प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की "अल्लाह लाजाळू आणि उदार मनाचा आहे. जेव्हा कुणी आपले दोन्ही हात त्याच्या समोर पसरवून त्याला काही मागतो तेव्हा त्यास रिकाम्या हातांनी परत पाठवताना त्याला लाज वाटते." (अबू दाऊद, तिर्मिजी, इब्ने माजा)
कअब बिन अजरा (र.) म्हणतात की मी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सेवेत गेलो तेव्हा मी पाहिले की प्रेषितांचा चेहरा पडलेला आहे. मी त्यांना म्हणालो की माझे माता-पिता तुमच्यावर कुरबान. आपणास बरे वाटत नाही का? त्यावर प्रेषितांनी उत्तर दिले, "तीन दिवस झाले अन्नाचा एक कण पोटात गेला नाही." कअब म्हणतात की मी तिथून निघून गेलो काही खाण्याची व्यवस्था करण्यासाठी. मी पाहिलं की एक ज्यू व्यक्ती आपल्या उंटाला पाणी पाजत होता. मी त्याला विहिरीतून पाणी काढून देण्याचा खजुरीवर सौदा केला. असे करून बरेच खजू जमा केले. ते घेऊन मी प्रेषितांकडे परतलो. त्यावर प्रेषितांनी विचारले, "हे तुम्हाला कुठून मिळाले?" कअब म्हणतात की मी त्यांना सर्व हकीगत सांगितली. प्रेषित (स.) यांनी मला विचारले, "हे कअब, तुम्ही माझ्यावर प्रेम करता?" मी म्हणालो की होय. माझे माता-पिता तुमच्यावर कुरबान. त्यावर प्रेषित (स.) म्हणाले, "जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याकडे उपासमार अशी चालून येते जसे डोंगरावरून पाणी खाली वाहते. हे कअब, तुम्हालादेखील या परीक्षेतून जावे लागेल आणि उपासमार तसेच आर्थिक संकटालाही तुम्हाला तोंड द्यावे लागेल." (तरगीब व तरहीब, तिबरानी)
उतबा बिन गजवान बसरा (इराक) चे राज्यपाल होते. त्यांनी आपल्या एका भाषणात इतर काही गोष्टींबरोबर हेदेखील सांगितले की मी आणि प्रेषित मुहम्मद (स.) अशा अपस्थेत होतो की (मी सातपैकी एक होतो, इतर सहा व्यक्ती होते) आर्थिक स्थिती इतकी हलाखीची होती की बाबळीच्या झाडाच्या पानाशिवाय आमच्याजवळ खायला काहीही नव्हते. पाने खाऊन खाऊन आमच्या तोंडात जखममा झाल्या होत्या. कपडे नव्हते. एकदा एक चादर मिळाली होती. तिचे दोन तुकडे करून एक तुकडा मी परिधान केला आणि दुसरा सअद बिन मालिक यांना दिला. आणि आजची स्थिती अशी आहे की आम्ही सातही जणांपैकी प्रत्येक जण कोणत्या न् कोणत्या राज्याचा राज्यपाल आहे. मला हा सन्मान लाभला यासाठी मी अल्लाहचा आभारी आहे. मी मोठेपण बाळगावे यापासून मी अल्लाहला शरण जातो. (तरगीब व तरहीब, मुस्लिम)
माननीय अदी यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``तुमच्यापैकी प्रत्येक मनुष्याशी अल्लाह स्वत: संभाषण करील (हिशोब घेईल) आणि तेथे त्याचा कोणीही शिफारस करणारा नसेल आणि त्याला लपविणारा पडदाही असणार नाही. तो मनुष्य आपल्या उजवीकडे पाहील (कोणी शिफारस करणारा आणि मदत करणारा आहे) तेव्हा त्याला आपल्या कर्मांव्यतिरिक्त दुसरे काहीही दिसणार नाही, मग डावीकडे पाहील तेव्हा तिकडेही आपल्या कर्मांव्यतिरिक्त त्याला काहीही दिसणार नाही, मग समोरच्या दिशेने पाहील तेव्हादेखील त्याला फक्त नरक (आपल्या अनेक भयानकतेसह) दृष्टीस पडेल. हे लोकहो! आगीपासून वाचण्याची काळजी घ्या, एका खजुरीचा अर्धा भाग देऊन का असेना.'' (हदीस : मुत्तफ़क़ अलैह)
स्पष्टीकरण : या वेळी पैगंबर मुहम्मद (स.) `इनफ़ाक़' (अल्लाहचा `दीन'- जीवनधर्म आणि अल्लाहच्या निराधार दासांवर खर्च करणे) ची शिकवण देत होते, म्हणून फक्त याचाच उल्लेख केला. पैगंबर म्हणतात, ``जर कोणाकडे फक्त एकच खजूर आहे आणि तो तिचा अर्धा भाग देत असेल तर हेदेखील अल्लाहच्या दृष्टीने मौल्यवान आहे. तो संपत्तीचे अधिकउणे पाहात नसून खर्च करणाऱ्याची मनोवृत्ती पाहात असतो.''
संकलन :
सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment