Halloween Costume ideas 2015

आम्हाला हा देश महासत्ता बनवायचा नाही का?

Abdul Kalam
आम्ही कधी ब्रिटन, अमेरिका ,जपान या देशाशी भारताची तुलना करीत होतो, आता कोणासोबत होते हे न सांगितलेले बरे. या गोष्टीसाठी जबाबदार कोण? तो शेतकरी का जो दिवसभर श्रम करून उन्हापावसात राबून सोन्यासारखे पीक उगवतो की तो कामगार, ज्याला त्याच्या श्रमाचा मोबदलाही भांडवली लोक योग्य प्रमाणात देत नाहीत. कोण आहे जबाबदार? हेच ते राजकारणी व मूठभर भांडवलदार.
    येणेप्रमाणे देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक असून सर्व कळूनही आम्ही आंधळे झालो आहोत. अशा समयी देशाला व समाजाला प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे, पण दुर्दैवाने ते मिळत नाही. प्रत्येकाला आपले स्वार्थ साध्य करायची व आपले हित कसे साध्य होईल याची चिंता आहे. त्या नेत्याच्या हातात बढती आहे म्हणून तो अधिकारी तेथे ईमानाने राहतो. आमुक  नेता मला आर्थिक मदत करेल म्हणून एक बुद्धिजीवी आपली बुद्धी गहाण ठेवतो. आणि मतदारांबद्दल तर सांगायलाच नको.
    कदाचित हे आपल्याच देशात होत असेल. चार दिवस दारू, मटन, पैसा घेऊन हे त्या  व्यक्तीचे चरित्र त्याचे कर्तत्व,  त्याचे शिक्षण, समाजप्रति बघण्याचा दृष्टिकोन न पाहता शे-पाचशे घेऊन मतदान करतात व युवकांचे भविष्य बर्बाद करतात .सर्व सारखेच असतील असेही नाही. अनेक निष्कलंक व कवडीचा भ्रष्टाचार न करणारे प्रशासकीय अधिकारीही आहेत, जे पैशा पेक्षा काम महत्त्वाचे  व जबाबदारी महत्वाची म्हणतात, ते खरे भारताचे आदर्श आहेत. इतक्या भ्रष्ट वातावरणात काम करने सोपी गोष्ट नाही, नेते मंडळींचा विरोध पत्करणेही सोपी बाब नाही. तरीपण देश प्रेमी इमाने-इतबारे काम करतात. तसेच माझे काही मतदार बांधव असेही आहेत जे पैशाच्या आमिषाला बळी पडत नाहीत. दोनशे रुपये मजुरी मिळवणारा माझा अशिक्षित बंधू हजार रूपये नाकारतो ही सोपी बाब नाही. या उलट पाचशे कोटी चे बंगले बांधूनही, प्रचंड संपत्ती असूनही राजकारण्यांचे आणखी निवडून येऊन कोट्यावधीचा भ्रष्टाचार करण्याची नियत असते. हे असेच चालू राहिले तर येथील समाज मुठभर लोकांचा गुलाम होईल यात शंका नाही. राजकारण्यांनी  येथील लोकांची धर्माच्या,जातीच्या नावाने माथी भडकवलेली आहेत. फक्त लोकांना धर्म दिसतो परंतु साधी बाब का लक्षात येत नाही? इतर धर्मियांकडून आपल्या धर्माला किंवा इतर जातीकडून आपल्या जातीला धोका कसा आहे? राजकारणी हिंदू-मुस्लिमांना एकमेकांच्या विरोधात भडकवतात. मुळात इतर धर्माशी कोणालाच काहीच देणे घेणे नसते. मुसलमानानां हिंदुच्या भजनांचा व हिंदूंना मुस्लिमांच्या  नमाजचा काहीच त्रास नसतो. परंतु जेव्हा हे धार्मिक द्वेष मनात रुजवले जाते तेव्हा आवाजाने डोक्यात नाही तर पोटात दुखते, गाड्यांचा गोंगाट आम्ही सहन करू शकतो परंतु काही क्षणाचे भजन, अजान व इतर धार्मिक भजन, कीर्तन, नमाज सहन करणे म्हणजे पाप होऊन जाते.
    जगातील कोणताच धर्म हिंसेचे समर्थन करत असेल असे वाटत नाही. पण प्रतिकारात्मक हिंसा योग्य. पण हल्ला तरी कोण करतोय? मी कधीच कोणा हिंदू बांधवांला इतर धर्मातील लोकांनी मंदिरात जाण्यास रोखले पाहिले नाही आणि मुस्लिम बांधवाला इतर धर्मातील बांधवांना प्रार्थना करण्यास रोखले हे ही पाहिलेले नाही. काही घटना अपवाद असतील परंतु सामाजिक एकोपा आज पण आहे. पण हे धूर्त राजकारणी नवे धर्मरक्षणाचे राजकारण करीत आहेत व धार्मिक वाद निर्माण करीत आहेत. हे होऊ नये यासाठी बुद्धिजीवी लोकांनी समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे.
    भारतातील अंदाजित 40 टक्के लोकांचे धर्म श्रम करणे, भुख  शमवणे हाच आहे. त्यांची व त्यांच्या कुटुंबांची रोजगारा अभावी अन्न, वस्त्र, निवारा, यांची पंचायत आहे. फक्त मतासाठी हे राजकारणी राजकारण करतात या 40% पैकी त्या स्वार्थी राजकारण्यांच्या धर्माच्या, जातीच्या लोकांच्या स्थितीत तरी तो  बदल करतो का? उत्तर नाहीच  आहे. या श्रमिकांना हे समजले पाहिजे की हा आमचा नेता कसा होऊ शकतो तो अब्जाधीश आहे. तो आम्हा गरिबांचे नेतृत्व कसे करेल? त्याला गरिबीची जाण कशी असेल. तो आमचे प्रश्‍न कसे सोडल? आमचे प्रश्‍न आमच्यातीलच माणूस सोडवेल यासाठी आम्ही आमच्या श्रमिक बांधवाला आमचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी. राजकारण हा गुंडगिरीचा शेवटचा अड्डा बणला असून त्याच बरोबर यात धर्मांध व जातीय लोकांचा भरणा जास्त झालेला आहे, पण निवडणूकीत  निवडून तर आम्हीच देतो ना? आम्हाला काही जाणीव होत नाही. हे धर्मांध निवडून येण्यासाठी आम्हाला धर्माच्या नावाखाली लढवतात व दुर्देवाने आम्ही लढतो. इथे त्यांचा धूर्तपणा कारणीभूत असला तरी आमचा अविवेकीपणा जास्त कारणीभूत आहे. समाजापुढे विकृत इतिहास प्रस्तुत करून मते मिळविली जात असताना चिकित्सक विचार आम्ही का करत नाही? आम्ही आमचा विवेक का म्हणून गहाण का ठेवावा?
    समाजातील मुठभर धर्मवादी व भांडवलवादी लोकांनी राजकारणात प्रवेश करून गेल्या अनेक वर्षापासून येथील समाजाची धर्माच्या आधारे पिळवणूक केली आहे. आज देशावर मुठभर भांडवलदारांचे वर्चस्व निर्माण झाले म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण सरकारने खाजगीकरण्याचा जो सपाटा सुरू केला आहे त्यावरून तर या धुर्त राजकारण्यांची नियत समजते.    सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करून लोकांचे रोजगार तर गेले आहेतच त्याचबरोबर समाजवादी व मानवतावादी मूल्यांचा र्‍हासही होत आहे. कामगार वर्गाच्या हिताचे कायदे शिथिल करून या देशातील मोठ्या प्रमाणात असलेल्या संघटित व असंघटित कामगारांच्या हक्कावर गदा आणीत आहेत. एकंदरीत काय तर भांडवलदारी लोकांचे लाड करून सर्व श्रेत्रात गुंतवणुक करण्याचे स्वातंत्र्य दिले जात असून, ज्यांच्या श्रमावर देश चालतो त्यांना मात्र योग्य न्याय मिळत नाही. लाखो लोक आज बेरोजगार आहेत. खाजगी निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असून खाजगी श्रेत्रात गरीब लोकांची जी पिळवणूक होते त्यावर न बोललेलेच बरे. तरीपण त्या कामगाराला उदरनिर्वाहासाठी मन मारून अल्प पगारावर काम करावे लागते. मालक त्याच्याकडून हवे तसे काम करून घेतो हवे तेव्हा काढून ही टाकू शकतो. याचे स्वातंत्र्य त्याला मिळते परंतु कामगारांच्या स्वातंत्र्याचा विचार केला जात नाही.
     अशी सध्याची परिस्थिती आहे. असे असताना हा देश गरीब श्रमिकांचा आहे का? हा प्रश्‍न उपस्थित राहतो कारण येथील कामगार मेले तरी सरकार व समाजाला काही फरक पडत नाही.हा लढा जातीवादाहुन अधिक बिकट आहे म्हटले तरी वावगे ठरत नाही. कारण श्रीमंत लोक कोणत्याही जातीचे असो त्यांना दंगली व जातीय प्रश्‍नांना तोंड द्यावे लागत नाही. त्याला कोणतीही आपत्ती जातीय लोकांकडून होत नाही, पण गरीब लोकांना मग ते कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असो दंगलीत गरीब लोकांचे व्यवसाय उद्ध्वस्त होतात, झोपड्या जाळल्या जातात, कलम 144 मध्ये गरिबांची उपासमार होते, इतर बांधवांकडून बोलणी सहन करावी लागते. त्यामुळे सर्व संकटे ही गरीबांसाठीच असतात असे वाटणे सहाजिक आहे. जातीवादी व धर्मवादी नेते देश अधोगतीकडे नेत आहेत. हे युवकांना समजले तर ते जागरूक होऊन लोकांना जागरूक करेल. परंतु, असे काहीच होत नाही.गेल्या वीस वर्षापासून देशात जातीयता वाढत आहे. देशात असहिष्णुतेचे वातावरण पूर्वीही होते आजही आहे,परंतु पूर्वीचे लोक राजकारणात धर्म आणून भ्रष्ट नेत्याला निवडून देत नव्हते. 
    आज  लोकांमध्ये जी जातीयवादी मानसिकता निर्माण झाली ही एकदम निर्माण झाली नसून येथील व्यवस्थेने हळूहळू राजकारणात धर्म आणून लोकांची मने दूषित केली. सामान्य: देशातील बहुसंख्य लोकांना राजकारण काय? हे माहिती नसताना  ते या विषयावर बोलतात. देशाची ही परिस्थिती निर्माण होण्यास लोकशाहीचे चारही आधारस्तंभ काही प्रमाणत कारणीभूत ठरले आहेत. संसदेमध्ये आम्ही निवडून दिलेले नेते असल्याने यावर बोलूच शकत नाही, परंतु न्यायव्यवस्थेत वर तर आमचा विश्‍वास आहे व असणार परंतु येथे ही राजकारण व राजकीय नेत्यांचे वर्चस्व निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अपराधी, अपराधी असूनही समाजात ताठ मानेने जगतात. काही राजकारणात येऊन कायदेमंडळात कायदे निर्माण करतात. काहींची पुरावे नसल्याने सुटका होते.
    परंतु काही निरपराधी लोक शिक्षा भोगत आहेत अनेक शिक्षित युवक तुरुंगात डांबले जातात सामान्यांनी कसे न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेवावा. लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभ ने तर आपली प्रतिष्ठा गमावली आहे यावर बोलण्यासारखे भरपूर आहे. परंतु ते सर्व देशाला माहितीच आहे कशाप्रकारे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बाजारीकरण करण्यात आले आहे.
    आज विशिष्ट पक्षाची व नेत्याची बाजू घेताना आमची मीडिया दिसते. देशातील वास्तविक परिस्थितीवर बोलणे त्यांची जबाबदारी आहे पण ते बोलत नाहीत, तर राजकारण्याची बाजू मांडण्याचे काम करतात. प्रसार माध्यमे हे एक जाहिरातीचे माध्यम झाले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. वास्तवीक परिस्थिति जाणून घेऊनही आम्ही त्या वृत्तवाहिन्यांवर बातम्या पाहतो, ते वास्तविकता दाखवत नाही तरीपण पाहतो, येणेप्रमाणे जातीयवादांच्या प्रचाराला बळी पडतो.
    एकंदरीत एक धार्मिक मानसिकता निर्माण करण्यात या प्रसारमाध्यमांची कामगिरी खूप मोठी आहे. देशात आजही लोक उपाशीपोटी झोपतात, कुपोषणग्रस्त बालकांची संख्याही चिंतित करणारी असून भारतीय लोकांच्या राहणीमानात बदल झाला तरी एक मोठी संख्या आजही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे. यावर चर्चा होत नाही. संबंधित सरकार व नेत्यांना  ही प्रसारमाध्यमे प्रश्‍न का विचारित नाहीत, त्यांची ती जबाबदारी नाही का? सर्व राजकीय पक्षांत काही  जातीयवादी व भ्रष्टाचार करणारे राजकारणी आहेत. देशात सेक्युलर विचार असणारा एकही पक्ष नाही. सर्वच पक्षातील काही राजकारणी अब्जावधी चा घोटाळा करतात, जमिनीवर कब्जे करतात, तरी यावर बोलायला यांना वेळ नाही. फालतु चर्चांवर  वर वेळ वाया घातला जातो पण   ज्वलंत प्रश्‍नावर चर्चा कधीही होताना दिसत नाही. यांना आर्थिक ,जातीय ,धार्मिक हितसंबंधाचे प्रश्‍न महत्त्वाचे वाटतात.
 मित्रांनो जागे होणे गरजेचे आहे! राजकारण्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, आपले नेतृत्व तपासा, योग्य नेतृत्व मिळाल्याशिवाय तुमच्या स्थितीत बदल होऊ शकत नाही. (भाग - 2)

- नजीर महेबूब शेख
9561991736
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget