हरियाणाच्या भिवानी जिल्ह्याच्या पिरू गावाच्या एका रस्त्यावर एका जळालेल्या बोलेरोमध्ये दोन जळालेले नरकंकाल आढळून आले. तपासामध्ये लक्षात आले की, राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्याच्या गोपालगढ इलाख्यामधून दोन मुस्लिम तरूण जुनेद आणि नसीर यांचे अपहरण करून त्यांना जाळून मारण्यात आलेले आहे. मयतांपैकी एकाचा भाऊ इस्माईल याने पत्रकारांना सांगितले की, बजरंगदलचे कार्यकर्ते मोनू मनेसर आणि त्याच्या चार इतर मित्रांनी नसीर आणि जुनेद यांना मारहाण केली आणि त्यांना भरतपूरच्या एका पोलिस स्टेशनमध्ये नेऊन हजर केेले आणि त्यांच्याविरूद्ध गाय तस्करीचा संशय असल्याची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघांची परिस्थिती पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास इन्कार केला व जेथून त्यांचे अपहरण केले तेथेच किंवा रूग्णालयात घेऊन जा म्हणून सांगितले. त्यांनीच दिलेली नावे आम्ही पोलिसांना दिली असे सुद्धा इस्माईलने सांगितले.
यात आतापावेतो एका संशयिताला अटक करण्यात आलेली असून इतर आरोपींचा नेहमीप्रमाणे शोध सुरू असल्याचे पोलिस सांगत आहेत. मोनू मनेसर हा कथित गोरक्षक पथकाचा स्वयंघोषित प्रमुख असून त्याचे भाजपच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध असल्याचे त्याच्या प्रोफाईलवरून दिसून येते. अनेक नेते आणि अधिकारी यांच्या सोबत त्याचे फोटो फेसबुकवर असून, त्याच्या यु-ट्यूब चॅनलला दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी सब्सक्राईब केल्याचे दिसून येते. हरियाणा पोलिस त्याला अटक करण्यापेक्षा वाचविण्यामध्येच जास्त प्रयत्नशील आहे की काय? असा संशय यावा इतपत त्यांचे वागणे संशयास्पद आहे.
जून 2014 मध्ये पुण्यात मोहसिन शेखच्या हत्येने सुरू झालेली मॉबलिंचिंगची ही मालिका थांबता थांबत नाहिये. लिंच झालेल्या लोकांचा डाटा सरकारकडे असण्याचा प्रश्नच नाही. परंतु 2014 पासून किमान दोन-अडीचशे लोक लिंच झाले असतील व त्यातील सर्वाधिक मुस्लिम असतील, असा अंदाज नक्कीच वर्तविता येतो. दुर्दैवाची बाब म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने लोकांच्या हत्या होऊनही एकालाही शिक्षा झालेली नाही. या कथित गोरक्षकांना दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी उद्वेगाने, ’गुंड’ म्हणून संबोधलेले असताना सुद्धा त्यांचा आतंक सुरूच आहे. म्हणून आता हे स्पष्ट झालेले आहे की, मॉबलिंचिंग थांबविण्यासाठी सरकार कठोर पावले उचलणार नाही. सरकारशी गोपुत्रांची असलेली जवळीक पाहूनच उत्तरेतील काऊ बेल्ट भागात पोलिस कथित गोरक्षकांवर कायदेशीर कारवाई करत नाहीत उलट भिवानीसारख्या महाभयंकर घटनांमध्येही पोलिस आरोपींना सहानुभुतीची वागणूक देताहेत. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा आरोपींच्या समर्थनार्थ रस्त्यावर ’गावपंचायत’ भरवून आरोपींचे समर्थन करण्यात आले व त्यांना अटक करण्याचे धाडस करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे हातपाय तोडण्याच्या उघड धमक्या देण्यात आल्या. तरीही पोलिस शांत राहिले.आरोपिंना अटक करण्याचे तर दूर हस्ते परस्ते पोलिस त्यांचीच मदत करत असतात. आता याच प्रकरणात पहा आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस किती टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत आहेत.
जेव्हा शासन आणि प्रशासन एखाद्या प्रश्नामध्ये सहकार्य करत नाहीत, हे लक्षात आल्यावर शहाणपणा यातच आहे की, मुस्लिम समाजाने स्वतःच शक्य तेवढे उपाय करावेत. आता प्रश्न हा उपस्थित होतो की, मुस्लिम समाजाने कोणते उपाय करावेत? तर त्याचे उत्तर असे की, मुस्लिमांनी मॉबलिंचिंग कशामुळे होते हे अगोदर नीट समजून घ्यावे. यासंबंधी आता पावेतो झालेल्या मॉबलिंचिंगच्या घटनांचे विश्लेषण करावे. त्याशिवाय निश्चित उपाय करणे शक्य होणार नाही. आपण जेव्हा लिंचिंगच्या या घटनांचे विश्लेषण करतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की, सकृतदर्शनी ’गोहत्या’ जरी लिंचिंगचे प्रमुख वाटत असले तरी तेच एकमेव कारण नाही. कारण अनेक मुस्लिम लोक केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून लिंच करण्यात आलेले आहेत. उदा. दिल्लीचा हाफेज जुनेद ईदचे सामान घेऊन घरी परत जात असताना लिंच करण्यात आला. दिल्लीमधीलच दारूल उलूमचा एक निरागस विद्यार्थी क्रिकेट खेळत असताना झालेल्या किरकोळ भांडणामुळे लिंच करण्यात आला आणि पुण्याचा मोहसिन शेख इशाची नमाज संपून घरी जात असताना लिंच करण्यात आला. याशिवाय, दाढी आणि टोपीमुळे अनेक मुस्लिम व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. शिवाय मुस्लिम व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी मारहाण होत असतांना इतर लोक शांतपणे पाहत असतात, असा आत्तापावेतोचा अनुभव आहे. कोणीच मदतीला पुढे येत नाही. यावरून दुसरी गोष्ट स्पष्ट होते की, मारहाण असो का लिंचिंग मुस्लिम समाजाविषयी काही लोकांच्या मनामध्ये खोलपर्यंत द्वेष ठासून भरला आहे आणि काही लोकांच्या मनात मुस्लिम लोकांविषयी अविश्वासाची भावना आहे. म्हणूनच ते गप्प बसतात. याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख दोन कारणे म्हणजे विदेशी मुस्लिमांनी 800 वर्षे या देशावर केलेले शासन आणि दुसरे कारण म्हणजे देशाची फाळणी. या दोन्ही कारणासाठी ते मुस्लिमांना दोषी समजतात जे की मुळातच चुकीचा समज आहे. मात्र त्यांचा समज कसा चुकीचा आहे हे दाखवून देण्याचे काम मुस्लिम समाजाचे होते. ते त्यांनी गंभीरपणे केलेले नाही. म्हणून आज द्वेष या पातळीवर पोहोचला आहे की, निरपराध मुस्लिम लोकांची लिंचिंग होत आहे. लिंचिंग तर कळस आहे. या कळसापूर्वी मुस्लिम विरोधाच्या भावना तेवत ठेवण्यासाठी नियमितपणे मुस्लिमकुष दंगली करून द्वेषाचा पाया रचण्यात आला. स्वातंत्र्यानंतर एक वर्षही दंगलमुक्त वर्ष म्हणून पाहणे मुस्लिमांच्या नशीबी आलेले नाही. त्यानंतर पोटा, टाडा, युएपीए सारख्या कठोर कायद्यांची निर्मिती करून त्यात मुस्लिमांना अटक करून जमानतीची संधीसुद्धा नाकारण्यात आली. शेकडो तरूण कित्येक वर्षे तुरूंगात खितपत पडले व आजही तुरूंगातच आहेत. अनेकांच्या सुटका झाल्या. त्यांच्या आयुष्याची कित्येक मौल्यवान वर्षे तुरूंगात गेली ना त्यांना नुकसानभरपाई मिळाली ना त्यांना विनाकारण डांबणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. असा प्रकार देशातील मुस्लिम समाजाव्यतिरिक्त इतर समाजघटकांवर झाला असता तर कायदाच काय घटना दुरूस्तीदेखील करता आली असती. विशेष म्हणजे मुस्लिम विरोधी कारवाया या कुठल्या एका ठराविक पक्षाच्या शासनाच्या काळात झालेल्या नाहीत तर मुस्लिमांचा प्रिय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या काळात असे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले.
मॉबलिंचिंग सहज होत नाही, त्यापूर्वी वातावरण तापविले जाते. घृणा पसरविणारी भाषणे केली जातात. हळूहळू वातावरण तापवत नेले जाते. तेव्हा कुठे मॉबलिंचिंग होते. मुस्लिमांनी याविरूद्ध उपाय म्हणून दोन स्तरावर काम केले पाहिजे. एक तात्कालीन उपाय म्हणून अशा घटनांची दखल घेऊन पोलिसांवर दबाव आणून गुन्हे दाखल करून आरोपिंना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे व दूसरे दीर्घकालीन काम जे की जमाअते इस्लामी हिंद गेल्या 75 वर्षांपासून सातत्याने करत आहे ते करणे. आता प्रश्न हा उत्पन्न होतो की जमाअते इस्लामी हिंद काय काम करते? जमाअत अनेक काम करते. प्रामुख्याने बहुसंख्य बांधवांच्या इस्लाम व मुस्लिम संबंधींच्या चुकीच्या धारणांना संपविण्यासाठी त्यांच्या भाषेत व्यापक साहित्यनिर्मिती करते. इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये अनेक वर्तमानपत्रे आणि नियतकालिके चालविते. अनेक कार्यशाळा घेते. इफ्तार पार्ट्या आणि ईद मिलनचे कार्यक्रम नियमितपणे घेऊन बहुसंख्य बांधवांना त्यात आमंत्रित करते व त्यांच्यापर्यंत इस्लामचा संदेश पोहोचविते. प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवते व त्यांना वेळोवेळी भेटून वेगवेगळ्या कार्यक्रमांना आमंत्रित करते. या पाठिमागचा एकच उद्देश असतो इस्लाम आणि मुस्लिमांसंबंधिचा गैरसमज दूर व्हावा. जमाअतच्या या कार्यक्रमाला खरे तर मुस्लिम समाजाने स्विकारून त्याला व्यापक स्वरूप देऊन एक जनआंदोलनामध्ये त्याचे रूपांतर करावे. तरच बहुसंख्य बाधवांचे गैरसमज उशीरा का होईना इन-शा-अल्लाह दूर होतील. याशिवाय, कुरआनमध्ये दिलेल्या निर्देशाप्रमाणे मुस्लिमांनी वागले पाहिजे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनाचा अभ्यास केला पाहिजे. आपल्यावर आलेल्या संकटांची तुलना त्यांच्यावर आलेली संकटाशी करावी. म्हणजे त्यांच्या जीवनातून आपल्याला मार्गदर्शन प्राप्त होईल. दूसरे जनसेवेची कामे मोठ्या प्रमाणात हातात घेतली पाहिजे जेणेकरून मुस्लिमांबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता निर्माण होईल. तीसरे म्हणजे इस्लामचा संदेश लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचविला पाहिजे. आणि यासाठी योजनाबद्ध पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत. मॉबलिंचिंग ही अदावतीचा परिणाम आहे. दावत दिल्याशिवाय ही अदावत संपणार नाही. यासंदर्भात कुरआन मार्गदर्शन करते की, ’’आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे. (सुरे अलमाईदा क्र. 41 आयत नं. 34).
शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, ’’ऐ अल्लाह ! आम्हाला आमच्या प्रिय देशामध्ये राहणाऱ्या प्रिय देशबांधवांशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यासाठीची समज आणि साहस दे.’’ आमीन.
- एम. आय. शेख
Post a Comment