Halloween Costume ideas 2015

‘प्रेषित मुहम्मद (सल्ल.) नवयुगाचे प्रणेते’ हा ग्रंथ प्रत्येकाने वाचावा

सोलापूर (प्रतिनिधी) 
 प्रेषितांचे जीवन हे समस्त मानवकल्याणासाठी मार्गदर्शक आहे़ जेव्हा मी हा ग्रंथ वाचायला सुरूवात केली तेव्हा माझ्या अंगावर शहारे येत होते़ मुहम्मद पैगंबरांची एक-एक वचने मनाला भावत होती़  त्यांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन मला विचार करायला प्रेरित करीत होते़ साहित्यीक, चळवळीतले कार्यकर्ते, लेखक, प्रबोधक, इतिहासाचे अभ्यासक, राजकारणी, सामान्य नागरिकांनी देखील पैगंबरांचे चरित्र वाचायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ़ जयसिंगराव पवार यांनी केले़
     सोलापूर येथील अॅड़ गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरतर्फे फडकुले सभागृहात आयोजित  ‘प्रेषित मुहम्मद (सल्ल.) नवयुगाचे प्रणेते’ या ग्रंथाच्या शानदार प्रकाशन समारंभात शनिवारी ते बोलत होते़
    मंचावर उस्मानाबाचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, ग्रंथाचे लेखक इफ्तेखार अहमद, लिंगायत धर्म अभ्यासक चन्नवीर मठ, मायबोली प्रकाशन मुंबईचे संचालक सलीम खान, गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरचे अध्यक्ष समिउल्ला शेख आदी उपस्थित होते़
     पुढे बोलताना डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, इफ्तेखार अहमद यांनी ‘प्रेषित मुहम्मद (स.) नवयुगाचे प्रणेते’ हा ग्रंथ सरळ, सोप्या आणि उत्तम मराठीत लिहिल्याने मराठीजणांना नक्कीच समजायला सोपे जाईल. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करीत शेजाऱ्याचा हक्क सांगताना ते म्हणाले होते, शेजारी जर उपाशी झोपत असेल आणि तुम्ही (मुस्लिम) जर पोटभर जेवत असाल तर ते इस्लामला मान्य नाही़ जर तुमच्या घरात पंचपक्वानाच अन्न शिजत असेल तर त्याचा सुवास दरवळू नये याची काळजी घ्यावी आणि जर तुम्ही फळे अथवा अन्य खाद्य पदार्थ आणून खात असाल तर त्याची सालपटे रस्त्यावर फेकू नका. यामुळे येणारे जाणारे व आजूबाजूच्या गरीब लेकरांत अशी फळे खाण्याची इच्छा होईल आणि त्यांना ते जर नाही मिळाले तर ते नाराज होतील़ त्यामुळे एक तर त्यांना आपले अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचवा . ते देणे होत नसेल तर कमीत कमी ते खाऊन राहिलेली सालपटं रस्त्यावर फेकू नका़ त्यांच हे उदात्त मानवीय दृष्टीकोण मला फार आवडला असल्याचेही डॉ़ पवार म्हणाले़ प्रेषितांचं चरित्र वाचल्यानंतर मी तर त्यांच्या प्रेमातच पडलो असल्याचेही डॉ़ पवार म्हणाले़
    यावेळी उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील म्हणाले, इफ्तेखार अहमद हे माझे मित्र असून, अत्यंत साधेपणा व उच्च विचाराची ही व्यक्ती आहे़  यांनी दीर्घ संशोधनानंतर हा ग्रंथ लिहिला असून,  वाचनाऱ्याशी हा ग्रंथ संवाद साधत असल्यासारखे वाटतो़ यात भावानुवाद दडला आहे. तो प्रत्येकाला जमत नाही़ मात्र इफ्तेखार अहमद यांनी हे पुस्तक रेखाटताना फार खबरदारी घेतली असल्याचेही ते म्हणाले़ सत्य साहित्याचा आत्मा आहे़ आज मोठ्या प्रमाणात इतिहासाचे विकृतीकरण होत चालले आहे़ प्रत्येक जण आपल्या विचारानुसार इतिहासाला कलाटणी देतोय इतिहास लेखकांनी त्यात स्वत:चे कधी मत मांडायचे नाही, असे सांगत नव्या पिढीला इतिहास माहित नसल्याने दोन समाजात दुरावा निर्माण होत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली़
    कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने झाली़ प्रास्ताविक सरफराज अहमद यांनी केले़ यावेळी त्यांनी या ग्रंथातील मांडणी, संदर्भ व गरज याचे सविस्तर वर्णन केले.
    या पुस्तकाचे लेखक इफ्तेखार अहमद म्हणाले की, प्रेषितांची शिकवण आणि कुरआनचं मार्गदर्शन हे फक्त मुस्लिमांसाठीच नसून ते समस्त मानवजातीकरिता आहे़ आम्हाला हे वारसामध्ये भेटले असून, हा पैगाम सर्वांपर्यंत पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे़ हाच उद्देश हा ग्रंथ लिहिण्यामागचा आहे़ कुरआनचं भाषांतर, प्रेषितांचं जीवन चरित्र बऱ्याच भाषेत झाले आहे़ मात्र मराठीत ते मोठ्या प्रमाणात झालं नाही़ समस्त मराठीभाषिकांना प्रेषितांचं जीवन कळण्यासाठी समजेल अशा मराठीभाषेत हे लिहिल आहे़ सर्वात पहिल्यांदा अनुवाद मीरमुहम्मद याकुब यांनी केला होता़ त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी फंड जमा करून मूळ अरबीतून कुरआनचं भाषांतर मराठीत करून घेतलं.  यानंतर जमाअते इस्लामी हिंदच्या इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टनंही कुरआनचं मराठीत अनुवाद केला आहे़ साने गुरूजी, मुन्शी अमीनोद्दीन यांनी देखील मराठीत अनुवाद केला मात्र ते पुरेसे झाले नाही़ मात्र हा ग्रंथ अकॅडमीक आणि सुलभ आहे. जे की प्रत्येकाला समजेल. दीर्घ अभ्यासाअंती, संशोधनानंतर हा ग्रंथ तयार झाला आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले असून, प्रत्येकाने एकदातरी हा ग्रंथ वाचावा, असेही ते म्हणाले.   यानंतर मायबोली प्रकाशनचे सलीम खान यांचंही समयोचित भाषण झालं. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन साहिल शेख यांनी केले़  आभार संघर्ष खंडागळे यांनी मानले़   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड. गाजीयोद्दीन रिसर्चच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget