Halloween Costume ideas 2015

जन्नतची हमी : प्रेषितवाणी (हदीस)

आदरणीय सहल बिन साद (रजि.) उल्लेख करतात की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘जो कोणी मला दोन जबड्यांमधील अवयव (जीभ) आणि दोन टांगांमधील अवयव  (जननेंद्रिय) या दोहोंची जमानत देईल तर मी त्याला जन्नतची हमी (गॅरंटी) देतो.’’ (बुखारी)

निरुपण
चारित्र्य सावरण्यासाठी माणसाचे जिव्हेवर नियंत्रण असणे अपरिहार्य आहे. जिभेवर नियंत्रण नसलेला माणूस चारित्र्यसंपन्न असू शकत नाही. खोटारडे बोलणे, लावालावी करणे, खोटी  आश्वासने देणे, मगरुरीने बोलणे, शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे इ. सर्व जिव्हेवर नियंत्रण नसल्याची लक्षणे आहेत. कुरआनात आहे, ‘‘हे ईमानधारकांनो, सत्य तेच बोला आणि मोजूनमापून शब्द वापरा.’’
न्यायनिवाड्याच्या दिवशी प्रत्येक माणसाला जिभेविषयीदेखील जाब द्यावा लागेल. निर्मिकाने माणसाला मुळात बोलण्याची क्षमता दिली ती सत्य बोलण्यासाठी आणि सत्याच्याच  प्रचारासाठी. न्यायनिवाड्याच्या दिवशी बहुतांशी लोकांना नरकाग्नीची कठोर सजा सुनावली जाईल ती जिव्हेच्या वाईट वापरामुळे. जिव्हेवर नियंत्रण जरी अवघड असले तरी सातत्याने  प्रयत्न केल्यास ते अशक्य नाही.
चारित्र्यसंपन्न माणूस जिव्हेविषयी सदैव जागृत असतो. तो मितभाषी असतो. जिव्हेनंतर उपरोक्त हदीसमध्ये पैगंबरांनी जनेनेंद्रियाचा उल्लेख केला आहे. कुरआनात आहे, ‘‘व्यभिचाराच्या जवळपासही फिरकू नका.’’
कामवासनेवर नियंत्रण खूप खूप महत्त्वाचे आहे. कामवासनेच्या परिपूर्तीसाठी केवळ एकच मार्ग अल्लाहने वैध ठरवला आहे आणि तो आहे विवाह! विवाहबाह्य संबंध इस्लामला  अजिबात मान्य नाही. तो व्यभिचारच आहे आणि कुरआनचा सार असा आहे की व्यभिचारी माणूस कदापि जन्नतमध्ये जाणार नाही. इस्लामी कायदेशास्त्राप्रमाणे व्यभिचाऱ्याला
जगातही दगडांनी ठेचून मारण्याची कठोर शिक्षा प्रयुक्त केली आहे, तीसुद्धा समाजादेखत! वरवर ही शिक्षा कठोर वाटत असली तरी एक-दोन व्यभिचाऱ्यांनादेखील ही शिक्षा समाजादेखत  दिली गेली तर परिणामस्वरूप हजारो-लाखो भगिनींची इज्जत-अब्रू सुरक्षित होईल आणि माणसे स्वप्नातदेखील व्यभिचार करण्याचा विचारही करणार नाहीत. जिव्हेवर आणि  कामवासनेवर संपूर्णत: नियंत्रण असलेल्या माणसाचे उर्वरित जीवनही साहजिकच अत्यंत इमानी व उदात्त असेल. अशा माणसाला पैगंबरांनी याच जीवनात मरणोत्तर जीवनात जन्नत  (स्वर्ग) प्रदान करण्याचीजमानत, हमी, गॅरंटी दिली आहे.

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget