प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की एक माणूस नमाज, रोजा, जकात, हज असे सर्व पुण्यकर्म करीत असतो पण त्याला मोबदला मात्र त्याच्या आकलनशक्ती आणि बुद्धिमत्तेच्या हिशेबाने दिला जाईल. (अबी उमर (र.), मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, एका ज्ञानीला चुकांचाही सामना करावा लागतो आणि बुद्धिमत्तेला मागील अनुभवांपासून देखील शिकावे लागते. (अबी सईद (र.), मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की बाथरुममध्ये लघवी आणि अंघोळ करू नये. अंघोळीसाठी बाथरुम आणि लघवीसाठी शौच्यालयाची वेगळी सोय असावी. (अब्दुल्लाह बिन मुफज्जल, मिश्कात)
ह. आयशा (र.) म्हणतात की मी प्रेषितांना असे म्हणताना ऐकले आहे की जर जेवणाची वेळ झाली असेल आणि सोय केली गेली असेल आणि नमाजचीही वेळ झाली असेल तर अगोदर जेवण करावे आणि नंतर नमाज अदा करावी. (मुस्लिम, मिश्कात)
अबू उसैद म्हणतात की आम्ही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर होतो. एका व्यक्तीने प्रेषितांना विचारले, मातापिता यांचे निधन झाल्यावर आम्ही त्यांच्यासाठी कोणते कार्य करावे? प्रेषितांनी उत्तर दिले, चार गोष्टी करू शकता, (१) त्यांच्यासाठी दुआ करावी, (२) त्यांनी लोकांना जे वचन दिले असेल त्याची पूर्तता करावी, (३) त्यांच्या मित्रमंडळींशी आदरभावाने वागावे आणि (४) त्यांचा ज्या ज्या लोकांशी नातेसंबंध असतील त्यांचा आदरसन्मान करावा. म्हणजे काका, आत्या, मावशी, मामा वगैरे नातेवाईक. (अदबुल मुफर्रद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की कोणत्याही श्रद्धावंत व्यक्तीने दुसऱ्या श्रद्धावंत व्यक्तीशी शत्रुत्व ठेवू नये. असे होऊ शकते की त्याची / तिची एकादी वागणूक तुम्हाला पसंत नसेल तर असे होऊ शकते की त्यांचे दुसरे गुण तुम्हाला आवडतील. (ह. अबू हुरैरा (र.), मिश्कात, मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की चांगला दानधर्म तो आहे ज्याच्यानंतर सुद्धा (तुमची) समृद्धी तशीच राहावी आणि अशा लोकांसाठी आधी खर्च करा ज्यांचे पालनपोषण करणे तुमच्यावर बंधनकारक असेल. (ह. अबू हुरैरा (र.), हकीम बिन हजम, बुखारी, मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे की जेव्हा कुणाच्या घरी मुलगी जन्म घेते तेव्हा अल्लाह त्याच्याकडे आपले दूत पाठवतो. ते म्हणतात, या घरच्या लोकांनो, तुम्हाला अल्लाहची कृपा लाभो. मग त्या जन्मलेल्या मुलीला आपल्या पंखांवर घेतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात की एका दुर्बलापासून जन्मलेली दुर्बल मुलगी आहे. जो त्या मुलीचे संगोपन करील, कयामतपर्यंत अल्लाहची मदत त्याला लाभत राहील. (तिबरानी)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``अगदी मनापासून कलमा `लाइलाहा इल्लल्लाहु' म्हटलेला मनुष्यालाच अंतिम निवाड्याच्या दिवशी माझी शिफारस प्राप्त होईल.'' (हदीस : बुखारी)
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे हे वक्तव्य आपल्या शब्दांच्या हिशोबाने खूपच तोकडे आहे, परंतु आपल्या अर्थाच्या हिशोबाने खूपच मोठे आहे. अर्थात एकेश्वरवाद नाकारणाऱ्या, इस्लामला अमान्य करणाऱ्या, अनेकेश्वरत्वाच्या गलिच्छतेत अडकलेल्या मनुष्याला पैगंबर मुहम्मद (स.) यांची शिफारस लाभणार नाही. अशाप्रकारे तोंडाने `कलमा' उच्चारून इस्लाममध्ये दाखल होऊन मनापासून त्यास खोटे ठरविणारादेखील पैगंबरांची शिफारस प्राप्त करू शकणार नाही. पैगंबर फक्त त्याच लोकांची शिफारस करतील ज्यांनी मनापासून ईमान धारण केले, जे एकेश्वरत्व सत्य असण्यावर विश्वास ठेवतात, जसे- दुसऱ्या हदीसमध्ये `मुस्तैक़ीनन बिहा कल्बुहू' हे शब्द आले आहेत. मग ही गोष्टदेखील स्पष्ट आहे की कर्मामुळे विश्वासात वृद्धी होते. मनुष्याला आपले मूल विहिरीत पडल्याची बातमी कळते तेव्हा ज्याप्रकारे त्याला त्या बातमीवर विश्वास बसतो त्या वेळी दु:खी होऊन त्याचे प्राण वाचविण्यासाठी धावत जातो; हीच स्थिती मनापासून ईमान स्वीकारणाऱ्याची आहे, हेच मनुष्याच्या अंतर्गत मुक्तीची काळजी निर्माण करते आणि आचरणात सुधारणा घडविते.
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment