Halloween Costume ideas 2015

पापा दी ग्रेट !

उधोजीराजे दिल्ली सोबतची व्हिडिओ कॉन्फरन्स संपवून आपल्या दिवाणखान्यात व्याघ्रसनावर आज जरा जास्तच रुबाबात बसलेले आहेत. पारनेरचे पाच नगरसेवक जितक्या नकळतपणे दादांनी पळवावेत तितक्याच नकळतपणे त्यांचा एक हात मिशांवर ताव देत आहे. तेव्हढ्यात बाळराजे प्रवेश करतात आणि त्यांच्यासमोर उभे राहतात. उधोजीराजे त्यांच्याकडे प्रश्‍नार्थक नजरेने पाहतात .
बारा - आप की ईजाजत हो तो मैं बोलू पापा दी ग्रेट ?
उरा - हा काय वात्रटपणा लावला आहेस ? रात्री-अपरात्री इकडे तिकडे उंडारतांना घेतोस का कधी माझी परवानगी ? आता बोलण्यासाठी काय माझी परवानगी मागतोस आणि तीही हिंदीतून?
बारा - यात कसला आलायं वात्रटपणा ? मी अनुकरण करतोय तुमचं ! काल तुम्ही नाही का बोलण्याआधी दिदींची ’ईजाजत’ मागितली हिंदीतून ? आणि मी हिंदीतून बोलतोय म्हणजे मला इंग्रजी येत नाही असं समजू नका. काही लोकांची होते इंग्रजी बोलतांना पंचाईत, पण आपलं नाही बुवा तसं. फक्त समोरच्याला समजेल अशा भाषेत बोलावं म्हणून हिंदी मराठीत बोलावं लागतं. समजलं पापा दी ग्रेट ?
उधा - कळलं. कळलं. जास्त अक्कल नका पाजळू. काय बोलायचं आहे ते बोला आणि निघा. कामं खोळंबली आहेत माझी.
बारा - काही विशेष नाही. शेवटी काय ठरलं ते विचारायला आलो होतो. पापा दी ग्रेट!
उरा - कसलं काय ठरलं ?
बारा - तेच ते, डरना है के लढना है ? पापा दी ग्रेट !
उरा - अरे, मी तर आहेच लढणार्‍या बापाचा लढणारा मुलगा ! मी तर नेहमीच लढायला तयार असतो, अर्थात घरात बसून. आता पुढे काय करायचं ते बाकीच्यांना ठरवू दे.
बारा - हो ना. त्यांना म्हणावं काय ते लवकर ठरवा म्हणावं. नाहीतर असं ऑनलाईन भेटत राहायचं आणि ऑनलाईनच चहा पीत राहायचा, आपापल्या पैश्यांनी, याला काय अर्थ आहे ?
उरा - माझी तर तयारी आहे त्यांना माझ्या सारखं बनवायची, पण त्यांची तयारी आहे का माझ्यासारखं बनण्याची ?
बारा - सगळे कसे तुमच्यासारखे बनतील डॅड ? वाघ हा जन्मावाच लागतो. असं कोणी कितीही ठरवलं तरी वाघ होऊ शकत नाही. यू आर सिम्पली ग्रेट डॅडी. तुम्हाला जे जमतं ते दुसर्‍या कोणाला जमूच शकत नाही. काल त्या मिटींगला जे कोणी होते त्यांच्या पैकी एकाला तरी  निवडुन न येता मुख्यमंत्री बनता आलं का, सांगा ना ? यू आर रिअली ग्रेट पापा !

उधोजीराजे थोडेशे लाजतात. परत त्यांचा हात नकळतपणे  मिशांकडे जातो.
उरा - अरे, माणूस काही असाच लढवय्या होत नाही. ते सगळं रक्तातूनच यावं लागतं. आमचे पिताश्रीच लढवय्ये होते ना, म्हणून तर आम्ही लढवय्ये आहोत ना ! बाळराजे एकदम काहीतरी आठवल्यासारखं करत खिशातून एक चिट्ठी काढून उधोजीराजेंना देतात.
बारा - (चिट्ठी देत) डॅड, रस्त्यात देवा अंकल भेटले होते. त्यांनी तुमच्यासाठी ही चिट्ठी दिली होती. तू अजिबात वाचू नकोस, तुझ्या बाल मनावर वाईट परिणाम होईल, डायरेक्ट तुझ्या पप्पांनाच दे म्हणत होते.

उधोजीराजे घाईघाईने चिट्ठी आपल्या हातात घेतात आणि अधीरतेने वाचतात. चिट्ठीत लिहिलेलं असतं -

    आपली आपण करी स्तुती ! स्वदेशी भोगी विपत्ती !
    सांगे वडिलांची कीर्ती ! तो एक मूर्ख !!             - रामदास स्वामी.

 
उधोजीराजे घाईघाईने चिट्ठी चुरगळुन खिशात टाकतात.
बारा - (उत्सुकतेने) डॅड, काय लिहिलं होतं देवा अंकलांनी ?
उरा - तुला नाही कळणार ते. अजून काय सांगत होते तुझे देवा अंकल ?
बारा - अंकल सांगत होते की, 2000 साली एक मूव्ही आली होती, ’ पापा दी ग्रेट ’ ती पाहून ये तुझ्या पप्पांसोबत. असं काय आहे हो पप्पा त्या मूव्हीत ?
बाळराजेंच वाक्य पूर्ण होण्याआधीच उधोजीराजे दिवाणखान्यातून बाहेर पडलेले असतात !
       
- मुकुंद परदेशी,
मुक्त लेखक,
संपर्क -7875077728

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget