Halloween Costume ideas 2015

पुनश्च धमकी!


रात्रीचा समय आहे. राजा बुद्धिगुप्त आपल्या महालातल्या मंचकावर पहुडले आहेत. सकाळपासून पंधरा पंधरा मिनिटांच्या तीन व्ही सी करून त्यांना प्रचंड थकवा आला आहे. चोवीस तासातला तब्बल पाऊण तास आपण राज्यासाठी दिल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे. त्या समाधानात राजे डोळे मिटून पडले असतांनाच मोबाईलची बेल वाजते. राजे सहसा कोणाचा फोन उचलत नसतात, पण त्या स्वांतसुखाय अवस्थेत अनावधानाने त्यांच्याकडून फोन उचलला जातो.
राजा बुद्धिगुप्त (डोळे मिटलेल्या अवस्थेत) - हॅलो, कोण बोलतंय ?
दुबईचा भाई - दुबई से भाई बोलता भिडू.
राजा बुद्धिगुप्त - अरे, ही काय चेष्टा करण्याची वेळ आहे का ? तू तर शिवाजी नगरला राहतोस ना, तिकडे दुबईला काय शॉपिंगला गेलास की काय ?
दुबईचा भाई - मजाक मत कर भिडू. हम दुबईवाला भाई बोल रयला है. वो तेरा शिवाजीनगरवाला भाई नही.
राजा बुद्धिगुप्त - बरं. बरं. तुम्ही जे कोणी असाल ते असाल, पण जरा मातृभाषेत बोला आणि असं एकेरीत काय बोलता, राजे आहोत आम्ही इथले. जरा मानपान देत चला.काही संस्कार वगैरे केलेत की नाही आई-बापांनी ? तुम्ही काय टी व्ही अँकर आहात की सिनेमातली नटी आहात ?
दुबईचा भाई - भिडू, मातृभाषा बोले तो यईच तो आपुन की मातृभाषा है. एक बात पुछु ? तुम्हारा बेटा मातृभाषा में पढा क्या ? और माफ करना भिडू, वो क्या है ना के आजकल सब तुमरेकू ऐसाची बोलते ना, तो आपुन भी बोल गया.
राजा बुद्धिगुप्त - बरं. बरं. आता तुमचं काय जे काम असेल ते आमच्या प्रवक्त्याला सांगा. मी असा फोन उचलत नसतो कोणाचा. आज चुकून उचलला गेला. हवं तर त्या बिहारी नागपूरकरांना विचारा.
दुबईचा भाई - प्रवक्ता ? ये क्या होता है ?
राजा बुद्धिगुप्त - प्रवक्ता माहीत नाही तुम्हांला ? अरे, प्रवक्ता म्हणजे जो आमचे निरोप दुसऱ्यांपर्यंत पोहचवतो, आमच्या वतीने बोलतो, आमच्यासाठी कोणाच्याही अंगावर धावून जातो, कोणालाही अंगावर घेतो, आमच्यावतीने सेटलमेंट करतो, तो.
दुबईचा भाई - अच्छा. अच्छा. बोले तो पंटर. हम लोग ऐसे आदमी को पंटर बोलते है.पर हम तुम्हारे पंटर से क्यू बात करे ? हम को तो तुमको धमकी देनी है.
राजा बुद्धिगुप्त - अरे, वेडा की खुळा तू ? आता तर मागच्या आठवड्यात धमकी दिली होतीस ना ? अशी परत परत काय धमकी देतोस, असं करायला तू नागपूरकर आहेस का रे ? आणि हे बघ तू मागच्या वेळेस धमकी दिलीस ना, तेंव्हाच आमच्या मोठ्या साहेबांनी सांगितलं होतं की त्यांनाही अशा धमक्या येत असतात,पण ते घाबरत नाही कधी.
दुबईचा भाई - राजा बुद्धिगुप्त, भाई की बातोंको मजाक में मत लेना. हम तुम्हारा राजमहल बमसे उडा देनेवाले है.
राजा बुद्धिगुप्त - अरे, जोपर्यंत माझे तुंबई पोलीस आहेत ना, तोपर्यंत तू माझं काहीच बिघडवू शकत नाहीस . माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या तुंबई पोलिसांवर. हवं तर त्या नटमोगरी अंगणाला विचार. किती लोकांनी तिला धमक्या दिल्या होत्या तुंबईला येऊ नकोस म्हणून, तिचं थोबाड फोडणार होते, शिवाय ती माझ्या तुंबई पोलिसांवर खारसुद्धा खात होती ; तरीसुध्दा त्यांनी तिला खारपर्यंत सुखरूप पोहचवली !
दुबईचा भाई - तुमको सचमुच डर नही लगता ?
राजा बुद्धिगुप्त - अरे, मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे. मी तर म्हणीन की, मी असा लढाऊ असणार होतो म्हणूनच आमचे पिताश्री लढाऊ होते ! तुला मी अजिबात घाबरत नाही. नाहीच घाबरत मुळी. आणि घाबरणार तरी कसा तुला ? तू दुबईला राहतोस ना, दिल्लीला नाही ना राहत ?
तिकडून फोन कट केला जातो.

- मुकुंद परदेशी,
मुक्त लेखक,
संपर्क -७८७५०७७७२८


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget