Halloween Costume ideas 2015

मॉबलिंचिंगची नवी लहर?


अंतरराष्ट्रीय स्तरावरून टिका झाल्यानंतर काही दिवस झुंडीद्वारे केल्या जाणार्‍या हत्या बंद झाल्या की काय? असे वाटत असतांनाच उत्तर भारतामध्ये विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये या महिन्यात ओळीने चार हत्या करण्यात आल्या. त्यामुळे उग्र राष्ट्रवाद्यांच्या भावना अद्याप तापलेल्याच असून, सरकार त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई करत नसल्यामुळे त्यांची हिम्मत अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

4 सप्टेंबर बासीतअली बरेली

    पहिली हत्या 4 सप्टेंबर 2020 रोजी बरेली येथे बासित अली (34) या व्यक्तीची करण्यात आली. बरेली जिल्ह्यातील आंवला गावात लोखंडी सळया चोरीच्या आरोपावरून बासित अलीला झुंडीने इतकी जबर मारहाण केली की तो गतप्राण झाला. बासित अली हातगाड्यावर वस्तू विकून उपजिविका करत होता. त्याला 4 मुलं आहेत. त्याला झाडाला बांधून यातना देऊन मारण्यात आले. या प्रसंगी मुख्य आरोपी विक्रमसिंग याला अटक करण्यात आली असून, फारसा तपास न करता तुरूंगात रवाना करण्यात आले आहे. बाकी इतर सहा लोकांचे नाव एफआयआरमध्ये असून, ते उजळमाथ्याने फिरत असतांनाही पोलीस त्यांच्यावर हात टाकण्याची हिम्मत करत नसल्याचे चित्र आहे.

6 सप्टेंबर आफताब आलम नोएडा
    6 सप्टेंबर 2020 रोजी नोएडा येथे आफताब आलम (40) या टॅक्सी ड्रायव्हरला काही गुंडांनी ’जय श्रीराम’चे नारे द्यायला लावून निर्दयीपणे त्याची हत्या केली. आपल्या टॅक्सीत दिल्लीहून प्रवासी घेऊन तो बुलंद शहरला गेला होता. परतीच्या वेळेस तीन लोक जबरदस्तीने त्याच्या टॅक्सीत बसले व टॅक्सी पुढे घेण्यास सांगितली. टॅक्सी सुरू करताच त्यांनी त्याला त्याचे नाव विचारले आणि मुस्लिम असल्याचे लक्षात येताच त्याला जय श्रीरामचे नारे लावण्यात भाग पाडले. परिस्थिती लक्षात आल्या-आल्या आफताब यांनी   -(उर्वरित पान 2 वर)
आपल्या मोबाईलवरून मुलाला फोन लावला व फोन खिशात ठेऊन दिला. त्यात त्या तिघांचे आफताब आलमशी झालेले बोलणे त्याच्या मुलाने रेकॉर्ड करून घेतले व ते पोलिसांना दाखवले. त्याच्या मुलाचे नाव मुहम्मद साबरे असे असून त्याने व्हाईस रेकॉर्डिंगचा पुरावा दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी सदरचे प्रकरण मॉबलिंचिंगचे नसून लुटीच्या प्रयत्नाच्या दरम्यान त्याची हत्या करण्यात आली असल्याचे एफआयआरमध्ये नोंदविले आहे. पोलीस हे नेहमी मॉबलिंचिंगच्या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालतात. त्यामुळे या घटनेतही त्यांनी पाठीशी घातले त्यात नवल ते कोणते. सदर घटना ही बादलपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेली असून, नेहमीप्रमाणेच पोलिसांचा तपास संथ गतीने सुरू आहे.

7 सप्टेंबर आर्यमन यादव कुशीनगर
    7 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी उत्तर प्रदेशच्या रामनगर बंगरा या गावात एक शिक्षक सुधीर सिंग यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याची हत्या करणारा आर्यमन यादव बंदूक घेऊन छतावर जावून उभा राहिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले व त्याने आर्यमन यादव याला ताब्यात घेतले. मात्र गावातील सवर्ण लोकांनी पोलिसांच्या ताब्यात असतांनासुद्धा आर्यमन यादव या अवघ्या 24 वर्षाच्या इतर मागासवर्गीय तरूणाला जबर मारहाण करून त्याची हत्या केली. आणि कुशीनगर पोलीस असहाय्यपणे ते सगळे दृश्य पाहत राहिली. तरया सुजान नावाच्या पोलीस स्टेशन क्षेत्रामध्ये झालेल्या या घटनेमुळे ठाण्याचे प्रभारी अधिकारी हरेंद्र मिश्र यांना निलंबित करण्यात आलेले आहे. परंतु, निलंबन म्हणजे काही शिक्षा नव्हे. यथावकाश ते नोकरीवर परत येतील व दुसर्‍या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना तैनात करण्यात येईल.

7 सप्टेंबर सर्वेष दिवाकर मैनपुरी
    सर्वेष दिवाकरची झुंडीनी हत्या उत्तर प्रदेशातील खराबजीत नगरमध्येच केली. अत्यंत हृदयद्रावक अशा या घटनेमध्ये 40 वर्षीय दलित सर्वेष दिवाकर याला झुंडीने जबर मारहाण करून जागीच मारून टाकले. सर्वेष हा कचोरी बनवून हातगाड्यावर विकण्याचा व्यवसाय करत होता. सर्वेषने आपल्या मुलीला विकून टाकले, अशी अफवा गावात उठविली गेली आणि त्याची हत्या केली गेली. पोलिसांनी या संदर्भात जी माहिती दिली ती अशी की, सर्वेषने आपल्या मुलीला शिक्षणासाठी नोएडा येथे आपल्या नातेवाईकांकडे नेवून ठेवले होते. असे असतांनाही केवळ दलित असल्याकारणाने त्याच्यावर गैरविश्‍वास दाखवून झुंडीने त्याला मारून टाकले. आता या सर्व हत्यांवर नेहमीप्रमाणे राजकारण सुरू झालेले असून, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी मैनपुरीच्या घटनेत बजरंग दलाचे लोक लिप्त असल्याने बजरंग दलला आतंकवादी संघटन म्हणून त्यांनी स्वतःच जाहीर करून टाकले. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनीही उत्तर प्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्था व्हेंटिलेटवर असल्याचा आरोप केला. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी सांगितले की, पोलीस जनहितामध्ये जे आवाज उठवत आहे त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात गुंतलेले असून, कायदा व सुव्यवस्थेकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. मुळात या ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या सुद्धा औपचारिक आहेत. कोणताही विरोधी पक्ष भाजपच्या शिर्ष नेतृत्वावर या संबंधाने दबाव टाकण्याच्या स्थितीत नाही. कारण जोपर्यंत अशा घटनांची भाजपचे शिर्ष नेतृत्व आणि केंद्र सरकार दखल घेत नाही तोपर्यंत ह्या हत्या अशाच सुरू राहतील. यात वाद नाही.

- एम.आय. शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget