Halloween Costume ideas 2015

इतिहासाच्या कैदेत जगायचे का...!


तिसऱ्या निजामाने आपली राजधानी १७६१ साली हैदराबादला स्थापन केली. त्यावेळेपर्यंत औरंगाबाद हे अनेक राजवटींमध्ये महत्त्वाचे केंद्र होते. अखेर १९४८ साली हैदराबाद संस्थान भारतात विलिन झाल्यावर औरंगाबादही मराठवाड्यासह भारतात सामील झाले.

औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा नामांतर विरोधी कृती समितीतर्फे निषेध करण्यात आला. मुश्ताक अहेमद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शहरातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. फक्त श्रेयासाठी व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी असे निर्णय घेतले जात असल्याचे मुश्ताक अहेमद यांनी सांगितले. मुश्ताक अहेमद, अण्णासाहेब खंदारे व राजेश मोरे यांनी राज्य सरकारने केलेल्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका यापूर्वीच दाखल केली आहे.

उस्मानाबाद-

२५ मे १९९५ रोजी उस्मानाबादच्या नामांतराची पहिली घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुण्यात पत्रकारांसमोर केली होती. औरंगाबाद इथल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबही झाले. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तुळजापूर इथे झालेल्या सेनेच्या महिला मेळाव्यात या नामांतराची घोषणा केलेली होती. १९९९ साली शिवसेना-भाजप युती असलेल्या कालावधीत उस्मानाबादचे नाव बदलून ते धाराशीव करण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र हे प्रकरण न्यायालयात टिकले नाही. तेव्हापासून उस्मानाबादचे नाव बदलण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. 

ग्रामीण भागातील जुनी जाणती लोकं आजही धारशिव हाच उल्लेख करताना दिसतात. धाराशिव शहराजवळ राष्ट्रकूट काळात चमार लेणी खोदल्या गेल्या या लेणीमध्ये भव्य असे शिवलिंग पहायला मिळते. हे शिवलिंग हे धाराशिव जिल्ह्यातील सर्वात जुने असे शिवलिंग असून याच शिवलिंगावरून या ठिकाणी असलेल्या गावाचे नाव धारशिव असे पडले. त्याचबरोबर शहराच्या पश्चिमेला ६ व्या शतकात खोदल्या गेलेल्या लेणी ह्या धाराशिव लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत. तेरच्या शिव राजाचाही उल्लेख या नावाच्या संदर्भात येताना दिसतो. धाराशिव गावाची ग्रामदेवी हिचे देखील नाव हे श्री धारासुर मर्दिनी हे असून धाराशिव हे याच प्राचीन नावाकडे लक्ष वेधते.

त्याहीपेक्षा महत्वाचे उस्मानाबाद हा निजामाचा सरफेखास जिल्हा होता. म्हणजे निजाम उस्मान अली खान यांच्या व्यक्तिगत खर्चाची सोय या जिल्ह्यातील महसूलातून करण्यात येत होती. निजाम काळात नळदुर्ग हा जिल्हा होता तो बदलून धाराशिव हे जिल्ह्याचे ठिकाण करण्यात आले. याचे कारण म्हणजे हा धाराशिव जिल्हा हा ब्रिटिश आमल असलेल्या भागाशी संलग्न होता भविष्यातील धोका लक्षात घेऊन निजाम सरकारने नळदुर्ग ऐवजी धारशिव जिल्हा केला गेला. विशेष म्हणजे आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही यांच्या काळातील ऐतिहासिक कागदपत्रातून देखील धारशिव गावाचे उल्लेख आढळून येतात.

उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतिक नाव

नगर परिषदेच्या सुधारित नगर विकास योजनेच्या प्रकरण एक मध्ये उस्मान अली खान यांनी सन १९०० साली धाराशीव हे नाव बदलून उस्मानाबाद केलं, असा उल्लेख आहे. धाराशिव हे नाव १९२७ पर्यंत प्रचलित होते. उस्मानाबाद शिवाय एदलाबादचे मुक्ताईनगर... अंबोजोगाईचे मोमिनाबाद आणि पुन्हा अंबाजोगाई असे नामांतर काँग्रेसच्या काळात झाले आहे, तेही ही नावे ऐतिहासिक होती म्हणून. उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतीक नाव आहे, असे इतिहासाचे अभ्यासक जयराज खोचरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

अहमदनगर-

अहमदनगरच्या नामांतरचा मुद्दा १९९७ साली अहमदनगर येथे झालेल्या साहित्य संमेलनात सर्वात पहिल्यांदा चर्चेत आल्याचे सांगितले जाते. तेव्हा या शहराचं नाव अंबिकानगर करावे अशी मागणी करण्यात आली होती. अहमदनगरचे नाव ‘अहिल्यानगर’ करावे अशी मागणी आता आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. मात्र त्यांनी केलेली मागणी ही काही पहिली मागणी नाही. २०२१ सालच्याच जानेवारी महिन्यात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अहमदनगरचे अंबिकानगर करावे अशी मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे अहमदनगरचे अंबिकानगर करावे ही मागणी मनसे मार्फतदेखील करण्यात आली होती. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अहमदनगरचे अहिल्यादेवीनगर करावे अशी मागणी केली होती.

अहमदनगर नामांतराला विरोध

लोककल्याणपेक्षा स्वकल्याण करण्यासाठी आणि सत्ता मिळवून टिकवण्यासाठी महाराष्ट्रासह देशभर शहरांचे नामांतर करण्याचा धडाका सुरू आहे. उन्नत चेतनेचा अभावाने धर्म आणि जातीच्या मानसशास्त्रीय अ‍ॅपचा वापर करून आणि जनतेमध्ये धर्माची गुंगी टिकून ठेवण्याचा भाग म्हणून अशा नामांतरांच्या घोषणा केल्या जात आहे. त्याचाच भाग म्हणून अहमदनगरचे नामांतर करण्याचा घाट सत्ताधारी मंडळींनी धरला आहे असा आरोप करून अहमदनगरच्या नामांतराला पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला आहे.

धर्माच्या आणि जातीच्या नावावर राजकारण करणार्‍या लोकांविरुद्ध जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्र वापरण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. तर शहर नामांतरला संघटनेचे पदाधिकारी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, अर्शद शेख, डॉ. महेबुब सय्यद, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, ज्ञानदेव काळे यांनी देखील विरोध दर्शविला आहे.

इस्लामपूर-

गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील उरुण-इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ईश्वरपूर असे करावे अशी मागणी काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी केलेली आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तसेच भाजप व शिवसेना या पक्षांनी देखील या मागणीसाठी जोर लावलेला आहे.

या नामांतराला वंचित बहुजन आघाडी तसेच एम आय एम या पक्षांनी तीव्र विरोध केला आहे यासंदर्भात इस्लामपूर शहराचे रहिवासी असलेले वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी म्हणतात, जे नाव इस्लामपूर शहराला देण्याची मागणी होत आहे त्याला कुठलाही संदर्भ नाही. हे नाव शहरवासीयांवर लादून अल्पसंख्यांकावर दबाव ठेवण्याचे काम हे करत आहेत. शिवसेना महा विकास आघाडी सरकारसोबत गेल्यानंतर थोडासा बदल जाणवला होता. पण इस्लामपूर येथील शिवसेना ही भाजप आणि आर एस एस सोबत असल्यामुळे त्यांचा मूळ गुणधर्म यानिमित्ताने समोर आलेला आहे. 

- प्रा सचिन गरुड (इतिहास व संस्कृतीचे अभ्यासक)

इस्लामपुरात हिंदू जातीजमातीबरोबर मुस्लिमही सामंजस्याने राहत आहेत. देशात अनेकदा विविध ठिकाणी जमातवादी दंगे झाले तरी इस्लामपूर मध्ये कधीही असे जमातवादी दंगे व हिंसा घडून आलेली नाही. अनेक शहर व गावांची नामांतरे संस्कृत नावाने केली आहेत. जी संस्कृत भाषा फक्त ब्राह्मण पुरुषांनाच शिकण्याची मुभा होती. अनेक शहरे व गावे मध्ययुगात मुसलमानी राजवटीत उदयाला येऊन विकसित झाली. अनेक शहर व गावांची सांस्कृतिक जडणघडण मुस्लिम सुफी परंपरेने झाली. हिंदुधर्मातील जातीय शोषणाला कंटाळून अनेक जातीजमातीतील स्त्री-पुरुषांनी मुस्लीम धर्माचा स्वीकार केला. या वस्तुस्थितीकडे हिंदुत्त्ववादी हेतुत: दुर्लक्ष करत असल्याचे सांगत प्रा. गरुड यांनी इस्लामपूर शहराच्या नावाविषयीचा ऐतिहासिक संदर्भच स्पष्ट केला.

मुळात इस्लामपूर हे शहराचे नाव जबरदस्तीने दिलेले नसून ते इस्लाम धर्मवाचक असले तरी एका धर्माचे वा समाजगटाचे वर्चस्वाच्या हेतूने आलेले नाही. ते सुफी संप्रदायाच्या सर्व जाती समन्वयाच्या आधाराचे नाव आहे. मराठ्यांच्या स्वराज्याच्या काळात कोणत्याही मुस्लीम स्थळाचे नाव बदलले गेले नाही. शिवाजी राजे, संभाजी महाराज, महाराणी ताराबाई यांच्या काळातही इस्लामपूर हे नाव तसेच ठेवले गेले. इंग्रजांनीही हे नाव बदलण्याचा चुकीचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या काळात इथे ख्रिश्चन धर्माची चळवळ उभी राहिली. कोल्हापूर, मिरज येथील ख्रिस्ती धर्माच्या मिशनरी मोहिमेचा भाग म्हणून इस्लामपूरला एकोणिसाव्या शतकात ग्रेस मेमोरियल चर्च बांधण्यात आले. येथील दलितांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. राजर्षी शाहू महाराजांचा आणि कोल्हापूर, मिरज, इस्लामपूरच्या ख्रिस्ती धर्माच्या मिशनरीशी जिव्हाळ्याचा संबंध होता. शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभाव व सहिष्णुतेचा वारसा पुढे चालू ठेवला. त्यांनी कुराणचे मराठीत भाषांतर केले. इस्लामपूर हे शहर आणि येथील धर्मांतर कधीही जबरदस्तीने लादण्यात आलेले नाही. हिंदू धर्मातील अस्पृश्यता, जातीय भेद व शोषण याविरोधात येथील जनतेने मुसलमान व ख्रिश्चन होणे पसंद केले आहे. 

इस्लामपूर या शहराला बूवाफन- संभूआप्पा आणि राजेबागेश्वर या महान सुफी पिरांच्या धर्म समन्वयवादी तत्त्वांचा ऐतिहासिक वारसा आहे. बूवाफन ह्या मालगावच्या खालच्या जातीच्या मुस्लिम संताचा शिष्य संभू आप्पा ही कनिष्ठ जातीचा होता. त्याने उरूण इस्लामपूर परिसरात जातधर्म भेदभावाच्या विरोधात सर्व समाजात समतेची शिकवण दिली. त्यामुळे इस्लामपूरला आजही बुवाफन संभुआप्पा यांचा उरूस भरतो. राजेबागेश्वर पिराचाही असाच उरूस येथे साजरा केला जातो. त्यात सर्व जातधर्मीय सहभागी असतात. इस्लामपूरच्या जवळ कामेरी या गावात मशीद आणि मंदिर एकाच भिंतीच्या आधाराने अगदी शेजारी-शेजारी उभे आहे. हा सर्व परिसर धर्म समन्वयवादी तत्त्वांच्या इतिहासाचा आहे.

इस्लामपूरच्या राजकारणावर आ. जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा प्रभाव आहे. आणि नगरपरिषदेत भाजपची सत्ता होती (सध्या प्रशासक आहे). जयंत पाटील यांचे हिंदुत्त्ववादी भिडे यांच्या संघटनेशी जवळचे संबध राहिले आहेत. त्यांना कोंडीत पकडून आपले राजकारण पुढे रेटण्याची सेना-भाजपच्या विरोधकांची ह्या नामांतराच्या राजकारणाची खेळी आहे. नामांतराच्या या मागणीने धार्मिक विद्वेषाचे राजकारण पसरून शहरातील शांतता आणि सामंजस्य बिघडू शकते. याची काही नागरिकांना चिंता वाटत आहे.

आता हिंदुत्ववादी शक्तीना दुसऱ्या धर्माला द्वितीय स्थान द्यायच्या उद्देशाने इस्लामपूर या नावाला आक्षेप आहे. पण हे वास्तवाला धरून नाही गावांच्या नावाला शतकांचा इतिहास असतो.  त्यांचे इस्लामपूर का? आपल ईश्वरपूर का असू नये अशा प्रकारे तरुणांची माथी भडकविण्याचा प्रकार सुरु आहे. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून सत्तेची गणिते जुळविण्यासाठी नामांतराचा मुद्दा समोर केला जात आहे.

पुणे-

२०२१ मध्ये पुण्याच्या नामांतराची मागणी पुढे आली. पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव देऊन या शहराचे नामांतर ‘जिजापूर’ करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती. पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे. पुणे शहर हे माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. म्हणून याचे नामांतर व्हावे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले होते. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर औरंगाबाद ऐवजी पुणे जिल्ह्याचे नाव ‘संभाजीनगर’ करा, अशी मागणी केली होती. पुणे शहराचे नामकरण "जिजाऊ नगर" व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. या नामांतराच्या वादात आता ब्राह्मण महासंघाने उडी घेतली आहे. आनंदर दवेंनी मिटकरी यांच्या नामांतराच्या मागणीला विरोध करत, पुण्याच्या नामांतराची गरज नसल्याचे म्हटले आहे.

सिंदखेड राजा गावाच्या नामांतराला विरोध

आता सिंदखेडराजा नगरीचे सुद्धा नाव बदलून जिजाऊ नगर होणार आहे. त्यामुळे सिंदखेड राजा येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जाधव घराण्यातील वंशजानी या नामांतराला विरोध केला आहे. सिंदखेड राजा हे ऐतिहासिक शहर असून राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील राजे लखोजीराव जाधव यांनी सिद्धपूर या शहराचे नाव त्यावेळी सिंदखेड राजा असे केले होते. त्यामुळे या शहराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असल्या कारणाने सिंदखेडराजा शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करण्यास जिजाऊंच्या जाधव घराण्यातील वंशजांनी आता विरोध केला आहे. त्याचबरोबर नामांतर करायचे असेल तर बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून जिजाऊ नगर करावे अशी ही मागणी एका निवेदनाच्या माध्यमातून जिजाऊंच्या वंशजांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सिंदखेड राजा शहराच्या नामबदलावरून आता नवा वाद तयार झाला आहे.

- सरफराज अहमद (इतिहास संशोधक, सोलापूर)

औरंगाबाद हे मुस्लिमांच्या सांस्कृतिक मूल्यांचा महत्त्वाचा आधार आहे. दक्षिणेतील मुसलमानांचे ते पहिलं आणि प्रमुख केंद्र राहिलं आहे. दक्षिण भारतामध्ये मुसलमान संस्कृतीची स्थापना औरंगाबाद शहरामध्ये झालेली आहे. त्यामुळे मुसलमानांना उपरं ठरवायचं नसेल, दखनी मुसलमानांना उपरं ठरवायचं नसेल तर त्यांचा सांस्कृतिक आधार हा जपला पाहिजे.

हा देश मुसलमानांना आपला वाटावा, या देशाविषयी मुसलमानांना प्रेम वाटावं, म्हणून मुसलमानांच्या खाणाखुणा, मुसलमानांची संस्कृती जपणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य असते. पण राज्यकर्ते हे कर्तव्य पार पाडताना दिसत नाहीयेत. मुसलमानांची संस्कृती, मुसलमानांच्या खाणाखुणा मिटवण्यासाठी ते प्रयत्न करताहेत जेणेकरून मुसलमान उपरे ठरतील आणि मुसलमानांना हा देश आपला वाटणार नाही, अशी परिस्थिती ते निर्माण करून ठेवताहेत.

दखनी मुस्लिमांचा विरोध औरंगजेबाच्या नावाशी निगडित असलेल्या नामांतराला नाही तर औरंगाबादचं नामांतर हे दखनी मुस्लिमांच्या संस्कृतीवर आघात करणारं आहे. कारण दखनी मुस्लिमांची संस्कृती आणि त्याची स्थापना औरंगाबाद शहरामध्ये झालेली आहे. औरंगाबाद शहरामध्ये दखनी भाषेतील पहिला ग्रंथ लिहिला गेला. दखनी भाषेची सुरुवात ही औरंगाबाद शहरापासून आहे. मुहम्मद तुघलकाची स्वारी आल्यानंतर दौलताबादमध्ये राजधानी बनवल्यानंतर त्याने अनेक विद्वानांना आपल्या सोबत आणलं. त्यामध्ये हजरत राजू खत्तान हे बंदान नवाज जे गुलबर्ग्याला खूप मोठे सूफी आहेत, हे तुघलकाच्या सोबत दखनेमध्ये आले ते खुलताबादला, दौलताबादला राहिले आणि त्यांनी इथल्या मुसलमानांशी किंवा येथील स्थानिक लोकांशी संवादाची भाषा म्हणून दखनी भाषेचा वापर केला आणि त्या दखनी भाषेच्या माध्यमातून आपली पहिली साहित्यकृती लिहिली आणि त्या साहित्यकृतीच्या माध्यमातून कुरआनाच्या आयती या ओव्यांच्या स्वरूपात, काव्यांच्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दखनी भाषेची सुरुवात, कुरआनप्रणित सांस्कृतिक राजकारणाची सुरुवात ही खुलताबाद, दौलताबाद या दोन महत्त्वाच्या शहरांपासून झाली जे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतात. त्याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खुलताबाद या शहरात जवळपास ७०० सूफींची स्मारकं आहेत, त्या सातशे सुफींनी खुलताबाद शहरात मोठं सुफींची ज्ञानकेंद्र बनवलं होतं, त्या सूफी ज्ञानकेंद्राच्या माध्यमातून त्यांनी दखनेमध्ये सूफी चळवळ पसरवण्याच्या, इस्लामचा प्रसार करण्याचा, वारकरी संप्रदायाशी संवाद साधण्याचा, बसव अनुयायांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, हे सगळे प्रयत्न खुलताबाद, औरंगाबाद शहरांशी जोडले गेलेले आहेत, त्याचा इतिहास औरंगाबाद शहरामध्ये आपल्याला सापडतो. त्यामुळे औरंगाबाद हे मुसलमानांचं सांस्कृतिक केंद्र आहे.

त्याचबरोबर औरंगाबाद शहरामध्ये मुसलमानांच्या पाच महत्त्वाच्या राज्यकर्त्यांच्या कबरी आहेत. औरंगाबादशेजारी खुलताबादमध्ये ज्या कबरी राज्यकर्त्यांच्या आहेत त्यामध्ये औरंगजेबाशिवाय बहामनीचा एक प्रमुख राज्यकर्ता अब्दुल्लाह बहामनी यांची कबर आहे, तसेच कुतुबशाहीचा शेवटचा राज्यकर्ता अबूल हसन सालार शाह ज्याला पदच्युत केल्यानंतर औरंगजेबानं खुलताबादमध्ये बंद केलं होतं, त्याची कबरदेखील तेथे आहे, हैद्राबादमधील निजामशाहीचा संस्थापक असणाऱ्या निजाम अली खानची कबर आहे, मलीक अंबर ज्यांना प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मराठी राष्ट्रीय प्रसाद आहेत म्हटलं, त्यांचीदेखील कबर तिथेच आहे. त्याशिवाय अनेक सूफी विचारवंतांच्या, अनेक विद्वानांच्या, कवींच्या कबरीदेखील या औरंगाबाद शहरामध्ये आहेत. त्यामुळे दखनेच्या मुसलमानांचं, मराठी मुसलमानांचं औरंगाबाद शहराशी एक महत्त्वाचं नातं ते या नामांतराच्या माध्यमातून संपवलं जाऊ नये, त्या सांस्कृतिक नात्यावर आघात केला जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे.

या शहराचं नामकरण ज्यानं या शहराची स्थापना केली त्या मलीक अंबर यांच्या नावावरून अंबराबाद असं करावं. मौलाना आझाद यांच्या नावावरून आझादनगर असं करू शकता किंबा ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावावरून कलामाबाद हे नाव देऊ शकलं असतं. हे शहर दखनी मुसलमानांच्या राजवटीचं केंद्र राहिलेलं आहे, दखनी मुसलमानांची राजवट तेथे स्थापन झालेली आहे, मलीक अंबर यांनी तिथे राजकारण केलेलं आहे त्यामुळे अहमदनगरचंही नामकरण करू नये अशी आमची भूमिका आहे. त्याचबरोबर हा देश आम्हाला आपला वाटावा म्हणून तुम्ही ह्या देशात आमच्या खाणाखुणा जपाव्यात येवढीच आमची विनंती आहे. यासाठी आमचा या नामांतराला विरोध आहे.

( उत्तरार्ध)

- शाहजहान मगदुम

8976533404


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget