Halloween Costume ideas 2015

नैतिकतेवर आधारित राजकारण्यांची निवड हवी


छत्रपति शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे मावळे घडवले व स्वराज्य निर्माण केले ते असे स्वराज्य होते की ज्यात जाती धर्मापेक्षा महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या कर्तृत्वाला महत्त्व दिले होते. परंतु हल्ली महाराजांना फक्त एका जाती-धर्माचे भासवुन काही लोक आपले राजकीय हेतू साध्य करीत आहे. यावरून या व्यवस्थेतील धर्मवादी व जातीवादी राजकारण्यांची नियत स्पष्ट होते. चिंतेची बाब ही आहे की विकृत इतिहास मांडणार्‍यांचे तर स्वार्थ असतो परंतु आम्ही ते सर्व सत्य मानून त्यांचा स्वीकार करून त्यांचे हेतू साध्य करून देतो. सध्या महापुरुषांचे नाव घेऊन ही मते मिळवली जातात त्यांच्या हेतूला आम्ही ओळखले पाहिजे. त्यांची नेतृत्व करण्याची क्षमता, समाजाविषयी आपुलकी, लोकशाही मुल्यांवर दृढ निष्ठा इत्यादी बाबी त्यांच्या कर्तृत्वात आहेत काय? याचे मुल्यमापन करूनच मतदान केले पाहिजे. राजकारणात बहुतांशी नेते हे शैक्षणिक दृष्ट्या सक्षम नसतात. केवळ पदव्या मिळून तर काही तर नकली पदव्या खर्‍या म्हणून सांगतात. त्यांना देशाचे संविधान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास ,भूगोल याचा ज्यांना अभ्यास नसतो तेच नेते यावर भाषणे ठोकतात.
    काही धर्मांध राजकारणी लोकशाहीचा अवमान सर्रास करतात. त्यांना आम्ही कायदेमंडळात कायदे तयार करण्यासाठी पाठवतो आणि अपेक्षा करतो की ते आमच्या हिताचे कायदे करतील. परंतु ज्यांची मानसिकताच संविधान विरोधी आहे ते भले कसे संविधानाचे रक्षण करते ठरतील? या देशातील संविधान येथील जनतेच्या कल्याणासाठी निर्माण झाले परंतु हल्लीची राजकारणीजमात कल्याणाचे तर सोडा लोकांचे अहित कसे होईल याचाच प्रयत्न करते. कष्टकरी बळीराजा घामातून मोती पिकवतो. परंतु त्याच्या पदरी दारिद्र्याच पड़ते. दुष्काळ ,कर्जबाजारीपणा, व सरकारचे धोरण हे नेहमीच शेतकरी आत्महत्येस कारणीभूत आहे. धर्म-जातीच्या नावावर मते मिळवणारे या शेतकरी राजाला आपल्या जातीचा -आपल्या धर्माचा म्हणून कधी मदत करतात का? त्यांना  फक्त मते मिळवायची असतात. अब्जावधीचा मालक कसा शेतकर्‍यांचे दुःख जाणून घेणार? त्यासाठी शेतकरी  नेतृत्व हवे असते. तो शेतकर्‍यांच्या समस्या जाणू शकतो. ज्याने भोगले, ज्याने पाहिले असा सर्वसामान्यांचा नेता आम्ही निवडून दिला तर त्याला आमची काळजी असेल. बंगल्यात राहून शेतकर्‍यांच्या समस्या त्याला कशा माहीत होतील? महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कार्य अतुलनीय आहे. ते सदैव बळीराजांचा विचार करत असत. तसेच कृषी क्षेत्रात आज आम्ही जी प्रगती पाहतो यासाठी मोठ्या प्रमाणात नाईकांचे योगदान राहिले. त्यांनी पैसा, प्रतिष्ठा  पाहिली नाही, भ्रष्टाचार ही केला नाही सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते राहिले.
    मुख्यमंत्रीपदी असतांनासुद्धा ते सामान्य लोकांत मिसळायचे. त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे. तसेच महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री ज्यानी केंद्रात ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली ते यशवंतराव चव्हाण यांचे चरित्र निःस्वार्थी नेतृत्वाची प्रेरणा देते. असा नेता महाराष्ट्राला लाभला होता हे खूप मोठे आमचे भाग्य आहे. अशी असंख्य नावे आहेत त्यांचे चरित्र हे निष्कलंक होतेच त्याचबरोबर आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी ,कामगार ,गरीब यांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला. देशपातळीवर दुसरे असे नेतृत्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींच्या रूपाने देशाला लाभले होते, हे ही सर्वांना माहित आहे.
    अशी आमची नेतृत्वाची परंपरा खंडित झाली आहे . आज केवळ बोटावर मोजण्याइतके लोक राजकारणात चांगले आहेत. आजचे स्वार्थी नेते आपल्याला माहित नाहीत असे नाही. सर्वांना माहित असते तरी पण आपण त्याना पुन्हा-पुन्हा  निवडून देतो व विवेक बुद्धी गहाण ठेवतो. थोडासाही विचार करावासा वाटत नाही. आपली पिढी बरबाद झाली पण येणारी पिढी ही आम्ही बरबाद करतो. पैशाच्या आमिषाला व भूलथापांना बळी पडून आम्ही घराणेशाही चालवतो. आम्हाला पर्याय नसतो का? पर्याय असतात. नसेल तर समाजातील  योग्य माणसाकडे नेतृत्व देऊन त्याला निवडणुकीत उभे करून निवडून आणण्याचे धाडस आम्ही करीत नाही. प्रत्येकाला आपल्या जातीचा धर्माचा अभिमान असतो व असायलाच हवा पण म्हणून लोकांना आपल्या धर्माचा जातीचा नेता निवडून यावा असे वाटते. आणि निवडूनही आणतात. उद्देश हाच असतो की तो आपल्या जातीचा धर्माचा आहे आपल्या समस्या तो सोडवेल परंतु होते ते अगदी वेगळे . त्याला आम्ही फक्त जातीचा आहे म्हणून निवडून देतो तो जातीच्या लोकांच्या समस्या सोडवतो असे नाही. शेवटी त्याच्या पक्षातील वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी तो वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे वागतो.
    जे नेते समाजातील विषमता दारिद्र्य व समाजाच्या शैक्षणिक अधोगतीला एकुण समाजाच्या अधोगतीला कारणीभूत असलेले भाषण ठोकून समाजात प्रतिमा बनवतात आणि आम्ही त्याला आमचा कैवारी म्हणून निवडून देतो. परंतु, नंतर तो लोकांची निराशा करतो. असेही होते असे मुखोटेधारी पुरोगामी म्हणवून घेणारे गल्लोगल्ली सापडतात .ते धारण करणारे समाजवादी, मार्क्सवादी पुरोगामी  धर्मनिरपेक्ष, म्हणून समाजात ओळख देत असले तरी ते प्रतिगामी असतात. आज काँग्रेसमधील बहुतांश नेते धर्मांधच आहेत जे जाती-धर्माचे राजकारण करून निवडून येतात. त्यामुळे  सेक्युलर आहे म्हणून घेण्याचा अधिकार  इतरां प्रमाणे काँग्रेसने गमावला आहे. राहिला प्रश्‍न स्वतःला मार्क्सवादी पुरोगामी म्हणून घेणार्‍याचां जर ते वर्गसंघर्ष लढ्यात गरीबात हिंदू-मुस्लीम करीत असतील तर ते लोक मार्क्सवादी होऊ शकत नाही. नैतिक मूल्ये जपणारा कॉम्रेड कधी जात धर्म पाहत नाही. परंतु ज्यांच्या मनात धर्मांधता डोक्यात इतर धर्माविषयी द्वेष असतो ते फक्त मुखोटेधारी असतात. त्यांचा व पुरोगामी विचारधारेचा काही संबंध नसतो त्यांच्या तोंडावरील पुरोगामी असल्याचा मुखवटा जेव्हा पडतो तेव्हा त्यांचा विकृत चेहरा दिसतो.
    हे गंभीर प्रश्‍न असताना व समाजाला समाज प्रबोधनाची गरज असताना हे पुरोगामी विचार जोपासणे गरजेचे असताना, जो  व्यक्ति किंवा समुह पुरोगामी  विचार जोपासतो, मग तो कोणी असो त्यास जर प्रबोधन करावे व विषमता कमी करावीशी वाटते,  लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे असे वाटते, तेव्हा तो धर्म जात या आधारावर लोकांची विभागणी करत नाही. तो मानवतावादी दृष्टिकोण ठेवणारा पूरोगामी असतो. मानवतावादी असणे म्हणजे पुरोगामी असणे.
    पुरोगामी विचार करणारे कधी परिणामाची पर्वा करीत नाहीत. गेल्या दहा वर्षात गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश हे पुरोगामी विचाराचे लोक शहीद झाले तरी पण त्यांचा आवाज आजही पुस्तकातून ऐकू येतोच. त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. भारतात पुरोगामी असणार्‍यांना खूप मोठी किंमत या देशात चुकवावी लागते. निरपराध लोक या व्यवस्थेने केवळ विरोधापायी मारले. पुरोगामी समाजवादी विचारांचा बुलंद   आवाज दाबण्याचा प्रयत्न असफल झाला तर अशा लोकांना मारणे योग्य असे जातीयवादी लोकांना वाटते. पुरोगामी म्हणजे सत्यासाठी प्राणार्पण करणारा समाजसेवक. नवविचार रूजवणारा, समाज परिवर्तन करणारा गरीब लोकांची बाजू मांडणारा तो पुरोगामी असतो. परंतु, राजकारणात स्वतःचे स्वार्थ साध्य करण्यासाठी महापुरुषाचे नाव पुढे करून मते मिळविणारे कधीच पुरोगामी नसतात ते प्रतिगामी आहेत. जे पुरोगामी आहेत असे म्हणतात. त्यांनी वास्तविक परिस्थिती वर बोलावे. सध्याच्या विषमतेवर, धर्मांधतेवर व खाजगीकरणावर बोलावे व त्यास जबाबदार कोण? हे पण सांगावे जर हे सांगण्याची हिंमत होत नसेल तर स्वतःला पुरोगामी म्हणून घेण्याचा अधिकार कोणाला नाही आणि त्यांनी ते पुरोगामी असल्याचे लोकांना सांगू ही नये. पुरोगामी विचार हे स्वार्थासाठी नाही आहेत परिवर्तन घडवण्यासाठी आहेत.
    हे समाजाचे नेतृत्व करणारे आमचे नेते जरी आमच्या जातीचे आहेत असे वाटत असले तरी राजकारणात ते धर्मांध असतात. उदाहरणात मुस्लिमांचे ज्यांना हित बघायचे किंवा जो  मुस्लीम हिताचा विचार करतो किंवा हिंदू हिताचा विचार करतो तो बंधुभावाचे धर्मनिरपेक्षतेचे संदेश देईल वाद वाढवुन जातीय तेढ निर्माण करणार नाही. परंतु आज ज्यांना वाद निर्माण करुन वाद वाढवून आपले स्वार्थ साध्य करायचे असते ते आमचे नेते नसतात.  ते अशा गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे एकमेकांच्या धर्मातील जातीतील लोकांच्या उणीवा स्पष्ट होतील.
मुळात राजकारण्यांना राजकारणात धर्म हवा तरी कशासाठी ? त्यांचे आचरण धर्मविरोधी असते. जातीयता वाढवणे हे पण अधर्मच आहे. राजकारणात धर्माचा उपयोग होतच नाही पण स्वार्थ हेतू साध्य करण्यासाठी हे धूर्त राजकारणी आपले विचार लोकांत रूजवतात व एक वोट बँक तयार करतात.
यांच्यात नैतिक मूल्य तर असतच नाही सध्या अनैतिक काम करूनही तो व्यक्ती नैतिक, सज्जन  म्हणून समाजात मिरवला जातो. राजकारणी हे इतके धूर्त असतात की येणार्‍या पिढ्यांचीही ते व्यवस्थेत, राजकारणात व्यवस्था करतात. आपल्यानंतर आपली नंतरची पिढी ही राजकारणात कशी येईल व त्यांना कसे राजकारणात पुढे जाता येईल याचीही व्यवस्था करतात . राजकारणी धडे त्यांना कुटुंबातच मिळतात.
  परंतु गरिबांचे काय ?
कोट्यावधी खर्च करून राजकारणी बंगले बांधतात व आरामात राहतात ही तफावत आज निर्माण झाली आहे. भारतातील वर्गसंघर्ष हे ज्वलंत समस्या आहे. येथील धूर्त राजकारण्यानी आम्हाला कधी या गोष्टींची जाणीव होवू दिली नाही व जरी जाणीव झाली तरी आम्ही निवडणूक काळात त्यांच्यावर विचार करीत नाही.
    आज पर्यंत भारताची प्रतिमा धर्मनिरपेक्ष राष्ट्राची होती आज हा देश धर्म राजकारण यांच्यावरून चालतो हे पण नाकारता येत नाही. धर्मनिरपेक्ष देश धर्मांध लोकांच्या हातात जाऊ द्यायचा नसेल, तर देशातील युवा पिढीला हे राजकारण थांबविण्यासाठी पुढे आले पाहिजे. पण दुर्दैव हे आहे की आमची युवा पिढी या धर्मांधतेच्या आहारी गेली आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षित असून ही  चिकित्सक अभ्यास करण्याचे कौशल्य व विवेकी विचार आत्मसात करणे आजही जमले नाही. आमच्या बहुसंख्य युवापिढीने आज ही  वास्तविकता नाही स्वीकारली व वास्तव परिस्थिति जाणूनही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न आम्ही करीत नाही. राजकारण्यांसाठी आम्ही मानवता विसरतो शिक्षण घेऊन लोक शहाणे होतात असे पूर्वी म्हटले जायचे शिक्षणाने परिवर्तन होईल लोक विवेकवादी ,चिकित्सक विचार करण्यास प्रवृत्त होतील असा समज होता.  परंतु हे आजच्या घडीला सत्य असल्याचे दिसत नाही. जास्त शिक्षण घेणारेच या धर्मांधतेच्या राजकारणाला बळी पडले आहेत.
    आम्ही लोकशाहीवादी राष्ट्रात राहतो व  संविधानावर देश चालतो लोकप्रतिनिधींना निवडून देऊन आम्ही संसदेत पाठवतो हे खासदार आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व देशपातळीवर करतात.जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी खासदारावर असते .परंतु वास्तविक योग्य व्यक्तीला आम्ही निवडून देत नाही एक भ्रष्टाचारी धर्मांध नेत्याला खासदार बनवतो व जिल्ह्याचा विकास होईल असे वाटते लोकसभा निवडणुकीबाबत सामान्यांची गफलत होते त्यांना वाटते आम्ही जे मतदान करतो  यातून प्रधानमंत्री निवडतो परंतु असे नसते आम्ही फक्त खासदार निवडून देतो. आम्हाला फक्त खासदार निवडण्याचा अधिकार असतो तेव्हा देशपातलीवरील नेत्यांचा विचार न करता जिल्ह्याचा विचार करावा कारण आम्ही ज्याला निवडून देतो तो जिल्ह्याचे प्रतिनिधित्व संसदेत करतो. तो निष्कलंक असला पाहिजे व त्याने विकास कामे केली पाहिजे. असे निस्वार्थी खासदार निवडून देणे ही काळाची गरज आहे.

- नजीर महेबूब शेख  
9561991736Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget