Halloween Costume ideas 2015

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या विचार अन् कृती अमलात आणण्याची गरज

पैगंबर मुहम्मद (स.) यांची विविधांगी रूपे जगासमोर आली आहेत. गोरगरिबांचे कैवारी, शूरवीर योद्धे, सेनापती, हुशार व्यापारी, तत्त्वज्ञान व उपदेशाचे सागर, लोकहिताय राजनीतिज्ञ,  तसेच अनाथ, दीनदलितांचे व गुलामांचे कैवारी, स्त्री-जातीचे उद्धारक, न्यायप्रिय, आजीवन मानवतेचे व मानवांच्या कल्याणातच जीवनाचे ध्येय रुजविणारे अशी त्यांची विविध रूपे आहेत.  त्यांचे कार्यक्षेत्र अफाट होते. अंधारमय जगाला आकाशात ध्रूवाप्रमाणे चमकणारा तारा बनून अवतरले होते. पैगंबरांची श्रेष्ठ सामाजिक सुधारणा म्हणजे शिक्षणप्रसार होय. मानवास सुसंस्कृत बनविणयाचे सामर्थ्य फक्त शिक्षणात आहे, हे त्यांनी ओळखले होते. पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘ज्ञान संपादन करा. कारण नीती व अनीती, न्याय व अन्याय, पाप व  पुण्य यामधील फरक ज्ञानामुळे कळतो. शिक्षण घेणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.’’ त्यांनी मदीना शहरात पहिले विद्यापीठ ‘अल सुफ्फा’ या नावाने सुरू केले. तो चबुतरा आजही  मदीना शहरातील मस्जिद-ए-नबवी अर्थात पैगंबरांची मस्जिद म्हणून प्रसिद्ध आहे. ते स्त्रीजातीचे उद्धारक होते. त्यांचा स्त्रीभ्रूण हत्येला विरोध होता. अशा विघातक प्रवृत्ती पैगंबरांनी समाजप्रबोधन करून बंद केल्या. पैगंबरांनी पुरुषाइतकेच हक्क स्त्रीला दिले होते. ते म्हणतात, आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. आईवडिलांशी सद्व्यवहार करा, असा त्यांनी सर्व मानवजातीला उपदेश दिला आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांचा संदेश अखिल मानवजातीसाठी आहे. वर्ण, वंश, भाषा, उच्चनीच, गरीब, श्रीमंत, काळा, गोरा अशा सर्व प्रकारच्या  भेदभावांना मूठमाती देऊन प्रत्येकाला एका मानवाच्या रूपात संबोधित करतात. अखिल मानवजात एक आहे आणि सर्वांचे ईश्वर एकच आहे. अल्लाहजवळ सर्व समान आहेत. मानवांत  हीच खरी इस्लामची जीवपद्धती आहे. मानवांची सेवा हीच अल्लाहची सर्वश्रेष्ठ सेवा होय, असे जो मान्य करेल तो विश्वव्यापी मुस्लिम समुदायाचा घटक आहे. मग तो कोणत्याही पंथाचा किंवा जातीचा असो.
पैगंबरांनी समता व बंधुता या तत्त्वांना अनुसरून आचरण करण्याची शिकवण दिली. सद्वर्तन ही अल्लाहची उपासना होय, असे त्याचे विचार होते. बंधुत्वाचे हे नाते समतेपेक्षाही अधिक एकमेकांशी जवळीक निर्माण करणारे आहे आणि हे नाते पैगंबरांनी केवळ मुस्लिमांपुरतेच मर्यादित ठेवले नाही. जर कुणाचा शेजारी उपाशी असेल तर असा मानव मुस्लिम होऊच शकत नाही. मग तो शेजारी कोणत्याही जातीधर्माचा का असेना. प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याची चिंता करावी. म्हणजे एखाद्या वस्तीतली सारी माणसं एकमेकांचे शेजारी आणि त्या वस्तीला लागून दुसऱ्या वस्तीचे लोक त्या वस्तीचे शेजारी होतील. याचा विस्तार होत एका राष्ट्राचे सारे नागरिक आणि राष्ट्राला लागून असलेल्या राष्ट्राचे सारे नागरिक एकमेकांचे शेजारी होतील. लोकांशी चांगलं बोलणं, त्यांना क्षमा करणं, कुणास पाहताना स्मितहास्य करणं, आपल्यापासून दुसऱ्याला नुकसान होईल असे वर्तन न करणं, रस्त्यातून त्रासदायक वस्तू बाजूला सारणं  अशी परोपकारी कामं म्हणजे ईश्वराच्या (अल्लाहच्या) उपासना आहेत. आपसातल्या संबंधांमध्ये आपुलकीचा व्यवहार करणं, विधवा स्त्रीची मदत करणं, गोरगरीब, गरजू, वंचित,  पीडितांच्या हक्कासाठी झटणं हीदेखील अल्लाहची उपासनाच आहे. एवढंच नव्हे तर एकदा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, आपसातले संबंध जोपासणं ही श्रेष्ठ उपासना आहे.’’
समता व बंधुता या दोन वैश्विक तत्त्वांवर आधारलेली सद्वर्तन आचरणाची इस्लामची जीवनपद्धत पैगंबरांनी आपल्या वचनांतून अनेक ठिकाणी जाहीर केलेली आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, दुसऱ्याच्या अंत:करणात प्रेम निर्माण होईल अशा तऱ्हेने आचरण ठेवा. तुमचा कट्टर शत्रू असला तरीही त्याच्याशी प्रेमाने वागा. तुमच्या हृदयात द्वेषबुद्धीस थारा देऊ नका. अत्यंत सोप्या व साध्या पद्धतीने जीवन जगणं, लग्न कार्य करणं, गाजावाजाला प्रतिबंध पैगंबरांनी घातले आहेत. सावकारी, लाचखोरी, व्यसनाधिनता,  व्यभिचार, वेश्याव्यवसाय या सर्व बाबींस पैगंबरांनी मनाई केली आहे.
समाजातील धर्मगुरू, राजकीय नेते, हाजी लोक यांना एकत्र येऊन पैगंबर मुहम्मद (स.) यांचे विचार आणि आचार तळागाळातील सर्व मानवांपर्यंत पोहचविणे ही आजच्या काळाची गरज  आहे.

-जमीर मौला नरदेकर
कसबे डिग्रज, सांगली.
९६२३२७३६४१
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget