Halloween Costume ideas 2015

पाश्चिमात्य देशांना इस्लाम का आवडत नाही?

जगात कुठेही इस्लामचे नाव घेताच प्रस्थापितांकडून विरोध सुरू होतो. सातव्या शतकातही हीच परिस्थिती होती आणि आज 21 व्या शतकातही हीच परिस्थिती आहे. तसे पाहता विरोध सर्वांकडूनच होतो मात्र प्रखर विरोध पाश्चिमात्य ख्रिश्चन देशांकडून होतो. त्याची नेमकी कारणे काय आहेत? याबद्दल फारसे कुठेही लिहिले जात नाही. या लेखाच्या माध्यमातून या कारणांचा धुंडाळा घेण्याचा हा प्रयत्न अनाठायी ठरणार नाही.
    मध्ययुगीन काळात सर्वच ख्रिश्चन बहुल देशात सत्तासुत्रे ही चर्चच्या हाती होती. मात्र जशी-जशी वैज्ञानिक प्रगती होत गेली तशी-तशी ख्रिश्चन जनता चर्चपासून दूर होत गेली. भौतिक प्रगतीचा वेग वाढला आणि या प्रगतीच्या आड येणाऱ्या बायबलमधील धर्म आज्ञांना नाकारण्यास सुरूवात झाली. इतके की हळूहळू व्याज, नशा, अश्लिलता, खोटेपणा, भ्रष्टाचार या ख्रिश्चन धर्मात निषिद्ध असलेल्या गोष्टींना त्या समाजामध्ये स्विकारले गेले इतके की पुढे चालून त्यांना मानाचे स्थान मिळाले. चर्च हे फक्त रविवारच्या प्रार्थनेपुरते शिल्लक राहिले. आजतर अशी परिस्थिती आहे की, ’विक-एंड’च्या सुट्ट्यांच्या नियोजनामध्ये , ”संडे-प्रेअर”ला सुद्धा स्थान राहिलेले नाही. काही वृद्ध मंडळी चर्चमध्ये जातात. बाकी लोक आपल्या चंगळवादी जीवनशैलीत मस्त आहेत. परिणामी, पाश्चात्य समाज धार्मिक बंधनातून जवळ-जवळ मोकळा झाला. धर्माची मर्यादा सोडली की तिचा शेवट नास्तिकतेत होतो. म्हणून आजमितीला पाश्चिमात्य देशांमध्ये नास्तिक नागरिकांची संख्या 70 ते 75 टक्के एवढी प्रचंड आहे. म्हणूनच अनेक चर्चकडून ख्रिश्चन युवा पिढीला, ”लॉस्ट- जनरेशन” (वाया गेलेली पिढी) असे संबोधले जाते. या उलट अमेरिकेच्या प्रसिद्ध ,” प्यु रिसर्च सेंटर”चे अनेक सर्व्हेक्षण अहवाल असे आहेत की, ज्यात इस्लामला   जगात सगळ्यात वेगाने वाढणारा धर्म असल्याचे मान्य केले गेले आहे. विपरित परिस्थिती व ”हार्ट-लेस” दुष्प्रचारानंतरसुद्धा इस्लामने पाश्चिमात्य देशात ज्या गतीने आपली घौडदौड सुरू ठेवली आहे ती आश्चर्यजनक म्हणता येईल अशीच आहे. अगदी मागच्या महिन्यात म्हणजे 26 ऑक्टोबर 2018 ला प्रसिद्ध आयरिश गायीका स्निड-ओ-कॉनर हिने इस्लाम धर्माचा स्विकार केल्याची घोषणा ट्विटरवर ज्या आत्मविश्वासाने केली त्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये खळबळ उडाली आहे.
    ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन्ही धर्मांवर नजर टाकली असता एक फरक चटकन लक्षात येतो, तो हा की, ख्रिश्चन धर्म हा सर्व भौतिक सोयीसुविधांनी सुसज्ज असतांनासुद्धा रक्षात्मक मुद्रेत आहे तर कुठल्याही भौतिक सोयी सुविधा नसतांनासुद्धा इस्लाम हा आक्रमक मुद्रेत आहे. याची कारणमिमांसा करतांना पोप बेनेडिक्ट सहावे यांनी एकदा म्हटले होते की, ” मुस्लिम धार्मिकदृष्ट्या आक्रमक असण्यामागचे कारण हे आहे की, कुरआनच्या रूपात त्यांच्याकडे, ” वर्ड-ऑफ-गॉड’ आहे.  ते ही शुद्ध स्वरूपात आहे. याशिवाय विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध इतिहासकार आरनॉल्ड ट्विन बी. म्हणतो की, ” पाश्चिमात्य सभ्यतेचा अंत होत आहे. तिचे पुनरूज्जीवन करावयाचे असल्यास त्यांना दोन गोष्टी कराव्या लागतील. एक-स्वतःमध्ये अध्यात्मिकता वाढवावी लागेल, दोन-  तंत्रज्ञानाचे वेड कमी करावे लागेल. विसाव्या शतकाच्या मध्यामध्ये पाश्चिमात्य देशांचा एक विचार असा होता की, इस्लाममध्ये आधुनिक काळासोबत आपल्या अनुयायांना नेण्याची क्षमता नाही. प्रगतीची चाके मागच्या बाजूने फिरविण्यात इस्लामला रस असतो. थोडक्यात इस्लाममध्ये राहून प्रगती शक्य नाही. याच कारणामुळे मुस्लिम हे वेगाने प्रगती करू शकत नाहीत. वरकरणी हा विचार खरा वाटतो मात्र खोलपणे विचार केला असता हा विचार पोकळ आहे, हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. माणसाच्या आतून निर्माण होणाऱ्या नैतिक शक्तीशिवाय बाहेरील भौतिक शक्ती कितीही मोठी असली तरी ती माणसाच्या कामी येत नाही, हे इतिहासात अनेकदा सिद्ध झालेले आहे. यासाठी एक उदाहरण स्पेनचे घेता येईल. स्पेनवर मुस्लिमांनी म्हणजे अरबांच्या बनी उमय्या या खिलाफतीचे प्रतिनिधी तारीक बिन जियाद यांनी स्पेनच्या जनतेच्या आग्रहास्तव इ.स. 711 मध्ये प्रवेश केला व सत्ता ताब्यात घेतली. मुस्लिमांनी तेथे 1492 पर्यंत म्हणजे 781 वर्षे शासन केले. त्या काळात स्पेनने जगात सगळ्यात जास्त भौतिक प्रगती केलेली होती. मात्र ती प्रगती त्यांच्या कामी येवू शकली नाही. जेव्हा त्यांची नैतिक शक्ती खचली तेव्हा शासन करण्याचा त्यांचा प्रयत्न स्थानिक जनतेने उधळून लावला. इतका की ज्या स्पेनवर त्यांनी 781 वर्षे राज्य केले त्या स्पेनला त्यांना रडत-रडत सोडून मायदेशी परतावे लागले.             याचाच अर्थ असा की, माणसाला सुखी बनविणाऱ्या वस्तू मुबलक व धन अमाप प्रमाणात उपलब्ध असेल आणि हाती सत्तासुद्धा असेल मात्र समाज आतून नैतिकदृष्ट्या खचलेला असेल तर तो समाज फार काळ सुखी राहू शकत नाही. प्रगत समाज सार्थक जीवन जगू शकतो, हे गृहितकच मुळात चुकीचे आहे. पैशानी महागडे पलंग व गादीतर विकत घेता येते पण झोप विकत घेता येत नाही. माणसाला श्रीमंत बनविणाऱ्या गोष्टी त्याच्या आत असतात. ज्या प्रमाणे सदृढ शरिरासाठी पेशींची वाढ आवश्यक असते पण पेशी जेव्हा अनियंत्रित वाढू लागतात तेव्हा त्यांचे रूपांतर कर्करोगात होते. त्याचप्रमाणे गतीशील भौतिक प्रगती माणसासाठी आवश्यकत असते पण अनियंत्रित भौतिक प्रगती ही सुद्धा समाजासाठी कर्करोगाएवढी धोकादायक असते. म्हणूनच इस्लाममध्ये माणसाच्या जीवनाशी निगडीत कोणत्याही गोष्टींची वाढ अनियंत्रित होणार नाही, यासाठी शरियतने चेक आणि बॅलेन्सची एक परिपूर्ण संहिताच दिलेली आहे.                 पाश्चिमात्य देशांना इस्लाम न आवडण्यामागचं पहिलं कारण व्याज आहे. सामान्य लोकांमध्ये असा एक समज दृढ झालेला आहे की, पाश्चिमात्य देशांमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन जनतेमध्ये जो वाद आहे तो धार्मिक आहे. हा समज चुकीचा आहे. इस्लाम हा बायबलला ईश्वरीय ग्रंथ म्हणून मान्यता देतो. मदर मेरीला पवित्र माता म्हणून मान्यता देतो. येशू ख्रिश्तांना प्रेषित म्हणून मान्यता देतो. याच कारणाने आजही अनेक मुस्लिम मुलींची नावे मरियम (मेरी) आणि अनेक मुलांची नावे इसा (येशू) मोठ्या श्रद्धेने ठेवली जातात. ख्रिश्चन लोकांना कुरआनने, ”अहले किताब” म्हणजेच एका धर्मग्रंथाला माणणारेे म्हणून संबोधले आहे व त्यांच्याशी रोटी-बेटी व्यवहार करण्याची परवानगी दिलेली आहे. मुस्लिमांच्या मनात ख्रिश्चन धर्माविषयी कुठलीही विरोधाची भावना नाही. त्यांचा ख्रिश्चन नागरिकांना जो विरोध आहे तो यासाठी आहे की, त्यांनी बायबलच्या मूळ शिकवणीचा त्याग करून स्वतःच्याच मनाने एक नवीन जीवन पद्धती सुरू केलेली आहे, ज्याला भांडवलशाही असे म्हणतात. विरोध आहे तो या जीवन पद्धतीला आहे.  भांडवलशाही व्यवस्थेचा शोध ख्रिश्चनांनीं लावला व या पद्धतीला जगातील सर्वच देशांनी स्विकारले. या भांडवलशाही व्यवस्थेला इस्लामचा विरोध आहे. कारण ही व्यवस्था त्रुटीपूर्ण व शोषणावर आधारित व्यवस्था आहे. व्याज या व्यवस्थेचा पाठीचा कणा आहे. इस्लामची अशी शिकवण आहे की, व्याज हराम आहे. कारण व्याजामुळे गरीबांचा सर्वनाश होतो.
    खरे पाहता व्याजामुळे जगातील कुठल्याही देशात जेवढी हानी झाली तेवढी मागे लढल्या गेेलेल्या दोन महायुद्धातही झाली नसावी. आर्थिक कारणावरून रोज होणाऱ्या आत्महत्या, व्याजाधारित भांडवलशाही व्यवस्था चुकीची आहे, यावर शिक्कामोर्तब करतात. तरीपण लोभी लोक भांडवलशाही व्यवस्थेलाच कवटाळून बसलेले आहेत. इस्लामचा याला विरोध आहे, त्याला व्याजमुक्त अर्थव्यवस्था हवी. ज्यामुळे आत्महत्या करण्यासाठी लोक विवश होणार नाहीत. समाजातील सर्व लोकांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे प्रगती करण्याची संधी मिळेल. व्याजामुळेच अनेकांची संधी हिरावून घेतली जाते. शिवाय, व्याजामुळे माणसाचे मन कठोर होते आणि त्यात इतर अपप्रवृत्तींचा शिरकाव होतो. व्याजामुळे मुठभर लोकांच्या हातात विनासायास प्रचंड संपत्ती येते तर बहुसंख्यांच्या हातात प्रचंड कष्टानंतरही गरजेपुरता पैसा येत नाही. खराबीची सुरूवात येथूनच होते. याच विषमतेतून मग सर्वप्रकारचे अपराध, वेश्यावृत्ती, खोटारडेपणा, अश्लिलता, विश्वासघात, भ्रष्टाचार आदी विकारांचा जन्म होतो.
    या व्यवस्थेत श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत जातात. हे सर्व होतांना बहुसंख्य लोक उघड्या डोळ्यांनी ठीक त्या पद्धतीने पाहतात ज्या पद्धतीने शक्तीशाली सिंह हरणाच्या पाडसाला त्यांच्या कळपातून ओढून घेवून जातांना हरिणांचा कळप असहाय्यपणे पाहत राहतो, त्यांना काहीच करता येत नाही. या विवशतेमधून त्यांच्यातील काही लोक नाईलाजाने हत्यार उचलतात व नक्षलवादी बनतात तर ज्यांच्यात हत्यार उचलण्याची हिम्मत नसते ते आत्महत्या करून या आर्थिक पिळवणुकीतून आपली सुटका करून घेतात. इस्लामला हे दोन्ही पर्याय मान्य नाहीत. तो हत्यार उचलण्याचेही समर्थन करत नाही व आत्महत्या करण्याचेही समर्थन करत नाही. तो माणसाच्या सद्प्रवृत्तींना साद घालतो व व्याजरहित अशा एका शुद्ध अर्थव्यवस्थेकडे बोलावितो. ज्यामध्ये माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळेल. ज्यात व्याजाचा नाश होईल व अर्थव्यवस्था नैसर्गिकरित्या वाढेल. संपत्ती सर्वांच्या हाती येईल. व्याजामुळे अर्थव्यवस्थेची गती कृत्रिमरित्या वाढते. म्हणून त्या गतीने गरीबांना पळता येत नाही व ते मागे पडत जातात. याउलट व्याजमुक्त अर्थव्यवस्थेची गती नैसर्गिक असते म्हणून गरीबांना सुद्धा त्या गतीबरोबर चालता येते, ते मागे पडत नाहीत व समाजातील सर्व घटकांचा संतुलित विकास होतो. हाच विकास खरा विकास असतो. कारण यातूनच सामाजिक संतुलन साधले जाते. यात श्रीमंतांना आपली श्रीमंती वाढविण्याचीही संधी असते मात्र त्यांना अवाजवी गती गाठता येत नाही, कारण व्याजरूपी इंधन त्यांना मिळत नाही. आपल्या नैसर्गिक क्षमतेनेच त्यांना श्रीमंती वाढवावी लागते. गरीबांना केवळ ते संसाधनविहीन आहेत म्हणून प्रगतीपासून रोखता येत नाही. त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे प्रगती करता येते. कारण व्याजाचा अडसर नसल्यामुळे त्यांच्या प्रगतीला अनावश्यक बाधा पोहोचत नाही.
    मात्र प्रत्येक देशातील व प्रत्येक समाजातील (त्यात काही मुस्लिमही आले) लोकांना हा संतुलित विकास आवडत नाही म्हणून त्यांना इस्लाम आवडत नाही. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये श्रीमंतांना आपले श्रेष्ठत्व सिद्ध करावयाचे असते. येथेच इस्लाम आणि श्रीमंतांचा संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष मुळात सुरूच होवू नये, यासाठी श्रीमंत लोक इस्लामचा द्वेष करतात.
    इस्लाम न आवडण्याचे एक कारण हे सुद्धा आहे की, इस्लाम दारू, ड्रग्स, संगीत, सिनेमा, सिरियल्स, वेश्याव्यवसाय, फॅशन इत्यादी अनुत्पादक मात्र प्रचंड उत्पन्न देणाऱ्या मात्र त्याचवेळेस समाजाचे तेवढेच नुकसान करणाऱ्या उद्योगधंद्यांचा विरोध करतो. बुद्धिमान वाचक हे जाणूनच आहेत की, हे ’धंदे’ समाजातील सत्तेची सुत्रे ज्यांच्या हाती आहेत त्यांची किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचीच असतात. इस्लामी व्यवस्था समाजात प्रस्थापित झाली तर ह्यांचे हे ’धंदे’ बंद पडतात. म्हणून या लोकांना इस्लाम आवडत नाही.
    इस्लाम सर्वांना एका आई-वडिलाची लेकरे समजतो. म्हणून एकीकडे गरीबांना जकातच्या माध्यमातून ’अपलिफ्ट’ करण्याची व्यवस्था करतो तर दूसरीकडे श्रीमंतांकडून जकात, सदका, फितरा इत्यादी करांच्या माध्यमातून त्यांची श्रीमंती नियंत्रित करतो. एकंदरित समाजातील सर्व घटकांच्या योग्य विकासाचे मॉडेल देतो म्हणून प्रस्थापितांना तो आवडत नाही.
    कुठल्याही समाजात अनैतिक व्यवस्था फोफावली की त्याचा पहिला बळी स्त्रीवर्ग ठरतो. व्याजाच्या माध्यमातून आलेल्या प्रचंड पैशामुळे श्रीमंतांच्या सुप्त इच्छांना धुमारे फुटतात व त्यातून चंगळवादाची पायाभरणी होते. चंगळ म्हटले की, त्याची सुरूवात संगीतापासून होवून शेवट स्त्री च्या उपभोगामध्ये होतो. दरम्यान, नशा, फॅशन, अश्लिलता असे अनेक टप्पे येतात आणि समाजाचे कायमचे घटक बनून जातात. आणि समाज हळूहळू अनैतिकतेच्या गर्तेत जातो. या दुष्टचक्रात गरीबांच्या मुली अडकत जातात. मग समाजात महिलांचा उपयोग मनोरंजनासाठी केला जातो. त्यांना त्यांच्या मूळ जबाबदारीपासून बाजूला करून भलत्याच कामासाठी त्यांचा वापर होतो. म्हणजे पुन्हा- पुन्हा आई बनण्याचा त्यांचा निसर्गदत्त अधिकार हिरावून घेतला जातो व देशाला सातत्याने सुसंस्कृत नागरिक पुरविण्याच्या त्यांच्या मूळ जबाबदारीपासून त्यांना वेगळे करून इतर कामामध्ये जुंपल्यामुळे त्यांच्या उदरातून भ्रष्ट व लिंगपिसाट नागरिक मोठ्या प्रमाणात जन्माला येतात. इतर कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आई म्हणून मुलांवर संस्कार करतांना तीची तारांबळ उडते व परिणामी मुले उनाड होत जातात. मग भांडवलशाहीमध्ये अशा तरूणांना कायदे करून आवर घालण्याचा प्रयत्न केला जातो जो की कधीच यशस्वी होत नाही. मनुष्य एक असा अजब प्राणी आहे की ज्याला कायदा, कोर्ट, पोलीस कधीच नियंत्रित करू शकत नाहीत. तो स्वतःच स्वतःला नियंत्रित करू शकतो ही बाब इस्लाम ओळखतो आणि त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीला साद घालतो व अगदी लहानपणापासून चांगले शरई संस्कार करून चांगले नागरिक देशाला पुरविण्याची जबाबदारी आई या घटकावर टाकतो. इस्लाममध्ये बदलत्या काळाप्रमाणे माणसे घडविण्याची अजब शक्ती आहे. इस्लाम एक मानवकल्याणाची परिपूर्ण अशी जागतिक व्यवस्था आहे. त्याची अचूक अशी सैद्धांतिक मांडणी विसाव्या शतकाच्या मध्यात जमाअते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांनी आपल्या 103 पुस्तकांच्या माध्यमातून करून ठेवलेली आहे. फाळणीनंतर अशी व्यवस्था निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न पाकिस्तानचा दगलबाज राष्ट्रप्रमुख जनरल अय्युब खान व त्याच्या कंपुतील लोकांनी उधळून लावला. याच मांडणीवर मध्यपुर्वेतील अनेक देशांनी आदर्श समाज घडविण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र तो ही पाश्चिमात्य देशांनी आपल्या मुस्लिम हस्तकांमार्फत उधळून लावला. बुलेट असो का बॅलेट असो, कोणत्याही मार्गाने व्याजमुक्त नैतिक व मानवकल्याणकारी खिलाफत व्यवस्था, म्हणजे इस्लामी लोकशाही, जगात कुठेच अस्तित्वात येणार नाही यासाठी हे लोक रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून प्रयत्नशील असतात. आपल्या हाती असलेल्या मीडियाच्या माध्यमातून सातत्याने इस्लामची बदनामी करत असतात. यासाठीच मुस्लिमांच्या विविध घटकांना आपसात कायम झुलवित ठेवतात. दोघांनाही हत्यार पुरवितात. त्यांना हिंसेसाठी प्रोत्साहित करतात. येनकेनप्रकारेन जगासमोर इस्लामचा चेहरा जेव्हा-जेव्हा येईल तेव्हा-तेव्हा तो हिंसकच राहील, याची दक्षता ते घेत असतात.    इस्लाममध्ये स्त्री पुरूष संबंधांबाबत अतिशय कठोर असे नियम आहेत. इस्लामी व्यवस्थेमध्ये मुक्त लैंगिक संबंधाना वास नसतो म्हणून समाजातील गैराती प्रवृत्तीच्या लोकांचा या व्यवस्थेत जीव गुदमरतो. म्हणून अशा लोकांना इस्लाम आवडत नाही. इस्लाममध्ये भ्रष्टाचाराला कडक शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे पाश्चिमात्य जगातील भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांना इस्लाम आवडत नाही. इस्लामला कायद्याचे नव्हे तर न्यायाचे राज्य अभिप्रेत आहे. यासाठी कठोर कायदे व गतीशील न्यायव्यवस्थेची रचना इस्लाम सुचवितो. म्हणून पाश्चिमात्य समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना इस्लाम आवडत नाही.
    इस्लाममध्ये नैतिकतेला सर्वोच्च प्राधान्य आहे. पाश्चिमात्य व्यवस्था ही आपल्या नागरिकांना कायद्यात पकडते तर इस्लामी व्यवस्था ही आपल्या नागरिकांना नैतिकतेत पकडते. कायदा तर शेवटी येतो. इस्लामच्या माध्यमातून नैतिकतेचा सामाजिक दबाव एवढा प्रचंड तयार होतो की माणसांना अनैतिक आचरण करणेच अशक्य होवून जाते. पाश्चिमात्य समाजामध्ये अनैतिक गोष्टींना फारश्या गांभीर्याने घेतले जात नाही. म्हणून त्यांना इस्लाम आवडत नाही. ही आणि अशी बरीच कारणे आहेत ज्यामुळे पाश्चिमात्य देशांना व त्याच प्रवृत्तीच्या इतर देशांनाही इस्लाम आवडत नाही. आपल्या देशातही हीच परिस्थिती आहे. एकीकडे इंग्रजांच्या जुल्मी सत्तेला हजारो जीवांचा बळी देऊन उलथून टाकण्यात आले तर दूसरीकडे त्यांची शासन पद्धती, भाषा, पेहराव, खान-पान, सवयी, शिक्षण पद्धती, कायदे व न्याय पद्धती स्वीकारण्यात आली. मात्र मुस्लिमांनी न्याय शासन करूनही त्यांच्या जीवनपद्धतीला नाकारण्यात आले, ते याच मानसिकतेतून. वास्तविक पाहता ही, ” हक और बातिल” अर्थात सत्य आणि असत्यामधील लढाई आहे. ही लढाई प्रलयाच्या दिवसापर्यंत सुरू राहणार. श्रद्धावंत मुस्लिम इस्लामी जीवन पद्धतीचा पुरस्कार करीत राहणार तर पाश्चिमात्यांसह इतर समाजातील लोक त्याचा विरोध करीत राहणार.
    अशा या जागतिक भांडवलशाही संरेचनमध्ये गांधींचा अहिंसेचा वारसा लाभलेल्या देशात राहणाऱ्या मुस्लिमांना ही संधी नैसर्गिकरित्याच उपलब्ध आहे की, आपल्या वाणी आणी आचरणाने त्यांनी कल्याणकारी इस्लामी जीवन व्यवस्थेचा परिचय जगाला करून द्यावा. आव्हान मोठे आहे म्हणूनच ते पेलण्यासारखे आहे. जय हिंद!
 

- एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget