(११) त्यांच्या पैगंबरांनी त्यांना सांगितले, ‘‘खरोखरच आम्ही काहीच नाही परंतु तुमच्याचसारखे मानव. परंतु अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला उपकृत करतो,२१ आणि हे आमच्या अखत्यारीत नाही की तुम्हाला एखादे प्रमाण आणून द्यावे. प्रमाण तर अल्लाहच्याच आज्ञेने येऊ शकते आणि अल्लाहवरच श्रद्धावंतांनी विश्वास ठेवला पाहिजे.
(१२) आणि आम्ही अल्लाहवर का विश्वास ठेऊ नये ज्याने आमच्या जीवन-मार्गात मार्गदर्शन केले आहे? ज्या यातना तुम्ही लोक आम्हाला देत आहात त्यावर आम्ही संयम बाळगू आणि विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास अल्लाहवरच असला पाहिजे.’’
(१३-१४) सरतेशेवटी इन्कार करणाऱ्यांनी आपल्या पैगंबरांना सांगून टाकले, ‘‘एक तर तुम्हाला आमच्या संप्रदायात परत यावे लागेल२२ अन्यथा आम्ही तुम्हाला आपल्या देशांतून हुसकावून देऊ.’’ तेव्हा त्यांच्या पालनकत्र्याने त्यांच्याकडे दिव्य प्रकटन केले, ‘‘आम्ही या अत्याचाऱ्यांना नष्ट करून टाकू. आणि त्यांच्यानंतर तुमचे भूतलावर पुनर्वसन करू.२३ हे इनाम आहे त्याच्यासाठी जो माझ्या ठायी उत्तरदायी होण्याचे भय बाळगतो आणि माझ्या इशाऱ्याला भितो.’’
(१५) त्यांना निर्णय हवा होता (तर असा त्यांचा निकाल लागला) आणि सत्याचा प्रत्येक उन्मत शत्रू तोंडघशी पडला.२४
(१६-१७) यानंतर त्याच्यासाठी जहन्नम (नरक) आहे. जेथे त्याला रक्त पू सारखे द्रव पिण्यास दिले जातील, ज्याला तो जबरदस्तीने घशाखाली उतरविण्याचा प्रयत्न करील आणि मोठ्या कष्टाने उतरवू शकेल. मृत्यू त्याच्यावर सर्व बाजूंनी आच्छादित राहील परंतु तो मरू शकणार नाही व पुढे एक कठोर यातना त्याच्या जिवाशी लागून राहील.
२१) नि:संदेह आम्ही मानवच आहोत परंतु अल्लाहने तुमच्या दरम्यान आम्हाला सत्यज्ञान देण्यासाठी आणि पूर्ण विवेक प्रदान करण्यासाठी नियुक्त केले आहे. यात आमच्या अधिकारातील काहीच नाही. हा सर्व अल्लाहच्याच अधिकाराचा मामला आहे. तो आपल्या दासांपैकी ज्याला हवे ते देतो. आमच्या अधिकारात नाही की आमच्याजवळ जे आले आहे ते अल्लाहला सांगून तुमच्याकडे त्याने पाठवावे. आम्ही हेसुद्धा करू शकत नाही की जे सत्य आमच्यावर प्रकट झाले आहे त्याच्याशी आम्ही डोळेझाक करावी.
२२) याचा अर्थ असा होत नाही की पैगंबर हे पैगंबरत्व प्राप्ती अगोदर आपल्या मार्गभ्रष्ट लोकांत सामील असत. याचा अर्थ होतो की पैगंबर हे पैगंबरत्व बहाली अगोदर एकांतात जीवन जगत असत. ते एखाद्या धर्माचा प्रचार आणि प्रचलित धर्माचे खंडन करीत नसत. यामुळे त्यांचे समाजबांधव हे समजून घेत की ते पैगंबर त्यांच्याच समाजाचे आहेत. पैगंबरकार्य सुरु केल्यानंतर मात्र त्यांच्यावर हा आरोप लावला जात असे की त्यांनी आपल्या पूर्वंजाच्या धर्माला सोडले आहे. पैगंबर तर पैगंबरत्व बहालीपूर्वीसुद्धा अनेकेश्वरवादी समूहात सामील नव्हते. मग त्यांच्यावर समाजातून बहिष्काराचा आरोप बिनबुडाचा व अयोग्य आहे.
२३) म्हणजे घाबरू नका. ते म्हणतात की तुम्ही या देशात राहू शकत नाही. परंतु आम्ही सांगतो की हेच आता या भूभागात राहू शकत नाहीत. आता जो तुम्हाला मान्य करील तोच येथे राहील.
२४) लक्षात असू द्या की येथे ऐतिहासिक वर्णनस्वरुप वास्तविकपणे मक्का येथील नाकारणाऱ्यांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर दिले जात आहे. ते लोक हे प्रश्न पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी नेहमी विचारत असत. प्रत्यक्षात येथे उल्लेख पूर्वीच्या पैगंबरांचा आणि त्यांच्या सामाजिक घटनांचा आहे. परंतु ते तंतोतंत लागू होत आहे त्या परिस्थितीवर जेव्हा हा अध्याय अवतरित होताना होती. या ठिकाणी मक्का येथील विरोधकांना म्हणजे अरबच्या अनेकेश्वरवादींना स्पष्ट शब्दांत सचेत केले की तुमचे भविष्य आता त्या व्यवहारावर अवलंबून आहे जो तुम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या चळवळीविषयी स्वीकाराल. तुम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांचा संदेश स्वीकाराल तर अरब भूमीत राहू शकाल. याला अमान्य कराल तर येथून तुमचे नामोनिशान मिटून जाईल. या गोष्टीला ऐतिहासिक घटनांनी एक स्वयंसिद्ध सत्यता बनविले आहे. या भविष्यवाणीला पूर्ण पंधरा वर्षे झाली नव्हती की अरब भूभागात एकही अनेकेश्वरवादी शिल्लक राहिला नाही.
Post a Comment