Halloween Costume ideas 2015

उर्दू जगत

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात इन्क्लाब, उर्दू टाईम्स या मुंबईहून प्रकाशित होणार्या दोन वर्तमानपत्रामध्ये अब्दुल रशीद नावाच्या अनाथ मुलाची प्रेरणादायक बातमी प्रकाशित झाली आहे. ज्याला गेल्या दहा वर्षांपासून एका ब्राह्मण कुटुंबाने सांभाळले आहे. प्रा. सुचित्रा अश्विन नाईक व त्यांचे पती यांनी मिळून अ. रशीदचे संगोपन केले आहे. नुकताच  अ.रशीदचा विवाह झाला. त्यानिमित्त त्याने वरील वर्तमानपत्रातील बातमीदाराला सांगितले की, ”माझी आई आणि वडील अर्थात नाईक ब्राह्मण दाम्पत्यांनी मिळून माझे जसे संगोपन केले तसे संगोपन देशातील प्रत्येक मुलाला मिळो. मला माहित नाही की माझे जन्मदाते आई-वडिल आणि नातेवाईक कोण आहेत. पुण्याच्या बालगृहामधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उल्हासनगर येथील अनाथालयामध्ये बारावीपर्यंत मी शिक्षण घेतले होते. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मला अनाथालयामधून काढून टाकण्यात आले. तेव्हा मी ठाण्याच्या के.जी. जोशी कॉलेजच्या कला शाखेमध्ये पदवीसाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतला. जेथे माझी पहिल्यांदा भेट प्रा. सुचित्रा नाईक यांच्याशी झाली. त्यांना मी माझी अडचण सांगितली. तेव्हा त्यांनी माझा प्रामाणिकपणा आणि प्रखर बुद्धीमत्ता याचा विचार करून माझा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. माझ्या राहण्या-खाण्याची सोय केली. अल्पावधीतच मी त्यांच्या घराचा एक सदस्य झालो. यासंबंधी सुचित्रा नाईक यांनी इन्क्लाबला सांगितले की, अब्दुल रशीद हा माझ्या घराचा एक सदस्य आहे. माझ्या मुलांप्रमाणेच मला त्याच्यावर विश्वास आहे. त्याने आपल्या गुणवत्तेच्या बळावर सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरी मिळविलेली आहे. नोकरी मिळाल्यानंतर आम्हाला त्याच्या लग्नाची काळजी होती. तेव्हा महाराष्ट्र कॉलेजचे प्राचार्य सिराजुद्दीन चौगुले यांच्या मध्यस्थीने अंजुमन-ए-इस्लामच्या अनाथालयामधील एका मुलीबरोबर त्याची त्यांनी सोयरीक जुळविली. 4 नोव्हेंबर 2018 ला त्याचा विवाह अतिशय थाटामाटात पार पडला. 11 नोव्हेंबरला दादरमध्ये वलीमाचे भोजन देण्यात आले. आम्ही तर एका मुलाला आश्रय दिला, अंजुमन-ए-इस्लाम  तर शेकडो मुलांचे पालन पोषण करीत आहे. ही बातमी खरोखरच आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचा पुरावा ठरावी, अशीच आहे.
    हैद्राबादच्या ऐतेमाद व इतर वर्तमानपत्रामध्ये कर्नाटकच्या पोटनिवडणुकीच्या निकालांचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले आहे. या वृत्तात भाजपचा पराभव आणि त्याचे विश्लेषण देण्यात आले आहे. काँग्रेस आणि जनतादल एस. यांनी मिळून दोन लोकसभा आणि दोन विधानसभेच्या जागा जिंकलेल्या आहेत. शिवमोगा मतदार संघातून फक्त भाजपला आपला उमेदवार निवडून आणता आला आहे. हा निकाल भाजपसाठी पुढील लोकसभा निवडणुकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो अशी टिप्पणी जवळ-जवळ सर्वच वर्तमानपत्रांनी केलेली आहे.
    9 नोव्हेंबरच्या जवळ-जवळ सर्वच वर्तमानपत्रात 26/11 ला मुंबईत झालेल्या बॉम्बहल्ल्यातील शहिदांच्या घरच्या दु:खाच्या छायेत साजर्या होणार्या दिवाळी संबंधीच्या बातम्या दिलेल्या आहेत. ज्यात आजही ती कुटुंबे दु:खामध्ये कशी दिवाळी साजरी करतात याचे वर्णन आहे. शीतल यादव जी आता 10 वर्षाची झाली आहे. 26/11 - 2008 ला झालेल्या हल्ल्यावेळी ती अवघी तीन महिन्याची होती. सध्या ती वाराणसीच्या हॅप्पी मॉडेल स्कूलमध्ये शिकते. भविष्यात डॉक्टर बनू इच्छितो. शितल आपले वडिल आणि मामासोबत छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून गाझीपूरला जाण्यासाठी स्टेशनवर आली होती. हा प्रवास सुरू होण्यापूर्वीच तिच्या वडिलांच्या जीवनाचा प्रवास थांबला. ते रेल्वेची वाट पाहत होते. तेव्हा सीएसटीवर बेछूट गोळीबार झाला आणि पाहता-पाहता प्रेतांचा खच पडला. त्यात शीतलच्या वडिलांचा देहही निपचित पडला होता. शीतलला आजही प्रश्न पडतो की, तिच्या वडिलांची काय चूक होती? ज्यामुळे आतंकवाद्यांनी त्यांचा बळी घेतला.
    याशिवाय, या आठवड्यात उर्दू वर्तमानपत्रांमध्ये ’अयोध्येमध्ये मंदिर होता, आहे आणि राहणार’ असे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचे ठासून केलेले विधान प्रमुखपणे प्रकाशित करण्यात आलेले आहे. शिवाय, श्रीरामाची एक भव्य मूर्ती अयोध्येत उभारण्याच्या त्यांच्या संकल्पाचीही वर्तमानपत्रांनी दखल घेतली आहे. शिवाय, फैजाबादचे नाव बदलून अयोध्या केल्याचे पडसादही उर्दू वर्तमानत्रातून उमटलेले आहेत. योगी आदित्यनाथ यांचे हे वागणे घटनेची शपथ घेऊन घटनेच्या विरोधात वागण्याचे वाईट उदाहरण असल्याचे वर्तमानत्रांत म्हटलेले आहे.
    13 नोव्हेंबरच्या उर्दू टाईम्समध्ये आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या कुटुंबांना 50 हजार रूपयांची केलेल्या मदतीची बातमी आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्याच्या तराई गावामध्ये शेतकरी पोतन्ना पल्लेवाड यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून स्वत:च्या हाताने स्वत:ची चिता रचून आत्महत्या केली आहे. सरकारची मदत मिळालेली नसतांना काँग्रेस पक्षाने मात्र या कुटुंबाची मदत केलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेवून 50 हजार रूपयांची मदत या कुटुंबाला केलेली आहे. ही बातमी प्रामुख्याने प्रकाशित झालेली आहे.
    उर्दू टाईम्सच्या 13 तारखेच्या अंकात माझा एक लेख  ’लग्न करतांना रंग-रूप आणि संपत्ती न पाहता चांगले चारित्र्य पहावे’ या प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या हदिसच्या पार्श्वभूमीवर लिहिलेला होता. ज्यात मुस्लिम समाजात सध्या लग्नामध्ये चालू असलेल्या कुरीतींवर प्रकाश टाकून निकाह अगदी साधा करावा तसेच निकाह करताना मुला-मुलींच्या चारित्र्याला प्राधान्य देण्यात यावे, याबद्दलचे विवेचन केलेले आहे.
 

- फेरोजा तस्बीह
9764210789
(मिरजोळी चिपळून, रत्नागिरी)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget