Halloween Costume ideas 2015

लोकांचे नेता व सेनापती : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय अबू बक्र सिद्दीक (रजि.) यांचे पुत्र अब्दुर्रहमान यांच्या कथनानुसार, सुफ्फावाले गरीब लोक होते. एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याच्या घरात दोन मनुष्यांचे  अन्न आहे त्याने येथून तिसऱ्याला घेऊन जावे आणि ज्याच्याजवळ चार मनुष्यांचे अन्न आहे त्याने एक अथवा दोन मनुष्यांना घेऊन जावे.’’ तेव्हा माझ्या वडिलांनी (अबू बक्र (रजि.)  यांनी) आपल्या घरी तीन लोकांना आणले आणि पैगंबरांनी आपल्या घरात दहा लोकांना नेले. (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) लोकांचे नेता व सेनापती होते. जर त्यांनी त्यांच्या घरी दहा लोकांना घेऊन गेले नसते तर सर्वसामान्य लोक दोन, चार, सहा आणि आठ लोकांना आनंदाने का  घेऊन जातील. कायद्यानुसार जबाबदार लोकांनी त्याग व बलिदान केले तर त्याच्या मागे चालणाऱ्यांमध्ये अधिकाधिक त्याग व बलिदानाची भावना उद्दिपित होईल. पुढे चालणारेच जर मागे राहिले तर मागे चालणाऱ्यांमध्ये आणखीन मागे जाण्याच्या भावनेस चालना मिळेल.
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, इस्लामकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने पैगंबर मुहम्मद (स.) लोकांना देत होते. पैगंबरांना जे काही मागण्यात आले, त्यांनी मागणाऱ्याला  ती वस्तू अवश्य दिली. एकदा एक मनुष्य पैगंबरांकडे आला तेव्हा पैगंबरांनी त्याला दोन टेकड्यांदरम्यान चरणाऱ्या सर्व शेळ्या देऊन टाकल्या. तो मनुष्य आपल्या कबिल्यात गेला आणि  म्हणाला, ‘‘हे लोकहो! इस्लामचा स्वीकार करा कारण दारिद्र्य व उपासमारीला न घाबरणाऱ्या मनुष्यासारखे मुहम्मद (स.) देतात.’’
कथनकार (माननीय अन रजि.) पुढे म्हणतात की मनुष्य फक्त जगाच्या इच्छेपोटी ईमान बाळगतो, परंतु अधिक काळ लोटला नाही तोच इस्लाम त्याच्या आत्म्यामध्ये पैगंबरांच्या  शिक्षण व प्रशिक्षणाद्वारे प्रवेश करतो आणि जग व जगातील साधनसामुग्रीपासून इस्लामच्या दृष्टीने अधिक प्रिय बनतो. (हदीस : मुस्लिम)
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, एका ‘नबी’ (पैगंबर)चा परिचय करून देताना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ते दृष्य माझ्या डोळ्यांसमोर आहे.’’  पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘धर्माचा प्रसार (आवाहन) करण्याच्या अपराधापोटी त्या ‘नबी’च्या समुदायातील लोकांनी त्यांना इतके मारले की ते रक्तबंबाळ केले आणि ‘नबी’ची स्थिती अशी होती की त्यांनी आपल्या चेहऱ्यावरील रक्त पुसत पुसत म्हणायचे की हे अल्लाह! माझ्या समुदायाचा हा अपराध क्षमा कर. (आणि आता यांच्यावर प्रकोप कोसळवू नकोस.) कारण हे लोक  अज्ञान आहेत, सत्य स्थिती जाणत नाहीत.’’ (हदीस : बुखारी)
माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘तुम्हाला कधी उहुदच्या दिवसापेक्षा अधिक कठीण व त्रासदायक एखादा दिवस कंठावा लागला  आहे काय?’’ पैगंबर म्हणाले की आएशा (रजि.)! तुमच्या कुरैश समुदायाकडून मला खूप त्रास झाला आणि सर्वांत अधिक कठीण व त्रासदायक दिवस कंठावा लागला तो उ़कबाचा दिवस होता. त्या दिवशी मी स्वत:ला अब्द या लैल इब्ने अब्द किलालसमोर सादर केले, परंतु जे काही मला हवे होते ते देण्यास त्याने नकार दिला. तेव्हा मी बेचैन होऊन आणि विचार करीत  तेथून निघालो. जेव्हा मी करनुस्सआलिब पोहोचलो तेव्हा दु:ख थोडे कमी झाले, मग मी आकाशाकडे पाहिले तेव्हा मला जिब्रिल (अ.) दिसले. त्यांनी मला हाक मारून म्हटले, ‘‘तुमच्या समुदायाने जे काही तुम्हाला सांगितले आणि ज्याप्रकारे त्यांनी तुमच्या वक्तव्याचे उत्तर दिले आहे ते अल्लाहने ऐकले आणि अल्लाहने तुमच्याकडे डोंगरांचे नियोजन करणारे देवदूत  पाठविले आहेत. तुम्हाला वाटेल तो यांना आदेश द्या, ते सत्याला नाकारणाऱ्यांच्या बाबतीत तुमचा आदेश स्वीकारतील.’’ मग मला डोंगरांच्या देवदूताने हाक दिली, सलाम केला आणि  म्हटले, ‘‘अल्लाहने ऐकले आणि मला डोंगरांच्या नियोजासाठी पाठविण्यात आले आहे आणि माझ्या पालनकर्त्याने मला तुमच्याकडे पाठविले आहे जेणेकरून तुम्ही मला जो आदेश  इच्छित असाल तो द्या आणि जे काही तुम्हाला हवे आहे ते सांगा. हवे तर दोन्हीकडील डोंगरांना मी अशाप्रकारे जवळ करीन की हे लोक त्यांच्या दरम्यान चिरडले जातील.’’ पैगंबर  म्हणाले, ‘‘नाही. त्याऐवजी मला अशी अपेक्षा आहे की त्यांच्या अपत्यांपैकी असे लोक असतील जे फक्त अल्लाहची भक्ती करतील, त्याच्याबरोबर कोणालाही भागीदार बनविणार  नाहीत.’’
(हदीस : बुखारी, मुस्लिम)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget