(३) जे या जगातील जीवनाला पारलौकिक जीवनावर प्राधान्य देतात,३ जे अल्लाहच्या मार्गापासून लोकांना रोखत आहेत आणि इच्छितात की हा मार्ग (त्यांच्या इच्छेनुसार) वक्र व्हावा.४ हे लोक पथभ्रष्टतेत फार दूर गेलेले आहेत.
(४) आम्ही आपला संदेश देण्यासाठी जेव्हा कधी एखादा पैगंबर (रसूल)पाठविला आहे, त्याने आपल्या लोकांच्याच भाषेत संदेश दिला आहे जेणेकरून त्याने त्यांना चांगले स्पष्ट करून आपले म्हणणे मांडावे.५ मग अल्लाह ज्याला इच्छितो मार्गभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो सन्मार्ग दाखवितो,६ तो प्रभुत्वसंपन्न व बुद्धिमान आहे.७
(५) आम्ही यापूर्वी मूसा (अ.) लादेखील आपल्या संकेतांसहीत पाठविले आहे. त्यालाही आम्ही आज्ञा दिली होती की आपल्या लोकांना अंधाराच्या गर्तेतून काढून प्रकाशात आण. आणि त्यांना अल्लाहच्या इतिहासातील बोधप्रद८ घटना ऐकवून उपदेश दे. या घटनांमध्ये मोठे संकेत आहेत९ त्या प्रत्येक माणसासाठी जो संयम बाळगणारा व कृतज्ञ होणारा असेल.१०
३) दुसऱ्या शब्दांत ज्याला सर्व चिंता भौतिकतेची लागून राहिली आहे आणि परलोक जीवनाची त्याला पर्वा नाही. जे जगातील फायद्यांसाठी, स्वादांसाठी आणि आरामासाठी परलोकची हानी विकत घेऊ शकतात, परंतु या जगातील जीवनाची कोणतीच क्षति, कष्ट व संकट तसेच स्वादापासून वंचित होण्याला सहन करू शकत नाही. ज्यांनी जगातील आणि परलोकातील जीवनाची तुलना करून शांतचित्ताने या जगाला पसंत केले आहे. परलोकाविषयी त्यांनी निर्णय घेतला की जिथे जिथे ते भौतिक लाभाच्या आड येईल तिथे त्यास बळी चढवित जीवन व्यतीत करीत जातील.
४) म्हणजे ते अल्लाहच्या मर्जीच्या अधिन होऊन राहू इच्छित नाही तर त्यांना वाटते अल्लाहने दिलेला जीवनधर्म त्यांच्या मर्जीनुसार चालावा. त्यांचे प्रत्येक विचार, दृष्टिकोन आणि युक्ती ते आपल्या विश्वासात दाखल करतात. आपल्या चिंतन व्यवस्थेत ते एखाद्या अशा विश्वासाला पनपू देत नाही जे त्यांच्या डोक्यात घूसत नाही. त्यांची प्रत्येक परंपरा, पद्धती व स्वभावाला वैध समजले जावे. त्यांच्याकडून त्यांच्याच पसंतीच्या पद्धतीची मागणी करावी. तो त्यांचा बंदिस्त दास असला पाहिजे. हे जिथे जिथे आपल्या मनातील शैतानाच्या अनुकरणात जातील तिथे याने जावे. त्यांना कुठेही टोकले जाऊ नये आणि त्यांच्या मार्गावरच त्याने चालत राहावे. ते अल्लाहचे म्हणणे त्याच स्वरुपात मान्य करतील जेव्हा अल्लाह अशाप्रकारचा धर्म (दीन) त्यांच्यासाठी पाठविल.
५) याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे अल्लाहने जे पैगंबर ज्या लोकसमूहात पाठविले त्यांच्या लोकभाषेत आपली वाणी अल्लाहने त्या पैगंबरांवर उतरविली. जेणेकरून त्या ईशवाणीला त्या लोकांनी चांगल्याप्रकारे जाणून घ्यावे. लोकांना हा बहाणा सापडू नये की ईशवाणीला आम्ही समजू शकत नव्हतो तेव्हा आम्ही त्यावर ईमान कसे धारण करणार? दुसरा अर्थ म्हणजे अल्लाहने फक्त चमत्कार दाखविण्यासाठी असे केले नाही की पैगंबर तर पाठविले भारतात आणि वाणी होती चीनी किंवा जपानी भाषेतील! अशाप्रकारचे चमत्कार दाखविण्याऐवजी आणि लोकांच्या चमत्कारप्रिय मनोवृत्तीला तृप्त् करण्यापेक्षा अल्लाहने मार्गदर्शन, उपदेश आणि समजावून सांगणे, स्पष्टीकरण देणे यांस जास्त महत्त्व दिले. म्हणून हे अनिवार्य होते की एका लोकसमुदायाला त्याच्याच भाषेत संदेश पोहोच केला जावा ज्यामुळे लोक चांगल्या प्रकारे अल्लाहचा संदेश समजून घेतील.
६) म्हणजे पैगंबर प्रचार-प्रसार आणि समजावून सांगण्याचे पूर्ण कार्य त्याच भाषेत करतात ज्याला पूर्ण लोकसमुदाय जाणतो. तरी सर्वांनी मार्गदर्शन प्राप्त् करणे सर्वांच्या नशीबात नसते, कारण सर्वांनी ते ऐकल्यावर मान्य करावे हे अनिवार्य नाही. मार्गदर्शन आणि पथभ्रष्टतेची दोरी तर अल्लाहच्याच हातात आहे. तोच ज्याला इच्छितो आपल्या या वाणीद्वारा सरळमार्ग दाखवितो आणि ज्याच्यासाठी इच्छितो त्यास याच वाणीला मार्गभ्रष्टतेचे कारण ठरवितो.
७) म्हणजे लोकांचे स्वत:हून मार्गदर्शन प्राप्त् करणे किंवा मार्गभ्रष्ट होणे या आधारावर संभव नाही की ते पूर्णत: स्वतंत्र नाहीत, तर ते अल्लाहच्या प्रभुत्वाच्या अधीन आहेत. परंतु अल्लाह आपल्या या प्रभुत्वाला अंधाधुंद वापरत नाही. तो काही कारण नसताना कोणाला मार्गदर्शन करीत नाही किंवा विनाकारण कोणाला मार्गभ्रष्ट करीत नाही. अल्लाह प्रभुत्वशाली तर आहेच, परंतु तत्त्वदर्शी आणि सर्वज्ञसुद्धा आहे. त्याच्याकडून ज्याला मार्गदर्शन प्राप्त् होते, उचित कारणांनी प्राप्त् होते. ज्याला सरळमार्गाने वंचित ठेवून भटकण्यासाठी सोडून दिले जाते, तो स्वत:च्या धिक्कारीत स्थितीला पसंत केल्याने तो त्या धिक्कारालाच पात्र ठरतो.
८) मूळ अरबी शब्द `अय्याम' आहे. याचा अर्थ होतो `प्रसिद्ध ऐतिहासिक घटना' अल्लाहच्या इतिहास म्हणजे मानव इतिहासाचे ते महत्त्वपूर्ण अध्याय ज्यात अल्लाहने पूर्वीच्या लोकसमुदायांना किंवा व्यक्तींना त्यांच्या कर्मानुसार मोबदला किंवा शिक्षा दिली आहे.
९) म्हणजे या ऐतिहासिक घटनांमध्ये अशा निशाण्या विद्यमान आहेत. ज्यात अल्लाह एक होण्याचे प्रमाण मनुष्य पाहू शकतो. या वास्तविकतेच्या अनेक निशाण्या पाहू शकतो की `मोबदला देण्याचा नियम' एक विश्वव्यापी नियम आहे. ते सत्य आणि असत्याच्या बौद्धिक आणि नैतिक फरकावर पूर्णत: अवलंबून आहे. त्याची निकड पूर्ण करण्यासाठी एक दुसरे जग म्हणजे परलोक जीवन अनिवार्य आहे. या घटनांमध्ये त्या निशाण्या आहेत ज्यामुळे एक मनुष्य असत्य विश्वास आणि सिद्धान्तावर जीवन व्यतीत करण्याचे दुष्परिणाम पाहू शकतो आणि त्यापासून बोध घेऊ शकतो.
१०) म्हणजे या निशाण्या आपल्या ठिकाणी आहेत, परंतु यांच्यापासून लाभ उठविणे त्याच लोकांचे काम आहे जे अल्लाहच्या कसोटीला धैर्याने सामोरे जातात. तसेच अल्लाहच्या कृपेला जाणून त्याचे खरे आभार मानणारे असतात. कृतघ्न व उताविळ लोकांना या निशाण्यांचे अध्ययन व निरीक्षण झाले तरी त्यांची ही नैतिक दुर्बलता त्यांना या अभ्यासापासून लाभ उठवू देत नाही.
Post a Comment