोहचविले जाते. दान पेटीत टाकण्यात आलेल्या रकमेचा काही विशिष्ट वर्गालाच लाभ भेटत असतो. विशेष म्हणजे  

त्या वर्गाला अशा दानाची आवश्यकतही नसते. ते अगोदरच श्रीमंत असतात. दानपेटीतील दानाचा गोरगरिबांना आणि गरजू लोकांना काहीच लाभ मिळत नाही, परंतु अशा प्रकारे घरपोच देण्यात येणारी मदत ही खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचते.

या महिन्यात मोठ्या प्रमाणावर जकात अदा केली जाते. ’जकात’ या अरबी शब्दाचा अर्थ, पाक (पवित्र) करणे/ वाढवणे असा होतो. इस्लामच्या अनिवार्य कर्तव्यांपैकी हे एक कर्तव्य आहे. कुरआन मध्ये नमाज बरोबरच सुमारे 82 ठिकाणी जकातचा उल्लेख आहे. जकात हे अनिवार्य दान आहे तर, सदक़ा हे ऐच्छिक दान आहे. ज्या व्यक्तीजवळ साडे सात तोळे सोने किंवा साडे बावन्न तोळे चांदी किंवा तेवढी रक्कम किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असेल व त्यावर एक वर्ष उलटला असेल अशा व्यक्तीवर, एकूण रकमेच्या अडीच टक्के रक्कम वर्षातून एकदा दान करणे अनिवार्य आहे.

गरजू, गरीब, कर्जबाजारी, निष्पाप कैदी, प्रवासी, जे लोक जकात वसुलीच्या कामात नेमले आहेत, तसेच असे लोक, जे आपल्या दैनंदिन गरजा सहजरीत्या पूर्ण करू शकत नाहीत इत्यादी लोकांना जकात द्यावी. आई वडील, मुले-मुली व त्यांची संतती यांना जकात देवू नये. त्यांच्यावर मूळ संपत्तीतून खर्च करावे. जकात अनिवार्य झाली असतांनाही जो जकात अदा करत नाही, त्याची नमाज, रोजा, हज सर्व काही व्यर्थ आहे.

जो लोकसमुह जकात अदा करत नाही तो दुष्काळग्रस्त होतो. जकातचा इन्कार करणे, हे इनकार करणाऱ्या व्यक्तीसाठी विनाशकारी आहे. या शिकवणीमुळे कोणी जकात रोखून धरत नाही. स्वतः होऊन आपल्या संपत्तीतून जकात काढली जाते व ती गरजू लोकांना दिली जाते. 

जकातचे नियोजन

इस्लामी शासन पद्धतीत जकात वसुलीसाठी विशेष अधिकारी नियुक्त केले जात. सर्व जकात एकत्र जमा करून गरजू लोकांपर्यंत पोहचवली जाई. ज्या ठिकाणी इस्लामी शासन पद्धती नाही, तेथे बरेचसे लोक व्यक्तिशः गरजूंना आपली जकात देतात तसेच, काही सामाजिक संघटना, सेवाभावी संस्थाही जकात जमा करून गरजुंपर्यंत पोहचविण्याचे कार्य करतात.

मदरशांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोरगरीब लोकांची मुले शिक्षण घेत असतात. तसेच काही अनाथ मुलेही शिक्षणासाठी दाखल झालेली असतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदरशांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर जकात खर्च केली जाते. विशेष म्हणजे, जकात श्रीमंतांना गरीब करत नाही, गरिबांची गरिबी मात्र दूर करते. गरीब-श्रीमंत ही दरी कमी करण्यास जकात मदत करत असते. सामुहिकरित्या जकात अदा केल्यास त्याचे अधिक लाभ होतात. गरजू व्यक्तीला इतकी जकात मिळावी की, त्याने आत्मनिर्भर होऊन पुढील वर्षी स्वतः जकात अदा करावी. अशी अपेक्षा असते, परंतु जकात विखुरलेल्या स्वरुपात आपापल्या परीने वाटली जात असल्याने तेच ते लोक दर वर्षी जकात मागताना दिसून येतात.

फितरा

फितरा हे एक प्रकारचे दान आहे, जे सधन व्यक्तींकडून, गोरगरीब, गरजू लोकांना दिले जाते. जेणेकरून त्यांनाही ईदच्या आनंदात सामील होता यावे.

रमजान ईदला ईद-उल-फित्र असे म्हटले जाते. अर्थात फितरा देण्याची ईद. हे दान अन्नधान्य, जीवनोपयोगी वस्तू किंवा पैशाच्या रुपातही दिले जाऊ शकते. ईदच्या नमाज पूर्वी फितरा अदा करणे अनिवार्य आहे. ईदच्या दिवशी शेजारीपाजारी, नातेवाईक तसेच मित्र,  यांना आपल्या घरी बोलावले जाते, गोड शीरखुर्मा पाजला जातो आणि त्यांना आपल्या आनंदात सामील केले जाते. यातून प्रेमाची आपुलकीची देवाण-घेवाण होते. एकतेची भावना निर्माण होते. अशाप्रकारे ’ देते व्हा, देण्यातला आनंद लुटा.’ हा संदेश देत रमजानचा महिना येतो. गोर गरीब व गरजू लोकांना आनंद तर धनिकांना भरपूर पुण्य देऊन जातो.


- सय्यद झाकीर अली

परभणी

9028065881 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget