Halloween Costume ideas 2015

इक्बालांचे चिंतन

विवेकानंद, सर सय्यद, रविंद्रनाथ टागोर, शिबली नोमानी, अरविंद घोष, मौलाना आझाद हे आधुनिक भारतातील काही धर्मचिंतक आहेत. या पूर्वकालीन आणि समकालीन दार्शनिकांत इक्बालांनी ते ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्या समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे. शाह वलिउल्लाह यांच्यानंतर बुध्दी आणि तर्काच्या आधारे तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात  इस्लामचा अर्थ सांगणारे इक्बाल हे पहिले दार्शनिक आहेत. इक्बाल स्वतः तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांनी इस्लामी तत्त्वज्ञानाचा अर्थ तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांच्या आणि  दार्शनिकांच्या तुलनेत सादर करण्याचा प्रयत्न केला. इक्बाल मूलतः कवी म्हणून चर्चेत आहेत. मात्र त्यांच्या कविता या फक्त कल्पनेचा परिपोष नाहीत. त्यांच्या काव्याचा विषयदेखील  मूलतः तत्त्वज्ञान हाच आहे. जावेदनामा, असरारे खुदी, अरसगाने खुदी ही त्यांची काही प्रख्यात महाकाव्ये आहेत. यापैकी जावेदनामा हे दार्शनिक पाश्र्वभूमीवर आधारित ‘संवादी’ फारसी  महाकाव्य आहे. ३५ विभिन्न पात्रांशी संवाद साधत हे महाकाव्य पुर्ण होते. या महाकाव्यात इक्बाल यांनी १०० हून अधिक दार्शनिकांच्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख करताना त्यांच्या तत्त्वज्ञानाशी, मतांशी वाद घातला आहे. यासाठी त्यांनी महाकाव्यात आपले आध्यात्मिक गुरू रुमी यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत उभे केले आहे. त्यांच्या विचारांच्या आधारे इस्लामचे  तत्त्वज्ञानीय रूप स्पष्ट करत ते दार्शनिकांच्या कार्याची समीक्षा करतात. दांते हे महान विचारवंत होते. ते इक्बालांच्या अभ्यासाचा विषय. डिवाईन कॉमेडी ही त्यांची लॅटीन साहित्यकृती  आहे. त्यामध्ये दांतेने वर्जिन ला आपला मार्गदर्शक म्हणून उभे केले आहे. तीच पध्दत इक्बाल यांनी जावेदनामात रुमींसाठी वापरली आहे. इक्बालांच्या या महाकाव्यात ३२ मुख्य पात्रे  आहेत. त्यापैकी १२ पात्रे ही कवी, विचारवंत, तत्त्वज्ञांची आहेत. याच महाकाव्यात इक्बाल यांनी मार्क्सचे हृदय आस्तिक आणि बुध्दी नास्तिक होती, असा उल्लेख केला आहे. ( कल्बे  ऊ मोमीन दिमगश काफिर) इक्बाल हे मार्क्सचे कठोर टिकाकार होते. त्यांनी जमालुद्दीन अफगानी या आपल्या काव्यातील पात्राच्या साहाय्याने मार्क्सच्या चिंतनाला टिकेचे लक्ष्य बनवले  आहे.
इक्बालांचे मार्क्सच्या शोषणविरहित समाजाच्या संकल्पनेशी मतैक्य होते. मात्र वर्गसंघर्षाचा सिध्दान्त मांडून माणसाला नैसर्गिक अवस्थेची समता स्थापित करता येणार नाही, असे त्यांचे  ठाम मत होते. ‘खुदी’ ( self ) चा विकास केल्याशिवाय माणूस शोषणाचा सामना करण्यासाठी सिध्द होऊ शकत नाही, असे इक्बालांचे चिंतन होते. समतेसाठी सांगितलेल्या मार्क्सचा पाया, इमला सिध्दान्ताच्या पुढे जाऊन इक्बाल अतिनिसर्गवादी भूमिका मांडत होते. मार्क्स ईश्वराच्या अधिसत्तेला आव्हान देत असल्याची टिकादेखील इक्बाल यांनी त्यांच्या काव्यातून  केली आहे. इक्बालांनी मांडलेली ‘खुदी’ची संकल्पना नित्शेच्या ‘अधिमानव’ ( Super Man ) संकल्पनेसारखी असल्याची टिका केली आहे. मात्र मुहम्मद शिस खान या आरोपात तथ्य  नसल्याचे सांगतात.
इक्बाल यांनी इसा मसीह (अ.) यांचा अनुयायी म्हणून टॉल्सटॉयचा गौरव करणारी एक दीर्घकविता या महाकाव्यात समाविष्ट केली आहे. टॉलस्टॉय हे सैनिकी जीवन जगलेला तत्त्वज्ञ  होता. त्याने आयुष्यभर इसा मसिह (अ.) यांच्या समाजक्रांतीचा इतिहास चिंतनासाठी विषय म्हणून निवडलेला होता. त्यानंतर आपल्या महाकाव्यातील बहुतांश पाश्चात्य तत्त्वज्ञांना  इशारा देताना ते एका शेर मध्ये म्हणतात,
‘‘तुम्हारी तहजीब अपने खंजर से आप ही खुदकुशी करेगी ।
जो शाखे नाजुक पे आशियाना बनेगा, नापाएदार होगा ।।’’

समतेचा मार्ग ‘खुदी’च्या विकासात
कोणताही तत्त्वज्ञ चिंतनाच्या क्षेत्राकडे सामाजिक हिताच्या परिस्थितीच्या शोधासाठी वळतो. इक्बालांचे चिंतन याहून वेगळे नव्हते. माणसाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘खुदी’च्या विकासाची भूमिका घेतली. यासंदर्भात त्यांनी जगातील अनेक तत्त्वज्ञांच्या विचारांचा आधार घेतला. ‘असरारे खुदी’ इक्बालांची फारसी मसनवी आहे. त्यामध्ये प्लेटोच्या ‘रिपब्लिक’च्या  मांडणीचे इक्बालांनी कौतुक केले आहे. प्लेटोचा गौरव करताना ते आपल्यावर प्लेटोचा प्रभाव असल्याचे सांगतात,

‘‘बर तखय्युलहाए मा फर्मारिवास्त
जामे ऊ ख्वाब आवरो गेतीरुबास्त ।।’’

(आमच्या विचारांवर तो पसरलेला आहे. पेला आहे त्याचा निद्राकारक आणि इंद्रिय जगताचा याचक.)
इक्बाल यांनी ‘असरारे खुदी’मध्ये ‘मऱ्हलए दोम जब्ते नफ्स’ भोगीवृत्ती, वासना यांना वेसण घालून ‘खुदी’चा विकास कसा करायचा याचे विश्लेषण केले आहे.

इक्बालांच्या काव्यात कामगार हिताचा एल्गार
कष्टार्जन हा भूमिपुत्रांचा राष्ट्रधर्म. पण वसाहतिक मूल्यांनी भांडवलदारी आसूयेने मजुरांना वेठीस धरलं. त्यांचं शोषण केलं. इक्बालांनी त्या अन्यायाविरोधात आपल्या शब्दांची शस्त्र उगारली. ‘बांगे दिरा’ हा इक्बालांचा काव्यसंग्रह. इतिहास आणि कल्पनांचं मिश्रण त्यात आहे. भावना आणि बुध्दिवादाची सांगड घालून इक्बालांनी आपल्या चिंतनाला त्यात शब्दबद्ध  केलंय. ‘सरमाया व मेहनत’ म्हणजे भांडवल आणि मेहनत ही त्या काव्यसंग्रहातली इक्बालांची एक कविता. सांप्रत भांडवलदारी मानसिकतेचा प्रत्यय त्यातून येतो. भांडवलादारी  मानसिकतेला उघडे पाडून इक्बालांनी मजुरांच्या जागृतीचा एल्गार त्यातून पुकारला आहे. त्यात इक्बाल म्हणतात,

‘‘बंदाये मज्दूर को जाकर मेरा पैगाम दे
खिज्र का पैगाम क्या, है ये पयामे कायनात।।१।।

अय तुमको खा गया के सरमायादारे हीलागर
शाखे आहू पर रही सदियोंतलक तेरी बरात।।२।।’’

मजुरांचे दुःखी कष्टी जिणे इक्बालांना पाहावत नाही. त्यांच्या हळव्या मनाला त्यामुळे वेदना होतात. ते मजुराला संदेश देतात. म्हणतात, मजुराला या स्थितीतून सावरता यावं यासाठी  हा माझा संदेश आहे. माझा हा संदेश त्यांना द्या. हा फक्त माझाच नाही तर साऱ्या सृष्टीचा संदेश आहे. (हे मजुरांनो, श्रमिकांनो) त्या धूर्त भांडवलदारांनी (सरमायादार) तुम्हाला संपवले  आहे. तुझ्या क्षमतांना गिळंकृत केले आहे. त्यांच्या इच्छेवर तुझी मजुरी ठरत आहे. कार्ल मार्क्सने श्रममूल्य आणि वस्तूचे बाजारमूल्य यातील तफावत सांगितली. कोणत्याही वस्तूचे  वरकड मूल्य ( अतिरिक्त मूल्य / सरप्लस व्हॅल्यू) हे भांडवलदाराकडून श्रमिकांच्या होणाऱ्या शोषणाचे प्रतीक असल्याचे तत्त्व त्याने शोधून काढले. वरकड मूल्यात मजुरांनाही वाटा मिळेल अशी व्यवस्था निर्माण करणे हे मार्क्सचे स्वप्न म्हणता येईल.

‘‘दस्ते दौलत आफरी को मुज्दायौ मिलती रही
अहले सरवत जैसे देते है गरीबोंको जकात ।।३।।

साहीरे अल्मुतने तुझ को दिया बर्गे हशीश
और तु अय बेखबर समझा उसे शाखे नबात ।।४।।’’

मजूर हा श्रीमंताची गरज असतो. पण त्या गरजेचं प्रदर्शन मात्र श्रीमंत भांडवलदार कटाक्षानं टाळतात. मजुराला काम देऊन जणू काही ते मजुरावर उपकार करत आहेत. अशा  अविर्भावात वागतात. श्रीमंतांनी गरीबाच्या तोंडावर जकात फेकावी त्यापध्दतीने श्रीमंतांची संपत्ती आपल्या कष्टातून उभी करणाऱ्या मजुरांना मजुरी मिळत असते. या अन्यायाची जाणीव  कामगारांना होत नाही. जणू काही अल्मुत नावाच्या पर्वतावरील जादूगाराने त्यांना हशीशचे मादक द्रव्य देऊन गुंग केले आहे. त्यामुळेच ते हशीशसारख्या मादक द्रव्याला ते कल्पवृक्ष  समजत आहेत. म्हणजे मजूर हे त्यांचे शोषण करणाऱ्या भांडवलदारांनाच आपला मुक्तिदाता मानत आहेत.
‘‘ नस्ल, कौमीयत, कलिसा,सल्तनत,तहजीब,रंग ‘खाजगी’ ने खूब चुनचुनकर बनाये मुस्कीरात।।५।।

कट मरा नादां खियाली देवतांओ के लिये सुक्र कि लज्जत में तु लुटवागया लज्जते हयात।।६।।’’

मजुरांना भुलवण्यासाठी त्यांना त्यांच्या कल्याणाच्या मार्गापासून भटकवण्यासाठी नेत्यांनी मोहमयी विषयांची निर्मिती केली आहे. वंश, राष्ट्रवाद, मठ, राज्य, संस्कृती, वर्ण ही सर्व त्या नेत्यांनी मजुरांसाठी बनवलेली मादक द्रव्ये आहेत. नादान मजुरा तू या खोट्या दैवतांच्या (मादक द्रव्यांच्या) व्यर्थ मागे पडला आहेस. त्यातूनच तुझं मरण ओढावलयं. समाधिसुखासाठी  तू ऐहिक जीवन मात्र गमावलंस. त्याला तुझ्या नादानपणामुळे उद्ध्वस्त करून घेतलंस.

‘‘मक्र की चालों से बाजी ले गया सरमायादार इंतिहाये सादगीसे खा गया मज्दूर मात ।।७।।

उठ के बज्में जहां का और ही अंदाज है मशरीक व मगरीब में तेरे दौर का आगाज है।।८।।’’

भांडवलदार हे धूर्त आहेत. त्यांनी आपल्या धूर्त खेळीने विजय मिळवला. त्यांच्या धूर्तपणामुळेच श्रमिकांनी अत्यंत साधेपणाने पराभव स्वीकारला. पण हे मज्दूरा आता उठ. ही पराभूत मानसिकता त्याग. पूर्व आणि पश्चिमेत तुझ्या युगाची नांदी सुरू झाली आहे.

‘‘हिंमते आली तो दरिया भी नहीं करती कुबूल गुंचा सैं गाफील तरे दामन मे शबनम कबतलक।।९।।

नग्मायें बेदारीये जमहूर है सामाने ऐश किस्साये खाबआवरे इस्कंदारो जम कबतलक।।१०।।’’

श्रमिक आहे म्हणून मजुरांनी किती दिवस न्युनगंडात राहावे. त्यांनी क्रांतीची मशाल पेटवावी. मजुरांनी क्रांतिप्रवण व्हावं म्हणून इक्बाल भांडवलदारांच्या विरोधात मजुरांना धैर्य देतात. इक्बाल मजुरांना म्हणतात, दृढनिश्चय असेल तर कोणतीही बाब असाध्य नाही. किती दिवस फुलात दवबिंदू असावेत त्याप्रमाणे तू आसवांनी आपले कपडे भिजवत राहाशील.  बहुजनांमध्ये बेदारी (जागृती) निर्माण करणारे गीत आनंददायी आहे. तुला मोहीत करणाऱ्या सिकंदर आणि जमशेदच्या गोष्टी तू किती दिवस ऐकत बसणार आहेस.

- सरफराज अहमद
गाजियोद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget