Halloween Costume ideas 2015

गड्या आपला गाव बरा...!

गतसालच्या महापुराच्या कटू आठवणी विसरून जातोय न जातोय तोंच यंदाच्या वर्षी कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे पूर्ण ग्रामीण भागातील जनजीवन भयभीत आणि विस्कळित झाले आहे.  मागल्या वर्साला माहापुरानं हातात आल्यालं घालविलं आणि यंदा या कोरोनाच्या माहामारीनं सगळं सुखच हिरावलं...!  ही ग्रामीण भागातील प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहिली की, इथल्या भयान वास्तवाची जाणीव होते.असं असलं तरी,इथल्या काळ्या मातीत मिसळून निसर्गाच्या अवकृपेचा कैकदा अनुभव घेतलेला ग्रामीण भागातील शेतकरी राजा छातीचा कोट करून खंबीरपणे उभा राहिला आहे.संकटाशी दोन हात करून लढतो आहे.
      आपल्या देशात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठा जल्लोष साजरा करण्याचं नवीनच फॅड अलिकडच्या काळात वाढू लागले आहे, यंदाच्या वर्षी ही 2020 या नव्या वर्षाच्या स्वागत समारंभाचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच कोरोनाच्या जागतिक संकटाच्या वादळाची चाहूल लागली आणि बघता बघता हे गंभीर परिस्थिती निर्माण करणारं वादळ आपल्या दारात येऊन ठेपलं,  कोरोनाचं काळेकुट्ट सावट जसजसं गडद होत गेलं, तसतसं त्यातलं गांभीर्य लक्षात यायला लागलं. संसर्ग वाढत चालला, आणि त्याबद्दलची धास्ती ही वाढू लागली. संपूर्ण देशात कोरोनाचे संकट उभे राहिले.  देशांतील हे लोण राज्यात, शहरात आणि गावा गावात पसरले. सुरूवातीला  मला काय होतंय  म्हणणारा बळिराजाचा जोष मावळला. अशा सांसर्गिक रोगाची यत्किंचितही कल्पना नसलेला कृषक राजा पुर्णपणे खडबडून गेला. कधी नव्हे तो लॉकडाऊनचा काळ त्याच्या वाटेला आला. लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळातील धीरगंभिरतेचा अनुभव त्याला घ्यावा लागला. मात्र त्यातूनही प्रशासनाने घातलेल्या अटी व शर्ती पाळून बळिराजा आपल्या काळ्या आईच्या सेवेतून तसूभरही मागे हटला नाही. मृग नक्षत्राच्या आगमनाची चाहूल लागताच त्याने आपल्या शेतीत नांगर तर चालविलाच, पण संपूर्ण मशागत ही करून घेतली. हे सगळं करताना राज्यातील शासन व प्रशासन यांनी निर्देश दिल्याप्रमाणे संपूर्ण घराने काळजी घेतली. देशातील या काळ्याकुट्ट काळोखाच्या संकटाला तोंड देत त्याला तडीपार करण्यासाठी बळिराजा ने आता कंबर कसली आहे. खरं तर, गेले वर्षभर सर्वाधिक नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकरी कसाबसा जीव मुठीत धरून जगत होता.शेतकर्‍याचे हंगामा पाठोपाठ हंगाम वाया गेले आहेत.या वर्षीच्या शुभारंभाच्या काळात राज्य भरात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने हाहाकार माजविला. अर्थात हे सत्र संपलेलं नाही.वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट या नैसर्गिक आपत्तींशी सामना करावा लागतो आहे.रब्बी हंगामात लागवड करून हातात काहीच मिळाले नाही.अशी अवस्था आहे.अलिकडेच मराठवाडा, विदर्भ, आणि खानदेश मध्ये अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली, त्यातच गारपिटीने गहू, हरभरा, ज्वारी, मका,या रब्बी पिकांसह द्राक्षे, डाळींब, केळी, पपई, आंबा, आदी फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील बहुतांश शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीच्या झालेल्या आहेत. या हलाखीच्या परिस्थितीतही त्यांने माणूसकी सोडलेली नाही.      कोरोना आज आहे उद्या जाईल,पण ग्रामीण भागातील शेतकरी किती जिंदादील आहे हे या निमित्ताने अधोरेखित झाले. त्यांने माणसातला माणूस शोधून त्याला आपलेसे केले, माणूसपण काय असते ते दाखवले आणि माणूसकीच्या कळपातून लांब दूर फेकलेल्या माणसाला पुन्हा माणुसकीत आणण्याचे फार मोठी कामगिरी बजावली, हे मोठे मौल्यवान काम बळिराजाने करून दाखवले आहे.
     कोरोना सारख्या महामारीच्या काळात माणूसकी सोडलेली आणि संवेदनाहीन झालेल्या अनेक घटना शहरी भागात दिसून आल्या. मात्र काळ्या आईची सेवा करणार्‍या शेतकर्‍यांने या वैश्‍विक संकटाच्या वादळाला तोंड देत  आपली संस्कृती जपली; बळिराजाची परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम करून त्यांने माणूसकी सोडलेली नाही हे सिद्ध केले. नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलेल्यांना जवळ केले. सुखांच्या भोवती फिरत असतानाच :खाच्या प्रसंगी कोणी जवळ करत नाही, हा शहरी  भागातील अनुभव नित्याचा आहे,मात्र इथल्या ग्रामीण जीवनाची नाळ जोडलेल्या शेतकर्‍यांच्या वागणूकीने शहरीकरणामुळे आधुनिकतेचे वारे प्यायलेले चाकरमानी आता उत्स्फूर्तपणे अंत:करणापासून म्हणू लागले आहेत की,  गड्या,आपला गाव बरा....!       

- सुनिलकुमार सरनाईक
9420351352      

( लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget