देवा शपथ खरं सांगतो, अगदी आता आतापर्यंत म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत आम्ही पार नैराश्यात जगत होतो. सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं तर पार डिप्रेशनमध्ये ( हा शब्द आम्हांला आता आताच समजला. ऍक्ट ऑफ बॉलीवूड ! दुसरं काय ?) गेलो होतो. परत जिया असा बेचैन असतांना कोणतीच रिया जवळ नव्हती , पण देव थोडाफार का होईना दयाळू आहे हो. तो आला आमच्या मदतीला. निर्मला काकूंच्या रूपाने आला. त्यांच्या मुखातून त्याने आमच्या कानात ज्ञानामृत ओतले आणि आमचे डोळे खाडकन उघडले. आमचं नैराश्य कुठल्याकुठे पळालं.त्या ज्ञानामृतामुळे आम्हांला साक्षात्कार झाला की, भलेच आमच्या यशाला आम्हीच जबाबदार असू,( असू म्हणजे काय ? आहोतच आम्ही आमच्या यशाला जबाबदार. तितके बुद्धिमान आहोतच मुळी आम्ही. तितके कर्तृत्ववान आहोतच मुळी आम्ही !) पण आमच्या अपयशाला आम्हीच जबाबदार असू असे काही नाही. आमचे अपयश म्हणजे ऍक्ट ऑफ दुसरेच कोणीतरी असू शकते ! ते दुसरेच कोणीतरी कोण ते फक्त ओळखता आलं पाहिजे !
आता हे दुसरेच कोणीतरी म्हणजे कोणीही असू शकतं ; अगदी आपल्या जन्मदात्या आई- बापांपासून, शाळेतल्या मारकुट्या मास्तरड्यांपासून ते थेट देवापर्यंत कोणीही. आता हेच पहा ना, आम्ही मूलखाचे भित्रे आहोत, धांदरट आहोत, याला जबाबदार कोण ? अर्थातच आमचे आई -बाप ! लहानपणी कधी गल्लीत मारामारी करू दिली नाही, गल्लीतल्या वात्रट, टारगट मुलांसोबत राहू दिलं नाही. राहिलो आम्ही भित्रे ! सारखे सारखे आमच्या अंगावर खेकसत राहिले. आमच्या हातून कपबशी फुटली, खेकस अंगावर. शाळा बुडवून सिनेमाला गेलेलो कळलं, खेकस अंगावर. चार विषयात नापास झालो, खेकस अंगावर. असं नेहमी नेहमी खेकसून पार धांदरट करून टाकला की हो आम्हांला. एकदा तर कमालच केली की हो आमच्या आई-बापांनी, यत्ता सहावीत असतांना, म्हणजे तसे आम्ही चांगलेच जाणते झालेलो असतांना, (प्रति यत्ता दोन वर्षे याप्रमाणे हिशेब करावा.) मित्रांच्या आग्रहाखातर आम्ही धुम्रनळी तोंडात घेतली. आता आयुष्यातला पहिलाच झुरका तो, लागला जोरदार ठसका. जळती धुम्रनळी शर्टावर पडल्यामुळे तो जळाला. झालं ! त्यादिवशी घरी आम्हांला बदड बदड बदडलं. बाळ, तुला फार जोरात ठसका लागला का रे, तुला चटका लागला का रे, काही म्हणजे काही विचारलं नाही. मायेचा एक शब्द नाही. बदडलं मात्र व्यवस्थित. आता शर्ट जळणे हा ऍक्ट ऑफ धुम्रनळी होता, इतकी साधी गोष्ट आमच्या आई- बापांना कळू नये ? त्याची शिक्षा आम्हांला का ? आमच्या आई-बापांच्या अशा विचित्र स्वभावामुळे आम्ही भित्रे झालो, धांदरट झालो. (जिज्ञासूंनी बालमानसशास्त्राचा अभ्यास करावा.) ऍक्ट ऑफ आई-बाप ! दुसरे काय ?
जो प्रकार घरात तोच प्रकार शाळेत. एकजात सगळे मास्तरडे ( या शब्दाचा टीचर्स-डेशी काहीही संबंध नाही.) आमच्यावर टपून बसलेले असायचे. वर्गात चांगले अर्धा शेकडा विद्यार्थी असतांना या सगळ्या मास्तरड्यांचा डोळा मात्र आमच्यावरच असायचा. सगळे जसे महाभारतातले अर्जुनच. त्याला कसा फक्त त्या पक्ष्याचा डोळाच दिसत होता, तसे या मास्तरड्यांना वर्गात फक्त आम्हीच दिसायचो. अक्षर चांगलं नाही, गृहपाठ केला नाही, नापास झालो, सगळ्या विषयांसाठी एकच वही केली, मास्तर शिकवीत असतांना खिडकीतून झाडावरच्या चिमण्यांकडे पाहत होतो अशा किरकोळ कारणांसाठी बदडणारे मास्तर असतांना शिक्षणात मन कसं रमेल ? नाहीच रमलं. यत्ता नववीत असतांना तर कहरच झाला. झाडावरच्या चिमण्या पाहत पाहत आम्हाला शेजारच्या बाकावरची चिमणी आवडू लागली. मन भलतंच तळमळू लागलं. काय करावं काही कळेना. त्यात एके दिवशी मास्तरांनी शिकवलं, ' आळस हा माणसाचा शत्रू आहे.आजचं काम उद्यावर ढकलू नये, आजच करावं. कल करे सो आज कर. आज करे सो अभी कर.' झालं ! गुरू आज्ञा शिरोधार्य मानून आम्ही आमच्या मनीच्या भावना शेजारच्या बाकावरच्या चिमणीला चिट्ठीवर लिहून तात्काळ कळविल्या ! त्या मूर्ख चिमणीने चिट्ठी वाचताच आमच्याकडे एकदाही न पाहता तात्काळ ती मास्तरांना नेऊन दिली ! यात आमचा काय दोष ? चिट्ठी तर आम्ही त्या चिमणीला दिली होती. तिने मूर्खासारखी ती मास्तरांना का द्यावी ? तर या ऍक्ट ऑफ चिमणीमुळे मास्तरांनी भर वर्गातआम्हांला बदड बदड बदडला आणि पुढच्या दहा मिनिटात हेडमास्तरांसमोर आमचं कोर्टमार्शल करून, ' असभ्य वर्तनामुळे शाळेतून काढला.' असं लाल शाईने लिहिलेला दाखला आमच्या हातात कोंबून आमची घरी पाठवणी करण्यात आली. तेव्हापासून आमचा शिक्षणाशी संबंध तुटला तो कायमचाच. ऍक्ट ऑफ बिनडोक, निरस मास्तर ! दुसरे काय ? तरी त्या शाळेत नववीपर्यंत पोहचता पोहचता आम्ही तब्बल अठरा वर्ष घालवली होती, पण इतक्या जुन्या संबंधांची जाणीव काही त्या मास्तर-हेडमास्तरांनी ठेवली नाही. घरी गेल्यावर आमच्या निर्दयी, निष्ठुर आई-बापांनी आमचं काय केलं ते सांगण्यात काही अर्थ नाही. ऍक्ट ऑफ माझं दुर्दैव ! दुसरं काय?
-मुकुंद परदेशी, मुक्त लेखक, संपर्क- ७८७५०७७७२८
Post a Comment