अल्लाहच्या या पृथ्वीवर अल्लाहद्वारा निर्मित प्रत्येक माणसाला मुक्तपणे कुठेही संचार करण्याचा अधिकार या कृत्रिम राष्ट्रवादाने हिरावून घेतलेला आहे.
राष्ट्रवादाची भावना जरी एक महान भावना असली तरी त्या भावनेच्या वाजवीपेक्षा जास्त आहारी गेल्यास त्यातून समाजामध्ये संकुचितपणाची भावना वृद्धींगत होते व हा संकुचितपणा आपल्याच देशाच्या नागरिकांना एकमेकाचे वैरी बनविण्यापर्यंत जावून पोहोचतो. राष्ट्रवादाच्या अतिरेकाचा परिणाम म्हणून माणसं प्रादेशिकवाद, भाषावाद आणि इतर संकुचित विचारांच्या आधीन जातात. विदेशात दोन भारतीय भेटल्यावर आपण एका देशाचे ही भावना प्रबळ असते. पण देशपातळीवर अनेक वेळा अनेक क्षेत्रांमध्ये प्रादेशिक वादाचा प्रादुर्भाव जाणवतो. कावेरी जलविवादामध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू तर बेळगाव सीमाविवादामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोक एकमेकांचे हाडवैरी असल्यासारखे वागतांना दिसून येतात. या ठिकाणी राष्ट्रीय भावना काम करतांना दिसत नाही. अनेकवेळा मी अमुक राज्याचा, अमूक विभागाचा, अमूक जिल्ह्याचा, अमूक जातीचा, मी अमुक भाषा बोलणारा इथपर्यंत राष्ट्रवादाचे स्खलन होत जाते. हाच राष्ट्रवाद इतर राष्ट्रांच्या चांगल्या गोष्टींचा द्वेष करावयाचा शिकवितो. एवढेच नाही तर आपल्याच वेेगवेगळ्या प्रांतातील लोकांना वेगवेगळ्या कारणाने आपसात वैरी बनवितो.
आजकाल बॉलीवुडच्या भाई-भतीजा वादावर मुखरपणे बोलणार्या अभिनेत्यांपैकी अभिनेत्री कंगना रानावत ही ठळकपणे प्रकाशझोतात आलेली आहे. दोन आठवड्यापूर्वी तीने ’मुंबईत आपल्याला पाकव्याप्त कश्मीर सारखी परिस्थिती वाटत आहे’ असे वक्तव्य केले. पुढे तीने असेही म्हटलेले आहे की, तिला मुंबई पोलिसांची भीती वाटते. वास्तविक पाहता तिचे हे वक्तव्य राष्ट्रविरोधी या श्रेणीत मोडणारे असतांनासुद्धा भाजपच्या पाठीराख्यांनी तिची पाठराखण केली एवढेच नाही तर केंद्र सरकारने तिला वाय+ची दर्जाची सुरक्षा पुरवून आपल्याला न आवडणार्या राज्य सरकारांविरूद्ध आपण कुठल्याही स्तरापर्यंत जावू शकतो देशाला याची प्रचिती करून दिली.
वाचकांना आठवत असेल अभिनेता आमीर खान याने एका बक्षीस समारंभामध्ये म्हटले होते की, त्याची पत्नी किरण राव हिला देशातील जातीय परिस्थितीची भीती वाटत असून, मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने दुसर्या देशात जावून रहावेसे वाटते. यावर केवढा गहजब झाला होता. हिंदुत्ववाद्यांनी आमीरखानला राष्ट्रद्रोही ठरवून टाकले होते. अलिकडे छद्म राष्ट्रवाद मोठ्या प्रमाणात वाढला असून, एकाच प्रकारच्या वक्तव्याचे सोयीने दोन अर्थ काढले जात आहेत. एकच वाक्य कोण बोलतंय यावर त्याचा अर्थ अवलंबून आहे. कंगनाच्या या वक्तव्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला असून, कंगनानेही मी मुंबईत येतेय कोणाच्या बापामध्ये दम असेल त्यांनी अडवून दाखवावे, असे प्रती वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्र सरकारनेही कंगणाच्या प्रकरणाला संजय राउत विरूद्ध कंगना रानावत एवढे पुरते मर्यादित न ठेवता या प्रकरणाला व्यापक स्वरूप दिले. इतके की, पालेहील मध्ये तिच्या कोट्यावधी मुल्याच्या मनकर्णीका फिल्म्सच्या कार्यालयावर बुलडोझर चालविला. या छोट्याशा वाटणार्या घटनेच्या रोपट्यामधून राज्य सरकार विरूद्ध केंद्र सरकार असे वटवृक्ष होण्याची क्षमता आहे याची दोन्ही सरकारांनी दखल घेतलेली नाही. मुळात कंगनाच्या अशा वक्तव्यावरून राष्ट्रवादाची भावना या लोकांनी किती खालच्या स्तरावर नेऊन ठेवली आहे, याचे दुःख वाटते. कोरोनाचे रूग्ण 37 लाखाच्या पुढे गेले असून, चीन दारासमोर येऊन उभा आहे. अशावेळी देशात एकोप्याची गरज असताना असे मतभेद चांगले नाहीत.
म्हणूनच इस्लामने विश्व बंधुत्वाचा संदेश देऊन संकुचित राष्ट्रवादाच्या भावनेपासून मानवतेला मुक्त केलेले आहे. अल्लाहच्या या पृथ्वीवर अल्लाहद्वारा निर्मित प्रत्येक माणसाला मुक्तपणे कुठेही संचार करण्याचा अधिकार या कृत्रिम राष्ट्रवादाने हिरावून घेतलेला आहे. कुरआनमध्ये जागोजागी विश्वबंधुत्वाचा संदेश देण्यात आलेला आहे. या ठिकाणी फक्त एक आयात संदर्भादाखल देण्यात येत आहे. “लोकहो! आम्ही तुम्हाला एका पुरूष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.” (सुरह अलहुजरात आयत नं. 13)
संकुचित विचारापासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग इस्लाम आहे. ज्यात काळा-गोरा, उच्च-नीच, गुलाम-मालक, श्रीमंत आणि गरीब असा कुठलाच भेद मान्य नाही. म्हणूनच जागतिक मुस्लिम समाजामध्ये विश्वबंधुत्वाची भावना प्रचूर मात्रेमध्ये आढळून येते. यातूनच भारतीय मुस्लिम समाज आपापल्या गावी पायी जाणार्या मजुरांची निःस्वार्थपणे सेवा करतो. यातूनच कोविडने मृत्यू पावलल्या सर्वधर्मीयांच्या दफनविधीसाठी पुढाकार घेतो. जगाला आज ना उद्या इस्लामचा हा उदात्त विचार मान्यच करावा लागेल. फक्त प्रश्न एवढाच शिल्लक आहे की, कोण किती हानी सहन करून हा विचार स्विकारतो.
Post a Comment