Halloween Costume ideas 2015

कोरोना आणि आत्महत्या...


कोरोना महामारीमुळे देशात २४ मार्चपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मनोरुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे मत नवी दिल्ली येथील आकाश हेल्थकेयर या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने व्यक्त केले आहे. मानसिक आरोग्याचा सामना करणाऱ्या ३३ टक्के रुग्णांना आत्महत्या करण्याच्या विचारांचा सामना करावा लागत आहे. आत्महत्याविषयी वारंवार चर्चा करणे आणि सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या आणि त्यावर प्रसारमाध्यमांत एकसारखी चर्चा घडत असाल्यामुळे अनेक जणांच्या मनात आत्महत्येचा विचार आल्याचे आणि त्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. भावनात्मक दुःख, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण होणारी चिंता, एकटेपणा, रोजगाराच्या समस्या, बेकारी, नोकरीची सुरक्षा आणि मानसिक समाधानाचा अभावाने अनेकजण ग्रासल्याचे दिसून आले. वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक अशा विविध पातळ्यांवर मानवजातीसमोर संकट उभे राहिले आहे. गेल्या काही दिवसांत देशातील विविध वृत्तवाहिन्यांनी बातम्यांमध्ये प्राधान्याने घेतलेला विषय पाहता सुशांत सिंह राजपूत, त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि या वादात विनाकारण उडी घेतलेली वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत याव्यतिरिक्त कोणताही विषय माध्यमांना प्राधान्याचा वाटत नाही, हीच गोष्ट सिद्ध होत आहे. बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करून विनाकारण हा विषय दुसरीकडे वळवला. वृत्तवाहिन्यांना आणि माध्यमांना असे विषय चघळायला हवेच असतात. कंगना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामधील कलगीतुरा सर्वांना बऱ्याच ब्रेकिंग न्यूज देऊन गेला. याच कालावधीमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन पार पडल्याने या अधिवेशनामध्ये कंगना आणि रिपब्लिक टीव्हीचा संचालक अर्णव गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा ठरावही आणण्यात आला. माध्यमे आणि वृत्तवाहिन्यांच्या अतताईपणामुळे सामान्य नागरिकांना सुशांत सिंहच्या आत्महत्येसारखे विषय अत्यंत महत्त्वाचे वाटण्याचा धोका अशा धोरणातून निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे, बेरोजगारी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे, हातावर पोट असणाऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांचे उपजीविकेचे साधन बंद झाले आहे. देशातील करोनाची परिस्थिती आता हाताबाहेर जाऊ लागल्याने या महासंकटाच्या व्यतिरिक्त इतर कोणताही विषय महत्त्वाचा असू शकतो, हे सध्यातरी कोणालाही मान्य होण्यासारखे नाही. लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. आर्थिक व्यवहारच थांबल्यामुळे किंवा फारच कमी प्रमाणात सुरू असल्यामुळे त्याचा विपरित परिणाम मनुष्यबळावर झाला आहे. कोविड-१९च्या संकटामुळे जगभरात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे.  त्यामुळे आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. जीव वाचवायचा की उपजीविकेचा बचाव करायचा अशा कात्रीत जग सापडले आहे. बेरोजगारी वाढल्यामुळे त्याचा परिणाम आत्महत्येच्या प्रमाणावरदेखील झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ संगठन (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन) (आयएलओ) यांनी यासंदर्भातील अहवाल प्रकाशित केले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार जाण्याची माहिती देण्यात आली आहे. काही रोजगार आतापर्यतच्या कालावधीत गेले आहेत, तर काही रोजगार आगामी काळात जाणार आहेत.  दरवर्षी जगभरातून साधारणपणे ८ लाख लोक आत्महत्या करतात. हा अभ्यास करताना विविध वयोगट, लिंग, बेरोजगारी इत्यादी घटकांच्या आधारे विश्लेषण करण्यात आले आहे. मानसिक आरोग्य किंवा मानसोपचार सेवांशी निगडीत असणाऱ्यांनी विविध सरकारांसमोर आणि समाजांसमोर वाढत्या बेरोजगारीमुळे वाढणाऱ्या आत्महत्येंच्या प्रमाणासंदर्भात जागृती निर्माण केली पाहिजे. याचे गांभीर्य यंत्रणांसमोर आणि समाजासमोर आणण्याची आवश्यकता आहे. कोविड-१९ महामारीला रोखण्यावर सध्या सर्वच सरकारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावण्यात झाले आहे. अलीकडच्या काळात भारतात आणि जगभरातदेखील हळूहळू लॉकडाऊनमधून बाहेर येत अर्थचक्राला चालना देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र अजूनही कोविड-१९चे गांभीर्य मोठे आहे. त्यामुळे ही दीर्घकालीन लढाई आहे. दुर्दैवाने नकळत या सर्व घटकांचा दीर्घकालीन मोठा परिणाम समाजातील कमजोर घटकांवर होणार आहे. त्यांच्यासमोर आगामी काळात मोठे प्रश्न निर्माण होणार आहेत. या सर्व परिस्थितीत मानसोपचार सेवा योग्यरितीने उपलब्ध होणे आणि त्यांचा सर्वसामान्यांना योग्य तो प्रतिसाद मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशातील प्रसारमाध्यमे ज्यावेळी बेजबाबदार वागू लागतात तेव्हा तेथील लोकशाहीला मोठा धोका निर्माण होतो. या देशातील लोकशाहीला असाच धोका निर्माण झालेला आहे. माध्यमांना प्रचलित विषयांचे लॉलीपॉप चघळायला देवून महत्वाच्या पोटापाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय यावा, इतकी ही स्थिती बिघडली आहे. प्रगल्भ लोकशाहीकडून निर्बुद्ध हुकूमशाहीकडे निघालेला हा जत्था आपल्याच हाताने आपल्या लोकशाहीची हत्या करणारा ठरणार आहे. त्यानंतर लोकशाहीची हत्या झाली की तिने आत्महत्या केली या प्रश्नावर माध्यमांमध्ये, राजकीय वर्तुळात कॅमे-.यासमोर होणा-या चर्चा निव्वळ कुचकामी असतील. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणा-या माध्यमांनी हे वेळीच ध्यानात घ्यायला हवे.

- शाहजहान मगदूम 

मो.:८९७६५३३४०४


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget