बागायती शेती वाटते तेव्हढी सोपी नसते. लहान लहान रोपे सावलीत रांगेने ठेऊन त्यांची जोपासना करावी लागते. वर्षभर अशा रोपाना वेळच्या वेळी जलसिंचन करून त्यांची तहान-भूक शमवावी लागते. वर्षाची रोपे एकतर मे महिन्यांत किंवा दिवाळीत त्याची कृषिजन्य शास्त्रयुक्त लागवड करावी लागते.
सुपारीला फुले आणि फळे वर्षभर येत असतात. वर्षारंभास आलेली फुले कालांतराने फळात रूपांतरित होऊन सुमारे नऊ महिन्यांत फळे काढणीला तयार होतात. पुढे अशा तयार फळांचा विक्रीसाठी उपयोग होण्याआधी बरिच खिटपिट असते. गडद केशरी रंगाच्या फळावरील पातळ आवरण असलेली साल तीन भागात काढून फळं कडक उन्हात वाळवण्यासाठी म्हणून घरामागील खळ्यात पसरवून ठेवली जातात. एक ते तीन वर्षीय रोपांची बागेत लागवड करण्यासाठी म्हणून घरा शेजारील जागेची निवड एवढ्या साठी करायची की त्याच बागेत केळी, नारळ, पेरू, पपई इत्यादी फळझाडांची सावली असते. बागेत पुरेसे दमट आणि थंड वातावरण मिळते.जे सुपारी रोपांना पूरक असते.
प्रथम एक बाय एक बाय दोन फुट खोल असा खड्डा मारणे आवश्यक आहे. त्यांस आतून निर्जंतुकीकरण करून झाले की मग त्या खड्डयात लगतच्या कुंपणास असलेले ग्लि रीसीडीया नामक खताचे झाडाचा पाला-पाचोळा टाकून त्यावर महिनाभर जुने गोशेणाचा चुरा आछादित करून त्यावर एक थर स्वच्छ वाळलेली माती पसरवून त्यांत सुपारी रोप उभा करायचा. एक ग्रामीण अनुभव असा की शक्य झाल्यास रोपाची दक्षिण दिशा शक्यतो रोप रिप्लान्ट करतांना बदलू नये. ती जपता अली पाहिले. या क्रियेस ग्रामीण भागत लिखित असे काही नसेल पण अनुभवाने हे सिद्ध झाले आहे की जो रोप आपण नवीन खड्ड्यात लावतो त्या रोपाची जर दक्षिण दिशा जपली तर कालांतराने रोपवाढीस जास्त वेळ लागत नाही. शिवाय रोपवाढ सशक्त होते. प्रत्यक्ष एक शेतकरी म्हणून मी स्वतः तसा प्रयोग करून पाहिला आहे. शेडमध्ये पिशवीत ज्या दिशेने रोप वाढतात, तिच दिशा रोप स्थलांतर करताना जपली गेली पाहिजे. हा अलिखित नियम आहे. आग्रह नाही.
कोळथर-पंचनदी गावांत एस. एम. प्रचुरकर यांची पेपर एजन्सी होती. त्यावेळी एस.एम. यांचे वडील शहरातून निवृत्त होऊन गांवी परतले होते. ते घरोघरी पेपर वितरित करायचे. मुळात ते शेतकरी नव्हते पण दिशाशास्त्र अभ्यासाची आवड त्यांना होती. ज्यामध्ये दक्षिण दिशा मार्ग विषयीचा अनुभव त्यांनी वाचला होता जो पुढे त्यांनी माझ्याशी शेर केला. पांच-दहा रोपावर तसा प्रयोग करून पाहिला जो साक्षात खरा ठरला. म्हणूनच आजही मला दिशा शास्त्रा विषयीं आदर आहे.
पंचनदी येथील एक उच्चशिक्षित बागायती शेतकरी होऊन गेले. श्री. दादा मोडक असे त्यांचे नांव. स्वाभाविक innovative वृत्तीचे होते. शेती विषयीं त्यांचे अनुभव कथन खूप आवडायचे. मुळात ते शिक्षकी पेशातले मुरब्बी अभ्यासक असल्याने त्यांचा विषय समजावून सांगण्याचा होरा तसाच होता. तत्कालीन राज्य शासनाने सुपारीवर कर आकारणी जाहीर केली होती. त्यांनी रीतसर पत्रव्यवहार करून त्या खात्याचे जे मंत्री होते त्यांना वस्तुस्थिती कळवली. तोवर कर वसूलीस आलेल्या शासकीय अधिकाऱ्यास सुपारी संघटनेच्या वतीने विनम्र नकार कळविण्यात आला. दादा यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. शासनाचा कृषी कर माफ करण्यांत आला.
सुपारीचे झाड खूप उंच असते, त्यावर चढून पिकलेल्या (तयार) सुपारीचा पाडा करणे कठीण जात होते. शिवाय निपुण मजूराची उणीव भासत असे. त्यांना कुणीतरी सांगितले की कर्नाटकात तेथील बागायतदार सुपारी-नारळ पाडा ट्रेंड माकडाकडून करून घेतात. हा प्रयोग कोकणात शक्य होईल का? त्याकरिता ते स्वतः स्वखर्चाने तिकडे जाऊन आले. मात्र त्यात यश मिळू शकले नाही, कारण केव्हातरी सूर्य पश्चिमेकडून उगवेल कदाचित पण सहकार हा शब्द कोकणातील शब्दकोषात नाही सापडू शकत. ही वस्तुस्थिती आहे.
एकेदिवशी दादा मोडक यांनी मला प्रत्यक्ष फोन (लॅन्ड लाईन) करून त्यांच्या बागेत बोलावून घेतले. मला खात्री होती यावेळीं दादा काहितरी नवीन प्रयोगा विषयीं चर्चा करणार. तसे ते वयोमानानुसार मला पिता समान होते पण "विद्वान मित्र" असं मला म्हणायचे. असो.
त्यांच्या बागेतच वीजेवर चालणारी एक मशीन सुरू होती. पिठाची चक्की जशी असायची तसाच आवाज येत होता. वरच्या मुखातून एक-एक झावळ त्यांत सोडत होते आणि समोरून त्याचा भुगा बनून बाहेर येत होता.जो भुगा बाहेर पडला, तेच खरे कृषिखत! मी चकित झालो. बागेतील उन्हाळ्यात खाली पडणाऱ्या झावळा आम्ही एकतर घराच्या पडवीस शेड बनविण्यासाठी म्हणून उपयोग करायचो किंवा शेतातील भाजावणीत त्यांस पेटवून द्यायचो. तीच झावळ प्रत्यक्ष खताचे काम करते हे दादांनी सिद्ध केले! कोकणात वीज लोडशेडिंगमुळे तो प्रयोग विशेष पूढे नाही जाऊ शकला.
झावळीच्या एक टोकाशी चार-पांच स्तरांचा पुठ्ठ्यागत दिसणार भाग असतो, त्यांस कोकणात विरी असे म्हणतात. कोळथरे गावचे उद्योजक श्री. भाऊ बिवलकर यांनी त्या विरी पासुन पत्रावळी तयार करण्याची मशीन आणली आहे. सौ आणि श्री बिवलकर यशस्वीरीत्या त्या प्रयोगाने समाधानी आहेत. कोविडमुळे त्याची मागणी थांबली होती, त्याला पर्याय काहीच नव्हता. पण आता पुन्हा त्याचा खप वाढणार यात शंका नाही.
पर्यावरण संरक्षण करण्यासाठी सुपारीचे संपूर्ण झाड हे उपयोगी पडणारे आहे. अगदी झावळांपासून ते सुपारीच्या टरफलांपर्यंत आणि उभ्या खोडापासून बागेला कुंपण-कवाडी बनविण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होतो. नारळ झाडास आपण कल्पवृक्ष असे म्हणतो. अगदी तसेच सुपारीच्या(पोफळ) झावळा विषयींची ही माहिती कृषिक्षेत्रातील मित्रांना कशी वाटली जरूर लिहावे.
...बु क वा ला
- इकबाल मुकादम
कोळथरे-पंचनदी
ता. दापोली
मो.: 9420105985
Post a Comment