Halloween Costume ideas 2015

विकासाच्या उंबरठ्यावरील समाज

पुढची वाटचाल करण्याच्या प्रक्रियेस लोकशाही आणि विकासाचे मानक म्हटले जाते. ही धारणा खरे तर अमेरिकन प्रसिद्ध लेखक होरेटिओ अल्जर यांच्या नैतिक मिथकांपैकी एक आहे.  त्यांच्या मते कोणत्याही सामाजिक-आर्थिक वातावरणात एखादा युवक अथक परिश्रम व अल्पशा नशिबाच्या बळावर श्रीमंत बनू शकतो. इतकेच नव्हे तर बेंजामिन फ्रॅंकलिन यांचे विचारदेखील समाजाचा स्तर वाढविण्यास सूचक ठरतात. पूर्वी कथा-कहाण्यांद्वारे प्रगतीच्या गोष्टी सांगितल्या जात असत. मात्र आता ती नियम व सिद्धान्तांवर आधारलेली परेड आहे.  सुखद बदलाचे प्रामाणिक मानक कोणते आहे? यावर सध्या तीव्र गतीने कार्य सुरू आहे. दरम्यान, सॅम आशेर (जागतिक बँक), पॉल नोवोसाद (डार्टमाउथ कॉलेज) आणि चार्ली राफकिन  (एमआयटी) यांनी ‘इंटर जनरेशनल मोबिलिटी इन इंडिया’ नामक एक सर्वेक्षण केले आहे. याद्वारे प्रगती म्हणजेच पुढे जाण्यासंदर्भात एक नवीन प्रकाशकिरण आढळून येतो. दोन  पिढ्यांच्या दरम्यान घडून येणाऱ्या प्रगतीवर हे सर्वेक्षण आधारित आहे आणि याचा निष्कर्ष गंभीर चर्चेची मागणी करतो.
वास्तविक पाहता या सर्वेक्षणात राजकीय अर्थदेखील शोधले जाऊ शकतात. हे सर्वेक्षण उत्पन्नावर नव्हे तर शैक्षणिक प्रगतीवर करण्यात आले आहे. याच्या तीन निष्कर्षांवर निश्चितपणे  चर्चा व्हायला हवी. पहिला निष्कर्ष- मुस्लिम आणि अनुसूचित जाती/जमातींना जर एकूण लोकसंख्येतून वेगळे केले गेले तर उर्वरित लोकांच्या वाढत्या सामाजिक स्तराची तुलना  आनंदाने अमेरिकेशी केली जाऊ शकते. दुसरा निष्कर्ष- अनुसूचित जाती/जमातींचा सामाजिक स्तरात उल्लेखनीय स्वरूपात प्रगती झाली आहे. यात जवळपास जे काही बदल घडले  आहेत ते सर्व राजकीय आंदोलनाची उपज आहे. मात्र उच्चवर्गावर याचा काहीही प्रभाव पडलेला नाही, कारण त्याने सकारात्मक आंदोलनाचा विरोध केला. परंतु या सर्वेक्षणाचा तिसरा  निष्कर्ष अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. यात म्हटले आहे की मुस्लिमांमध्ये अंतरपिढीतील बदल नगण्य स्वरूपाचा आहे. म्हणजे मुस्लिमांच्या दोन पिढ्यांच्या दरम्यान झालेली प्रगती अत्यल्प आहे. यावरून हे स्पष्ट होते की निवडणुकीत लाभ उठविण्यासाठी लोकशाहीने अन्य मागासवर्ग आणि अनुसूचित जाती/जमातींसाठी केलेल्या कार्यापेक्षा मुस्लिमांच्या हितासाठी  केलेले कार्य नगण्य आहे. उदारीकरण आणि लोकशाहीद्वारे मुस्लिमांना विशेष काही लाभलेले नाही. शैक्षणिक क्षेत्रात झालेली प्रगती उत्पन्नात झालेल्या प्रगतीच्या तुलनेत उत्तम प्रकारे  मोजली जाऊ शकते.
सद्य:स्थितीतील आकडेवारीनुसार ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडले आहेत. शहरे आणि गावांच्या दरम्यान असलेला फरक उच्च जाती  आणि अनुसूचित जातींच्या दरम्यान असलेल्या फरकाइतकाच आहे. इतकेच नव्हे तर दक्षिणेच्या तुलनेत उत्तरेत हा फरक अधिक आढळून येतो. या अध्ययनाद्वारे स्पष्ट होते की  ऐतिहासिक आणि राजकीय स्वरूपात मुस्लिम समुदाय आजदेखील अस्तित्वहीन आहे. समुदायाच्या सभोवताली उभारण्यात आलेली राजकीय आंदोलने स्पष्टपणे मुस्लिमांच्या विरूद्ध कार्यरत आहेत. यांत उघडपणे भेदभाव केला जातो. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याशी संबंधित सध्याच्या शासनाची नीतीधोरणे एक प्रकारे धार्मिक अल्पसंख्यकांसाठी अलाभकारी सिद्ध  होतात. अंतरपिढीच्या भावनेसंदर्भात पाहिले तर मुस्लिमांची स्थिती फारशी चांगली नाही. यावरून मुस्लिमांच्या शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याची नीती आणि त्यास  राजकीय अर्थव्यवस्थेशी जोडण्याची नीती, दोन्हींचा अभाव असल्याचे स्पष्ट होते. या विचारसरणीच्या रूपात लोकशाही मुस्लिमांच्या बाबतीत अपयशी सिद्ध होते. अशा तुच्छ  विचारसरणीच्या लोकशाहीवरील आघातामुळे देशात धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे.
ज्या  लोकशाही व्यवस्थेमध्ये बहुमताने निर्णय घेतला जातो, जेथे अधिकारांचे विभाजन, स्वतंत्र न्यायपालिका, कायद्याचे राज्य आणि निष्पक्ष मीडियाचा अभाव असे तेथे अल्पसंख्यकांच्या समस्यांमध्ये वाढ होत असते. ही स्थिती बहुसंख्यकांच्या हुकूमशाहीकडे वाटचाल करते. ‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली’मध्ये प्रकाशित झालेल्या एका  सर्वेक्षणानुसार धरणग्रस्त लोकांच्या विस्थापनापेक्षा अधिक विस्थापन दंगलपीडितांचे होत असते. विशेषत: गुजरात दंगलींच्या अध्ययनावरून आढळून येते की धरणग्रस्त विस्थापित पुन्हा  परत येतात मात्र दंगलग्रस्त विस्थापित परतत नाहीत. हिंसा पीडितांच्या फक्त आशाआकांक्षांवरच घाला घालत नाही तर त्यांना आर्थिकदृष्ट्यादेखील दुर्बल करते, आणि हीच प्रगतीची  महत्त्वाची अट आहे. या हिंसेविरूद्ध कार्य करण्याबरोबरच उत्तम सामाजिक नीतीधोरणे आखण्याचीदेखील अत्यंत आवश्यकता आहे. मुस्लिम समुदायाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून  कोणतीही परिणामकारक योजना या सर्वेक्षण करणाऱ्या गटाला आढळून आली नाही. या मुद्द्यावर सामाजिक विश्लेषकांनी गांभीर्याने चर्चा करण्याची गरज आहे. सध्या भारतीय मुस्लिम  समुदाय विकासाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे आढळून येतो. द्वेषपूर्ण वातावरणामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु हे वातावरण बदलण्यासाठी मुख्य प्रवाहातील  सध्याच्या राजकारणात फार मोठ्या बदलाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य भारतीय नागरिकांची मानसिक स्थितीतदेखील बदलण्याची अत्यंत गरज आहे. मुस्लिम समाज  फक्त गत काळातील भारताचे प्रतीकच नव्हे तर लोकतांत्रिक भविष्यासाठीदेखील त्याची आवश्यकता आहे.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget