काल मी जमाअते इस्लामी हिंदच्या इज्तमा (शिबिरा)मध्ये सामील झालो होतो. हे संमेलन फकीरांचे संमेलन होते. त्या फकीरांचे नाही जे भीक मागतात. हे त्या फकीरांचे संमेलन होते जे समाजात नेकी (पुण्य) पसरवतात. मानवतेची सेवा करतात. ’मी’ आणि ’तू’ यातील अंतर मिटवितात. ते लोकांना म्हणतात, ’’तुम्ही सर्व ईश्वराचे बंदे (पायीक) आहात. म्हणून ईश्राचे आज्ञाकारीही व्हा.’’ त्यांच्या संमेलनामध्ये सामील झाल्याचा मला कुठलाही पश्चाताप नाही. उलट आनंद आहे. जर या लोकांनी मला पुन्हा बोलावले तर मी पायी चालत त्यांच्या संमेलनात जाईन.’’ - महात्मा गांधी. (संदर्भ : त्रिदिवसीय उर्दू वर्तमानपत्र 4 जुलै 1970).
इस्लामी तहेरिक के कारकूनों को मेरी आखरी नसिहत ये है के, उन्हें खुफिया तहेरिकें (गुप्त चळवळ) चलाने और अस्लहे (हथियार) के जरिए इन््नलाब बरपा करने की कोशिश नहीं करनी चाहिए. ये भी दरअसल बेसब्री और जल्दबाजी की ही एक सूरत है और नतायज (परिणाम) के ऐतबार से दूसरी सूरतों की बनिस्बत ज्यादा खराब है. इन््नलाब (सामाजिक क्रांती) हमेशा अवामी तहेरिक (सामाजिक चळवळ) के जरिये से ही बरपा होती है.’’ (जमाअतच्या कार्यासंबंधी जमातचे संस्थापक मौलाना मौदूदी रहे. यांनी मक्का येथे अरबी युवकांच्या मेळाव्यास संबोेधित करतांनाच्या भाषणातील अंश).
30 मे 1866 रोजी दारूल उलूम देवबंदची स्थापना झाली. 19 नोव्हेंबर 1919 रोजी जमियत उलेमा-ए-हिंदची स्थापना झाली. 1925 साली तबलिगी जमाअतची स्थापना झाली. येणेप्रमाणे विसाव्या शतकाच्या सुरूवातीलाच या तीन मोठ्या धार्मिक संस्था अस्तित्वात आल्या आणि आजतागायत अत्यंत प्रभावशालीपणे कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत 26 ऑगस्ट 1941 साली लाहोरमध्ये जमाअते इस्लामी हिंदची स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता? हे समजून घेतल्याशिवाय जमाअते इस्लामी संबंधी परिपूर्ण माहिती कोणालाही समजू शकणार नाही.
मुस्लिमांची सामाजिक पार्श्वभूमी
त्या काळात मुस्लिम समाजामध्ये इस्लामसोबत इतर धार्मिक रितीरिवाज देखील मोठ्या प्रमाणात प्रचलित झाले होते. स्वामी श्रद्धानंद यांच्या ’शुद्धी चळवळ’चा परिणामही दिसू लागला होता. दारूल उलूम देवबंद मधून शिकून बाहेर पडलेले उलेमा यांनी मुस्लिमांमध्ये इस्लामसंबंधीची जाणीव निर्माण करण्यासाठी देशभरात मस्जिद आणि मदरशांच्या मदतीने एक नेटवर्क उभारून प्रयत्न सुरू केले होते. जमियते उलेमा-ए-हिंद ने काँग्रेसच्या सोबत स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेण्याबरोबरच मुस्लिमांमध्ये इस्लामसंबंधी जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तबलिगी जमाअतने अतिशय सोप्या आणि सरळ पद्धतीने गावागावात जावून लोकांना नमाजचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या मनामध्ये इबादतींसंबंधी गोडी निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम बजावले होते.
जमाअते इस्लामीच्या स्थापनेचा रोचक इतिहास
या तिन्ही संस्थांचे काम आपल्याजागी महत्त्वपूर्ण होते आणि आजही आहे. परंतु हे काम पुरेसे नाही. इस्लाम यापेक्षा जास्त आहे, म्हणून इस्लाम विषयी लोकांमध्ये व्यापक जाणीव निर्माण करण्याची गरज त्यावेळेसचे एक इस्लामिक विद्वान सय्यद अबुल आला मौदुदी यांनी प्रतिपादित केली. त्यांचे म्हणणे होते की, 1. इस्लाम एक समग्र जीवन पद्धती आहे. तो केवळ इबादतींपुरता मर्यादित नाही. 2. कुरआन समजून वाचणे अत्यंत आवश्यक आहे व हे काम मुस्लिम समाजामध्ये होत नाहीये. 3. इस्लामचा संदेश इतर देशबांधवांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचविण्याचे काम या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून होत नाहीये. म्हणून हे काम करण्याचे आव्हान ’तर्जुमानुल कुरआन’ या हैदराबादहून निघणाऱ्या उर्दू नियतकालीकातून सय्यद अबुल आला मौदूदी यांनी केले. त्यांच्या या आवाहनाने प्रभावित होऊन देशभरातून अशी मागणी पुढे आली की सय्यद अबुल आला मौदुदी यांनी या संबंधी पुढाकार घ्यावा. तेव्हा अखंड भारतातून या विचाराशी सहमत असणारे लोक बोलावण्यात आले. 26 ऑगस्ट 1941 रोजी 75 लोक लाहोर येथे गोळा झाले. त्या सर्वांनी एकमताने कुरआनचा संदेश समस्त देशबांधवांपर्यंत पोहोचवावा आणि इस्लामवर आधारित जीवन व्यवस्थेला व्यक्तिगत आणि सामुहिक जीवनात स्थापित करण्यात यावे या उद्देशाने एका संघटनेची स्थापना केली. जिचे नाव ’जमाअते इस्लामी’ ठेवण्यात आले.आणि या संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून सय्यद अबुल आला मौदूदी यांची निवड करण्यात आली. दुर्दैवाने 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाची फाळणी झाली आणि लाहोर पाकिस्तानमध्ये गेले. त्यावेळेस जमाअतच्या सदस्यांची संख्या 300 होती. त्यातील बहुतेक लोक फाळणीमुळे पाकिस्तानमध्येच गेले. उरलेल्या सदस्यांनी भारतामध्ये जमाअते इस्लामीची पुनर्स्थापना करण्यासाठी 16 ते 18 एप्रिल 1948 दरम्यान, इलाहाबाद येथे एक बैठक केली. या बैठकीस देशभरातून 42 सदस्य गोळा झाले होते. या सदस्यांनी सर्व संमतीने ’जमाअते इस्लामी हिंद’ ची स्थापना केली या संघटनेने आपल्या नावातच ’हिंद’ हा शब्द सामल करून आपण भारताच्या संविधानाशी एकनिष्ठ आहोत याचा सुतेवाच केला. बैठकीनंतर सर्वसंमतीने मौलाना अबुल लैस इस्लाही नदवी यांना आमीर (राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले). त्याचबरोबर मोहम्मद युसूफ यांना महासचिव नेमण्यात आले आणि संघटनेचे काम एकमेकांच्या सल्ल्याने करण्यासाठी केंद्रीय सल्लागार समितीचेही गठन करण्यात आले. जमाअते इस्लामी हिंदची स्थापना स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना मानली जाते.
जमाअते इस्लामीचे अध्यक्ष
आजपावेतो जमाअते इस्लामी हिंदचे पाच अध्यक्ष झाले असून, सहाव्या अध्यक्षांची मुदत मार्च अखेर संपली असून, रमजाननंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल.
1. जमाअते इस्लामी हिंदचे पहिले अध्यक्ष मौलाना अबुलैस इस्लाही नदवी. (1948 ते 1972). त्यानंतर पुन्हा अबुलैस इस्लाही यांनाच अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. ते 1990 पर्यंत अध्यक्ष राहिले.
2. त्यानंतर दूसरे अध्यक्ष म्हणून मौलाना मुहम्मद युसूफ यांची निवड झाली. (1972 ते 1979)
3. त्यानंतर तीसरे अध्यक्ष म्हणून मौलाना सिराजुल हसन यांची निवड करण्यात आली. (1990 ते 2003).
4. डॉ.मुहम्मद अब्दुल हक अन्सारी यांनी 2003 ते 2006 पर्यंत अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
5. त्यानंतर मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी यांनी 2007 ते मार्च 2019 पर्यंत अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
6. 2019 पासून आजतागायत जमाअते इस्लामीचे अध्यक्ष म्हणून सय्यद सआदतुल्लाह हुसैनी हे काम पाहत आहेत.
जमाअतची निवडणूक प्रक्रिया
जमाअते इस्लामी हिंदची निवडणूक प्रक्रिया देशातील सर्वोत्कृष्ट निवडणूक प्रक्रिया आहे. जमाअतमध्ये कोणालाच कोणत्याच पदाच्या निवडीसाठी इच्छुक म्हणून फॉर्म भरता येत नाही. येथे पदाची इच्छा म्हणजे लालसा माणन्यात येते आणि त्याला ते पद कधीच मिळत नाही. मुळात कोणी कुठल्याही पदासाठी इच्छाच व्यक्त करू शकत नाही आणि प्रत्यक्षात करतही नाही. जमाअतचे सदस्य स्वतःच्या विवेकाने आपल्यातील योग्य व्यक्तीची निवड स्थानिक शहराध्यक्षापासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत करतात. मतदान गोपनीय पद्धतीने घेतले जाते. निवडून आलेल्या पदाची अदलाबदली अत्यंत शांतपणे कुठलाही खळखळाट न करता केली जाते. वर नमूद सहा राष्ट्रीय अध्यक्ष वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे व्यक्ती असून, त्यांचा एकमेकांशी कुठलाच संबंध नाही. जमाअते इस्लामी हिंदमध्ये घराणेशाहीला स्थान नाही. ही एकमेव अशी मुस्लिम संघटना आहे जिच्यामध्ये पदावरून कधीही आपसात तक्रार झालेली नाही किंवा व्यक्तीगत महत्त्वकांक्षेवरून संघटनेची शकले देखील झालेली नाहीत.
जमात-ए-इस्लामी हिंदची नियमावली
1948 साली झालेल्या स्थापनेनंतर जमाअते इस्लामी हिंदने 13 एप्रिल 1956 रोजी स्वतःचे संविधान अर्थात नियमावलीचा लिखित स्वरूपात स्विकार केला. या नियमावलीमध्ये एकूण 75 कलमांचा समावेश केलेला आहे.
1. कलम 3 मध्ये जमाअते इस्लामीच्या मूळ श्रद्धेचा उल्लेख केलेला आहे. या कलमाप्रमाणे जमाअतची श्रद्धा,’’लाईलाहा इल्लललाह मुहम्मदुर्र रसुलुल्लाह’’ अशी आहे. याचा अर्थ पूजनीय फक्त अल्लाहाच आहे आणि हजरत मुहम्मद (सल्लम.) त्याचे प्रेषित आहेत.
2. कलम 4 मध्ये जमातचा ’नस्बुलऐन’ अर्थात उद्देश जाहीर करण्यात आलेला आहे. तो म्हणजे, ’’अकामत-ए-दीन’’ ज्याचा अर्थ या लेखाच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये विस्ताराने नमूद करण्यात आलेला आहे. जमाअते इस्लामी हिंदची अशी धारणा आहे की, इस्लाम, जो की पृथ्वी तलावर अवतरित झालेल्या पहिल्या दोन व्यक्तीपासून (ह.आदम आणि हजरत हव्वा अलै.) ते प्रेषित मुहम्मद सल्ल. पर्यंत चालत आलेला आहे. मध्यंतरी यात अनेकदा भेसळ करण्यात आली पण प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यानंतर पृथ्वीतलावर शुद्ध स्वरूपात असलेला एकमेव दीन म्हणजेच आजचा इस्लाम आहे. ज्याला की अल्लाहने समस्त मानवजातीसाठी पसंत केलेला आहे. ज्याची घोषणा खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहे.
’’अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे. या ’दीन’पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही.’’ (आले इमरान 3: आयत नं.19)
हा दीन (इस्लाम) माणसाच्या व्यक्तीगत, सामुहिक आणि सार्वजनिक जीवनावर सारखेपणेच लागू होतो. घरात एक, बाहेर एक, पोटात एक, ओठात एक अशी दुटप्पी भूमिका जमाअते इस्लामी हिंदला मान्य नाही. जमाअतची अशी धारणा आहे की, इस्लाम ही जीवन जगण्याची सर्वोत्कृष्ट पद्धती आहे. एवढेच नव्हे तर या पद्धतीचा स्वीकार न केल्यास माणसाचे जीवन तणावग्रस्त, विकारग्रस्त होवून जाते. शिवाय, जीवनात उत्पन्न होणाऱ्या सर्व समस्यांचे समाधान केवळ इस्लामच देवू शकतो. याचा पुरावा म्हणून मी एका सत्याकडे वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. ते सत्य म्हणजे अनेक मुस्लिम देशांमध्ये ज्या ठिकाणी बहुसंख्य लोकांनी इस्लामचा जीवनपद्धती म्हणून स्वीकार केलेला आहे. त्या ठिकाणी एक तर मनोरूग्ण व मनोरूग्णालय तथा वृद्धाश्रम नाहीत किंवा अत्यल्प संख्येत आहेत.
3. कलम 5 मध्ये कलम 4 मधील उद्देशाला हस्तगत करण्याची पद्धती दिलेली आहे. त्यात म्हटलेले आहे की,
अ) कुरआन आणि हदिस हाच जमाअते इस्लामीचा पाया आहे. बाकी इतर गोष्टींना तेवढीच मान्यता दिली जाईल जेवढी की कुरआन आणि हदिसच्या प्रकाशात देणे शक्य आहे.
ब) जमाअत आपले उद्देश्य गाठण्यासाठी अख्लाक (नैतिकता)ची पाबंद राहील. कधीच त्या मार्गाचा अवलंब करणार नाही जो वाकडा, अप्रमाणिक किंवा बेकायदेशीर असेल. ज्यामुळे जातीय घृणा पसरू शकेल किंवा आपसात गटतट पडतील व अशांती माजेल.
क) जमात आपल्या उद्देशांच्या प्राप्तीसाठी सकारात्मक व शांतीपूर्ण मार्गाचाच अवलंब करेल. म्हणून जमाअत-ए-इस्लामी हिंद इस्लामी मुल्यांचा प्रचार व प्रसार करूनच लोकांमध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. आणि त्याच दिशेने लोकांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करेल.
अशा पद्धतीने जमाते इस्लामी हिंदचे कार्य लिखित संहितेनुसार चालते. कोणताही हिंसक मार्ग, भूमिगत चळवळ यावर जमाअतचा विश्वास नाही. सामाजिक क्रांती ही वैचारिक परिवर्तनानेच शक्य आहे, अशी जमातची धारणा आहे. यासंबंधी जमातचे संस्थापक मौलाना मौदूदी रहे. यांचे विचार खालीलप्रमाणे, ’’ इस्लामी तहेरिक के कारकूनों को मेरी आखरी नसिहत ये है के, उन्हें खुफिया तहेरिकें (भूमिगत चळवळ) चलाने और अस्लहे (हथियार) के जरिए इन््नलाब बरपा करने की कोशिश नहीं करनी चाहिए. ये भी दरअसल बेसब्री और जल्दबाजी की ही एक सूरत है और नतायज के ऐतबार से दूसरी सूरतों की बनिस्बत ज्यादा खराब है. इन््नलाब (सामाजिक क्रांती) हमेशा अवामी तहेरिक (सामाजिक चळवळ) के जरिये से ही बरपा होती है.’’ (मक्का येथे अरबी युवकांच्या मेळाव्यास संबोेधित करतानांच्या मौलानांच्या भाषणातील अंश).
जमाअत-ए-इस्लामी हिंदची रचना
जमाअत-ए-इस्लामी हिंदचे मुख्य कार्यालय डी-321, दावत नगर, अबुल फजल एन््नलेव्ह, जामिया नगर, नवी दिल्ली. 110025. येथे आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे कार्य करण्यासाठी त्रिस्तरीय रचना करण्यात आलेली आहे. 1. केंद्रीय कार्यालय दिल्ली, 2. राज्यस्तरीय कार्यालय. भारताच्या जवळ-जवळ प्रत्येक राजाच्या राजधानीत जमाअतचे राज्यस्तरीय मुख्य कार्यालय आहे. 3. जिल्हास्तरीय कार्यालय.
आजपर्यंत जमाअते इस्लामी हिंदमध्ये कधीही नेतृत्वासाठी भांडणे झालेली नाहीत. जमाअतचे कार्य शुराई निजाम म्हणजे सल्लागार मंडळाद्वारे चालते. त्यात अत्युच्च पारदर्शकता असते. नैतिकतेला जमाअतच्या कार्यात अतिशय महत्व देण्यात आलेले आहे. नियम 11 अनुसार जमाअतचे अध्यक्ष, प्रतिनिधीसभा, सल्लागार मंडळ व सचिव निवडले जातात. नियम 6 प्रमाणे जमाअतचा सदस्य होण्यासाठी भारताच्या कोणत्याही नागरिकाला चार अटींची पूर्तता करावी लागते. अ) कलमा लाईलाहा इलल्लाह मुहम्मदुर्र रसुलुल्लाह ला चांगल्याप्रकारे समजून घेवून या सत्याचा स्विकार करणे की, हीच माझी धर्मश्रद्धा आहे. (संदर्भ : कलम- 3). ब) - जमाअतचा उद्देश्य चांगल्या प्रकारे समजून त्याचा स्विकार करणे की हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. (संदर्भ : कलम -4). क) जमाअतची कार्यपद्धती (संदर्भ : कलम 5) चा स्वीकार करण्याचा निर्णय करणे. ड) - जमाअतच्या नियमावलीला चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतर हा प्रण करने की, या नियमावलीच्या आधीन राहून मी शिस्तबद्ध पद्धतीने काम करीन. वर नमूद शर्ती पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकास जमाअते इस्लामीचा सदस्य होता येते. त्यसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी शहराध्यक्षाकडे विहित नमून्यात अर्ज करावे लागतो. त्यानंतर त्याला जमाअतच्या उपक्रमांमध्ये सामील करून घेतले जाते. साधारणतः वर्षभर किंवा त्यापेक्षा अधिक काळ त्याच्या कामाचे व जीवन पद्धतीचे बारकाइने निरिक्षण केले जाते व तो जमाअतला पाहिजे असलेल्या नैतिक पातळीच्या स्तरापर्यंत पोहोचत असेल तर त्याला सदस्यता प्रदान केली जाते. सदस्य झाल्यानंतर त्याच्यावर ज्या जबाबदाऱ्या येतात त्याचा उल्लेख कलम 8 मध्ये केलेला आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद मध्ये सामील होण्यासाठी नैतिकतेचा जो स्तर आवश्यक आहेत त्याचा उल्लेख कलम 9 मध्ये केलेला आहे.
जमाअत-ए-इस्लामी हिंदची एकंदरित अशी रचना आहे. थोडक्यात इस्लाम एक दीन (व्यवस्था) आहे. हा फक्त इबादतीपुरता सिमित नाही तर मुस्लिमांच्या वैयक्तिक आणि सामुहिक जीवनासाठी ही आवश्यक आहे. म्हणून जमाअत-ए-इस्लामी हिंद मध्ये सामील होणाऱ्या लोकांनी आधी स्वतःमध्ये शुद्ध इस्लामी आचरणाचा अंगीकार करावा व तद्नंतर इतरांना त्या संबंधीचे मार्गदर्शन करावे अशी जमाअतची भूमिका अगदी सुरूवातीपासूनच राहिलेली आहे. म्हणूनच या जमाअतमध्ये प्रवेश देण्यापूर्वी इच्छुक उमेदवाराला शुद्ध इस्लामचे प्रशिक्षण दिले जाते. त्याला वर्ष-दोन वर्षे प्रबोशनवर ठेवले जाते. त्याच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो व तो खरोखरच जमाअतच्या मतलुबा मेआर (अपेक्षित स्तरावर खरा उतरत असेल तरच त्याला प्रवेश दिला जातो. ही कठिण परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या फार कमी असते म्हणून जमाअतच्या सदस्यांची संख्याही कमी आहे.) 2022 च्या आकडेवारीनुसार जमाअते इस्लामीच्या सदस्यांची संख्या 3 हजार 589 एवढी आहे.
काँग्रेसच्या कारकिर्दीत जमाअतवर तीन वेळेस प्रतिबंध (इतर संस्थांवर बंदी लादताना संतुलन साधण्यासाठी) लादण्यात आले होते. मात्र तिन्ही वेळेस सर्वोच्च न्यायालयाने ते प्रतिबंध रद्द केले. आज देशभरात जमाअतचे काम अनेक क्षेत्रामध्ये चालू आहे. जमाअतच्या कार्याची विभागणी 6 विभागामध्ये केलेली असून, त्याचे कार्य जमाअतच्या सदस्यांनी दिलेल्या निधीतून व देशभरातून गोळा केलेल्या जकात आणि देणग्यांच्या माध्यमातून केले जाते. गोळा झालेल्या सगळ्या निधीच्या पाईपाईचा हिशेब ठेवला जातो. नियमितपणे सीए कडून त्याचे ऑडिट केले जाते. जकातचा पैसा सुरे तौबा आयत क्र. 60 मधील दिलेल्या आठ विभागामध्ये आवश्यकतेप्रमाणे खर्च केला जातो. कुठेही अनावश्यक खर्च केला जात नाही. विशेषतः दंगलग्रस्त भागातील हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांना आर्थिक मदत दिली जाते. अनेक शैक्षणिक संस्था जमाअत तर्फे देशभरात चालविल्या जातात. अनेक रूग्णालये चालविली जातात. प्राकृतिक आपदांच्या वेळेस जमाअतचे लोक देशातील इतर संस्था, संघटनांच्या खांद्याला खांदा लावून रिलीफ वर्क करीत असतात. जमाअत-ए-इस्लामी हिंदची अशीही धारणा आहे की, देशातील विषमतेमुळे जे लोक आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्याचे मुख्य कारण व्याज आहे. व्याजामुळे गरीबाची प्रगतीच होवू शकत नाही. हफ्ते फेडण्यामध्येच त्याचे आयुष्य निघून जाते. त्यातूनच आत्महत्या होतात. म्हणून जमाअतने देशभरात बिनव्याजी पतसंस्थांचे जाळे विनलेले आहे. त्यातून हिंदू, मुस्लिमांसह सर्व जाती धर्मातील गरजू लोकांना बिनव्याजी अल्प स्वरूपाचे कर्ज दिले जाते. एकट्या महाराष्ट्रामध्ये 17 पेक्षा जास्त बिनव्याजी पतसंस्थांमधून कोट्यावधींची आर्थिक उलाढाल झालेली आहे.
- एम. आय. शेख
Post a Comment