सहाव्या शतकात अरबस्तानातील संस्कृती अतिशय खालच्या स्तरावर पोहोचली होती. अरब लोक पशुंसारखे जीवन जगत होते. जगात जेवढी वाईट पद्धती असू शकतात ती सर्व त्यांच्यात होती. शिर्क अर्थात अनेकेश्वरावाद ते करीत होते. एक अल्लाह (ईश्वरा)ला सोडून ते अनेक देवतांची उपासना करीत होते. काबाग्रहात त्यांनी अनेक देवीदेवतांच्या मुर्ती आणून ठेवल्या होत्या आणि त्या मूर्तींसमोर ते नतमस्तक होत असत. किरकोळ कारणावरून शंभर-शंभर वर्षे ते एकमेकांशी शत्रुत्व राखत होते. निष्पाप लोकांना मारून टाकणे, त्यांच्यासाठी साधारण बाब होती. गुलामगिरीला सामाजिक मान्यता होती. निरक्षरतेचा अंधार चोहिकडे पसरलेला होता. स्त्रीयांवर अत्याचार सामान्य बाब होती. विधवेला निम्न दर्जा होता, मुली जन्माला आल्यावर त्यांना जीवंत दफन करण्याची परंपरा -(उर्वरित पान 7 वर)
सर्वमान्य होती. अनाथांचा कोणीच वाली नव्हता. त्यांचे हक्क हिसकावून घेणे त्या संस्कृतीची ओळख होती. अंधश्रद्धा त्यांच्या रक्तांमध्ये ऑक्सीजनसारखे काम करीत होते. सावत्र आईशी विवाह करणे त्यांच्यासाठी वाईट काम नव्हते. एकमेकांची संपत्ती लुटणे, दरोडा टाकणे, व्यसन करणे, दारू पिणे, व्याज खाने, खोटे बोलणे, वेश्यावृत्ती इ. वाईट कामे त्यांच्यासाठी साधारण बाब होती. एवढी अज्ञानता, क्रुरता त्यांच्यात होती की कुणी त्यांच्यावर राज्य करणे पसंत करीत नव्हते.
कुरआनचे अवतरण
अशा असभ्य संस्कृतीत एक क्रांती येते. त्यांच्यातली एक पवित्र आत्मा उभी राहते. त्या आत्म्याला आपल्या पालनकर्त्याचा शोध असतो. ती व्यक्ती हिरा नावाच्या गुहेत एकांतात अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू करते. तेव्हा अल्लाह, आपले दूत हजरत जिब्राईल (अलै.) यांना ईशवाणी (कुरआन) देऊन त्यांच्याजवळ पाठवितो आणि तुम्हाला प्रेषित म्हणून निवडल्याची शुभवार्ता देतो. गारे हिरामध्ये जी ईशवाणी देवदूताच्या माध्यमातून अल्लाहने त्या व्यक्तीला दिली तिचा प्रारंभ ’’इकरा’’ वाचा (शिक्षण) या शब्दापासून होतो आणि ज्या रात्री ही ईशावणी अर्थात कुरआन त्या व्यक्तीला प्रदान केली गेली ती रात्र होती रमजान महिन्याची पवित्र रात्र होती ज्या रात्रीला शबे कद्र असे म्हणतात. ज्या व्यक्तीवर हे पवित्र अवतरण झाले ती व्यक्ती दुसरी कोणी नव्हती तर ती व्यक्ती हजरत मुहम्मद पैगंबर (स.अ.) होते.
हजरत मुहम्मद (स.अ.) यांना अल्लाहने असा आदेश दिला की जा आणि लोकांना सांगा की तुम्ही ही जी अनेकश्वरांची (शिर्क) पूजा करीत आहात हे सर्व अल्लाहजवळ महापाप आहे. जो तुमचा पालनकर्ता आहे तो तुमच्या मनात काय विचार चालतात त्यांची देखील जाणीव ठेवतो, ज्याने ब्रह्मांडाची निर्मिती केले आणि त्यामधील सजीव, निर्जीव वस्तू मानवाच्या कल्याणासाठीच बनविल्या. त्याची पूजा-अर्चा करा व त्याच्या आणि फक्त त्याच्याच समोर नतमस्तक व्हा. तेव्हा प्रेषित मुहम्मद (स.अ.) मक्का शहरात जातात. अल्लाहच्या आदेशानुसार लोकांना सांगतात की, हे लोकहो! अल्लाहने मला प्रेषित म्हणून निवडले आहे. तुम्ही एका अल्लाहची उपासना करा आणि मूर्तीपूजा सोडून द्या. हे जीवन जे ईश्वराने तुम्हाला दिलेले आहे त्याची जाणीव ठेवा. या ऐहिक जीवनानंतर मरणोत्तर जीवन देखील आहे. न्याय निवाड्याचा एक अंतीम दिवस येणार आहे. त्या दिवशी सर्व मानवजातीला अल्लाहसमोर वैयक्तिकरित्या उभे राहणे अनिवार्य आहे आणि या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा हिशोब देणे आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. साहेबांनी समाजात जी अशांती पसरलेली होती तिच्याबद्दल जनजागृती केली. लोकांना सभ्यतेचे धडे दिले. सर्व मानवसमाज एक आहे. यामध्ये कुठलाही भेद नाही. सर्व मानव अल्लाहचे गुलाम आहेत. मानव-मानवाला गुलाम बनवू शकत नाही. विनाकारण आपसांत भांडणे, युद्धे, लढाई करणे अल्लाहला आवडत नाही. अल्लाह शांतीप्रिय आहे आणि शांतीला पसंत करतो. स्त्रीयांचा आदर करा. त्यांचेशी आपुलकीने वागा, अंधश्रद्धेने आपल्या मुलींना जीवंत गाडू नका. अनाथांचे रक्षक बना, अल्लाहची भक्ती करा आणि त्याच्याच आदेशाचे पालन करा.
जेव्हा प्रेषितांनी हे महान कार्य सुरू केले तेव्हा त्यांना त्यांच्याच समाजाकडून विरोध झाला. प्रेषितांना काही लोकांनी जादूगार म्हटले,काहींनी त्यांना वेडे म्हटले, ते लोक एवढ्यावरच थांबले नाही तर त्या लोकांनी प्रेषितांना मारहाणही केली. ज्या पवित्र आत्म्यांनी प्रेषितांवर विश्वास ठेवला, ज्यांनी इमान कबूल केले त्यांना सुद्धा समाजकंटकांनी त्रास दिला. प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्या संपूर्ण कबिल्याला व श्रद्धावंत इमानधारकांना तीन वर्षे शोबेअबी तालीब (एका गुफेचे नांव) मध्ये वाळीत टाकून दिले. एवढा की त्यांना आपले प्रिय शहर मक्का सोडणे भाग पाडले. प्रेषितांना देखील मजबूर करून टाकले की त्यांनी म्नका शहर सोडून जावे.
सत्य-असत्याची लढाई
जेव्हा प्रेषित सल्ल. व त्यांच्या सहकाऱ्यांनी मजबुरीने मक्का सोडले व मदीना येथे हिजरत (स्थलांतर) केली तरी देखील मक्केतील शत्रुंनी त्यांना आनंदाने राहू दिले नाही आणि अशी परिस्थिती निर्माण केली की युद्धाचे वातावरण तापू लागले. शत्रुंनी मदीनेवर चढाई करण्याचे षडयंत्र रचले ही खबर मुहम्मद पैगंबर (सल्ल.) आणि श्रद्धावंतांना कळाली. त्यांनी आपले रक्षण करण्याकरीता नाविलाजाने शत्रुला प्रतिउत्तर देण्याचे ठरवले व मदीनेपासून काही अंतरावर बदर नावाच्या स्थानावर दोघांचा सामना झाला. शत्रुंची फौज तगडी आणि शक्तीशाली होती. त्यांचे सैनिक एक हजार होते. युद्ध सामुग्री भरपूर व आधुनिक होती. घोडे आणि उंट होते मात्र प्रेषितांजवळ युद्ध सामुग्री तोकडी होती. अल्प उंट व काही घोडे होते. तलवारी तुटलेल्या अवस्थेत होत्या आणि प्रेषित सल्ल. यांच्या सहकाऱ्यांची संख्या फक्त 313 होती. सत्य आणि असत्याची ही विषम लढाई सुरू होण्याअगोदर प्रेषितांनी अल्लाहच्या दरबारी दुआ केली की हे अल्लाह जर आजच्या दिवशी आमचा पराभव झाला तर या भूतलावर तुझे नाव घेणारा कोणीच नसेल, आमची मदत कर. अल्लाहने प्रेषितांची दुआ स्विकार केली. या युद्धात अल्लाहची मदत प्रेषित सल्ल. यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना देवदुतांच्या (फरिश्ते) मार्फत झाली. विजय श्रद्धावंतांचा झाला. सत्य आणि असत्याची लढाई ज्या महिन्यात झाली तो महिना रमजानचा महिना होता. एका नव्या युगाची सुरूवात 17 रमजानपासून सुरू झाली.
मक्केवर विजय
हा विरोध होण्याचे कारण एवढेच की प्रेषितांचे अनुयायी एका ईश्वराची आराधना करीत होते. शांतीचा संदेश देत होते. सभ्य संस्कृतीचा पाया रचत होते. एका ईश्वराकडे बोलवत होते. यामुळे मक्कावासियांची अर्थव्यवस्थाच धोक्यात आली होती. शत्रुंना हे चांगले वाटले नाही म्हणून त्यांनी वारंवार षडयंत्र रचून श्रद्धावंतांशी युद्धं केले. प्रत्येक वेळी युद्ध सामुग्री कमी असतांना सैनिकांची व सहकाऱ्यांची संख्या कमी असतांना देखील अल्लाहच्या मदतीने प्रेषितांची व त्यांच्या सहकाऱ्यांची अल्लाहने मदत केली. त्याचे एकमेव कारण असे की त्यांच्याजवळ सत्याची ताकद होती. दरम्यान प्रेषित सल्ल. व त्यांच्या सहकाऱ्यांनी उमरा करण्याचा निश्चय केला. व त्यासाठी मक्केला प्रयाण केले. मात्र मक्केच्या कुरेशनी त्यांना मक्केमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यामुळे वातावरण तापले. युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा प्रेषित सल्ल. हे आपल्या सहकाऱ्यांसोबत मक्का शहरापासून 40 किलोमीटर अलिकडे असलेल्या हुदैबिया नावाच्या गावाजवळ तळ ठोकून होते. तेथे पाण्याची एक विहिर होती. म्हणून हा काफिला त्या ठिकाणी थांबला होता. शेवटी मक्काचे कुरैश आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यात एक करार झाला. आणि प्रेषित सल्ल. हे आपल्या सहकाऱ्यासह उमरा न करता मदिना येथे परत गेले. काही दिवसात मक्कावासियांनी हुदैबियाच्या कराराचे उल्लंघन करण्यास सुरूवात केली. त्यामुळे पैगंबर सल्ल. व त्यांच्या सहकाऱ्यांनी शत्रुंच्या या घाणेरड्या षडयंत्राचे उत्तर देण्याचे ठरविले व मक्का शहरावर दहा हजार सहकाऱ्यांसोबत चढाई केली. दहा हजार संख्याबघून शत्रूंचे साहस खालावले व त्यांनी युद्ध न करता शरणागती पत्करली. शांतीने सर्व काही झाले. प्रेषितांसमोर त्यांचे ते शत्रू उभे होते ज्यांनी प्रेषितांना व त्यांच्या सोबत्यांना ना-ना प्रकारे त्रास दिला होता. प्रेषितांना व श्रद्धावंतांना त्यांचे आवडते शहर मक्का सोडण्यास भाग पाडले होते. त्यांच्या एका इशाऱ्यावर शत्रूंचे गळे कापले जाऊ शकत होते. पण प्रेषित मोहम्मद सल्ल. यांनी आम माफी जाहीर केली. प्रेषितांचे हे वर्तन बघून सर्व शत्रू चकीत झाले. त्यांना पश्चाताप झाला व ते सर्वचे सर्व श्रद्धावंतांच्या जमातीमध्ये सामील झाले. हा मक्काविजयही रमजानमध्ये झाला.
रमजानच्या महिन्याने अरब सभ्यतेमध्ये परिवर्तीत केले
अरबस्तानाची संस्कृती रानटी व असभ्य होती. प्रेषितांनी तिला सभ्य संस्कृतीमध्ये परिवर्तित केले. जो कुरआन प्रेषितांवर अवतरीत होण्यास सुरूवात झाली होती तो महिना रमजानचा. सत्य व असत्याची पहिली लढाई ज्या महिन्यात झाली तो महिनाही रमजानचा महिना. व मक्कावर विजय प्राप्त झाला तो महिनाही रमजानचा. पूर्वी जे मक्का शहरात राहणारे लोक अनेक ईश्वरांची पूजा अर्चना करत होते आता ते एका अल्लाहसमोर नतमस्तक होऊ लागले. ज्यांनी काबागृहात 360 पुतळे पूज्य म्हणून ठेवलेले होते. ते काढून टाकण्यात आले. काबागृह पवित्र केले गेले व लोक फक्त अल्लाहची आराधना करू लागले. जे किरकोळ कारणांवरून युद्ध करत होते आता तेच जगाला शांती दूत बनून शांतीचा संदेश देऊ लागले, जे लोक पूर्वी निष्पाप लोकांना गुलाम बनवून ठेवत होते आता ते त्यांचे सहकारी झाले व फक्त अल्लाहचे गुलाम बनून जीवन व्यतीत करू लागले. जे गुलामांना जनावरांसारखी वागणूक देत होते ते आता त्यांना अल्लाहाचा दास समजून मानसन्मान देऊ लागले व त्यांना स्वतंत्र करू लागले. मक्काचे जे लोक निरक्षर आणि असंस्कृत होते मक्का विजयानंतर त्यांच्यापासून जगाला सभ्यतेचे ज्ञान प्राप्त होऊ लागले, स्त्रियांवर अत्याचार करणे ज्यांची ओळख होती आता ते स्त्रियांचे रक्षण करू लागले, त्यांचा सन्मान करू लागलेे.
जे अन्याय करत होते ते आता न्यायाधीश बणून लोकांना खरा न्याय देऊ लागले, पूर्वी जे मुलींना जिवंत दफन करीत होते आता त्यांच्यासाठी मुलीचा जन्म हा स्वर्गप्राप्तीचा मार्ग बनला. ते मुलीच्या जन्मावर एकमेकांना जन्नतची आनंदवार्ता देऊ लागले, अनाथांची संपत्ती लुटण्याचा आनंद घेणारे आता अनाथांना आश्रय देऊ लागले. जे दारू पीत होते आता त्यांच्या समाजात दारू अवैध ठरली. जे व्याजाचे व्यापारी होते त्यांनी व्याज मुक्त व्यवस्था निर्माण केली. जे दरोडे टाकत होते ते आता दरोडेखोरांना नीट करू लागले. खोटे बोलणेे ज्यांची सवय होती ते सत्य बोलण्यावर आपले प्राण देखील देवू लागले. एवढी मोठी जी क्रांती त्या अरबस्तानात सातव्या शतकात घडवून आणली. त्यामागचे एकमेव कारण म्हणजे त्यांनी आपल्या पालनकर्त्याला ओळखले, त्यांना पालनकर्त्याची ओळख करून देणारे कोण ते महानायक हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहू अलै वसल्लम. प्रेषित सल्ल यांनी जी क्रांती उदयास आणली त्याचा स्त्रोत कोणता तर तो कुरआन. प्रेषितांवर अवतरीत झालेला कुरआन अर्थात जीवन जगण्याचा एकमेवव खरा मार्ग कोणत्या महिन्यात अवतरीत झाला तर तो महिना म्हणजे रमजानचा महिना.
आज 21 व्या शतकात मार्च-एप्रिल 2023 मध्ये पुन्हा रमजानची सुवर्णसंधी ईश्वराच्या अल्लाहच्या कृपेने आम्हाला प्राप्त होत आहे. पण आजच्या या आधुनिक युगात मानवजात अगदी त्याच प्रमाणे आपल्या खऱ्या पालनकर्त्याला व त्यांच्या शिकवणीला विसरून गेलेली दिसत आहे, जशी सहाव्या शतकात मक्काच्या लोकांना विस्मृती झाली होती. आजचा मानव देखील ईशमार्गाने भरकटलेला आहे. समाजात मोठ्या प्रमाणात अशांती माजली आहे. अन्याय आहे. युद्धे सुरू आहेत. दहशतीचे वातावरण आहे, लहान सहान कारणांवरून मानव मानवाची कत्तल करीत आहे, गोरगरिबांना आसरा नाही, दारिद्र्य आहे कुपोषण आहे, श्रीमंत अधिक श्रीमंत बनत चालला आहे, गरिबांची चूल जळताना दिसत नाही, काही राष्ट्रात तर मूलभूत गरजा देखील मानवाला पूर्ण करता येत नाहीत. जातीयवाद, राष्ट्रवाद, भाषावाद, प्रांतवाद, भौतिकवाद, शिखरावर पोहोचलेला आहे. ज्याचा तडाखा सामान्य माणसांना बसत आहे. न्याय सर्वाधिक महाग झालेला आहे. बेकसुरांना कैदेत टाकले जात आहे. काही गुन्हेगार दंड थोपटून अभिमानाने हिंडत आहेत. दीन-दुबळ्यांवर अत्याचार होत आहेत, व्याजयुक्त अर्थव्यवस्थेने सामान्य माणसांच्या मेहनतीच्या कमाईला आपल्या खिशात नकळत टाकलेले आहे. व्याज भरून लोक गरीब होत चालले आहेत काही तर आत्महत्या देखील करीत आहेत. व्याजमुक्त व्यवस्था दिसत नाही. बेरोजगारी गंभीर समस्या बनलेली आहे. सुशिक्षित युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत. काम मिळत नाही. उघडपणे नग्नता युवकांना मार्गभ्रष्ट करीत आहे. प्रगतीच्या नावावर महिलांचे अंगप्रदर्शन सर्रास होत आहे. पोर्नोग्र्राफीने युवकांना वेडे बनविलेले आहे. त्यामुळे युवकांमध्ये मानसिक आजार बळावत आहेत. ते डिप्रेशन व एं्नझायटीचे बळी पडत आहेत. युवकांचे आत्महत्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शिक्षण महाग झालेला आहे. शिक्षणाचा दर्जा कमी झालेला आहे. भ्रष्टाचार आणि दृष्टाचार चोहिकडे होत आहे. माणुसकी राहिलेली नाही. आदरसन्मान राहिला नाही. समाजसेवा निस्वार्थ राहिली नाही. राजकारण आपल्या स्वार्थासाठी होत आहे. आई-वडिलांना ओल्ड एज होममध्ये त्यांचीच मुलं टाकत आहेत. महिलांवर बलात्कार होत आहेत. चोऱ्या होत आहेत. भेसळ होत आहे. लहान मुलांचे शारीरिक शोषण होत आहे. अशा अनेक वाईट गोष्टी या युगात आहे.
समाजातून आपल्याला जर वरील सर्व बाबी नष्ट करावयाच्या असतील तर अल्लाहने आम्हाला एक उत्तम संधी प्राप्त करून दिली आहे. ती सुवर्णसंधी पवित्र रमजानच्या रूपात आम्हाला लाभली आहे. जशी ह्या पवित्र रमजानमुळे कुरआनच्या माध्यमातून प्रेषित हजरत मुहम्द (स.अ.) व त्यांचे श्रद्धांवंतांनी एक क्रांती घडवून आणली होती तीच क्रांती घडवून आणण्याची संधी आम्हाला अल्लाहच्या कृपेने आपल्याला प्राप्त होत आहे. मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या संधीचे सोने करावे. एका ईश्वराची भक्ती करावी, शांती दुत बनावे, आदर्श समाज निर्माण करावा, भ्रष्टाचार मुक्त व्हावे. व्यसनमुक्त व्हावे, आपल्या पालनकर्त्याला राजी करण्याचा प्रयत्न करावा व प्रेषित सल्ल. यांच्या सर्व शिकवणी आपल्या देशबांधवांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. अल्लाह आम्हाला सद्बुद्धी देवो. आमीन.
- आसीफ खान
धामनगांव बढे,
बुलढाणा 9405932295
Post a Comment