ठोस धोरण अवलंबविण्याची गरज
८ मार्च रोजी महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला. विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा कुठे गौरव झाला तर कुठे त्यांचे गोडवे गायले गेले. महाराष्ट्राच्या विधानसभेत 8 मार्चला महिलांच्या प्रश्नासंदर्भात चर्चाही झाली. ही समाधानाची बाब आहे. महिलांना समानअधिकार मिळाले पाहिजे, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. त्यांना कामाच्या ठिकाणी अल्हाददायक वातावरण मिळाले पाहिजे. मात्र असे होताना क्वचितच पहायला मिळते. नुकतेच विधानसभेच्या एका महिला सदस्याला विधानसभेत लहान बाळासाठी हिरकणी घर व्यवस्थित नसल्याने अश्रू अनावर झाले. सुशिक्षित, नोकरदार, राजकारणी महिलांना बऱ्यापैकी सुविधा मिळतात. पण, सामान्य महिलांचे काय? तर त्यांच्या हालअपेष्टांचे वर्णन न केलेलेच बरे.
हुंडाबळी, भानामती, छोट्या-मोठ्या कारणावरून महिलांना मारहाण, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बाळांतीनींची रस्त्याच्या कडेलाच प्रसुती अशा एक ना अनेक घटना महिलांच्या नशीबी येत आहेत. सुशिक्षित महिलांच्या नशिबी जरा कमी त्रास आहे. सामान्य कुटुंबातील महिलांना जगण्यासाठी रोजच संघर्ष करावा लागत आहे. सरकारला व समाजालाही याचा रामबाण उपाय सापडत नाही. सर्व घटनांना सरकार जरी जबाबदार नसले तरी जेवढ्या घटना घडत आहेत त्यात मोठ्या प्रमाणात सरकारी धोरण समोर येत आहे. नुकतेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे गावाजवळ दहा पंधरा कुटुंबीयांची वस्ती असलेली बरड्याचीवाडी आहे. येथील यशोदा त्र्यंबक आव्हाटे या गर्भवती महिलेस प्रसूती काळा जाणवत असल्याने आई सोनाबाई आव्हाटे यांच्यासोबत अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. मात्र आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. यावेळी प्रसूती वेदना वाढत असल्याने सोबत असलेल्या आई आणि आशा वर्करने प्रसूती करण्याचे ठरविले. त्यानुसार त्या विवाहित महिलेच्या आईने स्वतः बाळाचा जीव धोक्यात घालुन प्रसूती केली. विवाहितेच्या आईने कशीबशी तरी डिलिव्हरी केली. यावेळी महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
तसेच नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तालुक्यामध्ये एका अल्पवयीन गर्भवतीने युटुबवर बघून स्वतःची डिलिव्हरी केली. त्यात तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.
रयत साखर कारखान्याकडे (जि.कोल्हापूर) ऊस तोडणीचे काम करत असलेले कामगार कासेगावात वास्तव्यास आहेत. सायंकाळच्या सुमारास ट्रॅ्नटरमध्ये बसून ते तिरवडेच्या (ता. भुदरगड) दिशेने निघाले होते. ही मंडळी शुक्रवारी (3 मार्च) नऊच्या सुमारास यमगेजवळ आल्यानंतर गर्भवती महिलेच्या पोटात दुखू लागले. रस्ता खराब असल्याने ट्रॅ्नटर वारंवार आदळत होते. अशातच महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या. महिलेला त्रास होत असल्याचे समजताच तातडीने ट्रॅक्टर मालक सुरज नांदेकर यांनी 108 रुग्णवाहिकेस कॉल केला. त्यानुसार सेनापती कापशीमधून रुग्णवाहिका दाखल होण्यापूर्वीच रस्त्याकडेलाच शेतामध्ये काही महिलांनी आडोसा निर्माण केला. यावेळी किरण केसू पालवी (रा.खारी, ता. खालवा, जिल्हा खांडवा, मध्य प्रदेश) या महिलेने आपल्या बाळाला जन्म दिला. यावेळी बाळाची खुरप्याने नाळ कापावी लागली.
कौटुंबिक हिंसाराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नुकतीच सोलापूरमधील घटना समोर आली आहे. फॅ्नट्री खरेदी करण्यासाठी पत्नीला माहेरून एक कोटी रूपये घेऊन ये म्हणत तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी श्रावणी प्रेम पोटाबत्ती (वय 28, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रेम श्रीनिवास पोटाबत्ती याच्यासह सासूवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे श्रावणी आणि प्रेम दोघेही आयटी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. लग्नानंतर प्रेमने श्रावणीला पॉवरलूम फॅ्नटरी खरेदी करण्यासाठी एक कोटी रूपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केला. शिवाय, तू मला पसंद नव्हती, तुझा पगार व माझ्या वडिलांची आम्हाला आर्थिक मदत होईल म्हणून मी तुझ्याशी लग्न केले, असे म्हणत शारीरिक व मानसिक त्रास देत होते. असे फिर्यादीत नमूद आहे.
या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना राज्यातील बिघडलेली कायदा आणि आरोग्य व्यवस्था अधोरेखित करत असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे त्या म्हणाल्या की, यामुळे राज्यातील आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था किती ढासळलेली आहे हे अधोरेखित होत आहे. राज्य महिला आयोगाने या तिन्ही घटनांची दखल घेतली असून या घटनांतील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या सूचना आरोग्य संचालकांना दिलेल्या आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दिली.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2021-22 वर्षी देशातील महिलांवरील एकूण गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. महिलांचे अपहरण, महिलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, महिलांची शालीनता भंग करण्याच्या हेतूने त्यांच्यावर हल्ला करणे आणि महिलांच्या विनयशीलतेचा अपमान यासारख्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीनुसार, गेल्या वर्षी महिलांविरुद्ध एकूण 428278 गुन्हे नोंदवले गेले, त्यापैकी उत्तर प्रदेशात सर्वाधिक (56083) गुन्हे नोंदवले गेले, त्यानंतर राजस्थान (40738) आणि महाराष्ट्र (39526) आहेत. महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कापासून दूर करणे आणि अपहरणाच्या प्रकरणांमध्ये उत्तर प्रदेश 10574 प्रकरणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर बिहार (8661) आणि महाराष्ट्र (7559) आहे. महानगरांच्या बाबतीत, दिल्ली 3948 नोंदणीकृत प्रकरणांसह आघाडीवर आहे, त्यानंतर मुंबई (1103) आणि बेंगळुरू (578) आहेत. महिलांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणांमध्ये, महाराष्ट्र 927 प्रकरणांसह अव्वल, मध्य प्रदेश (758) आणि पश्चिम बंगाल (456) आहे. ओडिशा महिलांवर 14853 हल्ले करून त्यांची विनयभंग करण्याच्या उद्देशाने आघाडीवर आहे, तर महाराष्ट्र 10568 प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश (939) आहे. या प्रकरणांमध्ये 2022 प्रकरणांसह दिल्ली अव्वल आहे, त्यानंतर मुंबई (1625) आणि जयपूर (586) आहेत.
महिलांच्या अपमानाच्या बाबतीत आंध्र प्रदेश अव्वल स्थानावर आहे, 2370 प्रकरणे, त्यानंतर महाराष्ट्र (1038) आणि ओडिशा (838) आहेत. या प्रकरणांमध्ये मुंबई 481 प्रकरणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर दिल्ली (415) आणि कोलकाता (222) आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांच्या नोंदणीच्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की राजस्थानमध्ये सर्वाधिक (6337) गुन्हे नोंदवले गेले आहेत, त्यानंतर मध्य प्रदेश (2947), उत्तर प्रदेश (2845) आणि महाराष्ट्र (2496) आहेत. या प्रकरणांमध्ये दिल्ली 1226 प्रकरणांसह यादीत अग्रस्थानी आहे, त्यानंतर जयपूर (502) आणि मुंबई (364) आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार/सामूहिक बलात्काराच्या (48) सर्वाधिक खुनांची नोंद झाली आहे, त्यानंतर आसाम (46), मध्य प्रदेश (35) आणि महाराष्ट्रात (23) आहेत. या यादीत 4 प्रकरणांसह मुंबई अव्वल आहे, त्यानंतर बेंगळुरू (3) आणि अहमदाबाद (2) आहेत, अशी आकडेवारी समोर आली आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (फक्त बालिका पीडित) प्रकरणांमध्ये, उत्तर प्रदेशात सर्वाधिक 6970 प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यानंतर महाराष्ट्र (6116) आणि मध्य प्रदेश (6012) आहेत. दिल्लीमध्ये सर्वाधिक 1357 प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यानंतर मुंबई (1019) आणि चेन्नई (429) आहेत.गर्भपाताच्या प्रकरणांचा विचार करता, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 63 प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यानंतर महाराष्ट्र (26) आणि पश्चिम बंगाल (24) आहेत. (संदर्भ : फ्री प्रेस जनरलमध्ये एनसीआरबीच्या अहवालानुसार प्रसिद्ध झालेली माहिती.)
- बशीर शेख
Post a Comment