Halloween Costume ideas 2015

इस्लामी चळवळीचा तारा निखळला!

जमाअत-ए- इस्लामी हिंदच्या शिक्षणविभागाचे माजी सचिव अशफाक अहेमद यांचे निधन

अशफाक अहेमद हे एक अतिशय प्रामाणिक आणि गंभीर प्रवृत्तीचे व्यक्ती होते. शिक्षण व प्रशिक्षण घेण्यात व देण्यात त्यांचा हतकंडा होता. माझा त्यांच्याशी संबंध मी एसआयओमध्ये असतांनापासूनचा होता. प्रत्यक्ष संबंध येण्यापूर्वीसुद्धा मी त्यांना जमाअते इस्लामी हिंदचे एक आदरणीय सदस्य म्हणून ओळखत होतो. मात्र ज्यावेळेस ते एसआयओचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा मी महाराष्ट्र जमाअते इस्लामी हिंदच्या कार्यालयात सचिव म्हणून कार्यरत होतो. जेव्हा मी दिल्ली मुख्यालयात गेलो तेव्हा मी त्यांच्या शेजारच्याच खोलीत राहत होतो. तेव्हा माझा त्यांच्याशी रास्त संबंध आला. त्यांनी आणि मी दोघांनी ताबीश मेहदी साहेबांकडून कुरआनचे उच्च दर्जाचे ज्ञान प्राप्त केले आहे. त्यासाठी ताबीश साहेब आम्हाला त्यांच्या सवडीनुसार कधी उशीरा रात्री तर कधी भल्या पहाटे फजरपूर्वी बोलवून घेत. अशफाक साहेब मला घेऊन बरोबर वेळेवर जात होते. हे शिक्षण तब्बल दोन वर्षे चालले आणि आम्ही कुरआनच्या सखोल ज्ञानापर्यंत पोहोचलो.
    सेवानिवृत्तीनंतर औरंगाबादला परत आल्यावर या वयात सुद्धा त्यांनी जामियतुल सुफ्फामध्ये अरबी भाषेच्या कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. सतत शिकत राहण्याचा त्यांचा गुण वाखाण्याजोगा होता. औरंगाबाद येथील अल हिरा या प्रथितयश शिक्षण संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांचा कल इस्लामी मुल्यांना शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमामध्ये सामील करण्याकडे होता. त्यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतलेले अनेक शिक्षक आणि जमाअतचे सदस्य हे भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले असून, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते आपली सेवा बजावत आहेत. शिक्षणामध्ये त्यांची विलक्षण रूची पाहून जमाअतनेही त्यांना शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून नेमले होते. त्यांच्यापूर्वी अफजल हुसैन यांना जमाअतमध्ये शिक्षणतज्ज्ञ मानले जाई. सुरूवातीला अशफाक साहेबांनी त्यांचे सहाय्यक म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम सुरू केले. त्यांनी तयार केलेला अभ्यासक्रम मर्कजी मक्तबा तर्फे प्रकाशित करण्यात आला असून, त्यामध्ये त्यांनी अनेक सुधारणा केल्या. शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे कामही त्यांनी खूबीने केले. अमीरे जमाअत यांच्या अनुपस्थितीत मुख्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांचे आदरातिथ्य करून त्यांची कामे ते हिरहिरीने करीत. एक मोठा काळ त्यांनी मर्कजमध्ये घालविला. ते एक त्यागी व्यक्तीमत्व होते. कसलीही कौटुंबिक अडचण आली तरी ते कार्यालयातूनच हाताळत. कोणतेही दिलेले काम ते जबाबदारीने पार पडत.
    त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे वैशिष्ट्ये हे ही होते की, त्यांच्यासमोर कोणाविषयी वाईट बोलल्याचे त्यांना खपत नसे. त्यांच्या मनामध्ये इतरांबद्दल प्रेमच होते. त्याचा अनुभव मला त्यांच्यासोबत राहतांना आला. त्यांच्यासारखा मेहमान नवाज व्यक्ती मी पाहिला नाही. भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांचे आतिथ्य ते आवर्जुन करत. त्यामुळे दिल्लीत बाहेरून येणाऱ्या लोकांना त्यांचा मोठा आधार होता. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून मला भ्रमणध्वनी येत आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. मला तर ते मोठ्या भावासारखे होते. त्यांनी मानसशास्त्रामध्ये एम.ए. केले होते. त्यामुळे त्यांना लोकांची मानसिकता चांगल्या प्रकारे समजत होती. दुर्देवाने त्यांना एसआयओमध्ये असतानाच मधुमेह झाला होता. त्यांना इन्सुलीन घ्यावे लागत होते. मध्ये त्यांना पक्षाघातही झाला होता. एवढ्या व्याधी असतांनासुद्धा ते सतत शैक्षणिककार्यात व्यस्त राहत. शुक्रवार, 20 ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले त्या दिवशीसुद्धा ते सकाळी रूग्णालयात जावून स्वतःची टू-डी चाचणी करून आले होते. शुक्रवारची नमाज अदा केली आणि तीन वाजेपासून शैक्षणिक संस्थेची बैठक घेत होते. घरी गेल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांचे निधन झाले. इन्नालिल्लाहि व इन्ना इलैहि व राजेऊन.
    हजला गेलेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर स्मितहास्य असलेला चेहरा मी व्हॉटस ऍपवर पाहिला होता. अशफाक अहेमद साहेबांच्या अंत्यविधीमध्ये मी सामील होतो. यावेळी त्यांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य होते. हे पाहून माझ्या मनाला समाधान वाटले.
    मी त्यांच्यासाठी दुआ करतो की, अल्लाहने त्यांनी केलेल्या सेवेचा स्विकार करावा आणि त्यांना जन्नतमध्ये उच्च सन्मान अता करावा. आमीन.

- तौफिक असलम खान
प्रदेशाध्यक्ष जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget