Halloween Costume ideas 2015

अशफाक अहेमद : डेरेदार वृक्षाची सावली हरवली

अशफाक अहेमद साहेबांबद्दल माझी अशी धारणा आहे की, त्यांच्या जाण्याने माझ्यासहीत अनेक लोकांना एका डेरेदार वृक्षाची सावली हरवल्याचा अनुभव येत आहे. मी 9 वर्षाचा असतांना अकोल्यामध्ये त्यांना पहिल्यांदा ऐकलं होतं. त्यावेळेस बोलतांना त्यांनी कुरआनची एक आयत ’खदअफलाहा मन जक्काहा व मनखाबा मनदस्साहा’ (यशस्वी झाला तो ज्याने अंत:करणाची शुद्धी केली आणि अयशस्वी झाला तो ज्याने त्याला दाबून टाकले.) वाचून त्याचा अर्थ समजावून सांगितला होता. तेव्हापासून मी त्यांच्यापासून प्रभावित झालो होतो. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट माझ्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची ठरली. ते उच्चविद्याविभूषित होते. त्यांना अनेक ठिकाणी मुख्याध्यापक आणि प्राचार्य म्हणून मोठ्या पगाराची नोकरी करता आली असती परंतु, अतिशय कमी मानधनावर त्यांनी आपले आयुष्य जमाअते इस्लामीच्या शिक्षण विभागामार्फत समाजासाठी वाहिले. माझ्या दृष्टीने त्यांचा हा त्याग त्यांनी समाजासाठी दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. ते एक फार मोठे स्कॉलर होते. केंद्र सरकारच्या अभ्यास क्रमामध्ये इस्लामविषयी काही त्रुटीपूर्ण किंवा चुकीचा उल्लेख कुठल्या पुस्तकामध्ये अज्ञानामुळे करण्यात आला असेल अशा प्रत्येकवेळेस त्यांनी त्या त्रुटीला दूर करण्यासाठी सरकारशी संपर्क साधलेला होता आणि सरकारनेही त्यांच्या म्हणण्याला महत्व देवून अभ्यासक्रमामध्ये संबंधित ठिकाणी दुरूस्त्या केलेल्या होत्या. दिल्ली विद्यापीठामध्ये त्यांचे शिक्षणशास्त्रावर अनेक लेक्चर्स होत असत. ते एसआयओचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या देखरेखीखाली देशातील शेकडो शाळा आणि महाविद्यालयात शिकविले जाणारे अभ्यासक्रम दुरूस्त करण्यात आले होते. हजारो शिक्षकांची  फळी त्यांनी आपल्या देखरेखीखाली तयार केलेली आहे जी देशभर कार्य करत आहे.  देशभरात चालणाऱ्या दीनी मक्तबसाठी त्यांनी अभ्यासक्रम तयार केला होता व तोच आज अनेक मक्तबमधून देशभर शिकविला जातो. दारूल उलूममधील शिक्षकांना त्यांनी मदरश्यामध्ये कसे शिकवावे (टेक्निक ऑफ एज्युकेशन) यावर मार्गदर्शन केलेले होते. औरंगाबादमध्ये त्यांनी अल-हिरा नावाने फार मोठी शिक्षणसंस्था उभी केली. ही संस्था म्हणजे एक शैक्षणिक चळवळ आहे. त्यांनी देशभरातील अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी एक पद्धत विकसित केली होती. त्यासाठी त्यांनी चार्टस् तयार केले होते. त्या चार्टस्मधून सहजपणे लक्षात येत होते की, कोणत्या शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्या गोष्टींची उणीव आहे व कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत. एका दृष्टीक्षेपातच शैक्षणिक संस्थेचा दर्जा लक्षात येऊन त्याला ग्रेड देता येणे शक्य होते. 50 पेक्षा अधिक पुस्तकांमध्ये त्यांनी सुधारणा घडवून आणल्या.
    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या एस.टी. कॉलनीमध्ये त्यांचे घर आहे. याच घरामध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला.  त्यांची कधीही नमाज कजा होत नव्हती. फजरमध्ये ते सर्वात अगोदर यायचे. शेवट्या दिवशी ही ते सर्वात अगोदर आले होते आणि नमाज झाल्यानंतरही उशीरापर्यंत एकांतात अल्लाहच्या हुजूरमध्ये शांतपणे बसून होते. त्यांची नमाजे जनाजा औरंगाबादच्या जामा मस्जिदमध्ये जी की देशातील मोठ्या मस्जिदींपैकी एक मस्जीद आहे अदा करण्यात आली व  काली मस्जिद कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर दफनविधी पार पडला. त्यांच्या जनाजामध्ये सर्वस्तरातील मोठ्या प्रमाणात लोक सामील होते. औरंगाबादमध्ये आतापर्यंत मी पाहिलेल्या जनाज्यांपैकी हा एक मोठा जनाजा होता. विशेषमध्ये म्हणजे त्यात इस्लामच्या प्रत्येक शाखेतील लोक सामील होते.
 
- मौलाना इलियास फलाही
शहर संघटक जमाअते इस्लामी हिंद, औरंगाबाद
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget