Halloween Costume ideas 2015

आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१९५) उत्तरादाखल त्यांच्या पालनकर्त्याने फर्माविले, ‘‘मी तुमच्यापैकी कोणाचेही कृत्य वाया घालविणार नाही मग तो पुरुष असो अथवा स्त्री, तुम्ही सर्वजण परस्परांत सहजाती  आहात,१३९ म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले व  मारले गेले - त्यांचे सर्व अपराध मी माफ करून टाकीन व त्यांना अशा उपवनांत दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील. हा त्यांचा मोबदला आहे अल्लाहजवळ आणि  सर्वोत्तम मोबदला अल्लाहजवळच आहे.’’१४०
(१९६) हे पैगंबर (स.)! या जगात अल्लाहच्या अवज्ञाकारींची धावपळीमुळे तुमची दिशाभूल होता कामा नये.
(१९७) ही केवळ काही दिवसांच्या जीवनाची थोडीशी मौज आहे, नंतर ते सर्वजण नरकामध्ये जातील जे अत्यंत वाईट ठिकाण आहे.
(१९८) याउलट जे लोक आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगून जीवन व्यतीत करतात त्यांच्यासाठी अशी उद्याने आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहतात, त्या उद्यानांत ते सदैव राहतील,  अल्लाहतर्फे ही त्यांच्यासाठी पाहुणचाराची सामग्री होय, आणि जे काही अल्लाहजवळ आहे सदाचारी लोकांकरिता तेच सर्वोत्तम आहे.
(१९९) ग्रंथधारकांमध्येसुद्धा काही लोक असे आहेत जे अल्लाहला मानतात, या ग्रंथावर श्रद्धा ठेवतात जो तुमच्याकडे पाठविण्यात आला आहे आणि त्या ग्रंथावरदेखील श्रद्धा ठेवतात जो  याच्यापूर्वी खुद्द त्यांच्याकडे पाठविण्यात आला होता. अल्लाहच्या समोर विनम्र झालेले आहेत आणि अल्लाहच्या संकेतवचनांना अल्पशा किंमतीला विकून टाकीत नाहीत. त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ आहे आणि अल्लाह हिशेब चुकता करण्यात विलंब लावीत नाही.
(२००) हे श्रद्धावंतांनो, संयम पाळा, असत्यवाद्यांविरूद्ध दृढता दाखवा,१४१ सत्याच्या सेवेसाठी कटिबद्ध राहा व अल्लाहचे भय बाळगा, आशा आहे की तुम्ही सफल व्हाल.


 अन्निसा

(मदीनाकालीन, एकूण १७६ आयती)
अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.
(१) लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची जोडी बनविली आणि या एकाच जोडप्यापासून समस्त  पुरुष व स्त्रीया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर  राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.


१३९) म्हणजे तुम्ही सर्व माणसे आहात आणि माझ्या दृष्टीत एकसमान आहात. माझ्या येथे असा शिरस्ता नाही की स्त्री व पुरुष, मालक आणि गुलाम, काळे आणि गोरे, उच आणि नीच इ. साठी न्यायाचे निकश वेगवेगळे असावेत.
१४०) काही मुस्लिमेतर लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आले आणि विचारले की आदरणीय मूसा (अ.) लाठी आणि चमकदार हात घेऊन आले आणि इसा (अ.) आंधळयांना दृष्टी देत असत आणि महारोग्याना निरोगी करीत असत. तसेच इतर पैगंबरांनी काहीनाकाही चमत्कार आणले होते. आता दाखवा की आपण कोणता चमत्कार (मोजिजे) आणला आहे? यावर  पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आयत नं. १९० पासून इथपर्यंत आयतींचे वाचन केले आणि सांगितले, `मी तर हे आणले आहे.'
१४१) मूळ अरबी शब्द `साबिरु' आहे. याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे असत्यवादी आपल्या असत्यावर जी दृढता दाखवित आहेत आणि जुलमी व्यवस्थेला प्रतिष्ठा बहाल करण्यासाठी  जी प्रयत्नांची पराकष्ठा करीत आहेत, तुम्ही त्यांच्या मुकाबल्यात त्यांच्यापेक्षा जास्त दृढता आणि धैर्य दाखवा. दुसरा अर्थ म्हणजे त्यांच्या मुकाबल्यात एक दुसऱ्यापेक्षा जास्त दृढता दाखवा.
१) पुढे माणसातील परस्परांचे हक्क वर्णन करावयाचे असल्याने आणि मुख्यत्वे कौटुंबिक व्यवस्थेचे उत्कर्ष आणि दृढतेसाठी आवश्यक कायदे घोषित करावयाचे असल्याने सुरवात  अशाप्रकारे करण्यात आली आहे. एकीकडे सर्वप्रथम अल्लाहचे भय आणि अल्लाहच्या नाराजीपासून वाचण्याची ताकीद करण्यात आली. दुसरीकडे हे लोकांच्या मनात रूजविले की समस्त  मानवांचे एकच मूळ आहे आणि एकाच मुळातून सर्वांचे हाड मांस व रक्त बनले आहे. ``तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले'' म्हणजेच मानवाचा जन्म प्रथमत: एका व्यक्तीपासून  झाला. दुसऱ्या एके ठिकाणी कुरआन याविषयी तपशील देत आहे की आदम (अ.) हेच प्रथम मानव होते ज्यांच्यामुळे जगात मानव वंश फैलावला. ``त्याच जीवापासून त्याची जोडी  बनविली.'' याचा तपशील आमच्या माहितीत नाही. टीकाकार सामान्यत: जे स्पष्टीकरण देतात आणि बायबलमध्येसुद्धा ज्याचे वर्णन आले आहे ते म्हणजे आदमच्या बरगडीपासून हव्वा  (स्त्री) चा जन्म झाला. (तलमुदमध्ये अधिक तपशील दिला आहे की हव्वा यांना आदम (अ.) यांच्या उजवीकडची तेरावी बरगडीपासून निर्माण केले) परंतु अल्लाहचा ग्रंथ कुरआन   याविषयी खामोश आहे. ज्या हदीसी याच्या समर्थनात सांगितल्या जातात त्यांचा अर्थ तो नाही जे लोक समजतात. म्हणून उत्तम हे आहे की हे वर्णन तसेच केले जावे जसे अल्लाहने  केले आहे. ज्याप्रमाणे अल्लाहने त्यास अस्पष्ट ठेवले आहे. याच्या विस्तारात जाऊन वस्तुस्थिती निश्चित करण्यासाठी वेळ नष्ट केला जाऊ नये.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget