पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``स्वर्गात एक कचरा ठेवण्याचे ठिकाण जग आणि जगातील सामानापेक्षा उत्तम आहे.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)
स्पष्टीकरण : `कचरा ठेवण्याचे ठिकाण' म्हणजे ती लहानशी जागा आहे जेथे मनुष्य आपले अंथरुण टाकून पहुडलेला असतो. अर्थात अल्लाहच्या `दीन'- जीवनधर्माचे अनुसरण करताना एखाद्याचे जगच नष्ट झाले, सर्व सामानसुमानापासून वंचित झाला आणि त्या बदल्यात स्वर्गातील मर्यादित आणि लहानशी जमीन मिळाली तर हा फारच क्षुल्लक सौदा आहे, नाशवंत वस्तूच्या बलिदानाच्या परिणामस्वरूप अल्लाहने त्याला ती वस्तू दिली जी निरंतर राहणारी आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, जगातील सर्वांत जास्त सुखी नरकवासीला आणले जाईल आणि नरकात टाकले जाईल. जेव्हा आग त्याच्या संपूर्ण शरीरावर आपला प्रभाव दाखवू लागेल तेव्हा त्याला विचारले जाईल, ``तू कधी चांगली स्थिती पाहिली आहे काय? तू कधी ऐशोआरामात जीवन व्यतीत केले आहेस काय?'' तो म्हणेल, ``नाही, तुझी शपथ हे माझ्या पालनकर्त्या! कधीच नाही.'' मग जगात अत्यंत हलाखीच्या (गरिबीच्या) स्थिती जीवन व्यतीत करणाऱ्या स्वर्गवासीला आणले जाईल. जेव्हा त्याच्यावर स्वर्गातील ईशकृपांचा प्रभाव पडेल तेव्हा त्याला विचारले जाईल, ``तू कधी हलाखी पाहिली आहेस काय? कधी तुला संकटांना सामोरे जावे लागले आहे काय?'' तो म्हणेल, ``हे माझ्या पालनकर्त्या! मी कधीही हलाखी व गरिबीत अडकलो नाही, मला कधीच संकटांना सामोरे जावे लागले नाही.'' (हदीस : मुस्लिम)
पैगंबर मुहम्मद ( स.) यांनी सांगितले, नरकाला स्वादांनी व अस्तित्वाच्या इच्छांनी घेरण्यात आले आहे आणि स्वर्गाला कठोरता व संकटांनी घेरण्यात आले आहे. (हदीस : बुखारी व मुस्लिम)
स्पष्टीकरण : जो मनुष्य आपल्या अस्तित्वाची पूजा करील आणि जगातील स्वादांमध्ये गुरफटला जाईल त्याचे ठिकाण नरक आहे आणि ज्याला स्वर्गप्राप्तीची इच्छा असेल त्याने काटेरी मार्ग अवलंबावा, आपल्या अस्तित्वाला हरवून त्यास त्रास व प्रत्येक प्रकारच्या अडचणींना अल्लाहसाठी सहन करण्यास विवश करावे, जोपर्यंत एखादा मनुष्य ही अवघड खाडी ओलांडत नाही, आराम व सुखात कसा पोहोचेल.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``मी नरकाच्या आगीपेक्षा अधिक भयानक कोणतीही वस्तू पाहिली नाही, ज्यापासून पळणारा झोपला आहे आणि स्वर्गापेक्षा अधिक चांगली वस्तू पाहिली नाही, ज्याची इच्छा बाळगणारा झोपला आहे.'' (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : एखाद्या भयानक वस्तूला पाहिल्यानंतर मनुष्याची झोप उडते. तो तिच्यापासून पळत सुटतो आणि जोपर्यंत समाधान वाटत नाही तोपर्यंत झोपत नाही. अशाप्रकारे ज्याला चांगली वस्तू हवीहवीशी वाटू लागते तेव्हा जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत तो झोपत नाही की आरामात बसत नाही. जर ही हकीकत असेल तर स्वर्गाची इच्छा बाळगणारे का झोपले आहेत? ते नरकापासून पळ काढण्याचा प्रयत्न का करीत नाहीत? ज्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तो बेसावध झोपत नाही आणि ज्याच्या अंतर्गत चांगल्या वस्तूची उत्कटता असते तो आरामात बसत नाही.
माननीय सहल बिन सअद यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``मी `हौज-ए-कौसर' (स्वर्गातील एक हौद) वर तुमच्या अगोदर पोहोचून तुमचे स्वागत करीन आणि तुम्हाला पाणी पाजण्याची व्यवस्था करीन. जो माझ्याजवळ येईल तो `कौसर'चे पाणी पियील, त्याला पुन्हा कधी तहान लागणार नाही आणि काही लोक माझ्याजवळ येतील, मी त्यांना ओळखत असेन आणि ते मला ओळखत असतील, परंतु त्यांना माझ्याजवळ पोहोचण्यापूर्वी अडविले जाईल तेव्हा मी म्हणेन, ही माझी माणसे आहेत (त्यांना माझ्यापर्यंत येऊ द्या), तेव्हा उत्तरात मला सांगितले जाईल, तुम्हाला माहीत नाही की तुमच्या मृत्यूपश्चात तुमच्या `दीन'- जीवनधर्मात किती नवीन गोष्टी (बिदआत) घातल्या आहेत, तेव्हा (हे ऐकून) मी म्हणेन, दूर व्हा, दूर व्हा, त्या लोकांकरिता ज्यांनी माझ्यापश्चात `दीन' (इस्लाम) चा आराखडा बदलला.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)
स्पष्टीकरण : ही हदीस स्वत:च एक शुभवार्ता आहे आणि फार मोठे भयदेखील. शुभवार्ता अशी की पैगंबर मुहम्मद (स.) त्यांनी आणलेला (दीन) जीवनधर्म कसल्याही फेरबदलाशिवाय स्वीकारणाऱ्या आणि त्याचे अनुसरण करणाऱ्या लोकांचे स्वागत करतील आणि जाणूनबुजून जीवनधर्मात (दीनमध्ये) निषिद्ध असलेल्या नवनवीन गोष्टींची त्यात सरमिसळ करणारे लोक पैगंबरांपर्यंत पोहोचतील आणि `कौसर'चे पाणी पिण्यापासून वंचित राहतील.
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment