Halloween Costume ideas 2015

देशातील घरकामगारांना गुलामाची वागणूक!

देशातील ९१ लाखांपेक्षा अधिकच्या घरकामगारांना कामाच्या ठिकाणी गुलामाची वागणूक मिळत असल्याची बाब एका संशोधनातून समोर आली आहे. आपल्या मागण्यांविषयी घरेलू कामगारांनी अलिकडेच नॅशनल प्लॅटफॉर्म फॉर डोमेस्टिक वर्कर्सच्या बॅनरखाली २० हून अधिक राज्यांत आंदोलन केले होते. घरकाम करणाऱ्यांकडून घरातील धुणी, भांडी, कचरा, लादी, डस्टिंगपासून सगळी कामे केली जातात. मात्र या कामाचे पैसे न ठरल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा मोबदला मिळतो. अनेकदा हा मोबदला घरकामगार काय मागणी करतो, ज्याच्या घरी काम करायचे त्याचे बार्गेनिंग स्किल अशा गोष्टींवर अवलंबून असतो. घरकामगारांना मिळणारा पगार हा शहरांमधील सामाजिक आर्थिक स्तरानुसार ठरतो. बंगळुरूतील कंपनी बाबाजॉब.कॉमच्या सर्व्हेनुसार, भारतात काम करणाऱ्यांना घरकामगारांना दरमहा १० हजारांपेक्षा कमी रुपये मिळतात. अहमदाबादमध्ये यांना दरमहा ६५०० रुपये मिळतात. तर मुंबईतील घरांत काम करणाऱ्यांना ७५०० रुपयांपर्यंत मिळतात. कोलकात्यात हे सर्वात कमी ५००० रुपये आहे. छोट्या शहरांत हा पगार ३००० ते ४००० दरम्यान असतो. 

मोठ्या शहरांमध्ये झारखंड, रांची, आसाम, ओडिशा या राज्यांमधून महिला विस्थापित होऊन येतात. या महिलांमध्ये आदिवासी महिलांचे प्राबल्य आहे. यामध्ये मानवी तस्करीचाही समावेश होतो. झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये चांगले जीवन, अधिक पैसा आणि शिक्षणाचे आमिष दाखवून आदिवासी मुलींना जाळ्यात ओढले जाते. या मुली पुढे देशाच्या महानगरांमधल्या श्रीमंत कुटुंबांमध्ये कामासाठी पाठवल्या जातात. ही एक प्रकारची मानवी तस्करीच आहे. या मुलींचा जगण्याचा नैसर्गिक हक्कच हिरावला जातो. स्वतंत्र बंगले, गगनचुंबी अपार्टमेंट्स, दुकाने आणि स्पा अशा ठिकाणी त्यांना अत्यंत स्वस्तात कामाला लावले जाते. ही नवी जीवनशैली त्यांना भूलवणारी असते. आपल्या आयुष्याचे कल्याण झाले, अशा भावनेने श्रीमंत घरांमध्ये कामाला लागणाऱ्या या मुली पुढे आपोआप शोषणाच्या सापळ्यात अडकत जातात. त्यांच्याकडून अठरा-अठरा तास काम करून घेतले जाते. पुरेसे अन्न, कपडे न देता कित्येक महिने विनावेतन राबवले जाते आणि काही वेळा तर मालकांच्या बलात्कारातून या मुली गर्भवतीही होतात. घरकामासाठी आणल्या गेलेल्या महिलांना कधीकधी देहविक्रीमध्येही ढकलले जाते. वाढत्या शहरीकरणाबरोबर हा प्रश्न वेगाने वाढतो आहे आणि त्या तुलनेत तो सोडवण्यासाठी होणारे प्रयत्न अपुरे आहेत. या महिलांची नोंदणी नसते. बनारस हिंदू विद्यापीठात समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक एक जोशी सांगतात की डोमेस्टिक हेल्परशी क्रूरता सर्वच लोक करत नाही. हेल्पर्सचा छळ करणारे लोक मानसिकरित्या कुंठित आणि आजारी असतात. हेल्पर्सचा छळ करून त्यांनाच आनंद मिळतो जे लोक जीवनात यशस्वी होत नाही किंवा काही विशेष न करू शकण्याच्या भावनेने कुंठित असतात. घरात कुठलीही चोरी झाली तर सर्वात आधी शंकेची सुई वळते ती घरकाम करणाऱ्यांवरच. घरातील आर्थिक व्यवहार, मौल्यवान वस्तू यांच्याविषयी सर्वतोपरी माहिती त्यांच्याकडे असते त्यामुळेच पोलिसांकडून त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येतो असे पोलिसांकडून सांगण्यात येते. घरात होणाऱ्या चोऱ्या असोत की खुनासारखे गंभीर अपराध, यात ३० टक्के सहभाग कुटुंबातील सदस्यांचा असतो, हे सिद्ध झाले आहे. तरीही केवळ गरीब आण‌ि असहाय्य घरकामगारांना लक्ष्य केले जाते. 

केंद्रीय श्रम मंत्रालयानुसार देशात ९१ लाखांहून अधिक डोमेस्टिक वर्कर्स आहेत, जे ई- श्रम पोर्टलवर नोंदणीकृत आहेत. नॅशनल अलायन्स फॉर डोमेस्टिक वर्कर्सच्या संस्थापक रेखा सिंह सांगतात की घरात काम करणाऱ्या महिलांसोबत मारहाण, शिवीगाळ आणि कधी-कधी तर लैंगिक शोषणही केले जाते. त्यांना ठरवलेला पगार मिळत नाही. त्या आजारी पडल्यावर पगारातून पैसे कापले जातात. महिन्याला अमुक एक रक्कम घरातल्या कामवाल्या बाईच्या हातात टेकवली म्हणजे प्रश्न मिटला. तिने सुट्टी घ्यायची नाही, अडीअडचणीला पैसे मागायचे नाहीत. रजा घेतली तर हमखास पैसे कापणारच... वर्षोनुवर्ष मालकांकडून घरकामगारांना याच पद्धतीने वागवले जात आहे. हातावर पोट असलेला हा कष्टकरी वर्ग दाद मागायला कुणाकडे जाणार, असाच मालकांचा समज. त्यांना कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा दिली जात नाही.

घरकामगारांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी घरेलु कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. घरकामगारांच्या काही संघटना आणि काही समाजसेवी संस्था घरकामगारांच्या हक्कांसाठी आता लढताना दिसत आहेत. जसे सोलापुरातील महिला शिक्षिकांनी एकत्र येवून काही वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ऍचिव्हर्स महिला असोसिएशनच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सकारात्मक काम चालू आहे. एका अर्थाने घरकामाला प्रतिष्ठा मिळण्याचाही भाग आहे. कारण घरकाम म्हणजे फक्त कामाची पद्धत, त्याचे अर्थशास्त्र व त्याविषयीचे कायदे इतकीच मर्यादित चर्चा नसून तो स्त्री व कामाच्या ठिकाणी तिला मिळणाऱ्या विषम वागणुकीचाही अभ्यास आहे. घरकामगारांचे काम हे नेहमी किंमत शून्य का असते व तिला गृह‌ति का धरले जाते, स्त्रियांनी करायचे काम हे नेहमी घरगुती व दुय्यम दर्जाचे का असावे ? घरकाम करणाऱ्या बहुतांश महिलांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नसते. त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध व्यवसाय मार्गदर्शनपर कार्यक्रम, पाल्यांच्या शिक्षणासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एक संवेदनशील समाज म्हणून त्यांची ही गरज समजून त्यांचे जगणे थोडे सुकर व्हावे म्हणून आपण मदत तर नक्कीच करू शकतो.

- सुरेश मंत्री

अंबाजोगाई. संपर्क- ९४०३६५०७२२


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget